Category: रायगड

raigad news and updates

आरटीओने ई-रिक्षाचे दर निश्चित करावे

स्थानिकांची मागणी माथेरान : श्रमिक हातरीक्षा चालकांच्या ताब्यात ई रिक्षा द्याव्यात असे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले असताना देखील सनियंत्रण समितीच्या हेकेखोर वृत्तीमुळेच  सध्या पायलट प्रोजेक्टवर केवळ ठेकेदाराला पोसण्यासाठी या समितीने ई रिक्षाचा ठेका दिलेला असून दस्तुरी ते माथेरान रेल्वे स्टेशन दरम्यान प्रति माणसी ३५ रुपये दर आकारण्यात येत आहे.सहा ते सात मिनिटांत हे अडीच किलोमीटर अंतर ई रिक्षाच्या प्रवासासाठी लागते.तर शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करण्यासाठी फक्त पाच रुपये इतका माफक दर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही महिने येथील शासकीय अधिकारी कर्मचारी वर्गाला दस्तुरी माथेरान दस्तुरी या प्रवासासाठी दर दिवसाला केवळ पाच रुपयांत मासिक पास देण्यात आले होते. ज्यांना  लाख रुपये मासिक पगार मिळतो अशा शासकीय अधिकारी वर्गाला ही सवलत देण्यात आल्यामुळे अनेकदा ३५ रुपये दर भरणाऱ्या प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत होते. परंतु या शासकीय अधिकारी वर्गाला नागरिकांच्या तक्रारी वरून या सुविधे पासून बंद करण्यात आले आहे.ज्या ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना इथे शासकीय खोल्या उपलब्ध आहेत अशी मंडळी सुध्दा नेरळ अथवा कर्जत याठिकाणी राहून ई रिक्षाच्या साहाय्याने नोकरीसाठी येतात. तर येथील  निमशासकीय कर्मचारी सुध्दा आपल्या स्वतःच्या खोल्या असताना माथेरान परीसरात वास्तव्यास आहेत.काही दिवसांनी जवळपास वीस नवीन ई रिक्षांची सेवा उपलब्ध होणार आहे. यासाठी आरटीओ ने या ई रिक्षाचे परवडणारे दर निश्चित केल्यास सर्वाना सोयीस्कर होऊ शकते अशी मागणी जोर धरू लागली आहे.

श्रीरंग आप्पा बारणे यांना निवडून देण्यासाठी शिवसैनिक सज्ज

माथेरान : खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे मावळ लोकसभा मतदार संघात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच कर्जतमध्ये शिवसेनेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. कर्जत – खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या नेतृत्वात श्रीरंग आप्पा बारणे यांना बहुसंख्य मताने निवडून देण्यास शिवसैनिक सज्ज आहेत. सलग दोनदा खासदारकीचा प्रदीर्घ अनुभव पाठिशी असणारे आणि पाच वेळा संसदरत्न पुरस्कार प्राप्त झालेले एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले बारणे यांनी मागील लोकसभा निवडणुकीत जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय संपादन केला होता. याही वेळेस त्यांना विकास कामाच्या जोरावर आणि समस्त शिवसैनिकांच्या बळावर पुन्हा एकदा विजयश्री मिळवून देण्यासाठी कर्जत खालापूर मतदार संघातील शिवसैनिक सज्ज झाले असून श्रीरंग बारणे कर्जतमध्ये आले असता त्यांचे शिवसेनेच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. बाळासाहेब भवन येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी औक्षण केल्यावर  जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी बारणे यांना हॅट्रिक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

एमएमआरडीएच्या नवनगर निर्मितीमुळे १२४ गावे उद्ध्वस्त होण्याची भीती

उरण : शासनाने अटल सेतू प्रभावित क्षेत्रातील उरण, पेण, पनवेल तालुक्यातील १२४ गावांत नवनगर (तिसरी मुंबई) उभी करण्यासाठी एमएमआरडीएला नवे नगर विकास प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे. यामुळे या गावातील नागरिकांचा…

शेकाप नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन

अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी (29 मार्च ) निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी पेझारी येथे दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.…

रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबतीत राकेश कोकळे यांचे प्रशासकांना निवेदन

माथेरान : माथेरान मधील मुख्य रस्स्यावर लावण्यात आलेले क्ले पेव्हर ब्लॉक निकृष्ट दर्जाचे असल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळे किरकोळ अपघात घडत असतात याकामी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते राकेश कोकळे यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात प्रशासक राहुल इंगळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. एमएमआरडीए च्या माध्यमातून जवळपास चाळीस कोटी रुपये खर्च करून दस्तुरी पासून माथेरान गावांपर्यंत पर्यावरण पूरक क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनविण्यात आले होते परंतु अत्यंत घाईगडबडीत ही कामे उरकण्यात आली होती. आणलेले ब्लॉक हे उत्तम दर्जाचे आहेत किंवा नाही याची शहानिशा न करता कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे बहुतेक ठिकाणी कच्चे ब्लॉक होते ते झिजून गेल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. यातून मार्ग काढताना पादचाऱ्यांना तसेच पर्यटक, हातरीक्षा, घोडेवाल्याना खूपच त्रासदायक ठरत असून या खड्ड्यात पडून अनेकजण जखमी झाले आहेत. पुढील दोन महिने सुट्टयांचा हंगाम येत असून खड्डेमय रस्त्यामुळे पर्यटनावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी लवकरच ही कामे पूर्ण करून घ्यावीत असे राकेश कोकळे यांनी निवेदनात म्हटले आहे. यावर लवकरच ठोस उपाययोजना करण्यात येईल असे उत्तम प्रशासक तथा कार्यक्षम मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सांगितले.

कौटुंबिक सोहळ्यात मिळालेले प्रेम पाहून डी. के. पाटील भारावले

ज्ञानेश्वर पाटील यांना मिळालेली रयत शिक्षण संस्थेचे कुबेर ही उपमा कौतुकास्पद राज भंडारी पनवेल : रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनियर कॉलेज या विद्यालयात वरिष्ठ लेखनिक असलेले ज्ञानेश्वर पाटील यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ दि. २७ मार्च रोजी जासई येथे संपन्न झाला. रयत शिक्षण संस्थेच्या जासई विद्यालयात त्यांना विद्यालयाच्यावतीने सर्व सेवकांकडून सपत्नीक सन्मान करण्यात आला. सायंकाळी त्यांच्या कुटुंबीय, आप्तेष्ट व मित्र मंडळींकडून घरगुती सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. सदर सोहळ्याला ज्येष्ठ शिक्षक नेते दा.चां.कडू गुरुजी सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित  होते. पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी याठिकाणी उपस्थित राहून ज्ञानेश्वर पाटील यांचे अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याची सुरुवात ज्ञानेश्वर पाटील यांच्या सेवापूर्तीतील ३६ वर्षे त्यांच्या संघर्षाची कहाणी उपस्थितांसमोर कथित करण्यात आली. शिक्षक नेते दा.चां.कडू यांनी ज्ञानेश्वर पाटील यांची सेवाभावी वृत्ती, प्रामाणिकपणा आदी बाबी निदर्शनास आणताना नात्यापेक्षा आपल्या बरोबर त्यांनी जपलेले स्नेहसंबंध हे रक्ताच्या नात्यापेक्षा निश्चितच श्रेष्ठ  असल्याचे  गौरवोद्गार काढले. सत्काराला उत्तर देताना ज्ञानेश्वर पाटील व त्यांच्या सौभाग्यवती भावूक झाले होते. आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी आपल्या प्रामाणिक सेवेच्या घडामोडी कथन केला. यावेळी दा.चां.कडू गुरुजी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना ज्ञानेश्वर पाटील यांच्या सेवेतील अनेक ठिकाणांच्या शैक्षणिक सेवांना उजाळा दिला. ज्ञानेश्वर पाटील यांच्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ज्ञानेश्वर पाटील यांच्या आजोबांनी रयत शिक्षण संस्थेला जासई शाळेसाठी एक एकर जागा बक्षीस रूपाने दिली होती. ज्ञानेश्वर पाटील हे बीएससी झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेने एक एकर जागेची जाणीव ठेवत ज्ञानेश्वर पाटील यांच्या शिक्षणाची दखल घेवून त्यांना  आपल्या शिक्षण संस्थेत रुजू करून घेतले. सुरुवातीपासूनच अतिशय हुशार आणि प्रामाणिक असलेले ज्ञानेश्वर पाटील यांना संस्थेने सहाय्यक लेखनिक पदाची जबाबदारी सोपविली. सुरुवातीला उरण तालुक्यातील गव्हाण येथील शाळेत सेवा दिल्यानंतर त्यांची पोलादपूर तालुक्यातील तुर्भे आणि नंतर पैठण याठिकाणी बदली झाली. त्यानंतर महाड तालुक्यातील विन्हेरे येथे देखील त्यांनी सेवा केली. नंतर मात्र संस्थेने त्यांना त्यांच्या घराजवळ पनवेल तालुक्यातील रिटघर नंतर दापोली – पारगाव येथे बदली केली. रयत शिक्षण संस्थेतील त्यांच्या प्रामाणिक कामाची पोहोच म्हणून एक अनोखी भेट रयत शिक्षण संस्थेच्यावतीने त्यांना देण्यात आली. आजोबांनी बक्षिसी रूपाने दिलेल्या एक एकर जागेत वसलेल्या शाळेतच त्यांची बदली ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. या सर्वच शाळेतील त्यांच्या कामावर रयत शिक्षण संस्थेचे वरिष्ठ नेहमीच खुश राहत. कारणही तसेच होते, या सर्व प्रवासादरम्यान ते मुख्य लेखनिक या पदावर काम करीत असताना शाळेच्या व्यवहारात कोणताही अपहार ना त्यांनी केला ना त्यांच्यामार्फत कोणाला करू दिला. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे ते कुबेर म्हणून त्यांना शाळेत संबोधले जावू लागले. कुबेर ही उपमा ज्ञानेश्वर पाटील यांना मिळणे ही बाब मुळात कौतुकास्पद असल्याचे दा.चां.कडू गुरुजींनी यावेळी सांगितले. दा.चां.कडू गुरुजींनी यावेळी सांगितले की, मला सेवानिवृत्त होऊन २७ वर्षे झाली. मी आजही निरोगी आहे. सध्या माझे वय ८७ वर्षांचे आहे. आपण दररोज घरातील किरकोळ कामे स्वतः करीत असतो. ज्ञानेश्वर पाटील यांनीही घरातील परिसरातील छोटीमोठी कामे करून आपले शरीर सुदृढ ठेवावे. त्यांच्या अर्धांगिनी वनिता पाटील, बँकेत असिस्टंट मॅनेजर असलेले त्यांचे चिरंजीव आदित्य पाटील, स्नुषा अवंतिका आणि धा.चिरंजीव केतन पाटील यांची भरभक्कम साथ असल्यामुळे ज्ञानेश्वर पाटील यांचे उर्वरित आयुष्यही आनंदात जाईल, असा विश्वास कडू यांनी व्यक्त केला.

तुकाराम बीजनिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल तालुक्यातील कोपर येथील मंदिरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे मनोभावे दर्शन घेतले. या यावेळी ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, कामगार नेते महेंद्र घरत, माजी उपसरपंच विजय घरत, अनंता ठाकूर, सुधीर ठाकूर, जयवंत देशमुख, किशोर पाटील, साईचरण म्हात्रे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केली मतदान केंद्राची पाहणी

अशोक गायकवाड रायगड : जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अलिबाग तालुक्यातील बामनोली येथील चार केंद्र, वरसोली येथील सहा केंद्र, चेंढरे येथील दहा केंद्र, अलिबाग येथील सहा मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देवून…

निवडणूकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी ५३ भरारी पथके, ७६ स्थिर सर्वेक्षण पथक – किशन जावळे*

अशोक गायकवाड रायगड : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ दरम्यान उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर आणि निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात ५३ भरारी पथके आणि ७६ स्थिर सर्वेक्षण पथकांची स्थापना…

भारताला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक दुवे गरजेचे – राज्यपाल रमेश बैस

अशोक गायकवाड मुंबई : भारताला विकसित देश बनवण्यात निर्यात क्षेत्राचे आणि विशेषतः लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्वाचे आहे. भारताला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता देशात जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक दुवे असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी येथे केले. राज्यपाल बैस यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २६) लॉजिस्टिक उद्योगाच्या पाचव्या ‘लॉजिक्स इंडिया – २०२४’ या तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेचे उदघाटन हॉटेल वेस्ट-इन गोरेगाव मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. परिषदेचे आयोजन फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्सने (फियो) केले. भारताला जागतिक लॉजिस्टिक हब बनविण्याचे दृष्टीने भारत सरकारने २०२२ मध्ये आपले राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण जाहीर केले आहे. लॉजिस्टिक उद्योगाचा विस्तार केवळ औद्योगिकीकरणाला चालना देत नाही, तर त्यात रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे. राज्यात २७ सार्वजनिक विद्यापीठे असून लॉजिस्टिक क्षेत्रासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळाची गरज भागवण्याची क्षमता विद्यापीठांकडे आहे. या दृष्टीने विद्यापीठांनी लॉजिस्टिक क्षेत्रातील निर्यात महासंघासोबत काम करावे, अशी सूचना आपण विद्यापीठांना करू असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते परिषदेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.उदघाटन सत्राला शिपिंग कॉर्पोरेशनचे महासंचालक श्याम जगन्नाथन, फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्सचे अध्यक्ष अश्वनी कुमार, शारजा येथील सैफ झोनचे वाणिज्य संचालक रईद बुखातिर, फेडरेशनचे विभागीय अध्यक्ष परेश मेहता तसेच विविध देशांमधील लॉजिस्टिक उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.