Category: ठाणे

Thane news

विरुद्ध दिशेकडील वाहतुक रोखण्यासाठी ठाण्यात ‘टायर किलर’

ठाणे : विरुद्ध दिशेने होणारी वाहतुक रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने ठाण्यातील रस्त्यांवर टायर किलर (टोकदार उपकरणे) बसविण्याचा निर्णय घेतला आहे. अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हे ‘टायर किलर’ बसवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. हे टायर किलर बसवण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती त्या त्या भागात दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. घोडबंदर रोड तसेच अंतर्गत रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शुक्रवारी बैठकीचे आयोजन महापालिकेच्या नागरी प्रशिक्षण केंद्र येथे करण्यात आले होते. या बैठकीस ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, महापालिका उपायुक्त दिनेश तायडे, शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, घोडबंदर रोडचे नोडल अधिकारी आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह मेट्रो प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. विरुद्ध दिशेने वाहने चालविल्याने अपघात, वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर ‘टायर किलर’ बसवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अशी ठिकाणे वाहतूक पोलीस निश्चित करणार आहेत. त्यानंतर तेथे महापालिकेतर्फे टायर किलर बसवण्यात येतील. हे टायर किलर बसवण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती त्या भागात दिली जाईल. टायर किलर बसविल्याबाबतचे माहिती फलक १०० ते २०० मीटर अंतरावर लावण्यात येतील. या भागात रात्रीच्या वेळेस पुरेसा प्रकाशझोत असल्याची खात्री केली जाईल. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा क्षेत्रात तो भाग येत असल्याचे निश्चित केल्यानंतर हे उपकरण बसवले जातील. या उपाययोजनेमुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना अटकाव होईल, असे महापालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. मागील दोन आठवड्यांत घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे. वाहतूक कोंडीपासून मुक्तीसाठी करीत असलेल्या या उपाययोजनांचा सातत्याने आढावा घेतला जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीच्या समस्येची तड लावण्यासाठी झालेल्या पहिल्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार विविध यंत्रणांनी एकमेकाशी समन्वय राखून उपाययोजना केल्याची आल्याची माहिती वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली. तसेच, सध्या असलेल्या अडचणी व त्यावरील संभाव्य तोडगे यांचे विवेचनही त्यांनी केले. त्याचबरोबर, १२.५ टन वजन क्षमतेच्या पुढील वाहने ही अवजड वाहने आहेत. त्यात सरसकट सर्व मालवाहू वाहने येत नाहीत. त्यामुळे तशी काही मालवाहू वाहने दिसली तर गैरसमज होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. गायमुख घाट, भाईंदर पाडा ते गायमुख या पट्ट्यामध्ये अजूनही वाहतुकीसंदर्भात काही उपाययोजना करण्याची गरज शिरसाट यांनी व्यक्त केली. दीडशे ते दोनशे टन वजनाची वाहने गायमुख घाटातून जातात. त्यामुळे पावसाळ्यात डांबरी रस्ता सतत खराब होतो. येथे काँक्रिटीकरणाची आवश्यकता असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता तांबे यांनी दिली. हा मार्ग आता मीरा-भाईंदर महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, कापूरबावडी- माजीवडा उड्डाणपुलावरील मुंबईच्या दिशेने असलेल्या वळण रस्ता, विवियाना मॉलपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण लवकरच केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मेट्रो मार्गिकेलगत सुरू असलेल्या दोन उड्डाणपुलांच्या कामामुळे तेथील मार्गिका अरुंद झाल्या आहेत. त्यामुळे सेवा रस्ते दुरूस्त करावेत अशी मागणी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यावर सेवा रस्त्यावरून अवजड वाहतूक करताना अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी व्यक्त केली. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आधी सेवा रस्त्याचे सक्षमीकरण करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे “मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत”  “ठाणे विकास परिषदेचे” उद्घाटन संपन्न

Untitied-3   ठाणे : विकसित शहर घडविण्यासाठी प्रत्यक्ष अडचणी काय आहेत, यावर अभ्यास करून त्यावरील उपाययोजना शोधून त्या प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी,  “ठाणे विकास परिषद-2024”चे आयोजन करण्यात आले होते. मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या कार्यक्रमाचे डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर “मित्रा” चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, “मित्रा” चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर व अमन मित्तल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पर्यटन विभागाचे संचालक बी.एन.पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त विकास आयुक्त प्रदीप चंद्रन, एमएमआरडीचे विक्रमकुमार कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदू राणी जाखड, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर, भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अजय वैद्य, वसई-विरार महानगरपालिका आयुक्त अनिल पवार, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ आदी मान्यवरांची उपस्थित होते. ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा कल्पकतेने वापर करुन नियोजनबध्द आराखडा केला जात आहे. यानुषंगाने या विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विकास परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी सुरुवातीस जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी “ठाणे strategic प्लॅन” चे सादरीकरण केले. तद्नंतर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी सर्वांसाठी घरे (Housing For All), माहिती व तंत्रज्ञान (Information and Technology), उद्योग 4.0 (Industries 4.0), पर्यावरण (Environment), आणि रोजगार निर्मिती (Employment Generation) या प्रमुख पाच मुद्द्यांवर संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. “मित्रा” संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी  परिषदेच्या उद्देश व उद्दिष्टांची माहिती दिली. या विकास परिषदेत सर्वांसाठी घरे (Housing For All), माहिती व तंत्रज्ञान (Information and Technology), उद्योग 4.0 (Industries 4.0), पर्यावरण (Environment), आणि रोजगार निर्मिती (Employment Generation) या प्रमुख पाच मुद्द्यांवर शासनाचे अधिकारी व संबंधित क्षेत्रातील मान्यवरांमध्ये चर्चासत्रही संपन्न झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी सोनटक्के यांनी केले.

वाढवण बंदराविरुद्ध एकजुटीने लढा उभारला पाहिजे-  रघुनाथदादा पाटील

Untitied-2   ठाणे : केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी व कष्टकरी कामगारांचे खूप नुकसान झाले आहे. वाढवण बंदरामुळे अनेक गावे प्रस्थापित होणारा असून मच्छीमार समाजाचे खूप नुकसान होईल,  त्यामुळे वाढवण बंदर रद्द करण्याच्या विरोधात सर्वांनी एकजुटीने लढा दिला पाहिजे. असे स्पष्ट उद्गार शेतकऱ्यांचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी जाहीर सभेत काढले. भारतीय जीवन व पृथ्वी रक्षक चळवळीचे निमंत्रक ॲड. गिरीश राऊत यांनी १९ सप्टेंबर २०२४  रोजी दादर येथील धुरु हॉलमध्ये वाढवण बंदर रद्द करा या व इतर मागण्यांसाठी देशातील मान्यवरांची  एक संयुक्त सभा आयोजित केली होती. पर्यावरण अभ्यासक  ॲड. गिरीश राऊत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, वाढवण बंदर,  जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, बारसू रिफायनरी अशा महाकाय प्रकल्पामुळे पृथ्वीच्या पर्यावरणात दुरुस्त न होणारा हस्तक्षेप होणार आहे.  विकासासाठी राजकीय क्षेत्राने औद्योगिकीकरणाच्या रूढ चौकटीत विचार केल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येत नाही.  विकासाचे मॉडेल म्हणून देशापुढे ठेवलेले गुजरात बुडाले व बडोदा जाम नगरातील उच्चभृ वस्त्यांसह इतरही शहरात मगरीचा संचार सुरू झाला ही गोष्ट बोलकी आहे. महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे उपाध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी वाढवण येथे खोल समुद्र असल्यामुळे चांगल्या प्रकारची मच्छी मिळते. वाढवण बंदर झाल्यास मच्छीमारांचे खूप नुकसान होणार आहे. त्यामुळे मच्छीमार समाज या वाढवणं बंदराला शेवटपर्यंत  विरोध करणार आहे.सागरी जीवशास्त्रज्ञ डॉ. शशिकुमार मेनन यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की,  आम्ही नरीमन पॉइंट ते पालघर या समुद्रकिनाऱ्याचा संपूर्ण अभ्यास केला असून पालघर येथे होणारे वाढवण पोर्ट करू नये असा अभ्यासकांचा व शास्त्रज्ञांचा अहवाल असतानाही वाढवण बंदराचे भूमिपूजन झाले आहे. या ठिकाणी समुद्रात ३०  मीटर पाण्याची खोली असल्यामुळे मोठ्या बोटी लागू शकतात, त्यामुळे केंद्र सरकारने वाढवणे येथे पोर्ट बनविण्याचा विचार केला आहे. मात्र या पोर्टमुळे मच्छीमार समाज व स्थानिक लोकांचे खूप नुकसान होणार आहे. महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे  माजी सरचिटणीस सूर्यकांत बागल यांनी सांगितले की, समुद्रात भर घालून या बंदरासाठी पाच हजार एकर जागा सरकारने ताब्यात घेतली असून, या ठिकाणी वाढवण बंदर झाल्यास आवश्यक असणारी रस्ते वाहतूक व इतर सुखसोयी जमिनीवरच होणार आहेत, त्यामुळे अनेक गावे प्रस्थापित होतील. या सभेला ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये, पोर्ट  ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जनार्दन जंगले, प्रा. डॉ. सचिन बनसोडे, आदी मान्यवर उपस्थित होते आभार प्रणाली राऊत यांनी मानले.

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे वाङमयीन पुरस्कारासाठी साहित्य पाठवा – प्रा. डॉ. प्रदीप ढवळ

अनिल ठाणेकर ठाणे : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. सन २०२३ – २४ साठी घोषित होणाऱ्या वाड्मयीन पुरस्कारासाठी पुस्तके मागविण्यात येत आहे. हे सर्व पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कोकणातील सभासद असणाऱ्या लेखकांसाठी आहेत. या पुरस्कारासाठी जास्तीत जास्त सभासदांनी पुस्तके पाठविण्याचे आवाहन कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी केले आहे. या पुरस्कारांमध्ये प्रथम श्रेणीचे अकरा पुरस्कार, द्वितीय श्रेणीचे पाच, विशेष श्रेणीचे तीन पुरस्कार आणि वाड्मयेतर बारा पुरस्कार दिले जाणार असून, यापैकी प्रथम श्रेणीच्या पुरस्कारासाठी पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि द्वितीय व विशेष पुरस्कारासाठी प्रत्येकी तीन हजार, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र प्रदान केले जाणार आहे. यामध्ये प्रथम श्रेणी पुरस्कारात र. वा. दिघे कादंबरी पुरस्कार, वि. सी. गुर्जर कथासंग्रह पुरस्कार, आरती प्रभू कविता संग्रह पुरस्कार, धनंजय कीर स्मृती आत्मचरित्र पुरस्कार, श्रीकांत शेट्ये स्मृती चरित्र पुरस्कार,  प्रभाकर पाध्ये स्मृती समीक्षा पुरस्कार, भाई भगत चित्रपट – नाट्य – विषयक पुरस्कार, अनंत काणेकर ललित गद्य पुरस्कार, प्र. श्री. नेरुरकर स्मृती बालवाड्.मय पुरस्कार, वि. कृ. नेरुरकर स्मृती संकीर्ण पुरस्कार, फादर स्टीफन सुवार्ता वैचारिक पुरस्कार यांचा समावेश आहे. तर विशेष पुरस्कारामध्ये वि. वा. हडप स्मृती कादंबरी पुरस्कार, विद्याधर भागवत स्मृती कथासंग्रह पुरस्कार, वसंत सावंत स्मृती कविता पुरस्कार, अरुण आठल्ये स्मृती संकीर्ण पुरस्कार, रमेश कीर नाटक – एकांकिका पुरस्कार व सौ. लक्ष्मीबाई व न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे ललित गद्य पुरस्कारासाठी कोकणासह गोवा – कारवार – बेळगाव या प्रदेशातील लेखकांचाही विचार केला जाणार आहे. पुरस्कारासाठी आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती ३१ ऑक्टोबर २०२४ पूर्वी केंद्रीय कार्यवाह, कवी केशवसुत स्मारक संकुल, मालगुंड पो. मालगुंड ता. जि. रत्नागिरी – ४१५६१५ याठिकाणी पाठवावेत. अधिक माहितीसाठी ९७६४८८६३३० / ९०२१७८५८७४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या पुरस्कारासाठी लेखक, कवी हे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातील (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई) या परिसरातील आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे आजीव सभासद असणे आवश्यक असून, तशा प्रकारचे कोमसाप जिल्हाध्यक्ष अथवा शाखाध्यक्षांचे प्रमाणपत्र किंवा सभासद पावतीची छायांकित प्रत यासोबत जोडणे आवश्यक आहे. पुस्तकाचा वाङमय प्रकाराचा स्पष्ट निर्देश लेखकाने पुरस्कारासोबत करावयाचा आहे. वरील पुरस्कारासाठी पुस्तके ही १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत प्रसिद्ध झालेली असावीत.

रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम व ठाणे लेक सिटीतर्फे

राष्ट्रीय हिंदी दिवस ठाण्यात संपन्न ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम व ठाणे लेक सिटीच्या सहकार्याने राष्ट्रीय हिंदी दिवस काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संपन्न झाला. कालिदास लिखीत शाकुंतलम नाटकातील एका अंकाचे प्रख्यात लेखक पद्ममश्री शरद जोशी यांनी  लिहीलेल्या विनोदी नाट्य अंकाचे यावेळी वाचन करण्यात आले. शरद जोशी यांची कन्या रिचा यांचा यावेळी रोटरीच्या वतीने गर्व्हनर दिनेश मेहता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रिमीयमच्या अध्यक्षा डॉ. सोनल बांगडे, रोटरी क्लब ऑफ लेकसिटीचे अध्यक्ष जगदीश चेलारामानी व्यासपीठावर उपस्थित होते. दोन्ही रोटरी क्लबतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला रसिकानी भरभरून प्रतिसाद दिला. लेखिका दिग्दर्शक प्रीता माथुर ठाकुर, अतुल माथुर, रमेश कुमार, अमन गुप्ता, दुर्गेश बक्शी, लता संजय यांनी नाट्य प्रयोगाचे सादरीकरण केले. रोटरी क्लबच्या वतीने दरवर्षी हिंदी दिवस साजरा केला जातो, त्याचाच भाग म्हणून या नाट्य अंकाचे सादरीकरण प्रेक्षकांसाठी करण्यात आले. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, तिचा सन्मान आपण राखला पाहिजे, जेव्हा भाषेचा वापर दैनंदिन जीवनातून कमी व्हायला लागतो त्यावेळी आपण आपली संस्कृती, इतिहास विसरू लागतो, तेव्हा आपल्या भाषेचा अभिमान आपल्याला हवा असे मत रोटरीचे गर्व्हनर दिनेश मेहता यांनी व्यक्त केले. सुरूवातीला प्रास्ताविक डॉ. सोनल बांगडे यांनी केले तर, आभार जगदीश चेलारामानी यांनी मानले. रोटरीच्या विविध उपक्रमांसाठी सहकार्य करणाऱ्या  सहकाऱ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

 कॅन्सर मुक्त रुग्णांसाठी `रोझ डे’ कार्यक्रम

ठाणे –  दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. सतीश कामत यांच्या आशा कॅन्सर ट्रस्ट तर्फे कॅन्सर मुक्त रुग्णांसाठी `रोझ डे’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत थोरले बाजीराव पेशवे हॉल, बेडेकर कॉलेज, चेंदणी नाका, ठाणे (प.) येथे होणाऱया या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 7304059239 या क्रमांकावर संपर्क साधावा.

माकपचा शहापूर तहसील कार्यालयावर “धडक मोर्चा”

अनिल ठाणेकर ठाणे : भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या. वतीने, नुकताच जमीन, पाणी, रोजगार, रेशन, वीज, या गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर हा मोर्चा काढण्यात आला होता. शहापूर बस स्थानक येथून सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयात येऊन धडकला. जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेले होते. पोलिस अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाचा गेट बंद केला होता. परंतु आंदोलकांच्या आक्रमकतेपुढे शेवटी पोलिस अधिकाऱ्यांना गेट खोलावा लागला. वन जमिनी कसणाऱ्यांच्या १० एकर नावे वनपट्टे मंजूर करून सातबारा तयार करा, पेसा कायद्याप्रमाणे १७ संवर्गात असलेल्या सर्व रिक्त जागा त्वरित भरा, शेतीसाठी आणि पिण्यासाठी धरणांचे पाणी शेतकऱ्यांना पुरवा, रेशन व्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण करा. रेशन कार्ड व रेशन संबंधित तक्रारींचे त्वरित निवारण करा, शेतकरी-शेतमजुरांचे कर्ज सरसकट माफ करा, अजनुप ग्रामपंचायत मधील वनदावे जे पडून आहेत त्याची पूर्तता करून ताबतोब निकाली काढण्यात यावे, अघई व दहिगाव ग्रामपंचायत मधील अंगणवाडी इमारत बांधकाम करा तसेच राजपुरी व शिरोळ ग्रामपंचायत मध्ये अंगणवाडी सुरू करा व अंगणवाडीतील आहाराचा दर्जा सुधारा, बेलनाला ते दहीगाव रस्त्याचे काम चालू करा, दहिगाव ग्रामपंचायत मधील तळवाडा, शिसवली, मनाचाआंबा, तुंबडेपाडा व काहडोल पोही ह्या लाईट देऊन तालुक्यात सर्व खेड्यापाड्यावर लाईटची व्यवस्था करा, धसई ग्रामपंचायत मधिल घरे तोडण्यासाठी  फॉरेस्ट खात्याने लावलेल्या नोटीसा तात्काळ रद्द करा, पेसा कायद्याप्रमाणे पेसा गावांना सर्व खेड्यापाड्यात सर्व सुविधांची व्यावसथा करा, शहापुर तालुक्यातील ७२ गावाना लावलेला ग्रीन झोन कायदा रद करा, खर्डी गावातील अखरपडीत जगेंचा घरांसाठी गावठाण द्या,  आदिवासी आश्रम शाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी व अंघोळी साठी गरम पाण्याची व्यवस्था करा, आवाळे ग्रामपंचायत मध्ये ५% पेसा निधी व १५ वा वित्त आयोग निधीमध्ये केलेल्या भ्रष्टाचारांवर लवकरात लवकर कारवाही करा. ह्या मागण्यांना घेऊन पक्षाच्या शिष्टमंडळाने माकप तालुका सचिव भरत वलंबा, किसान सभा तालुका सचिव कृष्णा भावर, एसएफआय जिल्हा आधक्ष भास्कर म्हसे, डीवायएफआय तालुका अधक्ष नितिन काकरा, सीटू तालुका अधक्ष विजय वीशे, जनवादी महिला संघटना तालुका सचिव निकिता काकरा, नंदू खांजोडे, श्याम नीखडा, सोनू वाघ, दिलीप बोंगे यांनी तहसीलदार कासकोले, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, धसई रेंज RFO ठाकूर, पाणी पुरवठा अधिकारी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा होऊन लेखी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाला स्थगिती दिली. आंदोलनाला माकप जिल्हा सचिव कॉ.किरण गहला, किसान सभा जिल्हा सचिव चंदू धांगडा, तालुका सदस्य आनंद रोज, मनोज काकवा, अशोक विशे, मनीष फोडसे,देवजी पनगा,बंडू खर्डीकर आदींनी उपस्थित राहून संबोधित केले.

मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे, आपले ठाणे विकासाचं खणखणीत नाणे !

Photo-2    महाराष्ट्र देशाच्या प्रगतीचे इंजिन, तर एमएमआर महाराष्ट्राचे – एकनाथ शिंदे अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस होऊ शकेल इतकी ताकद महाराष्‍ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र हे देशाच्या प्रगतीचे इंजिन आहे. तर आपलं ठाणे विकासाचे खणखणीत नाणे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच येथे काढले. डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे “मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत” “ठाणे विकास परिषद-२०२४” चे आयोजन करण्यात आले  होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, “मित्रा” चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, महाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजू जैस्वाल मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, “मित्रा” चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर व अमन मित्तल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पर्यटन विभागाचे संचालक बी.एन.पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त विकास आयुक्त प्रदीप चंद्रन, एमएमआरडीचे विक्रमकुमार, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदूराणी जाखड, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर, भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अजय वैद्य, वसई-विरार महानगरपालिका आयुक्त अनिल पवार, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ आदी मान्यवरांची उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, आपण मुंबई महानगर प्रदेशात पाच सेक्टर्समध्ये जर धोरणात्मक काम केले तर आपली अर्थव्यवस्था 1.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची क्षमता या मुंबई महानगर प्रदेशात आहे. यामुळे सर्वांना उद्योग, सर्वांना रोजगार, सर्वांना घरे, हरित ठाणे अशा सर्व गोष्टी साध्य करु शकतो. ठाण्यामध्ये काही गोष्टी सुरु होतात, मग नंतर त्या इतर सर्व ठिकाणी सुरु होतात, असा हा ठाण्याचा इतिहास आहे. महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस होईल, इतकी ताकद महाराष्‍ट्रामध्ये आहे. ते म्हणाले, शेतीनंतर रिअल इस्टेट जास्त रोजगार देणारे क्षेत्र आहे. महाराष्ट्र आता जीडीपी मध्ये, परदेशी गुंतवणूकीत, पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात अशा विविध क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. देशाची जी एकूण गुंतवणूक आहे,त्यापैकी ५२ टक्के ही एकट्या महाराष्ट्राची आहे. अटल सेतू मुळे आपण आता मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास फक्त २० मिनिटात करू शकतो. या प्रकल्पाबाबत आधी फ्लेमिंगो पक्षी नाहीसे होतील अशी टीका करण्यात आली. मात्र पर्यावरण विषयक काम करर्णाया संस्थांनी प्रत्यक्षात फ्लेमिंगोंची संख्या दुप्पट झाल्याचा अहवाल दिला आहे. अटल सेतू हा मार्ग एक गेम चेंजर प्रकल्प ठरला आहे. समृध्दी महामार्गामुळे 8 तासात आपल्याला नागपूरला पोहोचता येते. लवकरच ठाणे ते बोरिवली प्रवास आपण 20 मिनिटात करू शकणार आहोत. ईस्टर्न फ्री वेचा विस्तार करण्यात येत आहे. विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरु होत आहे. असे विविध प्रकल्प साकारताना, विकासकामे करताना जास्तीत जास्त प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. नवी मुंबई विमानतळाचे काम लवकर पूर्ण होणार आहे. पालघरला  तिसरे विमानतळ तयार करीत आहोत. आपल्याकडे उद्योगासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी असल्यामुळे उद्योग आपल्या राज्यात येत आहेत. दाओसला जावून 1 लाख 37 कोटींच्या करारांवर स्वाक्षरी केली आहे. त्यातील बहुतांश उद्योगांचे कामही सुरु झाले आहे. ३ लाख ५० हजार कोटींच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत. नुकताच इलेक्ट्रॉनिक्स  सेमिकंडक्टर  चीप बनविण्याचाही प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. लवकरच इलेक्ट्रॉनिक्स  सेमिकंडक्टर  चीप बनविण्याच्या प्रकल्पासाठी 84 हजार कोटींचा करार होतोय. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पॉवर, स्टील, औषध निर्माण अशा विविध क्षेत्रातील उद्योग येत आहेत. मी सर्व अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या आहेत की, उद्योग क्षेत्रातील कोणतीही तक्रार येता कामा नये. माझ्याकडे तक्रार आलीच तर मी त्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करतो. राज्यात जास्तीत जास्त उद्योग आले तर राज्याची प्रगतीही जास्तीत जास्त होईल, यावर माझा ठाम विश्वास आहे. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे की, ज्याने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीला विद्यावेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. काही देश हे पर्यटन व्यवसायावर चालतात. आपल्या राज्याला तर 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. आपण विकासाची वर्गवारी केली आहे. त्यामुळे आपल्या राज्याचा विकास जलद होणार आहे. हे शासन विकासाला चालना देणारे आहे. ठाणेमधील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्या इमारतींमधील सर्वांना क्लस्टर  डेव्हलपमेंटच्या माध्यमातून हक्काचे घर देण्याचे काम सुरु केले आहे. सिडको आणि ठाणे महानगरपालिका हे काम करीत आहे. पहिल्या टप्प्यातील 17 हजार घरे बांधण्याचे  काम वेगाने सुरु आहे, असेही ते म्हणाले.पर्यावरण रक्षणाबद्दल बोलताना मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, ठाणे महानगरपालिकेने 1 लाख 25 हजार झाडे लावली आहेत. 21 लाख हेक्टरमध्ये बांबू  लागवड करीत आहोत. बांबू हा सर्वात जास्त ऑक्सिजन देतो. त्यामुळे बांबू लागवड पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त सिद्ध झाला आहे. आपल्या सर्वांना पर्यावरणाचे संतुलन राखावे लागेल, ही काळाची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न साकार करावयाचे असेल तर नीती आयोगाच्या अहवालातील सूचनांप्रमाणे काम करणे आवश्यक आहे. याबाबतीत “मित्रा” संस्थेने पुढाकार घेवून त्याप्रमाणे दिशा देण्याचे  काम केले आहे. ठाणे जिल्हयाची 48 बिलियन डॉलर अर्थव्यवस्था आहे, सन 2030 पर्यंत ती 150 बिलियन डॉलर होणे हे आपले उद्दिष्ट आहे. ठाण्याचा जीडीपी 7.5 टक्के आहे, हा जीडीपी 20 टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठाण्यामध्ये विविध लोकोपयोगी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यातूनच खड्डेमुक्त रस्ते, सेंट्रल पार्क, ब्लू सी, एसटीपी प्लँट, प्रदूषणमुक्त पाणी यासारखे विविध उपक्रम सुरु आहेत, असे सांगून ते म्हणाले की, विकास आणि कल्याणकारी योजना राबविणारे तसेच राज्याच्या प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अहोरात्र काम करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी सोनटक्के यांनी केले तर आभार प्रदर्शन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रशांत रोडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील उद्योजक, विद्यार्थी, अधिकारी आणि सामान्य नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 0000

मराठा, ओबीसी आंदोलनानंतर आणखी एका मोठ्या आंदोलनाला सुरुवात

ठाणे: पालघर, ठाणे, नाशिक, रायगड हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागामध्ये विभागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी व आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्यांचे वास्तव्य आहे. त्यांचे अनेक मुलभूत हक्कांचे प्रश्न…

आदिवासींचे पनवेल पंचायत समितीसमोर आंदोलन

पनवेल : पालघर, ठाणे, नाशिक, रायगड हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागांमध्ये विभागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी व आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्या चे वास्तव्य आहे. त्यांचे अनेक मुलभूत…