Category: ठाणे

Thane news

राजश्री शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त महात्मा गांधी विद्यालयात कार्यक्रम संपन्न

ठाणे : राज्यात राजश्री शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या सामजिक न्याय दिन संमेलन सप्ताह कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज  (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग) स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी (पुणे) यांच्या वतीने दि.5 जुलै 2024 रोजी  महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ येथे कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे उप प्राचार्य ए. आर. कूसुंबे, पर्यवेक्षक राजेश रोहिदास, महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचारी, बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी मेघा पवार व सर्व समतादूत आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून श्री.गुरुनाथ देशमुख होते त्यांनी विद्यार्थ्यांना शाहू महाराज यांच्या जीवन चरित्र या विषयावर सखोल मार्गदर्शन केले तसेच नशा मुक्ती व व्यसन यावर खूप मार्मिक कविता सादर करून विद्यार्थांना व्यसनापासून परावृत्त करण्याचे मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा शेळके यांनी केले. समतादूत नितिन वाघमारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सामाजिक न्याय दिवस याबाबत थोडक्यात माहिती दिली. आभार प्रदर्शन जिल्हा प्रकल्प अधिकारी मेघा पवार यांनी केले.

डोंबिवलीतील विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचीव गीता खरे यांच्यावर गुन्हा दाखल

 गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शेतघरात आश्रय दिल्याचा ठपका अनिल ठाणेकर ठाणे, उल्हासनगर येथे एका नागरिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील पाच आरोपींना आपल्या माळशेज घाट भागातील करंजाळे येथील शेतघरात आश्रय दिल्याच्या आरोपातून उल्हासनगर पोलिसांनी डोंबिवलीतील विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचीव आणि शेतघराच्या मालकीण गीता खरे यांच्यासह चार जणांवर मंंगळवारी गुन्हा दाखल केला. रुतिक उर्फ अटल अनिल शुक्ला (रा. म्हारळ, उल्हासनगर), गोपाळ सत्यवान पाटील (रा. म्हारळ), सुमीत सत्यवान सैनी (रा. योगीधाम, कल्याण), शेतघराचे व्यवस्थापक प्रतीक जनार्दन ठाकरे (रा. कल्याण) आणि डोंबिवलीतील विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचीव व शेतघराच्या मालकीण गीता खरे अशी आरोपींची नावे आहेत. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचीन बबनराव पत्रे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, उल्हासनगर पोलीस ठाणे हद्दीत एका नागरिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न तीन ते चार जणांनी केला होता. या प्रकरणातील आरोपी गुन्हा करून फरार झाले होते. उल्हासनगर पोलीस शोध घेत होते. या गंभीर गुन्ह्यातील आरोपी माळशेज घाटातील ओतुर पोलीस ठाणे हद्दीतील करंजाळे शेतघरात लपून बसले असल्याची माहिती मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचीन पत्रे, उपनिरीक्षक समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक करंजाळे येथे पोहचले. रात्रीच्या वेळेत ओतुर पोलिसांच्या साथीने उल्हासनगर पोलिसांंनी शेतघरावर छापा टाकला. तेथे १५ जण होते. सहा इसम पोलिसांना पाहून पळून गेले. शेतघराचे व्यवस्थापक प्रतीक ठाकरे यांना पोलिसांनी या शेतघरात आरोपींची नावे वाचून दाखवून ते येथे राहतात का म्हणून विचारणा केली. प्रतीकने, अटल शुक्ला याच्या सूचनेवरून सोहन पवार, धीरज रोहेरा, यश पवार येथे राहत आहेत असे सांगितले. हेच गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन उल्हासनगर येथे आणून अटक केली. अटल शुक्ला याने शेतघराचा व्यवस्थापक प्रतीक ठाकरे यांना येथे राहणारे तीन लोक हे उल्हासनगर मधील गंभीर गुन्हयातील आरोपी आहेत. त्यांची राहणे, भोजनाची व्यवस्था कर, अशी सूचना केली होती. त्यामुळे तिघांना या शेतघरात आश्रय मिळाला होता, असे पोलीस तपासात उघड झाले. अटल शुक्लाला गोपाळ सत्यवान पाटील (रा. म्हारळ) याने शेतघराचा संदर्भ दिला होता. तीन जण गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत हे माहिती असुनही त्यांची माहिती पोलिसांपासून लपवली आणि गन्हेगारांना शेतघरात आश्रय देण्यासाठी पुढाकार घेतला म्हणून पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अध्यात्मिक गुरुकुल आश्रमातील लहान मुलांना विविध  वस्तूंची भेट

ठाणे : नगर, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला “आम्हाला गर्व हिंदुत्वाचा” या  समूहाच्या वतीने ३० जून २०२४ रोजी शिर्डी, राहुरी, नगर, उंबरे या गावी विश्व माऊली अध्यात्मिक गुरुकुल या आश्रमात लहान मुलांस गरम पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सोलर पॅनल, अन्नधान्य, शालेय वस्तू, रोख रक्कम तसेच आश्रमच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणुन शिवसेना युवासेना तालुका प्रमुख राहुल जुवाडी,  सचिन मोरे, राहुल मोरे, ग्रुपचे संस्थापक, संचालक, अध्यक्ष, सेक्रेटरी, सल्लागार व ग्रुप मधील ७० ते ८० सदस्य उपस्थित होते. आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या ग्रुपच्या वतीने समाजसेवे अंतर्गत हा २२ वा उपक्रम साजरा करण्यात आला. या आश्रमचे सर्वेसर्वा दुशिंग महाराज यांनी आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या ग्रुपचे संस्थापक संतोष पाटील यांचे मनापासून आभार व्यक्त करून त्यांचा व सौ.सोनिया वहिनी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

मला एक रुपयाचाही निधी दिला नाही-आव्हाड

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने आजपर्यंत मला एक रुपयांचा निधी दिलेला नाही. मी अजित पवारांच्या पीएला १०० वेळा फोन केले, पण त्यांनी मला भेटीची वेळही दिली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे…

 दिव्यांगाच्या कल्याणकारी योजनांसाठी खासदार नरेश म्हस्के यांचा पुढाकार

दिव्यांगांचे अनुदान वितरित करण्याबाबत आयुक्त सकारात्मक     ठाणे : राज्य शासनाच्या धोरणानुसार दिव्यांग व्यक्तींचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून दारिद्रय निर्मुलन समिती अंतर्गत विविध दिव्यांग कल्याणकारी योजना आणि महिला व बालकल्याण समितीच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. मात्र गेल्या दोन वर्षापासून दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणारी अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी याबाबत चर्चा केली. सदरचे अनुदान लवकरच वितरित करण्याबाबत कार्यवाही केली जाईल असे आयुक्तांनी या चर्चेत नमूद केले. दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांसाठी दरवर्षी महापालिकेतर्फे एकूण बजेटच्या पाच टक्के इतकी रक्कम राखीव ठेवली जाते. यामध्ये दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी स्टॉलचे वाटप, दिव्यांग स्कूटर, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, दिव्यांगाच्या व्यायामशाळा, परिवहन सेवेमध्ये 100 टक्के सवलत व बेरोजगार दिव्यांगासाठी रु. 24,000/- इतके अनुदान वितरित करण्यात येते. परंतु मागील दोन वर्षापासून सदरचे अनुदान बंद झाले असल्यामुळे दिव्यांगांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत धर्मवीर दिव्यांग सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन सादर केले होते. खासदार नरेश म्हस्के हे ठाणे महापालिकेत सभागृह नेता असताना त्यांच्या संकल्पनेतून महिला व बालकल्याण समितीच्या विविध योजना तसेच दिव्यांग कल्याणकारी योजनांमध्ये नवीन योजनांची सुरूवात करुन त्याची अंमलबजावणी केली होती. या महत्वाकांक्षी योजनांची नोंद राज्यातील इतर महापालिकांनी घेवून त्यांनी देखील अशा योजना राबविण्यास सुरूवात केली आहे. या दोन्ही योजनांचा फायदा ठाणे शहरातील अनेक गरीब व गरजू नागरिकांना होत आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत घरे वाटप करणे, स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध करुन देणे अशा अनेकविध योजना महापालिकेने राबविल्या असून याची नोंद संपूर्ण राज्याने घेतली होती. परंतु अचानकपणे अनुदानाची रक्कम बंद केल्यामुळे दिव्यांग व्यक्तींसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत खासदार नरेश म्हस्के यांनी दिव्यांगाच्या समस्या मांडून त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने चर्चा केली. तसेच महिला व बालकल्याण समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनाही राबवाव्यात असेही आयुक्तांना सांगितले. चर्चेअंती आयुक्तांनी दिव्यांग कल्याणकारी योजना आणि  महिला व बालकल्याण समितीतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबतही निर्णय घेवून त्याची त्वरीत  अंमलबजावणी केली जाईल असे नमूद केले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त  1-संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 – प्रशांत रोडे, धर्मवीर दिव्यांग सेनेचे अध्यक्ष गिरीष मेहरोल, सचिव शरद पवार व इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी पुढाकार घेवून आयुक्त यांच्याशी चर्चा करुन या बैठकीत दिव्यांगाच्या योजनांबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल दिव्यांग बांधवांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. 000000

राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही होणार प्राणीसंग्रहालय व उद्यान- प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर       ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनामध्ये ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात मंगळवारी एक बैठक पार पडली. त्यामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये हावरे सिटी जवळील नॅशनल पार्कचा एरिया सोडून वनखात्याच्या १५० एकर जमिनीवर  मुंबईतील भायखळा येथील जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर उद्यान करण्याची विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी केली असता मुख्यमंत्र्यांनी त्यास मान्यता देऊन वनखात्याच्या प्रधान सचिव व उपस्थित अधिकार्यांना त्यावर ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश दिले. ठाणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आजुबाजूच्या शहरामध्ये इमारतीचे बांधकाम वाढत चालले आहे. ठाण्यातील नागरिक हिरव्यागार उद्यानाकडे आकर्षित असल्यामुळे अश्या प्रकारचे उद्यान निर्मिती केल्यास आजूबाजूच्या महापालिका क्षेत्रातील अबाल वृध्दांना या उद्यानाचा फायदा होईल. काही महिन्यांपूर्वी ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये कोलशेत भागात नमो उद्यान सुरू करण्यात आले असून या उद्यानाचा आनंद  घेण्यासाठी तरूण-तरूणी, अबाल-वृध्द येत असतात. त्याचप्रमाणे हावरे सिटी येथे प्राणीसंग्रहालय व उद्यान झाल्यास त्याचा आंनद शाळकरी मुलांना व अबालवृध्द तसेच नागरिकांना मिळू शकतो.त्यानुसार या १५० एकर जागेवर बाबूंच्या झाडांबरोबरच इतरही झाडांची लागवड होणार आहे. तसेच विविध प्रकारचे प्राणी व पक्षी सुध्दा या उद्यानामध्ये उपलब्ध होणार आहेत. वनखात्याच्या नियमानुसार या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बांधकाम न करता फक्त प्राण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जेवढे बांधकाम करता येईल तेवढेच बांधकाम अनुज्ञेय करता येईल. त्यापैकी बहुतांश बांधकाम हे लाकडाचे असावे असाही अभिप्राय वनखात्याच्या अधिकार्यांनी दिला. मुंबईतील राणीची बाग तसेच नागपूरची महाराज बाग त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेतही अश्या प्रकारचे उद्यान लवकरच साकारण्यात येणार आहे, असे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव  विकास खार्गे,  अतिरिक्त प्रधान सचिव आय.एस. चहल, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, सचिव जलसंपदा संजय बेलभरे, जतून कपोले, उदय ढगे, क्लेंमेंट बेन, जी. मल्लिकार्जुन, दिपक खांबीत, श्री. उदय मराठे, अनिल अंकलगी,  अजित कवडे, विनोद पवार, संजय कदम, अतुल कुलकर्णी, पी.एम. शिंदे हे अधिकारी उपस्थित होते. 000000

 ‘खांदेश्वर पोलीस ठाण्यात धूळ पडलेले वाहन तुमचे तर नाही ना ? ‘

वाहन मालकांच्या प्रतीक्षेत खांदेश्र्वर पोलीस राज भंडारी       पनवेल : शहरात रस्त्याच्या कडेला असलेल्या बेवारस वाहनांप्रमाणेच पोलीस ठाण्यांमध्ये धूळ खात पडून असलेल्या वाहनांची मोठी समस्या आहे. या वाहनांच्या  मालकांचा शोध घेतला जातो. मात्र, गाडीमालकांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यांच्या आवारात अशा वाहनांचा खच लागत असून प्रदूषणासह अनेक समस्या उद्भवत आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत खांदेश्र्वर पोलीस ठाण्यांमध्ये अशीच २० वाहने धूळखात पडली आहेत. त्या वाहनांच्या मालकांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. पोलीस ठाण्याकडून यापूर्वीही मोहीम राबवून गाड्यांच्या मालकांचा शोध घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा गाड्यांची भर पडली आहे. खांदेश्र्वर पोलीस ठाण्याच्या आवारात १६ दुचाकी, २ चारचाकी आणि २ ऑटो रिक्षा आपल्या मालकांच्या प्रतीक्षेत आहेत. सदर वाहने वाहन मालकांनी त्वरित घेवून जाण्यासाठी खांदेश्र्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाय. टी. चव्हाण यांच्या सहीचे प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये वाहन मालकांना आपापले वाहन घेवून जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कंत्राटी कामगारांची मागण्यांसाठी १८ जुलैला ठामपा मुख्यालयावर दिंडी

अनिल ठाणेकर     ठाणे : महानगरपालिकेची कायमस्वरूपी बारामाही आणि सतत नियमितपणे चालणारी कामे कंत्राटी कामगारांच्या कडून करून घेतली जातात. मात्र वेतन, भत्ते, बोनस, भरपगारी रजेचे वेतन आणि अन्य कायदेशीर सोयी सुविधा देताना ठेकेदार लबाडी करतात. महापालिका प्रशासन मात्र मूग गिळून गप्प राहून ठेकेदार यांना पाठीशी घालत असल्याने सर्व विभागातील कंत्राटी कामगार श्रमिक जनता संघ युनियनच्या नेतृत्वाखाली अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी येत्या १८ जुलै रोजी ठाणे महापालिका मुख्यालयातवर दिंडी काढून महापालिका आयुक्त सौरव राव यांना साकडे घालणार आहेत. या वेळी विविध प्रमुख मागण्यांबाबत अंमलबजावणी करण्यासाठी आग्रह धरण्यात येईल, अशी माहिती महासचिव जगदीश खैरालिया यांनी दिली. आत्यावश्यक सेवेतील नियमित स्वरुपाची बारामाही सतत चालणारी कामे करणार्‍या कंत्राटी कामगारांना कायम कामगारां प्रमाणे वेतन, भत्ते व  सोयी सुविधा लागु करा. ठाणे महापालिका शाळेतील सफाई कामगार व अन्य खात्यातील कार्यरत कर्मचारी यांना वयोमानानुसार कमी करण्यात आलेले किंवा मरण पावलेल्या कामगारांना उपदान (Gratuity) ची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. कंत्राटी कामगारांना मृत्यु किंवा वयोमानानुसार कामावरुन कमी केल्यानंतर उपदानची रक्कम एका महीण्याच्या आत अदा करा, शिक्षण विभागातील कंत्राटी सफाई कामगारांना दरमहा २६ दिवसाचे वेतन, मे महिना, दिवाळीच्या सुट्टी आणि सार्वजनिक सुट्टीच्या काळात काम द्या / वेतन द्या, प्रत्येक कंत्राटी कामगारांना नियमितपणे वेळेवर कायदेशीर वेतन,गणवेश, ओळखपत्र, वेतनस्लिप, सुरक्षिततेची साधणे, पावसाळी रेनशूट , गमबूट आदी  वाटप करा, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यावर कामगारांना सुट्टी किंवा जादा कामाचा भत्ता मासिक वेतनात अदा करा, कायमस्वरुपी व अत्यावश्यक सेवेत कंत्राटी पध्दत बंद करुन सर्व कार्यरत कंत्राटी कामगारांना महापालिकेच्या सेवेत सामावुन घ्यावे. किंवा कायम स्वरुपी कामगारांच्या सारखे वेतन व भत्ते लागु करा. आदी मागण्यांसाठी सर्व विभागातील कंत्राटी कामगार, सफाई कामगार, वाहनचालक, वाल्वमेन आदींनी मिळून श्रमिक जनता संघ युनियनच्या नेतृत्वाखाली अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी येत्या १८ जुलै रोजी ठाणे महापालिका मुख्यालयातवर दिंडी काढून महापालिका आयुक्त श्री सौरव राव यांना साकडे घालणार आहेत, असेही महासचिल जगदीश खैरालिया यांनी सांगितले. अजय भोसले (कार्यकारी सचिव), सुनील दिवेकर, संतोष देशमुख, स्वाती देशमुख, अर्चना पवार (शिक्षण विभाग), भास्कर शिगवण (रस्ते सफाई), गणेश चव्हाण (पाणी पुरवठा विभाग) सूरज वाल्मिकी आदी कार्यकर्त्यांनी कामगारांना मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.

 घोडबंदर रोडचा घेतला महपालिकेने आढावा

‘रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, संसाधनांचे एकत्रीकरण आणि कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्ती या त्रिसूत्रीने सर्व यंत्रणांनी काम करावे- आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश     ठाणे : पावसाळ्यात रस्ते खराब होऊन त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करताना कमीत कमी वेळेत प्रतिसाद दिला गेला पाहिजे. त्यासाठी महापालिकेसह सर्व यंत्रणांनी एक टीम बनून काम करावे. संसाधने, मनुष्यबळ, रस्त्याची मालकी, कामाची जबाबदारी यापैकी कोणतीही अडचण त्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, संसाधनांचे एकत्रीकरण आणि कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्ती या त्रिसूत्रीने आपण सगळ्यांनी एकत्रित काम करून आपले क्षेत्र खड्डेमुक्त करूया, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे. पावसाळ्यातील रस्ते स्थितीचा, विशेषत:  घोडबंदर रोडचा, आढावा घेण्यासाठी बुधवारी सकाळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात सर्व यंत्रणांच्या विभागप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत, ठाणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता विनय सुर्वे, कार्यकारी अभियंता गुरुदास राठोड, मेट्रोचे समन्वयक जयंत डहाणे, कायर्कारी अभियंता सुरेंद्र शेवाळे आणि अतुल पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. आनंद नगर चेक नाका ते गायमुख या पट्ट्यातील पूर्व द्रुतगती महामार्ग आणि घोडबंदर रोड यावरील रस्त्याचे कोणते भाग कोणाकडे आहेत, तसेच, त्यावरील कोणत्या मार्गिकेत कोणाचे काम सुरू आहे, उड्डाणपूलांची जबाबदारी कोणाची आहे या विषयीची स्पष्टता येण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र बसून नकाशावर त्याचे रेखांकन करावे. त्यातून रस्त्याविषयी स्पष्टता येईल आणि संदिग्ध स्थिती होणार नाही, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, पावसाळ्यात रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी सर्व यंत्रणांची संसाधने, मनुष्यबळ हे एकाच यंत्रणेचा भाग आहेत. त्यामुळे एकमेकांना सहाय्य करून रस्ता कमीत कमी वेळात दुरुस्त करणे हेच आपले मुख्य उद्दीष्ट आहे. याचा पुनरुच्चार आयुक्त राव यांनी केला.…

 सर्व प्रभारी पदावरील अधिकाऱ्यांना मूळ पदावर आणा

महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनची मागणी     ठाणे : ठाणे महानगर पालिकेत सध्या सर्वच विभागांमध्ये प्रभारी अधिकाऱ्यांची चलती निर्माण झाली आहे. लिपीकांना थेट सहाय्यक आयुक्त ते उपायुक्तपदाचा प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे. त्यातून ठाणे महानगर पालिकेचे नुकसानच होत आहे. त्यामुळे सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना मूळ पदावर आणून त्यांच्याकडून अतिरिक्त वेतनाची रक्कम वसूल करावी, अशी मागणी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी केली आहे. या मागणीसाठी ते स्वातंत्र्य दिनी उपोषणाला बसणार आहेत. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी या संदर्भात ठामपा आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियमचे उदाहरण दिले असून या ठिकाणी नियुक्त असलेल्या अधिकारी लिपीक या संवर्गातील आहेत. मात्र, राजकीय वरदहस्त असल्याने त्यांना ही बढती दिली आहे, असा आरोप केला आहे. ठामपातील अनेक अधिकारी हे लिपीक असून त्यांना सहाय्यक आयुक्त तसेच प्रभारी उपायुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे. त्यातून ठाणे महानगर पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय, स्पर्धा परीक्षा न देता हे अधिकारी मोक्याच्या जागांवर बसलेले असल्याने धोरणात्मक निर्णय घेणे त्यांना शक्य होत नाही. परिणामी ठाणेकरांच्या करातून जमा झालेल्या पैशाचा अपव्यय होत असल्याने त्या प्रभारींना मूळ पदावर आणावे. अन्यथा, येत्या 15 ऑगस्ट रोजी आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा शिंदे यांनी दिला.