Category: ठाणे

Thane news

नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक

कल्याण : कल्याण (पश्चिम) विधानसभाअंतर्गत नियंत्रण कक्षाचा १८००-२३३-०११७ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध केला आहे. हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित असून कल्याण (पश्चिम) विधानसभा मतदारसंघांतर्गत नागरिकांसाठी आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारी व निवडणुकीसंदर्भातील इतर तक्रारी टोल फ्री क्रमांकावर नोंदवाव्यात, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी केले आहे. 00000

सोलापूर, रत्नागिरीच्या दोन्ही संघाची विजयी सलामी

 सुवर्णमहोत्सवी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा  धाराशिव, जालना, सांगली, बीड, नाशिक यांचेही विजय धाराशिव : सोलापूर, रत्नागिरी व नाशिक या संघाच्या कुमार व मुली संघाने सुवर्ण महोत्सवी ५० वी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेची विजयी सलामी दिली. महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा ३० ऑक्टोबरपर्यंत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर आयोजित केली आहे. रविवारी सुरू झालेल्या या स्पर्धेत सलामीच्या दिवशी सर्व सामने एकतर्फी झाले. सोलापूरच्या मुलांनी जालन्यावर २१-८ व मुलीनी बीडवर १७-५ असा एक डाव राखून दणदणीत विजय मिळविला. रत्नागिरीच्या मुलांनी लातूरचा १७-७ व मुलींनी नांदेडचा १९-६ असा एक डावाने धुव्वा उडवला. नाशिकच्या मुलांनी हिंगोलीला २६-४ तर मुलींनी नंदुरबारला २०-४ असे एका डावाने नमवले. मुलींच्या गटात धाराशिव, जालना व मुलांच्या गटात सांगली, बीड  यांनीही प्रतिस्पर्धी संघावर शानदार विजय मिळविले. चमकलेले खेळाडू :  कुमार : अहिल्यानगर (मच्छिंद्र वाघमारे, (३.१० मिनिटे संरक्षण व ६ गुण), रत्नागिरी (आशिष बालाडे ६ व ३ मिनिटे नाबाद),बीड (अभिषेक हिवाळे ३.५० मि. व २ गुण), सांगली (प्रेम दळवी१ मि.नाबाद व ८ गुण), सोलापूर (कृष्णा बनसोडे २.३५मि. व ३ गुण), (शुभम चव्हाण, ३ मि. नाबाद व २ गुण). मुली : सोलापूर (समृद्धी सुरवसे ४.२०मि.), (अनुष्का पवार, ५ गुण), रत्नागिरी (मृण्मयी नागवेकर ४.२० मि.), (युवा पालवे, ५ गुण) नाशिक (तेजल सहारे, ५.१० मि. व ५ गुण), धाराशिव (अश्विनी शिंदे, ३मि. व ४ गुण), प्रणाली काळे (१.३० नाबाद , ३.३० व २ गुण). अन्य निकाल : कुमार : अहिल्यानगर विजयी विरुद्ध नांदेड २२-८ एक डावाने, बीड विजयी विरुद्ध परभणी १२-११ (७.३० मिनिटे राखून), सांगली विजयी विरुद्ध जळगाव २२-८ एक डावाने. मुली : जालना विजयी विरुद्ध हिंगोली १२-२ एक डावाने, धाराशिव विजयी विरुद्ध परभणी १२-६ एक डावाने, पालघर विजयी विरुद्ध जळगाव १२-५ एक डावाने.…

कर्जत विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीचे अस्तित्व संपले ?

माथेरान : कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्रावर तब्बल पंचवीस वर्षे राज्य केलेल्या राष्ट्रवादीचे अस्तित्व संपल्याचे या निवडणुकीमध्ये दिसून आले असून अनेक वर्षे सत्ता भोगलेल्या राष्ट्रेवादीचा एकही उमेदवार यावेळी रिंगणात नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपले की काय अशा चर्चा होताना दिसून येत आहेत. माजी आमदार सुरेश लाड यांच्या स्वरूपात राष्ट्रवादीला कर्जत मध्ये एक मोठा सक्षम चेहरा लाभला होता ज्याने येतील राष्ट्रवादी वाढविण्यास व आपले अस्तित्व राखण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली होती परंतु पक्षांतर्गत घडामोडीनंतर त्यांना नाईलाजाने भाजपामध्ये जावे लागले व त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये ही दोन गट पडल्याने कर्जत मधील राष्ट्रवादी खिळखिळी होत चालली होती परंतु  सुधाकर घारे यांनी मागील दोन अडीच वर्षांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट यामार्फत राष्ट्रवादी जिवंत ठेवण्याचे काम केले होते व या काळात राष्ट्रवादीने चांगली घोडदोड ही केली होती त्यांच्या मागे राष्ट्रवादी रायगडचे खासदार श्री सुनील तटकरे असल्याने ते लवकरच या विधानसभा क्षेत्रात उमेदवार म्हणूनही उदयास आले. राष्ट्रीवादी मध्ये दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादी जरी कमजोर झाली असली तरी आपले अस्तित्व टिकवून होती व या विधानसभा जागेवर आपला हक्क राखून होती परंतु युती आघाडीच्या स्वरूपात या जागा दोन्ही शिवसेनेला गेल्याने राष्ट्रवादीमध्ये बंड पाहावयास मिळाले व खालापूर कर्जत मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामा घेत राष्ट्रवादी ला सुरुंग लावला त्याचे पडसाद हळूहळू कर्जत मधील सर्वच विभागात दिसून येत असून अनेक ठिकाणी पक्ष प्रवेशाची मालिका सुरू झाली असून त्याचा सर्वात मोठा फटका राष्ट्रवादीलाच बसत आहे. या विधानसभा क्षेत्राचा केंद्रबिंदू कर्जत ठरत असल्याने सर्व घडामोडी येथेच घडत आहेत व त्याचे पडसाद पूर्ण तालुक्यामध्ये दिसून येत असतात सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नितीन सावंत तर शिंदे गटाचे विद्यमान आमदार  महेंद्र थोरवे यांच्यामध्ये सरळ सरळ लढत आहे परंतु राष्ट्रवादी सोडून अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केलेल्या सुधाकर घारे यांनी मोठे आव्हान उभे केले असून या विधानसभा क्षेत्रामध्ये धक्का तंत्र देण्याचे काम ते करतात का हे पाहावे लागणार आहे. सध्या शरद पवार राष्ट्रवादी गट शांत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळेच कर्जत मध्ये राष्ट्रवादीचे अस्तित्व संपले की काय अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. अनेक वर्षे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघावरती राज्य केलेल्या राष्ट्रवादीचे अशी वाताहत का झाली व यास कारणीभूत कोण याबाबत जनता अनेकांना दोषी ठरवत असून अति महत्वकांक्षाच्या हव्यासापोटी राष्ट्रवादीच्या बालेकिल्लाचा बुरुज आज ढासळला आहे. 00000

दिलीप बारटक्के यांच्यातर्फे ३ नोव्हेंबरपासून ८ दिवसांच्या  ‘कोकण महोत्सवाचे आयोजन’

ठाणे : ठाण्यातील  सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ व दिलीप बारटक्के यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा ३ ते १० नोव्हेंबर २०२४ दरम्यान सावरकरनगर येथे भव्य स्वरूपाच्या कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण महोत्सवाचे यंदा १७ वे वर्ष असून विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरनगर येथील ठा म पा शाळा क्रमांक १२० च्या मैदानात होणाऱ्या या महोत्सवात दररोज सायंकाळी सायं ६ ते रात्री ९:३० च्या दरम्यान  रोज ५ पारंपरिक दशावतार नाटके,  कोकणरत्न पुरस्कार, खेळ पैठणीचा, गुणवंत विद्यार्थी सत्कार, मुलांसाठी फनफेअर, कोकण खाद्यपदार्थांचे स्टॉल. अशांची मेजवानी असेल.खाद्यपदार्थ स्टॉलवर झणझणीत म्हावरा, अस्सल चवीचो मालवणी मसालो, खडखडे लाडू, मालवणी खाजा, कुळदाची पिठी, सुकी मच्छी, मासे, कोकम,  काजू, आंबा अशा विविध प्रकारच्या स्टॉलचा समावेश असणार आहे.या महोत्सव ठिकाणी विशेष आकर्षण म्हणजे मालवण तालुक्यातील  साळेल-नांगरभाट गावातील श्री गिरोबा  मंदिराची प्रतिकृती  साकारण्यात येणार आहे. या महोत्सवाला दरवर्षी  दीड ते दोन लाख नागरिक, कोकणप्रेमी, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रांत कार्यरत असणारे, कलाकार भेट देतात. या महोत्सवात सादर होणाऱ्या पारंपरिक मालवणी दशावतार प्रयोगाला दरवर्षी तुफान गर्दी होत असते. यंदा रविवारी ३ नोव्हेंबरला प्रेरणा कला संस्था निर्मित  “मला काही सांगायचंय!” मी अनाथांचा नाथ एकनाथ हा नाट्यप्रयोग होईल.लेखक- डॉ.प्रा.प्रदीप ढवळ,रंगावृत्ती -अशोक समेळ, डॉ.प्रा.प्रदीप ढवळ, दिग्दर्शक- अशोक समेळ निर्माता- प्रा. मंदार टिल्लू, प्रमुख कलाकार- संग्राम समेळ.सोमवार ४ नोव्हेंबरला   देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण आयोजित  ट्रिकसिनयुक्त महान पौराणिक “दशावतारी नाट्य प्रयोग क्षेत्रपाल श्री देव वेतोबा नाट्यप्रयोग होईल.५ नोव्हेंबरला लोकराजा, नटसम्राट कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत, कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर-कुडाळ आयोजित ट्रिकसिनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग ‘व्यंकटेश पद्मावती’ सादर होईल. बुधवार ६ नोव्हेंबर रोजी  सुधाकर दळवी प्रस्तुत चेंदवणकर-गोरे पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ कवठी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग आयोजित ‘मुंबईची मुंबादेवी’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होईल. ७ नोव्हेंबरला शरद मोचेमाडकर प्रस्तुत जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, दांडेली, आरोस, ता. सावंतवाडी आयोजित पौराणिक नाट्यप्रयोग ‘विंद्यवासिनी विंदेश्वरी’ सादर होईल. ८ नोव्हेंबर रोजी भाई कलिंगण प्रस्तुत बाबी कलिंगण कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, कुडाळ आयोजित दशावतारी नाट्यप्रयोग ‘मुक्त झाली भानुमति’ सादर होईल. शिवाय, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा, खेळ पैठणीचा,  भजनाची डबलबारी, महाराष्ट्राची लोकधारा लोकगीते आणि नृत्ये असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ‘या कोकण महोत्सवाक यवकच होया’, असे आवाहन सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ व आयोजक दिलीप बारटक्के यांनी केले आहे. ०००००

 अमलीपदार्थ विक्री, व्यवसाय, वितरण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा !

 मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कालिंघम यांच्याकडे नितीन देशपांडे यांची मागणी   ठाणे : अमलीपदार्थ विक्री आणि त्याचा व्यवसाय अथवा वितरण करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी कठोर पाऊले उचलावीत, अशी आग्रही मागणी ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कालिंघम यांना केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून, भारतात अमलीपदार्थांचा वापर मोठ्याप्रमाणात होताना दिसत आहे. देशभर पसरणारा व्यसनांच्या अजगराचा हा विळखा, तातडीने सोडविला गेला नाही तर, संपूर्ण तरुणपिढी आणि या देशाचं भवितव्य हा अजगर गिळंकृत करेल आणि व्यसनाधीन झालेल्या बेरोजगार तरुणांना गुलाम व गुन्हेगार बनण्यास किंवा बनविण्यास फार काळ लागणार नाही. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची आणि उर्वरित महाराष्ट्राची परिस्थिती काही वेगळी नाही, किंबहुना अत्यंत चिंताजनक स्थिती या पुरोगामी राज्याची झालेली आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात अमलीपदार्थाचे सेवन करुन, एका तरुणीवर अत्याचाराची घटना घडल्याने, अमलीपदार्थाचा मुद्दा ‘उडता पंजाब’च्या धर्तीवर, पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला असून, मुंबई-पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांतच नव्हे; तर, महाराष्ट्रातील छोटी शहरे व ग्रामीण भागांतदेखील अमलीपदार्थाच्या व्यवसायाने आपले जाळे भक्कमपणे विणायला सुरुवात केलेली आहे. अमलीपदार्थ सेवनाच्या माध्यमातून, मुंबई-महाराष्ट्रासह, संपूर्ण देशभरात गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ झाल्याच्या घटना सर्रास पाहायला मिळत आहेत. परिणामी, अमलीपदार्थांच्या व्यसनांचे प्रमाण, दिवसेंदिवस अधिकच उग्ररुप धारण करताना दिसत आहे. याचा प्रतिकूल परिणाम, आगामी विधानसभा निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता असल्याने, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कालिंघम यांना पत्र पाठवून, याप्रकरणी त्रिस्तरीय चौकशी समिती नेमण्याची करण्यात आली आहे. दरम्यान, उपलब्ध गुन्ह्यांच्या (एफआरआय) आकडेवाडीनुसार, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये अमलीपदार्थाच्या सेवनात आघाडीवर आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, मुंबई शहर हे, अमलीपदार्थाच्या सेवनात पहिल्या क्रमांकावर आहे. ही बाब प्रगत आणि पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रासाठी प्रचंड लाजिरवाणी आहे. राज्यातील तरुणपिढी अमलीपदार्थाच्या विळख्यात पुरती गुरफटून गेल्याचेच यातून अधोरेखित होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हे प्रकरण अतिशय गंभीर आणि संवेदनशील बनलेले आहे. कारण, अमलीपदार्थाच्या पूर्णपणे आहारी गेलेल्या तरुणांना, काही गुन्हेगारी प्रवृत्तीची राजकीय मंडळी, आपल्या चुकीच्या कृत्यांसाठी या तरुणपिढीचा वापर करुन घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा मतदानावर विपरीत परिणाम होऊ शकतो. एकीकडे ऐन दिवाळीच्या तोंडावर, आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ उपस्थित नसल्यामुळे, अन्नप्रक्रिया करणाऱ्या आस्थापनांची तपासणी थंडावली आहे; तर, दुसरीकडे मात्र, अमलीपदार्थविरोधी पथकाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असतानाही, अवघ्या महाराष्ट्रभरात, अमलीपदार्थांचा बेसुमार वापर वाढीस लागून, व्यसनाधीनता मोठ्याप्रमाणात वाढलेली आहे. याच पार्श्वभूमीवर, या संपूर्ण देशविघातक कृत्यांची चौकशी करण्यासाठी, एक त्रिस्तरीय समिती नेमण्यात येऊन, अमलीपदार्थ विक्री आणि त्याचा व्यवसाय अथवा वितरण करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी कठोर पाऊले उचलावीत, अशी आग्रही मागणी ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, आपल्या पत्रातून राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

 काँग्रेसने लेखी करार पाळला नाही

 सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा आरोप, ३ उमेदवारांची घोषणा !   अनिल ठाणेकर ठाणे : आयाराम गयारामांना प्रोत्साहन, खोक्यांवर विकले गेलेल्यांना परत तिकिटे, जातीयवाद्यांशी संगनमत करणाऱ्यांना तिकिटे आणि समतावादी डाव्या आंबेडकरवादी पक्षांना स्थान नाही असा व्यवहार महाराष्ट्रात केल्यास महाराष्ट्राचाही हरियाणा झाल्याशिवाय राहणार नाही.लेखी करार  करून तो न पाळणे हा  लोकशाहीशी विसंगत व्यवहार आहे . काँग्रेसच्या लोकशाही विरोधी व्यवहाराचा निषेध करीत आहोत.सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष आज साक्री–कॉम्रेड यशवंत देवमन मालचे,बागलाण– संजय संजय भिका निकम व नवापूर– रणजीत वंत्या गावित या तीन उमेदवारांची घोषणा करीत आहे* या व्यतिरिक्त धुळे ग्रामीण व शिंदखेडा, कन्नड, नंदुरबार या ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड किशोर ढमाले नंदुरबार जिल्हाध्यक्ष गावित व धुळे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड सुरेश मोरे यांनी केली. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष हा उत्तर महाराष्ट्रातील धुळे ,नंदुरबार, नाशिक तसेच संभाजीनगर,पुणे  जिल्ह्यात कष्टकरी शेतकरी आदिवासींच्या शेती, जल ,जंगल, जमीन व रोजगार हक्काच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करत आला आहे.१९७८ सालापासून ते २०२३ च्या नंदुरबार ते मुंबई पायी बिढार  मोर्चा पर्यंत हा संघर्ष चालूच आहे. सत्यशोधक ने  शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व शेतीमालाला रास्त भाव या प्रश्नांवर सातत्याने अगदी दिल्लीच्या  संयुक्त किसान मोर्चापर्यंत विविध आंदोलनात सहभाग पुढाकार घेतला आहे. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने साक्री व नवापूर विधानसभा  निवडणूक सातत्याने लढवल्या आहेत  व दखलपात्र मतदान घेतलेले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये लाल निशान पक्षाच्या समवेत नंदुरबार व धुळे या दोन्ही लोकसभा मतदारसंघात सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने नंदुरबार मध्ये २२ व धुळे लोकसभा क्षेत्रात १९ छोट्या-मोठ्या सभा संघटित करून संविधान वादी विचार व इंडिया आघाडीचा प्रचार गावोगाव पोहोचवला ,हे निकालात दिसलेच. नंदुरबार लोकसभा क्षेत्रात एडवोकेट गोवाल पाडवींना साक्री ५५ हजार व नवापूर मध्ये ६३ हजार एवढे मताधिक्य मिळवून देण्यात सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसेच धुळे लोकसभा मतदारसंघात डॉक्टर शोभा बच्छाव फक्त ३ हजार मतांनी निवडून आल्या आहेत, त्यातही बागलाण, धुळे ग्रामीण व शिंदखेडा येथील सत्यशोधक आदिवासी व दलित मुस्लिम मतदारांचा मोठा वाटा आहे . याला काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाउ पटोले व इतर नेते स्वतः साक्षी आहेत. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाशी लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या  धुळे व नंदुरबार जिल्हा  कमिटी यांनी राज्य नेत्यांसमोर लेखी करार केला होता. एप्रिल व मे महिन्यात झालेल्या या करारात  सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षासाठी साक्री विधानसभा मतदारसंघ  सोडण्यात येईल व त्याला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा राहील असे कलम तीन व चार मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. या करारावर नंदुरबार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार शिरीष कुमार नाईक व एड. गोवा पाडवी यांच्या वतीने माजी मंत्री एडवोकेट के सी पाडवी,नंदुरबार जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष माननीय दिलीप नाईक, शिवसेना नंदुरबार संपर्कप्रमुख विद्याताई साळी तसेच राज्य कार्याध्यक्ष आमदार कुनालबाबा पाटील यांच्या समोर धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शामकांत सनेर आणि डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या सामंजस्य करारा ची अंमलबजावणीची मागणी लोकसभा निवडणुकीनंतर सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने सातत्याने केली. शरद पवार यांची दिल्ली येथे कम्युनिस्ट पक्ष मालेच्या कॉम्रेड राजाराम सिंग व कॉम्रेड सुदामाप्रसाद यां दोन खासदारांसह भेट घेतली त्यानंतर नानाभाऊ पटोले ,बाळासाहेब थोरात,डॉ सुधीर तांबे, सेनानेते आदित्य ठाकरे व सुषमा अंधारे या सर्वांची भेट घेऊन महाविकास आघाडीकडे साक्री व बागलाण या दोन विधानसभा मतदारसंघांची मागणी केली. कराराच्या प्रती सर्व नेते मंडळींना पुन्हा आठवणीसाठी देण्यात आल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ निरीक्षक रमेश चैनीतला यांनाही या कराराची प्रत देण्यात आली. परंतु या आठवणीनंतरही लोकसभा निवडणुकीतील डाव्या पक्षांचा पाठिंबा, त्यांनी कोणत्याही साधन  साधनसामुग्रीची वाट न पाहता केलेल्या प्रचार याकडे काँग्रेस पक्षाने कानाडोळा केला व छोट्या पक्षांना विशेषता डाव्यांना विचारात न घेता तिकीट वाटप करत आहेत. आज ते भाजपमधून आलेल्या आयाराम गयारामांना किंवा मागील निवडणुकीत भाजपला मदत करणाऱ्यांना उमेदवारी देत आहेत. परंतु जातीयवादाच्या विरोधात जीवाचं रान करणाऱ्या प्रसंगी बलिदान करणाऱ्या डाव्यांना नाकारत आहेत.काँग्रेसने याच पद्धतीचा व्यवहार हरियाणा मध्ये केला आहे. त्याचा परिणाम ते विसरलेले दिसतात. आयाराम गयारामांना प्रोत्साहन, खोक्यांवर विकले गेलेल्यांना परत तिकिटे, जातीयवाद्यांशी संगनमत करणाऱ्यांना तिकिटे आणि समतावादी डाव्या आंबेडकरवादी पक्षांना स्थान नाही असा व्यवहार महाराष्ट्रात केल्यास महाराष्ट्राचाही हरियाणा झाल्याशिवाय राहणार नाही. लेखी करार  करून तो न पाळणे हा  लोकशाहीशी विसंगत व्यवहार आहे . काँग्रेसच्या लोकशाही विरोधी व्यवहाराचा निषेध करीत आहोत. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष आज साक्री–कॉम्रेड यशवंत देवमन मालचे,बागलाण– संजय भिका निकम व नवापूर– रणजीत वंत्या गावित या तीन उमेदवारांची घोषणा करीत आहे* या व्यतिरिक्त धुळे ग्रामीण व शिंदखेडा, कन्नड, नंदुरबार या ठिकाणी उमेदवार उभे करणे किंवा वेळप्रसंगी   मतदान संविधानवादी अपक्षा कडे वळवणे हा पर्याय आहे. जनतेनेही जातीयवादी,खोकेवादी उमेदवारांना जेथे महविकास आघाडीने तिकिटे दिली त्या काँग्रेस उमेदवारांऐवजी डाव्या फुले आंबेडकरवादी समाजवादी विचारांचा पर्याय स्वीकारावा व  निषेध व्यक्त करावा, असे आवाहन सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड किशोर ढमाले नंदुरबार जिल्हाध्यक्ष गावित व धुळे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड सुरेश मोरे यांनी केले आहे. ००००

दयानंद चोरघे यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी;

 चोरघे बाहेरील उमेदवार असल्याचा आरोप ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघात काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली असून काँग्रेसचे नेते दयानंद चोरघे यांना उमेदवारी मिळाली आहे. परंतु उमेदवारी जाहीर होताच, हिरमोड झालेल्या इच्छूकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. भिवंडी पश्चिम मतदारसंघातून तब्बल १९ जण इच्छूक होते. या मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार द्यावा अशी मागणीही जोर धरत होती. चोरघे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने आता काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाची शक्यता व्यक्त केली जात आहे. भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रात भाजपचे आमदार महेश चौघुले असून या निवडणूकीत पुन्हा एकदा भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. चौघुले यांच्याविरोधात निवडणूक लढण्यासाठी मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे दयानंद चोरघे, माजी आमदार राशीद ताहीर मोमीन, विलास पाटील यांच्यासह अनेकजण उमेदवार मागणी करत होते. शनिवारी रात्री भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चोरघे यांना उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर होताच, राशीद ताहीर मोमीन, विलास पाटील यांच्यासह काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. चोरघे हे भिवंडी ग्रामीण मतदार संघात राहतात. त्यामुळे चोरघे हे बाहेरील उमेदवार असल्याचा आरोप राशीद ताहीर मोमीन यांनी केला. भिवंडीतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे राशीद ताहीर मोमीन असेही म्हणाले. चोरघे यांच्या उमेदवारी नंतर आता काँग्रेसमध्ये बंड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान चोरघे यांच्या समोर आहे. तर दुसरीकडे चोरघे यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. भिवंडी लोकसभा निवडणूकीमध्ये राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) बाळ्या मामा यांना उमेदवारी जाहीर झाली होती. त्यावेळी काँग्रेसकडून चोरघे हे निवडणूक लढविण्यास इच्छूक होते. परंतु त्यांना उमेदवारी जाहीर झाली नव्हती. चोरघे यांच्या गटाकडून नाराजी व्यक्त केली जात होती. परंतु त्यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश आले होते. या निवडणूकीत बाळ्या मामा यांनी भाजपचे नेते कपिल पाटील यांचा पराभव केला होता.

 प्रसारमाध्यमांना निवडणूक निकालांचे अंदाज प्रसारित करण्यास प्रतिबंध

 १३ ते २० नोव्हेंबर या कालावधीत   ठाणे : सर्वत्र विधानसभा सार्वत्रिक २०२४ च्या  निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून निवडणूक शांततेत व नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निकालाचे अंदाज (Exit Poll) १३ नोव्हेंबर सकाळी ७ पासून ते २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत या कालावधीत प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्यास प्रतिबंध केले आहे.विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.  मतमोजणीच्या ४८ तास आधीपासून ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यत निकालाचे व कोणत्याही सर्वेक्षणाचे अंदाज  प्रसिद्ध करु नये.  तरी आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन सर्व प्रसारमाध्यमांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रसारमाध्यमांवर निकालाचे अंदाज (Exit Poll) (प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, दूरदर्शन आकाशवाणी) प्रकाशित करू नये. तसे आढळून आल्यास लोकप्रतिनिधी कायदा १९५१ कलम १२६ अ कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी नमूद केले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचे आदर्श आचारसंहिता सुरू असून भारतीय निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्व प्रसारमाध्यमांनी काळजी घ्यावी, असेही आवाहन जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे. विधानसभा सार्वत्रिक  निवडणूक २०२४ मध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी  स्वीपच्या माध्यमातून सर्व  विधानसभा मतदारसंघात जनजागृती करण्यात येत आहे. गुरूवारी (२४ नोव्हेंबर) १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील वागळे इस्टेट येथील के.बी.पी महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली.लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येकाने बजावावा, आपले मत अमूल्य आहे, अशा प्रकारची जनजागृती करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली. तसेच संकल्पपत्राचे वाटप करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी देखील २० नोव्हेंबर रोजी आपण मतदान करणार आहे, तसेच मतदानासाठी घरातील पालक, आजूबाजूच्या परिसरातील नागरिक व मित्रपरिवाराला देखील मतदान करण्याबाबत आवाहन करणार असल्याचा विश्वास स्वीपच्या टीमला  दिला. यावेळी महाविद्यालयातील एक विद्यार्थ्यांना मतदान जनजागृतीपर तयार केलेली कविता सादर केली. रॅलीच्या माध्यमातून केली मतदानाची १५९ कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात स्वीपच्या माध्यमातून ठामपा शाळा क्र. ७३ मधील विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान रॅली काढून परिसरातील नागरिकांना मतदान करण्याचा संदेश दिला.“मतदान हमारा अधिकार है, इससी अपनी सरकार बनती है..” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसरातून जनजागृती काढली. या रॅलीत शाळेतील शिक्षक देखील सहभागी झाली होते. यावेळी  विद्यार्थ्यांना आपल्या घरातील पालकांना तसेच परिसरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे असा संदेश देण्यात आला. या रॅलीस नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कळवा-मुंब्र्यात अहंकार विरुद्ध विकास हीच लढाई आहे – नजीब मुल्ला

– लोकसभेप्रमाणेच कळवा मुंब्रा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांनाही निवडून आणायचे आहे – डॉ. श्रीकांत शिंदे   अनिल ठाणेकर ठाणे : लोकसभा निवडणुकीतील माझ्या विजयाप्रमाणेच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कळवा-मुंब्रा विधानसभेतील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनाही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असे जाहीर उद्गार कल्याण लोकसभेतील शिवसेना खासदार डाॅ श्रीकांत शिंदे यांनी काढले. तर कळवा मुंब्र्यात अहंकार विरुद्ध विकास हीच लढाई आहे असे मत कळवा मुंब्रा विधानसभेतील महायुतीचे उमेदवार नजीव मुल्ला यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील माता भगिनींमधील मातृशक्ती नजीब मुल्ला यांना निवडून आणणार असल्याचा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केला. तर कळवा मुंब्र्यात नजीब मुल्ला यांना विजयी करुन महायुतीचे वर्चस्व निर्माण करा. असे आवाहन भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, आरपीआय – आठवले गट, आरपीआय – कवाडे गट महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांच्या निवडणुक प्रचारार्थ कळवा विभागाच्या वतीने शनिवारी सायबा हॉल, मनिषा नगर, कळवा येथे महायुतीच्या प्रमुख पदाधिका-यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वरील मान्यवर मार्गदर्शन करताना बोलत होते. कल्याण लोकसभा मतदारसंघात  शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने माझा विजय झाला. पण कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात आपला माणूस नसल्याने माझ्यामार्फत कामे होताना त्रासही होत आहे. यासाठी पक्ष न पाहता महायुतीचा उमेदवार म्हणून नजीब मुल्ला यांना निवडून आणायचे आहे. आपल्या मतदारसंघातील आपला हक्काचा माणूस म्हणून नजीब मुल्ला यांना निवडून आणण्यासाठी प्रचाराचे नियोजन करा, असे आदेशच कल्याण लोकसभेतील शिवसेना खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांनी मोबाईलवरून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्रिय सहकार्याने व कल्याण लोकसभेतील खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्या मदतीमुळ माझ्यामार्फत खासदार निधी व ठाणे महापालिकेचा निधी कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात खर्च झाला. यामुळेच कळवा मुंब्र्यात विकासकामे होऊ शकली. असे असताना स्थानिक आमदार या विकास कामाचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अजितदादांनी माझ्यामार्फत १५० कोटी रुपये कळवा मुंब्र्यातील विकासकामांसाठी दिले. कळवा मुंब्र्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, मराठी, हिंदी, उर्दू या भाषेतील महापालिका शाळा सुरु करणे इतर नागरी प्रश्न मार्गी लावणे या सेवाभावनेतुन कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक मी लढवित आहे. कळवा मुंब्रा विधानसभेतील ४५  डजार लाडक्या बहीणींच्या आशिर्वादाने या मतदारसंघातील दादागिरी संपविणे आणि अहंकार विरुद्ध विकास यासाठी ही लढाई सुरु असल्याचे महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी स्पष्ट केले. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे महाराष्ट्राचे शीर्ष नेतृत्व व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळून आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला माता भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ही मातृशक्ती कळवा मुंब्र्यातील विधानसभेतील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना भरभरून मतदानरुपी आशिर्वाद देईल अशी आशा आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केला. कळवा मुंब्र्यातील विकासासाठी शिवसेना भाजप व नजीब मुल्ला यांच्यामुळे ठाणे महापालिकेचा निधी आला आहे. पण स्थानिक आमदार याचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळेच शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षातील कार्यकर्त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत कळवा मुंब्रा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांना विजयी करुन महायुतीचे वर्चस्व येथे निर्माण करावे, असे आवाहन मेळाव्याचे अध्यक्ष  व भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केले. यावेळी शिवसेना,भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष आठवले आणि कवाडे गट आदी महायुतीतील पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून मनोगत व्यक्त करण्यात आले. सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी केले.

लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही जनतेचा कौल महायुतीला मिळेल-संजय केळकर

अनिल ठाणेकर ठाणे : लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे साथ दिली तशीच साथ जनता विधानसभा निवडणुकीत महायुतीला देईल. असा विश्वास भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,रिपाई महायुतीचे उमेदवार आ. संजय केळकर यांनी व्यक्त केला.…