दिल्ली मद्य घोटाळा केजरीवाल निर्दोष

निकालानंतर धाय मोकलून रडले

दिल्ली: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदियांची न्यायालयाने दिल्ली मद्य घोटाळ्यातील सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर केजरीवाल मिडीयाला प्रतिक्रीया देताना धाय मोकलून रडले. मुख्यमंत्री पदावर असताना या मध्य घोटाळा प्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक करून सहा महिने तुरुंगात डांबले होते.

निकाल देताना न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की केवळ दावे पुरेसे नाहीत. न्यायालय केवळ ठोस आणि ठोस पुराव्यांद्वारेच निकाल देऊ शकते. न्ययालयाने म्हटले की तपास यंत्रणेने सादर केलेले पुरावे कमकुवत आणि अपुरे होते. प्रथम, न्यायालयाने उत्पादन शुल्क विभागाचे माजी आयुक्त कुलदीप सिंग यांना निर्दोष मुक्त केले. त्यानंतर, मनीष सिसोदिया यांना दिलासा मिळाला आणि त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनाही निर्दोष मुक्त करण्यात आले.

न्यायालयाच्या निकालानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना म्हणाले, आम्ही नेहमी सांगायचो सत्याचा विजय होतो. आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. ज्या न्यायमूर्तींनी आमच्यासोबत न्याय केला त्यांचे धन्यवाद… सत्याचा विजय झाला, मी नेहमी सांगायचो भगवान आमच्यासोबत आहे. मोदीजी आणि अमित शाह यांनी स्वतंत्र भारतातील सर्वात मोठं राजकीय षडयंत्र रचलं. आम आदमी पार्टीला संपवण्यासाठी पक्षाच्या सर्वात मोठ्या पाच नेत्यांना तुरुंगात टाकलं. विद्यमान मुख्यमंत्र्याला घरातून फरफटत नेऊन तुरुंगात टाकलं, सहा महिने आत ठेवलं गेलं.जे भारताच्या इतिहासात कधी घडलं नाही. केजरीवाल भ्रष्ट नाही.. केजरीवाल भ्रष्ट नाही. मी माझ्या आयुष्यात इमानदारी कमावली. यांनी खोटी केस लावली, ते आज सिद्ध झालं. कोर्टानं म्हटलं केजरीवाल कट्टर इमानदार,मनीष सिसोदिया कट्टर इमानदार आहेत. आम आदमी पार्टी कट्टर इमानदार आहे.

भाजप १० पेक्षा जास्त जागा जिंकल्यास राजकारण सोडेन- अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली :  निर्दोष मुक्तता झाल्यानंतर केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज दिलं आहे. दिल्लीत तुम्ही निवडणूक घ्या, भाजपच्या १० पेक्षा अधिक जागा निवडून आल्यास राजीनामा देईन, असं केजरीवाल म्हणाले. मोदी आणि अमित शाह यांनी देशाची माफी मागावी, असं देखील केजरीवाल म्हणाले.

अरविंद केजरीवाल म्हणाले कोर्टाचा निकाल ऐतिहासिक आहे. हे पूर्ण षडयंत्र नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी रचलं. त्यांनी पूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे. दोघांनी मिळून षडयंत्र रचलं आणि आम आदमी पार्टीला संपवण्याचा प्रयत्न केला. असा आरोपही केजरीवाल यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *