Category: ठाणे

Thane news

काळा पैसा हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री –  राजन राजे

अनिल ठाणेकर ठाणे : विधानसभा निवडणुकीचा विजय हा, कोणत्याही एका पक्षाचा नाही, व्यक्तिचा नाही, जनतेचाही नाही आणि धर्माचा तर नाहीच नाही. या सगळ्यांचाच दणदणीत पराभव करुन, निवडणुकीत वाटलेल्या काळ्या पैशाने विजय मिळवलाय. आता, यापुढे ‘काळा-पैसा’ हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल, अशी संतप्त प्रतिक्रिया ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली आहे. पैशाच्या महा(युती)पुरे झाडे जाती, तेथे ५१ लव्हाळे वाचती” असाच, या महाराष्ट्र विधानसभा-निवडणूक निकालाचा ‘सातबारा’ मांडावा लागेल, अशा शब्दात राजे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, याहीपेक्षा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल म्हणजे, “नवसे पुत्र होती। तरी का करावा लागे पती।।” याच तालावर, “ईव्हीएम कारणे विजयी होती, तरी का प्रचार करावा लागे निवडणुकीप्रती”, असंच या निवडणुकीच्या निकालाचं वर्णन करावं करावं लागेल. पूर्वी ‘मटका’ लावला जायचा, आता ‘ईव्हीएम’ लावला जातो, एवढाच काय तो फरक. मतपेटीतून परिवर्तन होईल असे दिसेनासं झालं; तर, अखेरीस जनता स्वतःच्या हाती सूत्र घेते आणि अराजकसदृश पार्श्वभूमी तयार होऊ लागते. सत्ताधाऱ्यांच्या ‘स्टार-प्रचारकां’च्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या, प्रचारादरम्यान यांना लोकं गावागावातून हाकलून देतात. महागाई-बेरोजगारी आणि अर्धरोजगारीचा आगडोंब उसळलेला असतानाही, निव्वळ ‘दीड हजारी’ भिकेपोटी, महाराष्ट्रीय जनता, यांची एवढी भरभरुन मतांनी ‘ओटी’ भरेल, हे संभवत नाही…इतर भाषिकांना, बहुतांशी गुजराथी भाषिकांना श्रीमंत करणारा ‘शिवबा-संतांचा’ भोळसट महाराष्ट्र, कायमच गरीब होता; पण, गुजराथसारखा ‘नीतिशून्य’ आणि यूपी-बिहारसारखा ‘अवलक्षणी-भिकारडा’ कधीच नव्हता. फक्त, तो तसा यापुढे होऊ नये म्हणून, खूपच मेहनतीने नजिकच्या भविष्यात डोळ्यात तेल घालून दक्षता घ्यावी लागेल, अशा शब्दात ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी परखड भूमिका मांडली. ०००००

कळवा-मुंब्रामध्ये वाढलेले मतदान महाविकास आघाडीला अनुकूल

ठाणे : गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मुंब्रा-कळवा मतदारसंघात मतदानाची वाढलेली टक्केवारी ही महायुतीच्याच पथ्यावर पडण्याची दाट शक्यता आहे. या मतदार संघात गेल्या 15 वर्षात जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विकासकामांमुळे कळव्यातील बहुतांश मतदारांचा कल मतदानापूर्वीसुद्धा महाविकास आघाडीकडेच होता. त्यामुळे मतदानात देखील हा कल उतरण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे लोकसभेतील भाजपने मुस्लिम विरोधातील घेतलेली भूमिका, रामगिरी महाराजांचे वक्तव्य आणि मुस्लिम चेहरा असूनही मात्र महायुतीचा चेहरा म्हणून मुंब्रामध्ये नजीब मुल्लांना किती मतदारांनी पसंती दिली हे मुद्दे देखील या मतदारसंघात प्रभावी ठरले आहेत. ठाणे महागनरपालिका क्षेत्रात असलेला परंतु ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडत नसलेला मतदारसंघ म्हणजे कळवा-मुंब्रा मतदारसंघ. 2009 पूर्वी हा मतदारसंघ बेलापूर मतदारसंघात मोडत होता. तेव्हा गणेश नाईक यांनी बरीच वर्षे या मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. परंतु, 2009 ला मतदारसंघांची पुनर्रचना झाल्याने कळवा-मुंब्रा नवा मतदारसंघ निर्माण झाला आणि तेव्हापासून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्याकडे हा मतदारसंघ आहे. आधी गणेश नाईक आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दबदबा कायम ठेवला होता. मात्र राष्ट्रवादीतील फुटीमुळे पहिल्यांदाच या मतदारसंघात राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी अशी निवडणूक पाहायला मिळाली. संपूर्ण कळवा पश्चिम, रेतीबंदर, पारसिक नगर, खारीगाव, पूर्वेकडील विटावा, सूर्या नगर, मुंब्रा, कौसा हे सर्व भाग या मतदार संघात येतात. भूमिपुत्र आगरी-कोळी बांधव आणि मुस्लिम समाज असे मिश्र मतदार येथे राहतात. कळवा मुंब्रा हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा गड राहिला आहे. गेल्या पंधरा वर्षांत जितेंद्र आव्हाडांनी येथे खूप कामे केली आहेत. म्हणून मोदी लाटेतही राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड निवडून आले होते. महायुतीकडून मुस्लिम चेहरा म्हणून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. गेल्या पंधरा वर्षांपासून मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली जात आहे. तसेच घड्याळ चिन्हावरच येथे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घड्याळ चिन्हाचा फटका पडू नये यासाठी महाविकास आघाडीकडून पुरेपूर दक्षता घेण्यात आली होती. केलेल्या विकासकामांमुळे पारसिक, खारेगाव, कळवा परिसरात मतदारांचा कल महाविकास आघाडीकडे दिसून आला. तर मुंब्य्रात लोकसभेतील भाजपची मुस्लिम विरोधातील भूमिका, मुस्लिम असूनही महायुती म्हणून नजीब मुल्ला यांचा असलेला चेहरा, रामगिरी महाराजांचे वक्तव्य आणि पारंपरिक मुस्लिम मतदार हा महाविकास आघाडीच्या आणि पर्यायाने जितेंद्र आव्हाड यांच्याच बाजूने राहण्याची जास्त शक्यता असल्याने ही निवडणूक महाविकास आघाडीला अनुकूल होण्याची शकतात आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड 1 लाख 9 हजार 283 मतानी जिंकले होते. तर, शिवसेनेच्या दीपाली सय्यद 33 हजार 644 मतांनी आणि आम आदमी पक्षाचे अबू फैजी यांना 30 हजार 520 मते मिळाली आहेत. नजीब मुल्ला आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात या निवडणुकीच्या काळात अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नजीब मुल्ला यांच्यासाठी या मतदार संघात प्रचारसभा घेतली. मुंब्य्रात 65 टक्के मतदान हे महाविकास आघाडीच्या बाजूने होण्याची शक्यता असा अंदाज या मतदार संघातील जाणकारांचा आहे. त्यामुळे मुस्लिम बहुल मतदार संघ असलेला मुंब्रा कळवा मुस्लिम समाजातील उमेदवाराला संधी देतात की पारंपरिक आमदाराला पुन्हा निवडून आणतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सिव्हील रुग्णालयात बालकांसाठी आरोग्यदायी खाऊचा कोपरा !

ठाणे : लहान मुलांना बाहेरचे चटपटीत पदार्थ खाऊ घालून पालक वर्ग मुलांच्या आरोग्याशी खेळत असला तरी ठाणे सिव्हील रुग्णालयात येणार्‍या बालकांसाठी खाऊचा कोपरा ही नाविण्यपूर्ण संकल्पना राबविण्यात आली आहे. रुग्णालयातील छोट्या जागेत मुलांना पोष्टिक आहार खाऊच्या माध्यमातून दिला जाणार असून, विविध बरण्यांमध्ये भाजलेले शेंगदाणे, फुटाणे, चिवडा, चिक्की असे जिन्नस त्यासोबत फळे देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, नेत्रशल्यचिकित्सक डॉ. संगीता माकोडे, भुलतज्ञ डॉ. प्रियांका महंगाडे, डॉ. अर्चना पवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश वानखेडे, डॉ गोपणपल्लिकर, विनोद जोशी, अधिसेविका प्रतिभा बर्डे आदी उपस्थित होते. खाऊचा कोपर्‍यात काय असणार रुग्णालयातील वॉर्डच्या एका कोपर्‍यात सकस व पौष्टिक आहार उपलब्ध करून दिला आहे. मुलांना त्याच्या आवडीप्रमाणे खाऊ निवडून खाणे शक्य होईल. खाऊच्या कोपर्‍यात विविध बरण्यांमध्ये भाजलेले शेंगदाणे, फुटाणे, चिवडा, चिक्की असे जिन्नस भरले व त्यासोबत फळेही ठेवण्यात येणार आहे. ठाणे सिव्हील रुग्णालयात सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी येत असतो. काहीवेळा या रुग्णांबरोबर छोटी मुलं देखील असतात. या लहान मुलांना भूक लागलीच तर बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊ घातले जातात. मात्र असे खाद्य पदार्थ मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हाच धागा पकडून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात खाऊचा कोपरा ही संकल्पना राबवली असल्याची माहिती आहार तज्ज्ञ डॉ.शीतल नागरे यांनी दिले. रुग्णालयात फिरताना अनेकदा लाहान मुलांच्या हातात वडापाव, चायनीज किंवा अस काही तरी खाताना दिसून आली. यावेळी राऊंड घेताना रुग्णालयाच्या आहार तज्ञ डॉ शितल नागरे यांच्या लक्षात आले व जेवणा व्यतिरिक्त मुलांना पौष्टिक आहार मधल्या वेळेत खाऊच्या कोपरा माध्यमातुन देता येईल आणि ही माहिती डॉ. कैलास पवार यांना सांगताच त्यांनी खाऊचा कोपरा सुरू करण्याची परवानगी दिली.

क्रिकेटमध्ये सराव आणि सातत्य महत्वाचे – संजय केळकर

अनिल ठाणेकर ठाणे : दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचा असेल तर डोक्यात हवा न जाऊ देता, सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे त्यात सातत्य ठेवले पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाल, असा संदेश आमदार संजय केळकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिला. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम आयोजित करण्यात आलेल्या ४८ वी एन.टी.केळकर स्मृती आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शुक्रवारी सकाळी ठीक. ९.३० वाजता स्टार स्पोर्टस् क्लब आयोजीत ४८ वी एन.टी.केळकर स्मृर्ती आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा ठाणे महानगर पालिका पुरस्कृत,डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशनच्या सयुक्तपणे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशन राष्ट्रीय महिला क्रिकेटर व मुंबई क्रिकेट असोसिएशन महिला क्रिकेट निवड समिती सदस्य तथा व्यवस्थापक सुषमा मढवी व भारत सरकार एनटीपीसी चे मा.संचालक ,टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष श्री विद्याधर वैशंपायन यांच्या हस्ते व स्पर्धेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर व बाळाराम खोपकर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. मी कॉलेज मध्ये होतो तेव्हा पासून ही स्पर्धा सुरू आहे. त्यावेळेला  शालिग्राम टूर्नामेंट म्हणून सुरू होती. मात्र कालांतराने ती बंद पडली. म्हणून रणजी प्लेअर, क्रिकेट मधील इतर दिगजनांना वाटले की ही स्पर्धा सूरु राहिली पाहिजे. येथील खेळाडूंना वाव मिळावा या उद्देशाने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या केलेल्या चर्चेनंतर ही टूर्नामेंट आम्ही पुन्हा सुरू केली. ४८ वर्षांपूर्वी ही स्पर्धा पुन्हा सुरू केली आणि आज अखंडितपणे सुरू आहे.  या टूर्नामेंटचे वैशिष्ट्य असे आहे की आत्तापर्यंत साडेसातशे हुन अधिक खेळाडू हे राज्यासह इतर राज्यांसाठी तयार झालेले आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यास देखील ही स्पर्धा महत्त्वाची ठरत आहे असेही केळकर म्हणाले. यात महापालिकेचे देखील सहकार्य लाभत आहे. ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट पुढे गेला पाहिजे खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे हाच प्रमुख उद्देश ही स्पर्धा सुरू करण्यामागचा असल्याचे ते म्हणाले. या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक खेळाडू पुढे गेले आहेत. नवीन खेळाडूंना आवाहन करेन की विकेटवर टिकता आले पाहिजे. दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचा असेल तर डोक्यात हवा न जाऊ देता सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे तरच तुम्ही पुढे जाल असेही संजय केळकर म्हणाले.

अजित पवार मुख्यमंत्री होणार?

 पुण्यात लागलेल्या पोस्टरमुळे महायुतीमधील चढाओढ चर्चेत   पुणे : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले असून आज मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग…

कडेकोट बंदोबस्तात पनवेलची मतमोजणी

पनवेल : पनवेल विधानसभा निवडणूकीच्या निकालाची मतमोजणी शनिवारी सकाळी आठ वाजता शहरातील कर्नाळा स्पोटर्स अकादमीसमोरील ए.आर. कालसेकर पॉलिटेक्नीक महाविद्यालयात केली जाणार आहे. याच महाविद्यालयात ६०४ इव्हीएम (मतदान) यंत्र पोलीस बंदोबस्तामध्ये…

मतमोजणीसाठी ठाण्यातील वाहतूक मार्गात बदल

ठाणे:  आज वागळे इस्टेट आयटीआय काॅलेजजवळ काेपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघांची मतमाेजणी हाेणार आहे. त्यामुळे या भागात हाेणारी संभाव्य राजकीय कार्यकर्त्यांची, तसेच नागरिकांची गर्दी लक्षात घेता श्रीनगर वागळे इस्टेट या भागातील वाहतूक…

कल्याण पूर्वेत फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी

कल्याण : कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी, खडेगोळवली, मलंगगड रस्ता, तिसगाव नाका, चक्की नाका भागातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर फेरीवाले हातगाड्या, ठेले लावून व्यवसाय करतात. हातगाड्या, ठेल्यांमुळे रस्ते अडून राहत असल्याने कल्याण पूर्व…

‘समृध्दी’ची शहापूर-आमणे महामार्गावरील कामे शेवटच्या टप्प्यात

कल्याण : नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावरील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, ठाणे जिल्ह्यातील शहापूर ते आमणे (भिवंडी) या शेवटच्या ७५ किलोमीटरच्या टप्प्यातील कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. शहापूर शेरे-आमणे रस्त्यावरील बोगद्याचे काम…

 ठाणे जिल्ह्यात लाडक्या बहिणी मतदानात आघाडीवर

 पुरुषाच्या तुलनेत एक टक्क्याने पुढे   ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार संख्येच्या तुलनेत ५६ टक्के पुरुषांनी तर ५७ टक्के महिलांनी मतदान केले असून यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिला मतदानामध्ये एक टक्क्याने पुढे असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात लाडक्या बहिणी मतदानात आघाडीवर असल्याचे चित्र असून महिलांचे वाढलेले मतदान कुणाला फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार, हे आज स्पष्ट होईल. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामधून २४४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली असून जिल्ह्यातील उमेदवारांचे भवितव्य बुधवारी मतदान यंत्रामध्ये बंदिस्त झाले आहे. या निवडणुकीत जिल्ह्यात अनेक ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला होता. काही ठिकाणी मनसे उमेदवार, बंडखोर अपक्ष उमेदवारांमुळे तिरंगी लढती झाल्या आहेत. महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना राबविली. या योजनेतील अनुदान आणखी वाढविण्यात येणार असल्याचा प्रचार महायुतीने केला होता. तर, महाविकास आघाडीनेही याच योजनेचा आधार घेत त्यातील अनुदान वाढवून देऊ असा मुद्दा प्रचारात मांडला होता. या योजनेच्या माध्यमातून महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुती आणि महाविकास आघाडीने केल्याचे चित्र दिसून आले होते. असे असतानाच, जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मतदानाची टक्केवारी जास्त असल्याचे समोर आले आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण ७२ लाख २९ हजार ३३९ मतदारांपैकी ४१ लाख १५ हजार ७५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ३८ लाख ४५ हजार ४२ पुरुष मतदारांपैकी २१ लाख ८३ हजार ५११ मतदरांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी ५६ टक्के इतकी आहे. तर, ३३ लाख ८२ हजार ८८२ महिला मतदारांपैकी १९ लाख ३१ हजार ९७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी ५७ टक्के इतकी आहे. १ हजार ४१५ इतर मतदारांपैकी २७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या तुलनेत ५६ टक्के पुरुषांनी तर ५७ टक्के महिलांनी मतदान केले असून यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिला मतदानामध्ये एक टक्क्याने पुढे असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. पाच मतदारसंघात महिला आघाडीवर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पश्चिममध्ये पुरुषांचे मतदान ५२ टक्के तर महिलांचे मतदान ५६ टक्के इतके झाले आहे. भिवंडी पूर्वमध्ये पुरुषांचे मतदान ४९ टक्के तर, महिलांचे मतदान ५४ टक्के इतके झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघामध्ये पुरुषांचे मतदान ५९ टक्के तर महिलांचे मतदान ६० टक्के इतके झाले आहे. ऐरोलीमध्ये पुरुषांचे मतदान ५४ टक्के तर महिलांचे मतदान ५५ टक्के आणि बेलापूरमध्ये पुरुषांचे मतदान ५४ टक्के तर महिलांचे मतदान ५५ टक्के इतके मतदान झाले आहे. यामुळे १८ पैकी ५ मतदार संघात महिलांची मतदान टक्केवारी सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. 0000