Category: ठाणे

Thane news

तुम्हाला माजी मंत्री ओळखता येत नाही का?

शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर गाडी अडवताच शिवतारे संतापले ठाणे : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजही सर्व बैठका रद्द केल्या आहेत. घशामध्ये इन्फेक्शनचे कारण सांगितले जात असून दोन दिवसांपूर्वी दरे गावी गेलेले असतानाही ते आजारी पडले होते. यानंतर रविवारी दुपारी ते ठाण्यात परतले होते. शिंदे यांचे आजारपण आणि मुख्यमंत्रिपदाचे भिजत घोंगडे याचे कनेक्शन राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. अशातच शिंदेंच्या बंगल्यावर शिवसेनेचे आमदार ये-जा करत आहेत. यावेळी विजय शिवतारे पोलिसांवर चांगलेच भडकल्याचे दिसले. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी गाडी अडवल्याने आमदार विजय शिवतारे संतप्त झाले होते. शिंदेंच्या ठाण्याताली निवासस्थानाबाहेर शिवतारेंची पोलिसांनी गाड़ी अडविली व कोण म्हणून चौकशी केली. यावेळी शिवतारेंनी तुम्हाला आमदार, माजी मंत्री ओळखता येत नाही का? असा सवाल पोलिसांना केला. शिवतारे यांना मुख्यमंत्री काही भेटले नाहीत. यामुळे शिवतारे यांची श्रीकांत शिंदे यांनी उठबस केली. बाहेर आल्यावर शिवतारेंनी शिंदेंनी अशी कोणतीही आमदारांची बैठक बोलविलेली नाही, असे सांगितले. दोन दिवस मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांना ताप आला होता. कालच ते दरेगावातून मुंबईत आले. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आलो होतो, अजूनही ते उपचार घेत आहेत, असे शिवतारे म्हणाले. श्रीकांत शिंदे यांची भेट झाली. आता एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी आहे. आज कोणत्याही बैठका नव्हत्या. खातेवाटपाचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, ते जे ठरवतील ते सर्वांना मान्य असेल, असेही शिवतारे म्हणाले.

रविवारपर्यंत ठाण्यातील वेगवेगळ्या भागात २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद

भातसातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात घट निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाणी वितरणाचे नियोजन ठाणे : बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे महापालिकेस मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे. तसेच, या दुरूस्तीच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्याने ठाणे महापालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यातही घट झाली आहे. अशा एकूण सुमारे ३० टक्के पाणी कपातीमुळे पुढील आठवडाभर ठाणे महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागात २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवून पाणी वितरणाचे नियोजन करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’मध्ये बिघाड झाला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम रविवार, ०१ डिसेंबरपासून सुरू झाले असून या तातडीच्या तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे ०५ डिसेंबरपर्यंत पाणी कपात करण्यात आली आहे. ही दुरूस्ती आणि भातसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची कमी करण्यात आलेली पातळी यामुळे एकूण ३० टक्के पाणी कपातीचा ठाणे महापालिकेस सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत, संपूर्ण महापालिका क्षेत्रास दररोज ३० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागू नये, यासाठी विभागवार स.९.०० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९.०० या वेळेत एकेका विभागाचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी दुरुस्तीच्या या काळात तसेच पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, अशी आवाहन करण्यात आले आहे. दिनांक आणि पाणी पुरवठा बंद असणारे विभाग मंगळवार, ०३ डिसेंबर – माजिवडा, मानपाडा, कोठारी कम्पाऊंड, ढोकाळी, मनोरमा नगर, रुणवाल, डोंगरी पाडा, विजय नगरी, विजय पार्क, वाघबीळ, आनंद नगर, कासारवडवली बुधवार, ०४ डिसेंबर – गांधी नगर, सुभाष नगर, नळपाडा, वसंत विहार, लोकपूरम, लोक उपवन, एमएमआरडीए, तुळशीधाम, सुरकरपाडा, सिद्धांचल, कोंकणीपाडा, गावंड बाग, उन्नती, शास्त्री नगर १ व २, मैत्री पार्क गुरूवार, ०५ डिसेंबर – सिद्धेश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई, मावळी मंडळ, कोलबाड, गोकूळ नगर, आझाद नगर, खोपट, सिव्हील हॉस्पिटल परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसर शुक्रवार, ०६ डिसेंबर – दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी, जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर शनिवार, ०७ डिसेंबर – राबोडी १ व २, आकाशगंगा, जेल टाकी परिसर, जरी मरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्प्लेक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कळवा, मनिषा नगर, आतकोणेश्वर नगर, भास्कर नगर, पौड पाडा, खारेगाव, रघुकुल, पारसिक नगर रविवार, ०८ डिसेंबर – लोकमान्य पाडा नं. १, २, दोस्ती, वेदांत, आकृती संकुल, अरुण क्रीडा मंडळ, मनोरुग्णालय परिसर, रहेजा, कशिश पार्क, शिवाजी नगर, धर्मवीर नगर, साठेवाडी, रघुनाथ नगर, इटर्निटी, विष्णूनगर, भास्कर कॉलनी, ब्राम्हण सोसायटी, घंटाळी, राम मारूती रोड.

पाच वर्षापर्यंतच्या सर्व बालकांसाठी ८ डिसेंबरला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवार 8 डिसेंबरला उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे. सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण, नियमित एएफपी सर्व्हेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत 0 ते 5 वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. राज्यात सन 1995 पासून दरवर्षी पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येते. ठाणे महापालिका क्षेत्रात, एकूण 1278 बूथवर ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेचे 2556 कर्मचारी कार्यरत असतील. गेल्यावेळी झालेल्या मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रात, 0 ते 05 या वयोगटातील 01 लाख 78 हजार 824 बालकांना लस देण्यात आली होती. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातंर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रामध्ये ही लस मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचा लाभ पालकांनी 0 ते 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना द्यावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

शरद पवारपक्षाच्या गटनेतेपदी आव्हाड

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर, दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे सुपुत्र व देशातील सर्वात तरुण आमदार असलेल्या रोहित पाटील यांना मुख्य प्रतोदपदी संधी देण्यात आली आहे. तसेच, आमदार…

शिंदे इन अॅक्शन; वाटाघाटी पुन्हा सुरु

स्वाती घोसाळकर मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील महत्वाच्या बैठकी रद्द करून दोन दिवस दरे गावी गेल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. दोन दिवस शिंदे यांनी आपला सर्व…

मुंबई, ठाणेकरांनो आता कपाटातून स्वेटर काढा !

मुंबई : विधानसभेच्या निवडणूकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय तापमान दिवसागणिक वाढत चालले असले तरी मुंबई ठाण्यासह राज्यातील तापामानात कमालीची घट होत आहे. राज्यातील किमान तापमानाचा पारा आता चांगलाच घसरला आहे. राज्यामध्ये शनिवारी नाशिक येथे ८.९ या सर्वात…

 आगामी काळातील निवडणुकांमध्येही हिंदू अस्मितेचे धमाके फुटत राहतील

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे भाकित   ठाणे: लोकसभा निवडणुकीच्या काळात हिंदूंमध्ये मतदानाबाबत उदासिनता होती. मात्र, बांगलादेश, सिलीगुडी आणि सिमला येथील हिंदूवरील अन्यायाच्या घटनांनंतर हिंदू अस्मिता जागी झाली. हिंदू धर्मियांना आपल्या उदासिनतेबाबत पश्चाताप झाल्यानंतर सुरुवातीला हरियाणा व आता महाराष्ट्रातील निकाल लागले. यापुढील निवडणुकांतही हिंदू अस्मितेचे धमाके फुटत राहतील, असे भाकीत ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी येथे व्यक्त केले. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या वतीने राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांचे `कारणं महायुतीच्या विजयाची, भाजपाच्या यशाची’ या विषयावर शुक्रवारी व्याख्यान पार पडले. त्यावेळी श्री. तोरसेकर बोलत होते. नौपाड्यातील उमा निळकंठ व्यायामशाळेलगतच्या हितवर्धिनी सभेच्या मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेकडो ठाणेकरांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमात भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते व हिंदुत्वाचे अभ्यासक अजय जगताप यांनी `लव्ह जिहाद’वर लिहिलेल्या `व्हायरस’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेला २४० हा आकडा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुपला नाही. पण तो हिंदूंना खुपला. त्यानंतर हळूहळू हिंदू धर्मीय संघटीत होत गेले, असे प्रतिपादन भाऊ तोरकसेकर यांनी केले. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजपाने मेहनत केली नाही. तर महाविकास आघाडीने संपूर्णपणे ताकद लावली. त्यामुळे त्यावेळी भाजपाची हाराकिरी झाली होती. महायुती व महाविकास आघाडीच्या मतांमध्ये केवळ ०.०३ टक्क्यांचा म्हणजे दोन लाख मतांचा फरक होता. महाविकास आघाडीतील काही पक्षांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्वारस्य नव्हते. त्यामुळे त्यांची मते महाविकास आघाडीकडे वळविण्यात आली. मात्र, ते विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढल्यास महाविकास आघाडीचा पराभव निश्चित होता. लोकसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने भाजपाचा पराभव झाला नसल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, ते ध्यानात घेतले गेले नाही, याकडे भाऊ तोरसेकर यांनी लक्ष वेधले. तसेच २०१९ पासून देवेंद्र फडणवीस यांची पाच वर्ष यथेच्छ टिंगल केली गेली. मात्र, त्यांनी संयम बाळगून आज इतर सर्वांना चेष्टेचा विषय केले आहे, असा टोला श्री. तोरसेकर यांनी मारला. सध्या सक्षम विरोधी पक्ष नसल्यामुळे राजकारणाचा `चुथडा’ झाला आहे. एकेकाळी महाराष्ट्रात अभ्यासू विरोधी आमदारांची फळी होती. परंतु, आता ती फळी संपल्यामुळे लोकशाहीपुढे आव्हान निर्माण झाले आहे, अशी खंत श्री. भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केली. विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने भाऊ तोरसेकर यांचे संजय वाघुले व संस्थेच्या सदस्या वृषाली वाघुले यांच्याकडून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद मुळे यांनी केले.

 विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा ‘अटल करंडक’

 राज्यस्तरीय ११ व्या ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन पनवेल : दरवर्षी प्रमाणे यंदाही रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यंदा या स्पर्धेचे ११ वे वर्ष आहे. या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा ‘अटल करंडक’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. नाटय चळवळ वॄद्धींगत करण्यासाठी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी “रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा” हे ब्रीदवाक्य घेऊन ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाटयरसिकांच्या गळयातील ताईत बनली आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी नाशिक केंद्रावर १३ डिसेंबर, जळगाव केंद्रावर १४ व १५ डिसेंबर, पुणे केंद्र १९ ते २२ डिसेंबर, रायगड (पनवेल) २५ डिसेंबर, तसेच मुंबई, ठाणे, कल्याण व इतर (पनवेल) केंद्राची प्राथमिक फेरी २६ ते २९ डिसेंबरपर्यंत होणार आहे.  तर अंतिम फेरी १० ते १२ जानेवारी २०२५ रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.  या एकांकिका स्पर्धेत राज्यभरातून १०० हुन अधिक एकांकिकांचा सहभाग असतो. नवनवीन संकल्पना आणि  दर्जेदार एकांकिका सादर होत असल्याने हा करंडक महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध झाला आहे. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत स्पर्धेचा आवाका वाढला आहे.  या स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास ०१ लाख रूपये, प्रमाणपत्र आणि मानाचा अटल करंडक, द्वितीय क्रमांक ७५ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह,  तॄतीय क्रमांक ५० हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक २५ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी १० हजार रुपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह तसेच इतरही वैयक्तिक प्रकारचे पारितोषिके देऊन कलाकारांना सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचा नाट्य संस्था कलाकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, स्पर्धा प्रमुख व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले आहे. 0000

कल्याणमध्ये भास्कर ट्रॉफीसाठी क्रिकेट खेळाडू निवड स्पर्धां

ठाणे  : मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे युएन बारा भास्कर ट्रॉफीसाठी कल्याणमध्ये निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने मुंबईमध्ये भास्कर ट्रॉफी सामने खेळवले जातात. या सामन्यांमध्ये प्रवेश घेणार्‍यांसाठी १-९-२०१२ किंवा त्यापुढे जन्म झालेले  क्रिकेटपट्टू सहभागी होऊ शकतात. कल्याणच्या यंग असोसिएशन आणि युनियन क्रिकेट अकादमीसाठी ही निवड होणार आहे. १ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते १० या वेळात युनियन क्रिकेट अकॅडमी, पोद्दार इन्टरनॅशनल शाळेसमोर, वायले नगर, खडकपाडा, कल्याण पश्चिम येथील मैदानावर ही निवड चाचणी होणार आहे. तरी कल्याण परिसरातील किंवा ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंनी या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन युनियन क्रिकेट अकादमीचे तुषार सोमानी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९३२३८९०१८९ 00000

स्व. वसंतराव डावखरे स्मृती पुरस्कारासह कोकणातील शिक्षक, संस्थाचालकांचा सन्मान

 ठाण्यात रंगला पुरस्कार सोहळा   ठाणे : कोकणातील दुर्गम भागासह विविध शाळांमध्ये नवनवीन शैक्षणिक प्रयोग व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी कार्य करणारे १५१ आदर्श शिक्षक, ३० शिक्षकेतर कर्मचारी आणि ११ आदर्श संस्थाचालकांना सन्मानित करण्यात आले. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ आमदार निरंजन डावखरे व भाजपा शिक्षक आघाडी-कोकण विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या पुरस्कारातून गुणवंत शिक्षकांच्या कार्याचा सन्मान झाला असल्याची भावना शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे. दरम्यान, पुढील वर्षापासून या पुरस्काराबरोबरच आदर्श शाळा पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा स्वागताध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केली. भाजपा शिक्षक आघाडी-कोकण विभाग आणि समन्वय प्रतिष्ठान यांच्या वतीने ठाण्यातील एम. एच. हायस्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी गटनेते मनोहर डुंबरे, कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, ठाणे हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील, शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस, जनरल एज्युकेशन सोसायटीचे संचालक राजेंद्र रजपूत, समन्वय प्रतिष्ठानच्या संचालिका सौ. नीलिमा डावखरे, भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक विकास पाटील, शेखर कुलकर्णी, एन. एम. भामरे, किशोर पाटील आदी उपस्थित होते. या वेळी ठाणे शहर मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक करणाऱ्या आमदार संजय केळकर यांचा सत्कार करण्यात आला. कोकणातील उत्कृष्ट संस्थाचालक म्हणून ठाणे येथील मावळी मंडळ, पालघर जिल्ह्यातील अरविंद स्मृती, मुरबाडमधील न्यू इंग्लिश स्कूल, नवी मुंबईतील शेतकरी शिक्षण संस्था, डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्था, तारापूर एज्युकेशन सोसायटी, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, सिंधुदुर्गातील कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था, कल्याण पूर्व येथील आदर्श शिक्षण मंडळ, भिवंडीतील पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळ, कल्याण येथील नुतन शिक्षण संस्था यांना सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर कोकणातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. कोकणातील शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्तेत कायम अव्वल क्रमांक राखला. दहावीच्या परीक्षेत कोकणातील विद्यार्थ्यांचा राज्यात सर्वाधिक निकाल असून, त्यात शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे. पुढील पिढी घडविणाऱ्या शिक्षकांचा आमदार निरंजन डावखरे व भाजपा शिक्षक आघाडीकडून होणारा सन्मान हा स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न विधीमंडळात मांडण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही आमदार केळकर यांनी दिली. विधान परिषदेचे माजी उपसभापती स्व. वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ कोकणातील गुणवंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्ठाचालकांचा सन्मान करताना आनंद होत आहे. भारताच्या भविष्यासाठी कार्यरत असलेल्या गुणवंत शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमाची परंपरा २०१८ पासून सुरू झाली. सुरुवातीला शिक्षक व संस्थाचालकांपाठोपाठ यंदाच्या वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव केला जात आहे. तर पुढील वर्षापासून आदर्श शाळांना पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा स्वागताध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी केली. या वेळी काही पुरस्कारविजेत्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केला. तसेच या पुरस्कारामुळे प्रेरणा मिळाली असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाचे विनोद शेलकर यांनी सूत्रसंचालन केले. ०००००