Category: पालघर

palghar news

मतदान केंद्रावर संस्कृती, परंपरांचा जागर

कासा : पालघर लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून जागृती करण्यात येत आहे. डहाणूमधील विविध मतदान केंद्रांवर आदिवासी, ग्रामीण परंपरांचे…

विक्रमगड पोलिस ठाण्यातर्फे रूट मार्च

विक्रमगड : पालघर लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने विक्रमगड नगरपंचायत हद्दीत पोलिस ठाण्यातर्फे रूट मार्च काढण्यात आला. पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि उपविभागीय पोलिस अधिकारी पिंगळे यांच्या सूचनेनुसार विक्रमगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च काढण्यात आला. यामध्ये केरळचे सीएफएफचा एक अधिकारी, ५० जवान आणि विक्रमगड पोलिस ठाण्याचे चार अधिकारी, १५ पोलिस सहभागी झाले होते.

गणेशोत्सवापर्यंत मिरा-भाईंदरला ‘सूर्या’चे पाणी

भाईंदर : सूर्या प्रादेशिक पाणी योजनेतून मिराभाईंदर शहराला गणेशोत्सवापर्यंत ४० दशलक्ष लिटर पाणी देण्याचा प्रयत्न केला जाईल. शहराला यापुढे पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

‘आरटीई’च्या निर्णयाने ग्रामीण भागातील पालकांना दिलासा

जव्हार : सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांमुळे तालुक्यातील नागरिकांचे जीवनमान गेल्या काही वर्षांपासून उंचावण्यास सुरुवात झाली आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार या पायाभूत सुविधा योग्यप्रकारे राबविण्यात आल्याने प्रगतीला सुरुवात झाली आहे; परंतु राज्य सरकारने घेतलेल्या ‘आरटीई’च्या खोडसाळ प्रवेशप्रक्रियेमुळे येथील आदिवासी विद्यार्थी हे इंग्रजी माध्यम व दर्जेदार शिक्षणापासून दूर राहण्याची शक्यता होता. स्पर्धेच्या युगात टिकण्यास असमर्थ ठरतील, म्हणून तालुक्यातील आदिवासी पालकांनी एकत्र येऊन काही शैक्षणिक संघटनांचा पाठिंबा घेत या प्रवेशप्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे न्यायालयाने या प्रवेशप्रक्रियेला स्थगिती देऊन जुन्याप्रमाणेच आरटीई प्रवेशप्रक्रिया व्हावी, असे सांगितल्याचे पालकांनी सांगितले. वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध होऊन या स्पर्धेच्या युगात अस्तित्व टिकावे, म्हणून इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के प्रवेश दिला जातो; परंतु सरकारने यंदा लाभार्थ्यांच्या राहत्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावरील इंग्रजी माध्यमाच्या शाळांसह मराठी अनुदानित, विनाअनुदानित व जिल्हा परिषद शाळांनाही ‘आरटीई’चे नियम लागू केले होते. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया मंदावली होती. त्यासाठी मुदतवाढ द्यावी लागली; परंतु स्वयंअर्थसहाय्यित मराठी व इंग्रजी शाळा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. त्यामुळे सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडले. त्यामुळे सरकारने ‘आरटीई’ची प्रवेशप्रक्रिया नव्याने होणार आहे. त्यातून अनुदानित शाळा वगळण्यात येणार असल्याचे जव्हार येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातून सांगण्यात आले. नवीन प्रवेशप्रक्रियेला मंगळवार (ता. १४)पासून सुरुवात झाली आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने केलेली चुकीची अधिसूचना घटनेच्या कलम १४ म्हणजे समानता आणि कलम २१चे उल्लंघन करणारी आहे, असे संघटनेच्या वतीने सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. तरीदेखील वेगवेगळे प्रयोग हे खासगी व इंग्रजी शाळांवर करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागातून होत आहे. जव्हार तालुक्यातील तीन इंग्रजी शाळांत जवळपास ४० विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची संधी गेल्या काही वर्षांपासून मिळत आल्याने शिक्षणात बदल होत गेला. त्यामुळे येथील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा असो किंवा इतर आव्हानात्मक शिक्षणाला पात्र ठरतील. – सचिन चव्हाण, पालक न्यायालयाच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षण संचालकांनी परिपत्रके रद्द करून स्वयंअर्थसहाय्यित शाळांचा समावेश करून पुन्हा प्रवेशप्रक्रिया राबवावी, असे पत्र काढले. त्यामुळे प्रक्रिया सुरू केली जाईल. – पुंडलिक चौधरी, गटशिक्षणाधिकारी, जव्हार

पाकव्याप्त काश्मीर आम्ही मिळवणारच- अमित शाह

पालघर : पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही राहील ही आमची भूमिका असून कोणतीही शक्ती या भूमिकेस आव्हान देऊ शकणार नाही, पाकव्याप्त काश्मीर आम्ही मिळवणारच असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी…

डहाणूला अवकाळीने झोडपले

कासा : डहाणू तालुक्यात सोमवारी (ता. १३) दुपारी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची उन्हाळी भातपिके, गवत व्यापारी, वीट भट्टीचालकांचे चांगलेच नुकसान झाले. मात्र, पावसाच्या माऱ्यामुळे परिसरात गारवा पसरला होता. त्यामुळे उकाड्याने अंगाची काहिली झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला. हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात दोन ते तीन दिवस पाऊस येईल, असा अंदाज व्यक्त केला होता; पण पावसाचे वातावरण नव्हते. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वारा, धुळीचे लोट वाहत ढगाळ वातावरण तयार झाले. विजेचा कडकडाट होत पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी १५ मिनिटे, तर काही ठिकाणी तासभर पाऊस झाला. डहाणू तालुक्यात गंजाड, कासा, धानिवरी या भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याचे प्रमाण जास्त होते. सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांवर उन्हाळी भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी तयार झालेले पीक कापण्यास सुरुवात केली होती. अनेकांनी पिके शेतात सुकत टाकली होती. अचानक आलेल्या पावसाने ती भिजून गेली, तर अनेक वीटभट्टीचालकांची धावपळ उडाली. कच्च्या विटांचे मोठे नुकसान झाले. तयार वीटभट्ट्यांवर सतरंज्या, ताडपत्री टाकण्यासाठी काही काळ मोठी धावपळ उडाली, तर गवत वखारीवाल्यांवरदेखील गवत भिजू नये, म्हणून ताडपत्री टाकण्याची लगबग उडाली. उन्हाळी भातकापणी सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी भातपिके कापून शेतात सुकण्यासाठी ठेवली होती; पण अचानक आलेल्या या पावसाने शेतात पाणी साचून भातपिके भिजून गेली. त्याचप्रमाणे वीटभट्टीचालकांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ऐन हंगामात कच्च्या विटा भिजल्या असून तयार वीटभट्ट्यांचे नुकसान झाले. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका दरवेळी वीटभट्टीचालक, तसेच गवत पावली व्यावसायिकांना बसतो. यामुळे हा व्यवसाय पूर्वी पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत होता; पण आता नुकसानीच्या भीतीने या धंद्यात उतरण्यास कोणी तयार होत नाही. तलासरीमध्ये गारांचा पाऊस तलासरीतील कोचाई गावात वादळी वारा, गारांचा पाऊस पडला. यामुळे अजय छोटू हाडल यांच्या घराचे छप्पर उडाले. पावसाळ्यापूर्वी घराचे मोठे नुकसान झाल्याने भरपाईची मागणी होत आहे. तसेच धानिवरी येथे एका घरावर झाड पडल्याने भिंतीला तडे गेले आहेत.

वीजपुरवठा खंडित झाल्याने जव्हार परिसरात अंधार

जव्हार : गेल्या दोन दिवसांपासून जव्हार, मोखाडा तालुक्यात ढगाळ वातावरण होते. त्यातच काही वेळ कडक ऊन, तर काही वेळ ढगाळ वातावरण अशाप्रकारे सायंकाळपर्यंत ऊन-सावलीचा खेळ सुरू होता; परंतु सोमवारी  दुपारी साडेबारा वाजता वादळी-वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे वातावरण थंड झाले; पण वादळामुळे रस्त्यावरील झाडे कोलमडल्याने, विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित होऊन तालुक्यात अंधार पसरला होता. तालुक्यातील ग्रामीण भागात खेडो-पाड्यांतील बहुतांश घरे विटा, माती, कौलारू, लाकडाची झोपडी, कुडाचे घर अशा ठेवणीची आहेत. गोठ्यांच्या अवतीभोवती पावसाळ्यात बचावासाठी ताडपत्री, प्लास्टिक बांधण्याची तयारी सुरू असताना जनावरांसाठी ठेवण्यात आलेला चारा, चार महिन्यांसाठी गोळा केलेले सरपण आणि पावसाळ्यापूर्वीची कामे मध्यावर असताना आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे सर्वांना बाधित करून अतोनात नुकसान झाल्याचे चित्र ग्रामीण भागात पसरले आहे. तालुक्याची भौगोलिक रचनाच अशी आहे की, डोंगरउतार, दरी खोऱ्यांतील लोकवस्ती आहे. वादळी- वाऱ्यामुळे कित्येक घरांवरील सिमेंट पत्रे उडून गेले, तर काही घरांच्या मातीच्या भिंती पडल्या आहेत. जोरदार वाऱ्यामुळे विजेचे खांब, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून तारांवर पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. महावितरण कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात गती देऊन लवकरच वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे महावितरणचे अधिकारी किरण जाधव यांनी सांगितले.

मोखाड्यात तीन दिवसांपासून नुकसान

मोखाडा : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून विविध परिसरांत वादळासह अवकाळी पावसाने धुमशान घातले आहे. सोमवारी  झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने तालुक्यातील अनेक भागांतील गाव-पाड्यांमधील घरांचे नुकसान केले आहे. पावसाळ्यापूर्वी अवकाळीने घरावरील छप्पर उडवल्याने घराची डागडुजी करण्याचा मोठा प्रश्न आदिवासी बांधवांसमोर उभा राहिला आहे. मोखाडा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी वादळी पाऊस कोसळत आहे. मात्र, सोमवारी तालुक्यातील काही भागांत वादळी, तर काही भागांत गारांचा पाऊस कोसळला. त्यामुळे वेगवेगळ्या भागांत घरांवरील छप्पर उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील आसे आणि चास ग्रामपंचायतीमधील गाव-पाड्यांना सर्वाधिक फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. धामोडी येथील प्रकाश वाजे, तर चास पांगरी येथील ढवळू वाजे यांसह अन्य गाव-पाड्यांतील आदिवासींच्या घरावरील छपरे या वादळी पावसाने उडवली आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच घरावरील छप्पर अवकाळीने उडविल्याने येथील आदिवासींचा संसार उघड्यावर आला आहे. घरांची डागडुजी कशी करायची, असा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. पंचनामे करण्याचे आदेश दरम्यान, नुकसानग्रस्त भागातील माहिती तलाठ्यांकडून येत आहे. तसेच नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना दिल्याची माहिती तहसीलदार मयूर खेंगले यांनी दिली.

पालघर मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार राजेंद्र गावित यांनी आज मुंबईत दादर येथील वसंतस्मृती येथे डीसीएम देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

कपिल पाटील यांच्या रॅलीने वाडा तालुक्यात महायुतीचा झंझावात

वाडा : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी प्रचारासाठी वाडा तालुक्यात काढलेल्या रॅलीने महायुतीचा झंझावात पाहावयास मिळाला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांचे वाडा शहरासह…