Category: ठाणे

Thane news

महायुती सरकारकडून मुंब्रा-कळव्याच्या विकासासाठी १०५ कोटीचा निधी  – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर       ठाणे : विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अधिकची मतं मिळवून विजयी होतील. जितेंद्र आव्हाड वैफल्यग्रस्त आहेत. मह्मुंयुती सरकारकडून मुंब्रा-कळव्याच्या विकासासाठी १०५ कोटीचा निधी दिलाआहे.. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून महायुतीमधील तिनही नेत्यांनी भाऊ असल्याचे कर्तव्य केले, असा रोखठोक संवाद राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी साधला. शुक्रवारी होणाऱ्या विधान परिषद ११ जागांसाठी महायुतीचे ९ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत महायुतीचे सर्व ९ उमेदवार विजयी होतील आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे पहिल्या फेरीत विजयी होतील. महविकास आघाडीच्या तीन पैकी एका उमेदवाराचा पराजय निश्चित असून शिवसेना (उबाठा) चे मिलिंद नार्वेकर यांचे सगळ्यांशी संबंध चांगले असल्याने ते विजयी होऊ शकतात. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव होईल आणि हा पराभब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांचा असेल. महायुतीच्या आमदारांची एकजूट पक्की आहे त्यामुळे घोडे बाजार होणार नाही. राष्ट्रवादीच्या आमदारांवर पूर्ण विश्वास असल्याचे अजित पवार यांनी आधीच सांगितले आहे. शिवसेनेचे आमदार देखिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात. भाजपाचे आमदार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात. महायुतीचे उमेदवार अधिकची मते मिळवून विजयी होतील, असे मत प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. जितेंद्र आव्हाड वैफल्यग्रस्त आहेत.२०० कोटींमध्ये इमेज मेकओव्हर हा आरोप कथा कल्पित असून हा आकडा आला कुठून ? २०१९ साली ज्यावेळेला राष्ट्रवादीने मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये आमदारांना ठेवले होते ते हॉटेल राष्ट्रवादी शरद पवार गटाने विकत घेतले असं म्हणायचे का ? बेसलेस आरोपांना मी काही फारसे महत्त्व देत नाही. त्यामुळे त्यांच्या आरोपांकडे फार लक्ष देऊ नये. रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड सातत्याने खोटे आरोप करत असतात. लोकसभेच्या यशानंतर  काँग्रेस महाविकास आघाडी मध्ये स्वतःला मोठा भाऊ समजायला लागली आहे. ते विधानसभेला २८८ उमेदवार उभे करायचा विचार करत आहेत. काँग्रेसचा एखादा सच्चा कार्यकर्ता मुंब्रा कळव्यातून तिकीट मागत नाही ना ? याकडे आव्हाडांनी लक्ष द्यावे. काँग्रेसचे ठाण्यातील नेते सातत्याने डॉ. जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यातील काँग्रेस संपवल्याचे आरोप करीत असतात. मी स्वतः पुढाकार घेऊन आव्हाड यांची भेट अजितदादा पवार यांच्याबरोबर करून द्यायला तयार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ५५ कोटी रुपयांचा विकास निधी आला आहे. आव्हाड यांच्या सोबतच्या अनेक नगरसेवकांनी हा निधी घेतलेला आहे. आता पुन्हा ५० कोटीचा विकास निधी आलेला आहे. मी, नजीब मुल्ला आणि स्थानिक नगरसेवकांच्या मागणीनुसार 50 कोटीचा विकास निधी आला आहे व तो खऱ्या विकासासाठी निधी वापरला जाईल. त्यामुळे निधी मिळाला नाही असं आव्हाड धादांत खोटे बोलत आहेत. आव्हाड यांच्या माध्यमातून निधी दिला तर  एका ठराविक ठेकेदाराला कामे दिली जातात. निधीच्या बाबतीत महायुतीकडून कोणताही भेदभाव नाही. आतापर्यंत १०५ कोटी रुपये मुंब्रा-कळव्या साठी निधी आल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली. अजितदादा यांनी राज्यातील माता भगिनी, बळी राजा व सर्व घटकांना सुख समृद्धी लाभो, यासाठी सिद्धीविनायकाकडे साकडे घातले. १४ जुलै रोजी बारामतीमध्ये सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभेच्या तयारीला लागली आहे. लपून छपून नाही तर मीडिया आणि सर्व आमदारांना घेऊन दर्शनाला गेले. काही जण लपून छपून शनी अमावस्येला शनी शिंगणापूरला दर्शन घेतात. घड्याळ चिन्ह आम्हाला मिळेल याची खात्री आहे. महायुतीत कोणतेही मतभेद नाही. समन्वयाने सर्व निर्णय होतील. राजकीय प्रगल्भता असली पाहिजे. अनेक बहिणींना मदतीचा हात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून मिळणार आहे. वैयक्तिक भाऊ बहीण या नात्याबद्दल बोलणे टाळले पाहिजे. महायुतीमधील तिनही नेत्यांनी भाऊ असल्याचे कर्तव्य केले आहे, असेही प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.

ठाणे जिल्ह्यात डेंग्यु, मलेरियाने डोके वर काढले;

रूग्ण संख्येत वाढ, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन         ठाणे : जिल्ह्यात एकीकडे पावसाने जोर धरला असतानाच विविध शहरात डेंग्यु आणि मलेरियाच्या रूग्णसंख्येतही वाढ होत असल्याचे चित्र आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसात ३२ हून अधिक रूग्णांची शासनाच्या दफ्तरी नोंद झाली आहे. मात्र यात रूग्णांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जाते आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसात पावसाने चांगला जोर धरला. त्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये हळुहळू वाढ होते आहे. पावसामुळे मोकळ्या आणि सखल भागात पाणीही साचते आहे. नैसर्गिक नाले प्रवाही झाले आहेत. त्याचवेळी शहरात रहिवासी भागांमध्ये मोकळ्या, सखल भागात, निर्माणाधीन इमारती, मोडकळीस आलेल्या आणि बंद घरांमध्येही पाणी साचू लागले आहे. परिणामी डासांची उत्पत्ती वाढून रोगराई पसरण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात डेंग्यु आणि मलेरियाच्या रूग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या महिनाभरात ३२ रूग्णांची नोंद झाली आहे. यातील डेंग्यु सदृश्य रूग्णांची संख्या मोठी आहे. अनेक जण लक्षणे दिसल्यास खासगी स्तरावर उपचार घेत असल्याने अशा अनेकांची नोंद स्थानिक पालिका प्रशासनाच्या लेखी नाही. गेल्या आठवडाभरात ठाणे जिल्ह्यात १० डेंग्यु रूग्णांची नोंद झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. मात्र त्याचवेळी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागात एकट्या बदलापूर शहरात १२ डेंग्यु रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील डेंग्यु रूग्णांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यातही एकाच घरात एकापेक्षा अधिक रूग्णांची नोंद झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे डेंग्युच्या रूग्णांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त होते आहे. तर जिल्ह्यात मलेरियाच्या रूग्णांची संख्याही २० वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जाते आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी विविध उपायोजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ताप उद्रेकाच्या ठिकाणी जलद ताप सर्वेक्षण करण्यात येत आहे. हिवताप बाधित रुग्ण आढळ्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे देखील रक्त तपासणी साठी पाठवण्यात येत आहेत. तर भिवंडी मध्ये इतर शहरांतून कामासाठी येणाऱ्या मजुरांचे प्रमाण अधिक आहे. या मजुरांचे देखील सर्वेक्षण करण्यात येत आहे. तर ग्रामीण भागातील नाले, डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडण्यात येत आहेत. तर ग्रामीण भागातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात गप्पी माशांचे एक पैदास केंद्र कार्यान्वित करण्यात येत आहेत. आरोग्य विभाग तपासणी पुरताच मर्यादीत जिल्ह्यातील सर्वच महापालिकांमधील आरोग्य विभाग हा डेंग्युचे रूग्ण आढळ्यानंतर तपासणी करत रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना सल्ले देण्यापुरताच मर्यादीत असल्याचे दिसून येते आहे. रूग्ण आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य पथक रूग्णाच्या घरी जाऊन साचलेल्या पाण्याचे साठे तपासते. एखादी कुंडी, पाण्याची भांडी आढळल्यास त्यावरून रूग्णाच्या कुटुंबियांना सुनावले जाते. मात्र त्याचवेळी इमारतींच्या शेजारी असलेली डबकी, निर्माणाधीन इमारतींचे मालक यांना मात्र समज दिली जात नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य – नरेंद्र पंडित

अनिल ठाणेकर     ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झालेले असून, यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरुन, रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाव्यतिरिक्त, याच परिसरात असणाऱ्या शिधावाटप कार्यालयाच्या दारातच कचऱ्याचे ढिगारे साचलेले असून, याचा अभ्यांगतांना मोठ्याप्रमाणात त्रास होत आहे, अशी तक्रार धर्मराज्य पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील या कचऱ्यातून निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे, रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने, साचलेल्या कचऱ्यावर डासांचे प्रमाण वाढलेले आहे. परिणामी, डेंग्यू आणि मलेरिया या आजारांची लागण होण्याचा धोका जास्त आहे. संतापजनक बाब म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच महाराष्ट्र शासनाचे “राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध योजना, ठाणे जिल्हा” यांचे कार्यालय याच ठिकाणी असून, दुर्दैवाने या कार्यालयात कोणीही संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याची बाब ‘धर्मराज्य पक्षा’च्या निदर्शनास आलेली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत साथीचे आजार मोठ्याप्रमाणात उद्भवत असतात. त्यातच ठाणे शहर आणि जिल्ह्यात, डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याचे वृत्त, प्रसिद्धीमाध्यमांतून प्रकाशित झालेले असताना, या पार्श्वभूमीवर, खुद्द ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होणे, हे प्रशासनाला नक्कीच भूषणावह नाही. तरी, याप्रकरणी गांभीर्याने दखल घेत, रोगराईला आमंत्रण देणारे, कचऱ्याचे ढिगारे त्वरित काढून टाकण्यात येऊन, स्वच्छता राखावी आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी विनंती ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे केली आहे. 00000

पातलीपाडा येथील महापालिका शाळेची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी

ठाणे : ठाणे महापालिकेच्या पातलीपाडा येथील शाळेची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरूवारी सकाळी पाहणी केली. या शाळेच्या इमारतीची प्रस्तावित दुरुस्ती आणि इतर कामांबद्दल आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला…

पुढील टप्प्यातील परिक्षा 18 जुलैपासून सुरू

 जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट- क सरळ सेवा भरती 2023     ठाणे : जिल्हा परिषद गट क सरळसेवा पदभरती प्रक्रिया 2023 मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परिक्षा पार पडलेल्या आहेत. पुढील टप्प्यात ठाणे जिल्ह्यातील परिक्षा केंद्राची निवड केलेल्या  आरोग्य सेवक (पुरुष) 40%, आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)), कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील परिक्षा 18 जुलै ते 30 जुलै पर्यंत होणार आहेत. जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावर परिक्षे संदर्भात वेळोवेळी प्राप्त झालेल्या सूचना उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सरळ सेवा भरती पुढील टप्प्यातील परिक्षा 18 जुलै रोजी मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका, 19 व 23 जुलै रोजी आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)), 20, 22 व 23 जुलै रोजी आरोग्य सेवक (पुरुष) 40%, 19 व 24 जुलै रोजी आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), 25,29 व 30 जुलै रोजी कंत्राटी ग्रामसेवक या पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावरून माहिती घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परिक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावरील आयबीपीएस द्वारे उपलब्ध करून दिलेल्या लिंकवरून हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे. विशेष सुचना ज्या महिला उमेदवारांनी त्यांचे नाव बदलले आहे त्यांच्या बाबतीत त्यांनी मूळ राजपत्र अधिसूचना / त्यांचे विवाह प्रमाणपत्र सादर केल्यास परिक्षेस बसण्याची परवानगी दिली जाईल. अन्यथा महिला उमेदवारांना परिक्षेसाठी बसू दिले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 000000

 ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सिंगल यूज प्लॅस्टिकबंदी मोहिम तीव्र

दिवसभरात 256 किलो प्लॅस्टिक जप्त; एकूण 1 लाख 27 हजारांचा दंड वसूल         ठाणे : ठाणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग, अतिक्रमण विभाग आणि प्रदुषण नियंत्रण विभागामार्फत संपूर्ण ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सिंगल यूज प्लॅस्टिक बंदीबाबत आज कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 293 आस्थापनांना भेटी देवून 256 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून यापोटी एकूण 1 लाख 27 हजार 100 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. सदरची कारवाई महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिवा प्रभाग समितीअंतर्गत 32 आस्थापनांना भेटी देवून 04 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 6 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. कळवा प्रभाग समितीअंतर्गत 30 आस्थापनांना भेटी देवून 11 किलो प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 13 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. मुंब्रा प्रभागसमितीअंतर्गत 23 आस्थापनांना भेटी देवून 50 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करुन एकूण 30 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. उथळसर प्रभाग समिती अंतर्गत एकूण 35 आस्थापनांना भेटी देवून 30 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 57 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. नौपाडा कोपरी प्रभागसमिती अंतर्गत 25 आस्थापनांना भेटी देवून 08 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 14 हजार. इतका दंड वसूल करण्यात आला. वागळे इस्टेट व लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत एकूण 68 आस्थापनांना भेटी देवून 20 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 8 हजार 100 रु. इतका दंड वसूल करण्यात आला.   वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत एकूण 35 आस्थापनांना भेटी देवून 08 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करुन एकूण 9 हजार 500 रु दंड वसूल करण्यात आला. माजिवडा मानपाडा प्रभागसमिती अंतर्गत एकूण 45 आस्थापनांना भेटी देवून एकूण 125 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 41 हजार 500 रु. इतका दंड वसूल करण्यात आला आहे. सदरची कारवाई दरम्यान प्रभागसमितीस्तरावरील उपमुख्यस्वच्छता यांच्यासह प्रभागसमितीतील कर्मचारी व सफाई कामगार उपस्थित होते.  सिंगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबतची कारवाई नियमितपणे शहरात सुरू राहणार असून नागरिकांनी सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

छायाचित्र स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे : आयुक्‌त सौरभ राव

 जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित ‘ठाणे महापालिका चषक 2024’   ठाणे : ‘ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने 19 ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ’ठाणे महापालिका…

मुख्यमंत्री असणाऱ्या भावाकडे आपल्या मागण्या घेऊन आलेल्या आझाद मैदानातील बहिणींची भर पावसात झालेली अवस्था

नवी मुंबईत प्रेमांश फाऊंडेशनतर्फे ट्रक चालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

नवी मुंबई : प्रेमांश फाउंडेशनने ‘सुश्रुत 2.0’ कार्यक्रमाच्या माध्यमातून ट्रक ड्रायव्हर्सच्या अपूर्ण आरोग्य गरजांवर लक्ष केंद्रित केले आहे. अॅमेझॉन आणि डोकऑनलाइन यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्याचा उद्देश हा आहे की या दुर्लक्षित समुदायाला आरोग्य आणि कल्याणाच्या दृष्टीने मदत करणे. मुंबईत या कार्यक्रमाची अंमलबजावणी होत असून 350 ट्रक ड्रायव्हर्सच्या एकात्मिक आरोग्य गरजांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत 5 जुलै ते 10 जुलै 2024 दरम्यान पाच दिवसीय आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये ट्रक ड्रायव्हर्ससाठी सुमारे 75 चाचण्यांची तपासणी केली जात आहे. या व्यतिरिक्त, कार्यक्रम अंतर्गत ट्रक ड्रायव्हर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी 60 हून अधिक डॉक्टरांशी कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी मोफत आणि अमर्यादित टेली-आरोग्य सल्लामसलत देण्यात येत आहे. या सेवांच्या माध्यमातून, ड्रायव्हर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांना आपत्कालीन स्थितीत आरोग्य तज्ञांशी संपर्क साधता येतो आणि एक वर्षासाठी अमर्यादित सल्लामसलत मिळते. प्रेमांश फाउंडेशनच्या संस्थापक आणि सीईओ डॉ. शिखा शुक्ला यांनी सांगितले की, “ट्रक ड्रायव्हर्सच्या कामाच्या स्वरूपामुळे आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे संसर्गजन्य रोगांचे प्रमाण जास्त आहे.” त्यांनी अॅमेझॉनचे आभार मानले कारण त्यांच्या मदतीमुळे या ट्रक ड्रायव्हर्सना आता त्यांच्या प्रवासातच डॉक्टरांशी संपर्क साधता येईल. या एकात्मिक आरोग्य कार्यक्रमाचा लाभ एकूण 1400 ट्रक ड्रायव्हर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत, बेंगळुरू, मानेसर आणि आता मुंबई येथे या कार्यक्रमाचा लाभ 5000 हून अधिक ट्रक ड्रायव्हर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.

जनावरांना साथीच्या रोगापासून सुरक्षित राहण्यासाठी मुरबाडमध्ये शिबिराचे आयोजन

राजीव चंदने मुरबाड : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद,पुणे अंतर्गत बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली,संलग्न यशोदिप  सामाजिक विकास संस्था संचलित कृषी महाविद्यालय सरळगांव कृषी वर्धिनी विभागातील विदयार्थ्यांनी बळेगाव येथे गाई,म्हैसी,बैल, लहान लहान वासरे आजारी पडू नये,तसेच त्यांना कोणत्याही साथीच्या रोगा पासून सुरक्षित राहण्या करिता लसीकरणाचे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ.महेंद्र सूर्यराव,एच डी जाधव सर,शेतकरी तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. ग्रामीण भागात पावसाळा सुरु झाला कि साथीचे रोग सुरु होतात आणि या रोगा मध्ये जनावरे आजारी होतात साथीच्या रोगा पासून सुरक्षित राहण्या करिता बळेगाव येथील योगेश विशे यांच्या फार्मावर जनावरा करिता लसीकरणाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ.महेंद्र सूर्यराव यांनी गाई,म्हैसी,बैल,वासरे यांना लसीकरण केले यावेळी उपस्थित शेतकरी विध्यार्थी यांना पाळीवप्राण्याच्या साथीच्या रोंगांची सखोल माहिती देत यावर कोणते उपाय केले पाहिजेत,कोणते आजार होतात या बाबत माहिती दिली बळेगाव येथे पहिल्यांदा जनावरा करिता लसीकरणाचे शिबीर घेण्यात आल्याने या शिबिरात करण्यात आलेल्या लसीकरणाने जनावरांचे आरोग्य निश्चितच सुरक्षित राहील म्हणत शेतकऱ्यांनी विद्यार्थी,शिक्षक,डॉ सूर्यराव यांचे आभार व्यक्त केले. लसीकरण शिबिरा वेळी पावसाळ्या मध्ये विशेष करून FMD,HS,Botolizum या सारखे साथीचे रोग जनावरा मध्ये पाहण्यासाठी मिळतात असल्याने एफ एम डी,या रोगावर डॉ. सूर्यराव यांनी लसीकरण केले यावेळी कृषी विद्यालयाचे विध्यार्थी रिचा डोईफोडे,तन्वी खामगांवकर,सिद्धी कारभारी,सानिका कारभारी,अपूर्वा केंजळे,कोमल खुशह,विश्वजीत पोतदार,आर्यन ऊंडे,शुभम भगत,यश कराळे,रोहन कनसे,यश वाघ,स्वराज कापसे,ओमकार नारूडकर,सिद्धार्थ सुंदरे,साईराज वाबळे,साईनाथ नरके, सुरज पवार,या विदयार्थ्यांनी लसीकरण शिबीर यशस्वी केले.