प्रसिद्ध यूट्यूबर निकुंज लोटिया -बीयुनीक यांचा टॉक शो डोंबिवली : डोंबिवलीत सुरू असलेल्या आगरी महोत्सवात प्रसिद्ध यूट्यूबर निकुंज लोटिया-बीयुनीक यांच्या टॉक-शो मध्ये नव्या पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच मार्केटिंगच्या तंत्राची ओळख करुन देण्यात आली. आता सोशल मीडियात `एआय’ची नवी क्रांती येणार असून, नव्या पिढीने `एआय’ तंत्र आत्मसात केल्यास भविष्य उज्जवल होईल, असे आवाहन निकुंज यांनी केले. आगरी समाजाबरोबरच राज्यातील तरुणांना सोशल मीडियाबाबत मार्गदर्शन मिळावे, यासाठी आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, सरचिटणीस रामकृष्ण पाटील यांच्यासह पांडुरंग म्हात्रे, रंगनाथ ठाकूर, दत्ता वझे, जालिंदर पाटील, गजानन मंगरूळकर, बंडू पाटील, भास्कर पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीकर रहिवाशी व लाखो फॉलोअर्स असलेल्या निकुंज लोटिया-बीयुनीक यांना निमंत्रित केले होते. मंडळाचे ज्येष्ठ सदस्य शरद पाटील यांनी खुमासदार शैलीत निकुंज यांची मुलाखत घेत सोशल मीडियातील आव्हाने, कार्य आणि अपेक्षित उत्पन्नाबाबत तरुणांच्या विविध प्रश्नांना उत्तरे मिळवून दिली. डोंबिवलीतील रहिवाशी असलेल्या निकुंज लोटिया यांचे जगभर लाखो फॉलोअर आहेत. त्यांची प्रत्यक्ष मुलाखत ऐकण्यासाठी आगरी महोत्सवात तरुणांची गर्दी झाली होती. अत्यंत साध्या सोप्या शैलीत निकुंज यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. आम्ही दहा वर्षांपूर्वी सोशल मीडियावर काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी यूट्यूब हे माध्यम नवीन होते. पण मेहनतीने आम्ही आता स्थिरावलो. पण दररोज आव्हाने उभी आहेत. दर्शकांच्या अपेक्षा वाढत आहेत. सोशल मीडियामध्ये करिअरसाठी येणाऱ्या तरुणांनी आपल्याला अन्य मार्गाने निश्चित उत्पन्न मिळेल, याची तरतूद करावी. त्यानंतर सोशल मीडियात काम सुरू करावे. आता सोशल मीडियात सध्या असलेल्या माध्यमांऐवजी भविष्यात `एआय’ तंत्रज्ञानाचा बोलबाला असेल. त्यात तरुणांनी एकाग्रता व मेहनत घेऊन दररोज एक तास व्हिडिओ पाहून नवे तंत्र आत्समात करावे. नोकिया ही सर्वश्रेष्ठ मोबाईल कंपनी होती. पण अॅड्राईड आल्यानंतर त्यांनी बदल न केल्यामुळे ते नामशेष झाले. त्यामुळे जीवनात बदल हे करीत राहावे, असे आवाहन निकुंज यांनी केले. तुम्ही करीत असलेल्या व्हिडीओमुळे किती जणांचे समाधान होते, ते महत्वाचे आहे. दर्शकांना होणाऱ्या फायद्यातून तुमचे त्यांच्या मनातील स्थान पक्के होईल. दर्शक (व्ह्यूअर्स) वाढविणे, हे टार्गेट ठेवू नये. तुम्ही कामामध्ये उत्साह व नवनव्या कल्पना मांडल्यास तुम्हाला यश मिळेल, असा मंत्र निकुंज यांनी दिला. अविनाश-विश्वजीतच्या संगीताने रसिक मंत्रमुग्ध प्रसिद्ध मराठी चित्रपटातील संगीतकार अविनाश-विश्वजीत यांनी सादर केलेल्या संगीताने रसिक मंत्रमुग्ध झाले. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या प्रायोजकत्वाखाली या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका जुईली जोगळेकर, रोहित राऊत, मनिष राजगिरे, रवींद्र खोमणे, संजना अरुण, प्रणव देहेरकर, साक्षी चौहान यांची सुमधुर गीते, हास्यकलाकार सुप्रिया पाठारे, गौरव मोरे, दिगंबर नाईक आणि प्रणव रावराणे यांच्या विनोदी किस्स्याने हास्याचे फवारे उडाले. अमिशिक कामठे व आरती पानसरे यांनी सादर केलेल्या लावण्यांना `वन्स मोअर’ मिळाला. दीप्ती भागवत यांनी संगीत रजनीचे सूत्रसंचालन केले.