Category: रायगड

raigad news and updates

पत्रकार संघर्ष  समितीची मागणी

बेकायदेशीर होर्डिंग्ज / मोबाईल टॉवरवर करवाई करण्याची पनवेल : मुंबईतील घाटकोपर होर्डिंग्ज  दुर्घटनेची घटना पनवेल महापालिका हद्दीत होऊ नये याकरिता , पनवेल महानगर पालिका हद्दीतील बेकायदेशीर होर्डींज ,मोबाईल टॉवर तातडीने काढण्याचे  आदेश द्यावेत  अशा आशयाचे निवेदन पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी  पनवेल महापालिका आयुक्तांना ई-मेल द्वारे दिले आहे. , होर्डिंग्ज कोसळून दुर्घटना ,अपघात होण्याच्या घटनेत वाढ होत आहे याला मुख्य कारण म्हणजे स्थैर्यता प्रमाण पत्र नसणे , तज्ज्ञांकडून होर्डिंग्ज चे डिझाईन न करणे ,वेळोवेळी त्या होर्डिंग्ज ची  न तपासणी करणे ,स्ट्रॅकचर  ऑडिट न  करणे  तसेच बाह्य जाहिराती करताना उभारलेले होर्डिंग्ज यांचे आकार मर्यादित नसणे त्या भागातील वाहणारे  पावसाळी वादळ वारे यांचा आढावा घेऊन आकार ठरवून न देणे  अशी विविध करणे अपघातास कारणीभूत असून यामुळे  निरपराध नागरिकांचे नाहक बळी जात आहेत . या निवेदनाद्वारे अशी विनंती करणेत येत आहे कि १)  पनवेल महापालिका हद्दीतील बेकायदेशीर होर्डिंग्ज तातडीने काढण्याचे आदेश आपल्या स्तरावर द्यावेत , २) महापालिका हद्दीतील बेकायदेशीर मोबाइलला टॉवर तातडीने काढावेत ,३) ब्युरो ऑफ  इंडियन स्टॅंडर्ड या राष्ट्रीयकृत  जे निकष ठरवून दिले आहेत त्या निकषाच्या आधारे परवाना धारक होर्डिंग्ज ची तपासणी करावी त्यात  तफावत   असल्यास ते होर्डिंग्ज हि तातडीने काढण्यात यावेत ,४)स्टॅबिलिटी  सर्टिफिकेट महापालिका अभयंत्याकडून तपासून घेण्यात यावेत अथवा महापालिका अभियंत्यांकडून  फेर तपासणी करावी तसा अहवाल सादर करून ठेवावा दुर्घटना घडल्यास महापालिका अभियंत्यांवर हि कारवाई करावी  ५)ज्या होर्डिंग्ज ला महापालिकेने परवानगी  दिली आहे त्या होर्डिंग्ज ची दरवर्षी / वेळोवेळी डागडुजी करणे परवानाधारकाला बंधनकारक करावे ,कुठे वेल्डिंग निखळली  असेल , कुठे बेसमेंट जवळ अनेक वेळा खोदकाम होते ,सिमेंट निघते ती दुरुस्त करण्याच्या सूचना द्यावेत ,५ ) पनवेल महापालिका हद्दीत डिजिटल  जाहिरात  फलक लावण्यात आले आहेत  असे डिजिटल फलक वाहनधारकांचे आणि नागरिकांचे विशेष करून संध्याकाळी व रात्रीच्या वेळेस लक्ष विचलित होण्यास कारणीभूत ठरत आहेत अशा फलकाचे जाहिरात धोरण ठरवुन त्यांना हि यामुळे अपघात होणार नाहीत याची काळजी घेण्याचे निर्देष द्यावेत   ६ ) ज्या ज्या ठिकाणी बेकायदेशीर होर्डिंग्ज उभारल्या आहेत त्या इसमांवर फोजदारी कारवाई करावी तसेच उभारलेली होर्डिंग काढण्याचा खर्च वसूल  करण्यात यावा . अशा आशयाचे निवेदन पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी पनवेल महानग पालिकेला दिले आहे.

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी पुन्हा ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक- पुनिता गुरव

अशोक गायकवाड रायगड :आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे आवाहन मतशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.रायगड पुनिता गुरव यांनी केले आहे. सन-२०२४-२५ या वर्षाकरिता…

शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करा- किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे दुर्गराज रायगड येथे तारखेनुसार ६ जून व तिथीनुसार १९ जून रोजी आयोजन करण्यातयेणार आहे. मागच्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळासाडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याने येथील कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांची लाखोच्या संख्येने उपस्थिती होती. यंदा होणाऱ्या कार्यक्रमांची पूर्वतयारी करताना संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळा २०२४ च्या अनुषंगाने नियोजन बैठक संपन्न झाली यावेळी जिल्हाधिकारी जावळे बोलत होते बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घागें, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड , अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन आर नामदे, राष्ट्रीय महामार्ग चे कार्यकारी अभियंता दिलीप चौरे, पोलीस उपअधीक्षक एस बी काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी जावळे म्हणाले शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक रायगड येथे येत असतात या वर्षी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमांसाठी आयोजकांकडून तयारी केली जात आहे. मागील वर्षी १५ हजार व्यक्तींची क्षमता असलेल्या गडावर अडीच लाखापेक्षा जास्त जण आल्यामुळे सुरक्षा व पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला होता . हा अनुभव लक्षात घेऊन या वर्षी कोणतीही समस्या उद्भवू नये या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी पूर्वतयारी केली जावी. येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी असे जिल्हाधिकारी यांनी सुचित केले. पोलीस अधीक्षक घार्गे यांनी महाड व माणगाव मार्गे येणाऱ्या खाजगी वाहनांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यांची कामे, पार्किंगच्या जागा व तेथून गडाकडे जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था संबंधित विभागांनी पूर्ण करावे तसेच आवश्यक ते माहिती देणारे फलक लावले जावेत असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी गडावर नागरिकांच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन, औषधे डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी या साठी करावयाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. मागील वर्षी झालेला सोहळ्याबाबत केलेली कार्यवाही व यंदाच्या पूर्वतयारी बाबत विविध प्रमुख अधिकाऱ्यांनी माहिती सादर केली. तत्पूर्वी जावळे आणि उपस्थित सर्व अधिकारी यांनी रायगड किल्ल्याची पाहणी केली. तसेच आवश्यक तयारीच्या अनुषंगाने त्यांनी संबंधित यंत्रणाना निर्देश दिले.

महेंद्र थोरवे मार्गदर्शनाखाली शिवमंदिराचा जीर्णोद्धार

माथेरान : कर्जत तालुक्यातील पोसरी गावातील शिव मंदिराच्या जीर्णोद्धाराचा सोहळा शनिवार दि. 18 मे रोजी उत्साहात आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने संपन्न झाला. शनिवारी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना, होम हवन, भजन कीर्तन यासह भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी शिव मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी श्रीरंग आप्पा बारणे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून यथोचित सत्कारही केला.तीन दिवस जीर्णोद्धार कामी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.कर्जत (पोसरी) येथील मंदिराच्या जिर्णोद्धार सोहळ्यासाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून श्री महादेवाचे दर्शन घेतले. त्यामुळे पोसरी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांकडून आमदार महेंद्र थोरवे यांच्या आध्यात्मिक कामाबाबत समाधान व्यक्त होत आहे. पोसरी येथे पुरातन काळापासून असलेल शंभू महादेवाच मंदिर हे आम्हा ग्रामस्थांच नेहमीच श्रद्धास्थान राहिल आहे त्यामुळे या शिव मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी अत्यंत जवळून काम करण्याची संधी मला मिळाली आणि आज हे शिव मंदिर पूर्ण झाल्यानंतर एक ग्रामस्थ म्हणून मलाही मनस्वी समाधान मिळत आहे -महेंद्र थोरवे आमदार, कर्जत विधानसभा

एसटीपी ठेकेदाराकडुन रस्ते पूर्ववत करण्यास शर्थीचे प्रयत्न सुरू !

पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी माथेरान : दरवर्षी माथेरान मध्ये अडीचशे ते तीनशे इंच पावसाची नोंद होते. अतिवृष्टीमुळे नेहमीच रस्त्यावर पावसाळी पाणी वाहून जात असल्याने रस्त्यांची वाताहत होते यासाठी सनियंत्रण समितीच्या परवानगीने माथेरान या अतिसंवेदनशील क्षेत्रात रस्त्याची धूप थांबविण्यासाठी क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार गावातील अनेक ठिकाणी सुरुवातीला पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले होते त्यानंतर दस्तुरी ते पांडे रोड पर्यंतच्या मुख्य मार्गावर धुळीमुळे व्यापारी वर्गाचे दुकानातील सामानाचे मोठया प्रमाणात नुकसान व्हायचे यासाठी हा मुख्य रस्ता धूळविरहित करण्यासाठी एमएमआरडीए च्या माध्यमातून काम सुरू केले होते परंतु अर्ध्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर या कामावरसुध्दा नेहमीप्रमाणे आक्षेप घेण्यात आल्यामुळे हे महत्वपूर्ण काम अर्धवट स्थितीत आहे. नुकताच सांडपाणी प्रक्रिया कामी रस्त्यांची खोदाई करून मलनिस्सारण पाईप लाईन टाकण्यात आली आहे.हे रस्ते खोदताना जे काढलेले पेव्हर ब्लॉक होते ते पुन्हा लावू नये असा पवित्रा  विकासाला विरोध करणाऱ्या गावातील काही मंडळींनी घेतला होता.त्यामुळे जर का ह्या खोदलेल्या रस्त्यांवर काढण्यात आलेले पेव्हर ब्लॉक लावले नसते तर आगामी काळात अतिवृष्टीमुळे लोकांच्या घराघरात पावसाळी पाणी जाऊन वित्तहानी झाली असती याकामी गावातील अन्य काही अभ्यासू,गावाचे हित पाहणाऱ्या लोकांच्या आग्रहास्तव हे रस्ते अबाधित राहण्यासाठी, गावाची सुंदरता टिकून रहावी धुळीचे साम्राज्य पसरू नये यासाठी संबंधीत ठेकेदाराला सूचित केल्यावर रस्ते पूर्ववत करण्यात येत आहेत. सनियंत्रण समितीने मुख्य रस्त्यावरील नवीन क्ले पेव्हर ब्लॉकचा विषय न्यायालयात प्रविष्ट असल्याने ब्लॉकचे नवीन काम बंद केले आहे. काही राजकीय पक्षांची मंडळी येथील काही भोळ्या भाबड्या लोकांना हाताशी धरून आतापर्यंत जी जी विकासकामे झाली आहेत त्यास केवळ आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी विकासाला विरोध करत आहेत. परंतु राजकारण बाजूला ठेवून एक सामाजिक बांधिलकी म्हणून शासनाच्या वतीने येणाऱ्या विकासकामांला नाहक विरोध करून सर्वसामान्य लोकांचे आणि भावी पिढीला अधोगतीला नेण्यास कारणीभूत ठरत आहेत. जर इथल्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना या गावात पर्यटन क्रांती घडवायची असेल तर विकास कामांना सहकार्य करणे ही काळाची गरज आहे. श्रेयवादामुळे आर्थिक लाभासाठी झटणारी काही मंडळीना गावाबद्दल काहीही सहानुभूती नसून आपला स्वार्थ कसा साधता येईल याकडेच त्यांचा नेहमीच दृष्टिकोन राहिला आहे. असे सूर सर्वत्र स्थानिकांमधून  ऐकावयास मिळत आहेत. ——————————————————- क्ले पेव्हर ब्लॉक ही माथेरानचे रस्ते बनविण्याकरिता काळाची गरज आहे. दर वर्षी माथेरान मध्ये जास्त पाऊस होत असल्यामुळे रस्ते वाहून जात होते याचा विचार करून मॉनेटरिंग कमिटीने क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्याचा निर्णय घेतला. परंतु अर्धा रस्ता झाल्यानंतर या ब्लॉकला विरोध होतोय. दगड मातीचे रस्ते बनविन्याकरिता मोठया प्रमाणात दरवर्षी दगड माती उपलब्ध  होत नसल्याने भविष्यात  माथेरानचे संपूर्ण रस्ते बनविण्याकरिता क्ले पेव्हर ब्लॉक शिवाय पर्याय उरलेला नाही. वसंत कदम—-अध्यक्ष शिवगर्जना मित्र मंडळ माथेरान

सुप्रसिध्द भजन गायक समर्थबुवा पाटील यांचा तिरुपती येथे संगीत भजनाचा कार्यक्रम

अशोक गायकवाड अलिबाग :रोहा तालुक्यातील दापोली गावचे रहिवासी व अलिबाग येथे वास्तव्यास असलेले, सुप्रसिध्द भजन गायक समर्थबुवा पाटील यांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम २७ मे ला दुपारी आंध्र प्रदेशातील ‘ तिरुपती तिरुमाला देवस्थान’ येथे सादर होणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना भजन रसिक आणि सल्लागार ॲड.प्रसाद पाटील यांनी सांगितले कि, तिरुपतीमध्ये महाराष्ट्रातील प्रासादिक भजन सादर करणारे रायगड जिल्ह्यातील हे एकमेव भजन मंडळ आहे. तिरुपती देवस्थान तर्फे प्रायोजित या भजनाचे थेट प्रक्षेपण ‘एस व्ही बी सी’ या चॅनेल वर ” नाद निराजमन ‘ या कार्यक्रमातून दुपारी ठीक ३:१० ते ४:३० वा. पर्यंत सादर होणार आहे.जेष्ठ भजन गायक पं. हरिश्चंद्र बुवा लोणारकर यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारित संगितबद्ध केलेल्या विविध भजन रचना या कार्यक्रमात सादर केल्या जातील. समर्थ बुवांना हार्मोनियम वर साथ नरेशबुवा कडू, तबला साथ जगदीश पाटील-लोणारकर करतील . तरुण , होतकरू कलाकार विराज म्हात्रे ( मानी ) हे पखवाज वर साथसंगत करतील. याविषयी अधिक माहिती देताना भजन रसिक आणि सल्लागार ॲड.प्रसाद पाटील यांनी सांगितले कि, तिरुपतीमध्ये महाराष्ट्रातील प्रासादिक भजन सादर करणारे रायगड जिल्ह्यातील हे एकमेव भजन मंडळ आहे. अनेक प्रतिष्ठित देवस्थान ठिकाणी या मंडळाने भजन सेवा सादर केल्या आहेत. श्रीविठ्ठल रखुमाई देवस्थान पंढरपूर, श्री अंबाबाई देवस्थान कोल्हापूर, श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली, ख्वाजा हजरत मोईनउद्दीन चिस्ती दर्गा अजमेर- राजस्थान, श्री अगस्ती आश्रम अकोले, महर्षी चांगदेव देवस्थान पुणतांबा, ई. चा समावेश आहे. तिरुपती देवस्थान मध्ये कार्यक्रम सादर करण्याची ही सहावी वेळ असून मुख्य रंगमंचा वर तिसऱ्यांदा मिळालेल्या या भजन संधी बद्दल वायशेत येथील श्री. गंगादेवी भजन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी देवस्थान चे आभार व्यक्त केले आहेत व अधिकाधिक भजन रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

हॉटेल धारकांना पाणी मस्त ,नागरिक पाण्याविना त्रस्त !

वीज, पाणी नॉट रीचेबलमुळे पर्यटनावर परिणाम माथेरान : मागील तीन दिवसांपासून माथेरान मध्ये वीज आणि पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने ऐन सुट्टयांचा हंगाम असताना याचा पर्यटनावर विपरीत परिणाम झालेला आहे. त्यातच ई रिक्षांना चार्जिंग नसल्याने ही सेवा सुध्दा कोलमडून गेली होती. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना सुध्दा दूरवर शाळेत जाताना तारेवरची कसरत करावी लागली आहे.शारलोट लेक येथे जनरेटर असताना देखील त्याचा वापर न केल्यामुळे पाणी पुरवठा केला गेला नाही. तर संध्याकाळच्या दरम्यान तीन दिवस सतत वादळी वारा आणि पाऊस यामुळे नेटवर्किंग सेवा उपलब्ध होऊ शकली नाही. काही ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली आणि सततच्या विजेच्या लपंडावामुळे उष्मां अधिक जाणवत होता. विशेष म्हणजे येथील हॉटेल धारकांना मुबलक पाणी पुरवठा केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हॉटेल धारक कधीच स्थानिकांनी उभारलेल्या आंदोलनात अथवा ग्रामस्थांशी हितसंबंध ठेवत नाहीत. मुळात त्यांची अनधिकृत वाढीव बांधकामे असल्याने हॉटेल धारक शासनाच्या विरोधात भूमिका घेत नाहीत. त्यांना मुबलक पाणी पुरवठा केला जातो आणि गावातील नागरिकांना पाण्यावाचून दिवस काढावे लागतात हा जरी संशोधनाचा विषय असला तरी जे माजी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आवाज उठवणे गरजेचे आहे पण पदाशिवाय इथली नेतेमंडळी पुढाकार घेत नाहीत हे दुभाग्यच म्हणावे लागेल असे स्थानिक बोलत आहेत.

कर्जत तालुक्यात वारा, वादळ व पावसामुळे महावितरण यंत्रणेचे अतोनात नुकसान 

वीजपुरवठा पुर्ववत करण्याची कामे युध्दपातळीवर रायगड : दि.१३ मे २०२४ रोजी वातावरणात कमालीचा बदल झाल्यामुळे रायगड जिल्हा हवामान विभगाकडून खबरदारीच्या सूचना करण्यात आले होते. या दिवशी, कर्जत तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार, वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने,वीज पुरवठ्याची वाताहात होऊन, तालुक्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. बऱ्याच  ठिकाणी उच्चदाब व लघुदाब  वाहिनीचे पोल पडले होते, विद्युत रोहित्र निकामी झाले होते. आशा प्रसंगी महावितरण कर्जत तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करून खंडित वीज पुरवठा पुर्ववत करण्याचे प्रयत्न करीत होते. सोमवारी झालेली पडझडीमुळे विस्कळीत झालेला वीज पुरवठा पुर्ववत करण्यात येत होता व बहुतांशी भागाचा वीजपुरवठा पूर्वपदावर आला आहे . परंतु दि. १६ मे २०२४ रोजी संध्याकाळी अचानक अवकाळी पावसाने व भोगावणाऱ्या वाऱ्याने कर्जत तालुक्यात पुन्हा जोरदार हजेरी लावल्यामुळे महावितरणचा विद्युत पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नेरल इन्कमर उच्चदाब  वाहिनीवर ७ पोल, कडाव उच्चदाब  वाहिनीवर १७ पोल व अंजप उच्चदाब  वाहिनीवर ७ पोल पडल्याच्या घटना संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारस समोर आलेले आहेत. प्रसंगी लघुदाब  वाहिनीचे अंदाजे ५० पोल पडले आहेत. या घटनेमुळे कर्जत तालुक्यातील बऱ्याच गावांचा वीजपुरवठा खंडीत झालेला आहे. अशा परिस्थितीत वीज ग्राहकांना वीजपुरवठा विना गैरसोय होत आहे. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे क्षतीग्रस्त वीजवाहिन्या, पोल, डीपी , इत्यादी   महावितरण तर्फे सदर काम लवकरात लवकर करण्याचा अथक प्रयत्न चालू असून, सदर वीजपुरवठा पुर्ववत करण्याचे कामे युध्दपातलीवर  सुरु आहेत.  तरी, महावितरण भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे यांनी कर्जत तालुक्यातील वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे अहवान केले  आहे.

समग्र शिक्षा अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन देणार-पुनिता गुरव

अशोक गायकवाड रायगड : जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका शाळा आणि खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये ज्या पालकांची मुले शिकत आहेत त्यांनी आपल्या पाल्यांची पुस्तके बाजारातून खरेदी करु नयेत.…

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशाची सुवर्णसंधी

१० जून पूर्वी अर्ज सादर करा – शशिकला अहिरराव अशोक गायकवाड रायगड :सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता १ ली मध्ये प्रवेश देण्यात येणार असून प्रवेश घेवून इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज १० जून २०२४ पूर्वी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण ता.पेण येथे सादर करावेत असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण शशिकला अहिरराव यांनी केले आहे.* या प्रवेशासाठीच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे- या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, पालकाने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी, यासाठी मुलाच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रु.१ लाख इतकी असावी, इयत्ता १ ली ते प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय ६ वर्षे पूर्ण असावे, वय ३१ डिसेंबर २०२४ रोजी ६ वर्षे पूर्ण असावे, त्याचा जन्म ०१ जुलै २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ दरम्यान झालेला असावा, अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा जन्माचा दाखला तसेच, अर्जासोबत विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात यावे, आधारकार्डची झेरॉक्स जोडण्यात यावी, विद्यार्थ्याचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत, खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. निवड केलेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चिती झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या/पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही.