Category: ठाणे

Thane news

कचराळी तलाव परिसरात केळकर यांनी मॉर्निग वॉक करणाऱ्यांशी संवाद

ठाणे : दिवाळी संपताच ठाणे शहर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांनी आपल्या प्रचाराचा झंझावात सुरु केला आहे. नुकत्याच त्यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन झाले होते, त्यानंतर मंगळवारी सकाळीच त्यांनी कचराळी तलाव येथे मॉर्निग वॉकला येणाऱ्या जेष्ठ, तरुण, महिला वर्ग यांच्याशी संवाद साधला. अनेक जेष्ठ नागरीकांनी त्यांचे यावेळी जोरदार स्वागत केले. केळकर हे खऱ्या अर्थाने जनसेवक असल्याचेही अनेकांनी यावेळी बोलून दाखविले. भाजपचे संजय केळकर हे ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा निवडणुक लढवित आहेत. त्यानुसार आता त्यांनी आपल्या प्रचाराला सुरवात केली आहे. मंगळवारी सकाळी ७.३० वाजता त्यांनी थेट कचराळी तलाव परिसराला भेट दिली. यावेळी येथे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या जेष्ठ नागरीक, तरुण मंडळी आणि महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, सुभाष काळे आदींसह इतर पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या जेष्ठ नागरीकांनी त्यांचे स्वागत केले. तसेच त्यांच्याशी गप्पा देखील मारल्या. तसेच या निवडणुकीत आपला निर्धार जनसेवक संजय केळकर हेच असल्याचेही अनेकांनी बोलून दाखविले. तब्बल दोन तास केळकर यांनी या परिसरात मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून संवाद साधला. तसेच ठाणे शहरातील विकास कामांसह इतर सोई सुविधा कशा उपलब्ध करुन दिल्या जातील यावर देखील त्यांनी दृष्टीक्षेप टाकला.

नवी मुंबई सानपाडा येथील कै. सिताराम मास्तर उद्यानात सानपाडा गार्डन समूह ७.५० च्या वतीने सानपाडा विभागातील विविध गृहनिर्माण सहकारी सोसायटीतील पदाधिकारी, सामाजिक, राजकीय  कार्यकर्त्यांनी व सभासदांनी ४ नोव्हेंबर  रोजी घरी बनवलेली दिवाळी आणून सामूहिक दिवाळी फराळ कार्यक्रम साजरा केला.

आज ठाण्यात योगेंद्र यादव यांचे व्याख्यान

ठाणे : बुधवारी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात, सायं. ७:३० वा. भारत जोडो अभियानच्या वतीने ‘लोकशाही, संविधान व मताधिकार’ या विषयावर नागरिकांचे सांस्कृतिक संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय संयोजक व प्रसिद्ध निवडणूक विश्लेषण तज्ञ योगेंद्र यादव यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. यावेळी लोकशाहीर संभाजी भगत व त्यांचे सहकारी आंबेडकरी जलशाची झलक सादर करणार आहेत. भारत जोडो अभियानचे राज्य संयोजक उल्का महाजन व डॅा. संजय मंगला गोपाळ यांचेही यावेळी मार्गदर्शन होईल. भारत जोडो अभियान कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसून देशातील नागरिकांचे संवैधानिक हक्क शाबूत रहावेत व जगणे सुसह्य व्हावे यासाठी कार्यरत संघटना आहे. देश कधी नव्हे तो संक्रमण काळातून जात आहे. लोकसभा निवडणुकीत विद्यमान सत्ताधाऱ्यांचा चारसो पारचा नारा निष्प्रभ करत, विरोधकांनी त्यांना कुबड्यांवरील सरकार स्थापन करायला लावले. यात महाराष्ट्रातील जनतेचा सिंहाचा वाटा राहिला आहे. तशीच जागरुकता आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम रहावी, यादृष्टीने सदर सांस्कृतिक संमेलन आयोजित केले असल्याचे भाजोअ कोकण विभाग संयोजक मुक्ता श्रीवास्तव व राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले. देशातील विद्यमान सरकारच्या गेल्या १०-११ वर्षांच्या काळात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या हमीभावास नकार, ठराविक कार्पोरेट कंपन्यांना मलिदा आणि आदिवासी व संघटीत – असंघटीत कामगारांच्या दैन्यावस्थेत भर, अशी स्थिती बिघडत चालली आहे. मणिपूर पासून बदलापूर पर्यंत महिला अत्याचाराच्या करूण कहाण्या वाढत आहेत. राज्यातील सरकारही फसवणुकीच्या आधारे सत्तेवर आले असून, केंद्राच्या टेकूवर ते तग धरुन आहे. राज्याच्या हितापेक्षा स्वतःचे व स्वपक्षाचे हित अशी महायुतीतील पक्षांची वाटचाल सुरु आहे. डबल इंजिन सरकार म्हणतांना सर्वसामान्यांवरील अत्याचार व बेहालीत दुप्पट वाढ झाली आहे. लोकशाही अधिकारांचे व अभिव्यक्ति स्वातंत्र्याचे हनन होते आहे. अशा परिस्थितीत राज्यात सत्तापरिवर्तन घडवून आणण्याच्या प्रयत्नास भारत जोडो अभियान ही कटीबद्ध आहे. संविधानवादी ठाणेकर नागरिकांनी या सांस्कृतिक संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ठाण्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व संमेलन संयोजक जगदीश खैरालिया व वंदना शिंदे यांनी केले आहे.

डोंबिवलीचे पाणी छुप्या पद्धतीने ठाण्याला पळविण्याचे षडयंत्र

मनसेचे उमेदवार राजू पाटील यांचा मुख्यमंत्री पिता-पुत्रावर घणाघात डोंबिवली – एका भागाचे पाणी दुसऱ्या भागात. दुसऱ्या भागाचे पाणी अन्य भागात असे उद्योग काही मंडळींकडून कल्याण ग्रामीणमध्ये सुरू आहेत. बारवी धरणातील नवी मुंबईच्या वाट्याचे १४० दशलक्ष पाणी २७…

हा प्रगती आणि स्थगिती यांतील सामना – प्रविण दरेकर

अनिल ठाणेकर ठाणे : विधानसभेसाठी महाराष्ट्रात होऊ घातलेली आगामी निवडणूक ही महाराष्ट्राच्या भविष्याची वाटचाल निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरणार असून राज्याच्या विकासाला स्थगिती देणारे सरकार हवे की प्रगतीला गती देणारे सरकार सत्तेवर हवे याचा निर्णय मतदारांना करावयाचा आहे. गेल्या पाच वर्षांतील पहिल्या अडीच वर्षांत जनतेने स्थगितीचा अनुभव घेतला, व अलीकडच्या अडीच वर्षांत वेगवान प्रगतीचाही अनुभव घेतला, त्यामुळे निर्णय करणे आता सोपे झाले असून महायुतीला कौल देऊन जनता प्रगतीच्या बाजूने मतदान करतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.यावेळी आमदार ॲड निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संजय वाघुले, प्रदेश प्रवक्ते सागर भदे,  मृणाल पेंडसे उपस्थित होते. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना राज्याच्या प्रगतीला खीळ बसली, आणि सर्वच क्षेत्रांत राज्याची पीछेहाट झाली. मुंबईतील आरे-कुलाबा मेट्रो प्रकल्पाचे काम निम्म्याहून अधिक पूर्ण झालेले असताना हा प्रकल्प थांबविल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने राज्याचे १४ हजार कोटींचे नुकसान केल्याचे स्पष्ट झाले, अन्य अनेक जनहिताचे प्रकल्प रोखल्याने शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि गरीब जनता सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहिली. मुंबईचा किनारी मार्ग, अटल सेतू, मेट्रो, नवा विमानतळ, झोपडपट्टी योजना, अशा अनेक सुविधांना महायुती सरकारने पुढे राबविल्या आणि बिघडलेला महाराष्ट्राचा मार्ग रुळावर आणला. समृद्धी महामार्गास महाविकास आघाडीने विरोध केला होते,  मराठवाडा वॉटरग्रीड योनजेतून मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीच्या प्रयत्नांनाही ठाकरे सरकारने खीळ घातली. अडीच वर्षांत उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केलेल्या जनहिताच्या आणि राज्यहिताच्या एका तरी कामाचा दाखला द्यावा, असे आव्हान श्री.दरेकर यांनी दिले. ठाकरे सरकारने प्रकल्प रोखले, आणि महायुती सरकारने त्यांना गती दिली. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी केवळ सत्तेसाठी निवडणुका लढवत आहे, तर आमची महायुती विकासाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी, आणि काम दाखवून मते मिळविण्यासाठी निवडणुका लढवत आहे, असा दावा श्री. प्रवीण दरेकर यांनी केला. सरकारने ठरविले, तर विकासाचे शानदार उपक्रम सरकार राबवू शकते, हे महायुती सरकारने सिद्ध केले आहे. विकासासोबत समाजजीवनाचा स्तर उंचावण्याच्या योजनाही राबविण्याची गरज ओळखून लाडकी बहीण योजना राज्यात सुरू केली, ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी अशा अनेक घटकांसाठी महायुती सरकारने आखलेल्या योजनांमुळे राज्याच्या सामाजिक विकासालाही गती मिळाली आहे, असा दावा आ. प्रवीण दरेकर यांनी केला. पटोले-पवार-ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने आपल्या सत्ताकाळात अनेक घोषणा केल्या, अनेक आश्वासने दिली, पण त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही, एकही घोषणा अमलात आणली नाही, असे सांगून आ. दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणाचा पाढाच पत्रकार परिषदेत वाचला. त्यांच्याच सत्ताकाळात एसटी कर्मचाऱ्यांची परवड झाली, वेतनही न मिळाल्याने १२० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, एमपीएससी परीक्षार्थींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना वाऱ्यावर सोडले, लॉकडाऊन काळातील वीजबिल माफीच्या घोषणेला हरताळ फासला, अनुसूचित जातिजमातींकरिता आयोग नेमण्यात दिरंगाई केली,  अतिवृष्टी आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देऊन पाने पुसली, कर्जमाफीच्या वारेमाप घोषणा करूनही अमलबजावणी केलीच नाही, आरक्षणाचा प्रश्न अधिक जटिल केला, प्रकल्प रखडले, उद्योगांना हिरवा कंदिल दाखविण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करून महाराष्ट्राची औद्योगिक प्रतिष्ठाही घालविली, अशा आरोपांची जंत्रीच आ. दरेकर यांनी पत्रकारांसमोर वाचली. याउलट महाविकास आघाडीने गेल्या सव्वादोन वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा प्रगती पुस्तकाद्वारे महाराष्ट्रासमोर मांडला असून सामाजिक, औद्योगिक विकास व पायाभूत सुविधांमुळे राज्याचा बदललेला चेहरामोहरा आ जनतेसमोर आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नावाचा मुखवटा पांघऱून राज्याच्या विकासाचा विनाश करणाऱ्या अभद्र आघाडीला जनतेने नाकारले आहे, असेही ते म्हणाले.

निवडणुका होईपर्यंत प्रतिस्पर्धी पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटू नका!

भाजपचा पदाधिकाऱ्यांना सल्ला डोंबिवली : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांची भेट घेतली आहे. तत्पूर्वी त्यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांची देखील भेट घेतली आहे. ठाकरे गट उमेदवाराच्या या भेटीगाठीने भाजप शिंदे गटाच्या गोटात खळबळ माजली आहे. याच भीतीतून भाजपचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी महायुती पदाधिकाऱ्यांना ‘निवडणुका होईपर्यंत कुणीही प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा कार्यकर्त्यांना भेटू नका. शुभेच्छा काय त्या फोनवरून द्यायला सांगा. 20 तारखेनंतर आपली मैत्री जपा असा सल्ला दिला आहे. अंबरनाथ मध्ये मनसेने ठाकरे गटाला दोस्तीचा वादा दिला असताना आता शिंदे गटातील पदाधिकारी देखील वानखेडे यांना भेटत असल्याने आमदार बालाजी किणीकर यांच्या विरोधात संदेश जात असल्याने या कानपिचक्या दिल्या जात आहेत का ? अशी चर्चा आता रंगली आहे. दिवाळीची धामधूम संपताच आता राजकीय मंडळी उमेदवाराच्या प्रचारासाठी कामाला लागली आहेत. कल्याण ग्रामीण मतदारसंघात महायुती मधील शिवसेना शिंदे गटाने मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या विरोधात उमेदवार दिल्याने मनसैनिक नाराज आहेत. त्यातच अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील मनसैनिकांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांना पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे. दिवाळी दीपोत्सवाला वानखेडे यांनी आमदार पाटलांची भेट घेतली. यावेळी आमदार पाटील यांनी देखील वानखेडे हे माझे मित्र आहेत. एक मित्र म्हणून मी त्यांना नक्कीच मदत करेल. पक्षाची भूमिका जी काही असेल ते नंतर पाहिले जाईल असे सांगितले. यामुळे महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात खळबळ माजली आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे उमेदवार वानखेडे यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांची त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अंबरनाथ येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना कानपिचक्या दिल्या आहेत. भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी आपल्या सांभाषणात म्हणाले, निवडणुकीच्या काळात आपला वाढदिवस असेल तर एखादा प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा कार्यकर्ता आपल्याला भेटायला येतो. त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकून संभ्रम निर्माण करतो. त्यामुळे 20 तारखेपर्यंत आपली मैत्री, आपले संबंध बाजूला ठेवा, आणि कुणालाही भेटू नका, फोनवरून शुभेच्छा स्वीकारा. त्यांना सांगा तुमच्या निवडणुका तुम्ही लढा आमच्या निवडणुका आम्ही लढतो. बाकी सगळं 20 तारखेनंतर असं भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी म्हणाले. 20 तारखेपर्यंत फक्त राजकारण, निवडणूक, महायुती आणि धनुष्यबाण इतकंच लक्षात ठेवा, असं सूर्यवंशी म्हणाले.

संजय केळकर यांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने दिला जाहीर पाठिंबा

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार संजय केळकर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरूच असून त्यांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी आपल्या पदाधिकारी यांच्या सह नुकतीच केळकर यांनी भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे. भाजपने पुन्हा एकदा संजय केळकर यांच्या विश्वास दाखवत ठाणे शहर विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यानुसार त्यांनी आता आपला प्रचार सुरू केला आहे. त्यांना विविध संघटना आणि पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. त्यात आता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी केळकर यांनी भेट घेतली आणि पाठिंबा दर्शविणारे पत्र दिले आहे. केळकर यांना ठाणे शहरातील जनतेची सेवा करण्याची संधी भाजपने दिली त्यासाठी मी भाजपचे आभार मानतो असे सांगत उघडे यांनी केळकर यांच्या कार्याचा गौरव केला. केळकर हे असे आमदार आहेत की जे गोर गरीब जनेतसाठी सदैव सेवेत उपलब्ध असतात. जनेतला न्याय देणार खरा आमदार हे केळकर आहेत असेही ते म्हणाले. केळकर हे आपल्याच पक्षाचे उमेदवार असल्याचे समजून त्यानुसार त्यांच्यासाठी आपल्या सर्वांना एकदिलाने काम करायचे आहे असे अवाहन त्यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना केले. केळकर यांना भरघोस मतांनी निवडून आणायचे असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

सिडकोच्या २६ हजार घरांच्या अर्जनोंदणीसाठी अखेरचे ७ दिवस

नवी मुंबई : सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ६८ हजार इच्छुकांनी या महागृहनिर्माणात घर मिळावे यासाठी अर्जनोंदणी केली आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणीची अखेरची मुदत सिडकोने…

नवी मुंबईत शिंदे शिवसेनेचे बंड कायम;

ऐरोलीत विजय चौगुले, तर बेलापूरमध्ये विजय नहाटा रिंगणात नवी मुंबई : नवी मुंबई ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघात महायुतीत झालेली बंडखोरी रोखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपयश आल्याचे सोमवारी…

ठाणे जिल्ह्यात ९० उमेदवारांची निवडणुकीतून माघार,

जिल्ह्यात २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या ४७ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न भंगले असतानाच, त्यापाठोपाठ सोमवारी उमेदवारी…