‘उत्पादन शुल्क’च्या स्वयंघोषित कर्मचाऱ्याकडून लाखोंची वसुली
अधिकाऱ्यांचे अभय असल्याने शिरजोर योगेश चांदेकर पालघर : उत्पादन शुल्क विभागात कोणत्याही पदावर अधिकृत नियुक्ती नसताना दापचरी सीमा तपासणी नाक्याच्या भरारी पथकात कर्मचारी असल्याचे भासवून लाखो रुपयांची वसुली एक खासगी व्यक्ती करत आहे. अशा प्रकारच्या वसुलीमुळे अवैध मद्य वाहतूक, तस्करी आणि साठा याला चालना मिळत असून उत्पादन शुल्क विभागाच्या धोरणालाच हा हरताळ फासण्याचा प्रकार आहे. पालघर जिल्ह्याच्या काही तालुक्यातील सीमेवर दीव-दमण, दादरा नगर हवेली आणि गुजरात असल्याने या भागातून दीव-दमण बनावटीची दारू महाराष्ट्रात येत असते. बनावट, अवैध मद्य कर चुकवून आणले जाते. उत्पादन शुल्क विभाग बनावट, अवैध मद्य वाहतूक आणि तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत असताना त्यांच्याच विभागातला स्वयंघोषित चालक दत्ता लोखंडे उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी असल्याचे सांगून अवैध बनावट मद्याच्या तस्करीला आणि साठवणुकीला वरकमाईतून प्रोत्साहन देत आहे. अवैध धंद्यांना ‘वरकमाई’तून संरक्षण दत्ता लोखंडे हा अवैध दारू विक्रते यांच्याकडून लाखोंची वसुली करत असून. त्यासाठी संबंधितांना फोन पे आणि गुगल पेद्वारे त्याच्या पत्नीच्या खात्यात पैसे वर्ग करायला सांगतो. काही वर्षे लोखंडे हा एका अधिकाऱ्याच्या हाताखाली खासगी चालक म्हणून काम करत होता. वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर काही काळ त्याचा विभागाशी संबंध नव्हता; परंतु आता दापचारी सीमा तपासणी नाक्याच्या भरारी पथकात तो विभागाचा स्वयंघोषित चालक म्हणून काम करतो. वास्तविक त्याच्या नियुक्तीचा कुठलाही प्रशासकीय आदेश किंवा परवानगी नाही, तरीही तो उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी असल्याचे भासवून संबंधितांकडून अवैध आणि बनावट दारू विक्री प्रकरणी वसुली करून संबंधितांच्या अवैध धंद्यांना पैशाच्या बदल्यात संरक्षण देत आहे. वसुलीकडे डोळेझाक, की लागेबांधे? एक खासगी कथित कर्मचारी वर्षानुवर्षे उत्पादन शुल्क विभागात काम करत असताना त्याचा पगार कोण करतो, त्याची नियुक्ती कोणी केली आणि नियुक्ती केली नसेल तर तो तेथे काम का करतो असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. सरकारी कर्मचारी नसताना तो अन्य राज्यातून येणाऱ्या अवैध आणि बनावट मद्यप्रकरणी परस्पर वसुली करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत असताना उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी काय करतात, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. लोखंडेच्या कृष्णकृत्याचे पुरावे ‘लक्षवेधी’च्या हाती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे लोखंडे याच्याशी असलेले संबंध लक्षात घेता अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच तो वसुली करत असावा आणि त्याचा वाटा संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत असावा अशी शंका घ्यायला जागा आहे. दरम्यान, दत्ता लोखंडे याच्या कृष्णकृत्याचे पुरावे ‘लक्षवेधी’च्या हाती आले असून त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. पोलिस कारवाईत पुढे, उत्पादनशुल्क ‘वसुली’त! पालघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग वारंवार बनावट मद्यतस्करी प्रकरणी कारवाई करत आहेत. गेल्या दोन दिवसांत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने २७ लाखांचे अवैध मद्य आणि मालमत्ता जप्त केली. कारवाई करण्याची ज्या विभागाची खरी जबाबदारी आहे, तो उत्पादन शुल्क विभाग मात्र थातूरमातूर कारवाई करून अवैध मद्याच्या तस्करीला पाठीशी घालत असल्याचा आरोप आहे. ज्यांच्या हाताखाली दत्ता लोखंडे काम करतो, ते उत्पादन शुल्क विभागाचे दापचरी सीमा तपासणी नाक्याचे निरीक्षक संभाजी फडतरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले. वास्तविक गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून दत्ता लोखंडे हा फडतरे यांच्या हाताखाली काम करत असून त्यांच्या आशीर्वादाने त्याची वसुली सुरू होतीका, अशी चर्चा आता सर्वत्र आहे. लोखंडेच्या टीपमुळे मद्यतस्करीला आळा घालण्यात मर्यादा विशेष म्हणजे अवैध मद्य तस्करी, बनावट मद्य वाहतूक प्रकरणी भरारी पथके कुठे कुठे आहेत आणि ते काय काय कारवाई करतात याची टीप हा दत्ता लोखंडे संबंधित अवैध धंदे करणाऱ्यांना देत असल्याचा संशय असून त्यामुळे अवैध बनावट मद्याची तस्करी पकडण्याचे प्रयत्न फोल ठरतात. पोलिसांच्या कारवाईलाही मर्यादा येते. शासकीय यंत्रणेचे हात धरून एखादी खासगी व्यक्ती कशी वसुली करते, याचा हा उत्कृष्ट नमुना असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम यांचे त्यांच्या खात्यावर नियंत्रण नाही का, असा प्रश्नही आता यानिमित्ताने उपस्थित होत आहे. कोट ‘दत्ता लोखंडे आमच्याकडे चालक म्हणून कामाला नाही. खासगी पंच म्हणून त्याला आम्ही अनेकदा मदतीला घेतले. त्याने परस्पर वसुली केली असेल, तर त्याची आम्हाला माहिती नाही. गेल्या आठ दिवसांपासून त्याचा आणि आमचा काहीही संबंध नाही. -संभाजी फडतरे, निरीक्षक, उत्पादन शुल्क विभाग दापचरी सीमा तपासणी भरारी पथक