कन्नौज: उत्तर प्रदेशात भाजपाचा सर्वात मोठा पराभव होणार आहे, कारण उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीचे वादळ येत आहे, असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये आयोजित प्रचार सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधाला. ते म्हणाले, ” मोदींनी १० वर्षे अदानी आणि अंबानींचे नाव घेतले नाही, परंतु जेव्हा ते घाबरले तेव्हा त्यांनी त्यांच्या दोन मित्रांची नावे घेतली आणि सांगितले की, या आणि मला वाचवा. इंडिया आघाडीने मला घेरले आहे.” नरेंद्र मोदी यावेळी पंतप्रधान होणार नाहीत, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. ते पुढे म्हणाले, “१० ते १५ दिवसात तुम्हाला दिसेल की, तुमची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले जातील, परंतु विचलित होऊ नका. आमचा मुद्दा भारतीय संविधानाचा आहे. या संविधानाने दलित आणि मागासवर्गीयांना अधिकार दिले आहेत.” नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, भाजपाने ठरवले आहे की, ते संविधान रद्द करणार आहेत, पण आम्ही हे होऊ देणार नाही. मतदानासह इतर अधिकारही संविधानानेच दिले आहेत. ही महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांची देणगी आहे. तसेच, नरेंद्र मोदी २२ लोकांसाठी काम करतात, असेही राहुल गांधी म्हणाले. याचबरोबर, नरेंद्र मोदींनी या २२ लोकांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. नरेंद्र मोदींनी तुमचे किती कर्ज माफ केले आहे? असा सवाल करत हे केंद्र सरकार दलित, मागासवर्गीय, शेतकरी, मजूर यांचे नाही, असे राहुल गांधी म्हणाले.