रायगड : भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुक कालावधीत उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीने काय करावे काय करू नये याबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहे. या सर्व नियमानुसार प्रचार, त्या अनुषंगाने विविध प्रकारच्या परवानग्या, तसेच प्रचार खर्चा बाबत कार्यवाही करावी. तसेच प्रचारा दरम्यान निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे,असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवार व खर्च प्रतिनिधींचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृह मध्ये आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण संजीव कुमार झा , निवडणूक खर्च निरीक्षक धीरेंद्रमणी त्रिपाठी, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे , उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी राहुल कदम, आदर्श आचारसंहिता कक्षाचा नोडेल अधिकारी श्रीमती जोत्स्ना पडीयार यांच्यासह राजकीय पक्षाचे उमेदवार व प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी जावळे म्हणाले, निवडणूक शासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी सहकार्याच्या भूमिकेतून काम करतील. प्रशिक्षण काळजीपूर्वक समजून घेवून आयोगाच्या नियम पालनास प्राधान्य द्यावे. निवडणूक विषयक विविध शासकीय विभागाचे समन्वय अधिकारी नेमण्यात आले असून जिल्हा नियंत्रण कक्ष व तक्रार संनियंत्रण कक्ष, माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी) तसेच खर्च पथक कार्यरत आहेत, प्रत्येक मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर निवडणुकीच्या अनुषंगाने खर्च पथक नेमण्यात आले आहेत असे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी पुढे म्हणाले, निवडणुक प्रचारासाठी वाहने, मिरवणूक, सभा आदी परवानगी अर्ज प्राप्त झाले नंतर ” प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य” तत्त्वानुसार कार्यवाही करण्यात येईल. सदर प्रचार दि. ६ रोजी सायंकाळी सहा वाजता थांबणार आहे. यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रचार करता येणार नाही परंतू वृत्तपत्रातून मतदान दिवशी व त्याच्या आदल्या दिवशी जाहिरात जिल्हा माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कडून प्रमाणित करून प्रसिद्ध करता येईल,असे जावळे यांनी म्हणाले. यावेळी आदर्श आचारसंहिता, होम व्होटिंग, माँक पोल, ई व्हो एम सरमिसळ, प्रचार खर्चासाठी विविध दरसुची, निवडणूक प्रचार कार्यालय, मतदानसाठी ओळखपत्र अथवा ओळखपत्राचे पर्यायी १२ पुरावे, मतदानाच्या दिवशी उभा करावयाची बूथ, मतदान केंद्र राजकीय प्रतिनिधी याबाबतची माहीती दिली. तसेच निवडणूक प्रचार कामासाठी बालकामगार ठेवू नये, प्रचारासाठी प्राण्यांचा वापर करू नये, अशा सूचना दिल्या. यावेळी निवडणूक खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी राहुल कदम यांनी सादरीकरण करून मार्गदर्शन केले. ते म्हणाले, खर्च संनियंत्रणासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर खर्च पथक नेमण्यात आले आहे. या पथकाचे काम अन्य विविध पथकांच्या समन्वयाने चालते. उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाचे तपशील आयोगाच्या नियमानुसार तपासण्याचे काम खर्च पटकन द्वारे होत असून यासाठी दैनंदिन खर्च नोंदवही देण्यात आली आहे. यातील नोंदी हिशोब व बँक व्यवहाराची माहिती उमेदवारांना त्याच दिवशी नोंदवणे गरजेचे आहे. उमेदवारांसाठी येथील खर्च मर्यादा ९५ लक्ष रुपये असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिवसापासून निकालाच्या दिवसापर्यंत सर्व प्रचार नोंदवला जाणे गरजेचे आहे. निवडणुकीचा निकाल नंतर तीस दिवसाच्या आत खर्च सादर करणे बंधनकारक आहे, असे कदम म्हणाले. आज उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण सत्राच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी जावळे यांनी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या असणाऱ्या शंकांबाबत प्रश्नोत्तर घेवून शंकांचे निरसन करण्यात आले. या प्रसंगी विविध पोलीस व शासकीय अधिकारी, जिल्हा खर्च नियंत्रण समितीतील अधिकारी उपस्थित होते.