Category: ठाणे

Thane news

महाराष्ट्रातही लागू होणार ‘मुख्यमंत्री लाडली बहना’ योजना, महिलांना महिन्याला १५०० रुपयांचा लाभ मिळणार !

आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश अनिल ठाणेकर     ठाणे : मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही ‘मुख्यमंत्री लाडली बहना’ योजना’ लागू होणार आहे. गरजू महिलांना प्रति महिना १५०० रुपये…

कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांचे एकाचवेळी राज्यभरातील १५ तालुक्यांच्या ठिकाणी लक्षवेधी आंदोलन – विठ्ठल मोरे

ठाणे : महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात कोयना धरण झाले, पण ६४ वर्ष उलटून देखील कोयना कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत, यामुळे ठाणे जिल्ह्यातील ठाणे तहसीलदार कार्यालय, भिवंडी तहसीलदार…

कोकण रेल्वेचा तब्बल तीस दिवसांचा मेगाब्लॉक

नवी मुंबई : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनलवर यार्ड फिट लाईनच्या देखभाल दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेने ३० जून ते ३० जुलैदरम्यान एक महिन्याचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या नेत्रावती एक्स्प्रेस व मत्स्यगंधा…

पामबीच खाडी किनारा परिसरात स्वच्छता मोहीम

वाशी : नवी मुंबईतील स्वच्छताकार्यात तरुणाई स्वयंस्फूर्तीने सहभागी होताना दिसत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार स्वच्छता कार्यात नागरिकांचा सहभाग वाढत आहे. या अनुषंगाने विविध विभागांमध्ये नागरिकांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छता मोहिमा राबविण्यात येत आहेत. अशाच प्रकारची विशेष स्वच्छता मोहीम अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, तसेच उपायुक्त डॉ. अजय गडदे व डॉ. कैलास गायकवाड, घणसोली विभाग अधिकारी संजय तायडे यांच्या नेतृत्वाखाली पामबीचलगत खाडी किनारा परिसरात राबविण्यात आली. या वेळी घणसोली पामबीच खाडी किनारा परिसर स्वच्छ करण्यात आला. यामध्ये स्थानिक नागरिकांप्रमाणेच तेजस्व करिअर अकॅडमीच्या ७० युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकसह इतर कचरा गोळा केला. यामध्ये घणसोली विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक व स्वच्छता कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते.

कचरा व्यवस्थापनात नागरिकांनी सक्रिय सहभाग गरजेचा – सौरभ राव

ठाणे-  कचऱ्याबद्दल जास्तीत जास्त नागरिकांशी संवाद वाढवावा, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. या संवादासाठी स्थानिक तरूणतरुणींचे गट, स्वयंसेवी संस्था, महिलांचे गट यांनी मदत घ्यावी, असेही महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नुकतेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत एक संवाद सत्र आयोजित केले होते. ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा, कचऱ्याचे वर्गीकरण, त्याची विल्हेवाट, नाल्यात टाकला जाणारा कचरा या सगळ्या पैलूंबाबत जनजागृती करून कचऱ्याच्या व्यवस्थापनात नागरिकांचा सक्रिय सहभाग घेण्याची आवश्यकता यावर ठाणे महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या चर्चेत पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार यांनी या संवाद सत्रात कचरा व्यवस्थापन, नागरिक सहभाग यांच्याविषयी प्रास्ताविक केले. या सत्रास, समर्थ भारत व्यासपीठ, स्त्री मुक्ती संघटना, परिसर भगिनी विकास संघ, सुनिलिमा सस्टेनेबल सोल्यूशन्स, आरनिसर्ग फाउंडेशन, एलएएचएस प्रतिष्ठान, ठाणे, रोटरी क्लब, ठाणे, ॲण्टी प्लास्टिक ब्रिगेड, पर्यावरण दक्षता मंडळ, ठाणे सिटीझन्स फाऊंडेशन, हिरवं स्वप्न, हरियाली, स्वत्व, ठाणे आदी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नागरी गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कचरा व्यवस्थापनासाठी क्षमता वृद्धी असे स्वरुप असलेल्या या सत्रात, घरगुती खत निर्मिती, कचऱ्याचे वर्गीकरण, एकल वापराच्या प्लास्टिकवरील प्रतिबंध, घनकचरा व्यवस्थापन करणारी मोठी गृहसंकुले, त्यांचे अनुभव, एनएसएसच्या विद्यार्थांच्या मदतीने शाळा, महाविद्यालयातील जागृती आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर, नाल्यात कचरा न टाकण्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज असून त्यासाठी स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन, या सत्रात आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांनी केले. 000000

 ठाणे महापालिकेला सीएसआर निधीतून चार एक्स रे मशीन झाल्या उपलब्ध

भारत सरकार टांकसाळ, मुंबई यांच्याकडून   ठाणे  : मुंबई येथील भारत सरकारच्या टांकसाळीच्या सीएसआर फंडातून ठाणे महापालिकेस चार पोर्टेबल एक्स रे मशीन्स (क्ष किरण प्रतिमा यंत्र) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपलब्ध झाल्या आहेत. त्यापैकी दोन मशीन्स छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे तर उर्वरित दोन मशीन महापालिकेची आरोग्य केंद्रे व बाह्य रुग्ण तपासणी शिबिरांसाठी वापरण्यात येणार आहेत. ठाणे महापालिकेस सीएसआर निधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे फेब्रुवारी २०२४ मध्ये मागणी नोंदवण्यात आली होती. त्यानुसार, सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत असलेल्या भारत सरकार टांकसाळ, मुंबई यांच्यातर्फे एक कोटी २१ लाख रुपये एवढा निधी उपलब्ध झाला. या निधीतून त्यांनी महापालिकेस चार पोर्टेबल एक्सरे मशीन उपलब्ध करून दिल्या. या मशीन्स नुकत्याच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दाखल झाल्या आहेत. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या निधी उपलब्धतेबद्दल भारत सरकार टांकसाळ यांचे आभार मानले असून या मशीन्समुळे रुग्णसेवेला फायदा होईल, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. महापालिकेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या बाह्य रुग्ण तपासणी शिबिरात एक्स रे त्वरित उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे, रुग्णाला मोफत एक्स रेसाठी महापालिकेच्या आरोग्य केंद्र किंवा पालिकेशी संलग्न असलेल्या खाजगी लॅबमध्ये जावे लागत होते. अशा स्थितीत सुमारे ५० टक्के रुग्ण आवश्यकता असूनही एक्स रे काढणे टाळत असत. या पोर्टेबल एक्स रे मशीन्समुळे रुग्णाचा एक्स रे त्वरित लॅपटॉपवर उपलब्ध होईल आणि त्याचा रिपोर्ट प्रिंट न करता रुग्णाच्या मोबाईलवर पाठवणे शक्य होईल. त्यामुळे रुग्णांचे त्वरित निदान करणे साेपे होणार आहे. भारत सरकार टांकसाळ, मुंबई यांनी सीएसआर निधी उपलब्ध करून दिल्यामुळे हे पोर्टेबल एक्स रे मशीन उपलब्ध झाले आहेत. त्याचा फायदा आरोग्य शिबिरांनाही होणार आहे. त्यामुळे येत्या काळात अशी आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील. त्याचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी यांनी केले आहे.

महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांची नौपाड्यात बिल्डरांबरोबर हातमिळवणी

पक्की चाळ धोकादायक जाहीर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचा खळबळजनक आरोप     ठाणे : महापालिकेच्या नौपाडा विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिल्डरांबरोबर हातमिळवणी करून दादा पाटीलवाडीत असलेली सुस्थितीतील एक पक्की चाळ धोकादायक जाहीर केली आहे. या प्रकाराची तातडीने चौकशी करून चाळीतील रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. याच पद्धतीने नौपाड्यातील पक्क्या चाळी व अधिकृत सुस्थितीतील इमारती धोकादायक जाहीर करण्याचा उद्योग सुरू झाला आहे, याकडे श्री. वाघुले यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. जुने ठाणे असलेल्या नौपाडा विभागात अनेक जुन्या अधिकृत इमारती आहेत. तर काही भागात अजूनही चाळींमध्ये नागरिक वास्तव्य करीत आहेत. या भागातील जागांचे भाव गगनाला भि़डल्यामुळे काही बिल्डरांनी महापालिकेच्या नौपाडा विभागातील काही अधिकाऱ्यांबरोबर हातमिळवणी केली. त्यातून काही चाळी व मोक्याच्या ठिकाणांवरील जुन्या अधिकृत इमारतींवर बिल्डरांची नजर गेली. त्यातून चाळमालकांबरोबर संधान साधून सुस्थितीतील व दुरुस्तीयोग्य असलेल्या चाळी व इमारतींना धोकादायक म्हणून जाहीर केले जात आहे. तसेच चाळीतील रहिवाशांवर दहशत पसरवली जात आहे. या प्रकारामुळे सामान्य रहिवाशी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी श्री. संजय वाघुले यांनी केली आहे. महापालिकेच्या नियमानुसार धोकादायक चाळी व इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करणे गरजेचे असते. मात्र, जागा बळकावण्याचा हव्यास असलेल्या बिल्डरांनी नियमांची पायमल्ली सुरू केली. त्यातून दादा पाटीलवाडीतील १२ फूट उंच असलेली १० बाय २० चौरस फूटांचे रुम असलेली १० भाडोत्री राहणारी चाळ धोकादायक ठरवून पाडण्याचा घाट घातला गेला आहे. ही चाळ पाडण्यात बिल्डरांना यश आल्यास नौपाड्यातील आणखी काही चाळी व जुन्या इमारतींवरही कुऱ्हाड चालविली जाईल, अशी भीती श्री. संजय वाघुले यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर सध्या नौपाड्यातील जुन्या इमारतींमधून `हक्क प्रमाणपत्र’ देतानाही हेतुपुरस्सरपणे दिरंगाई केली जात असल्याचा आरोप श्री. वाघुले यांनी केला. 000000

प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कामगाराला सेवेत घेण्याचे ठाणे लेबर कोर्टाचे आदेश  – जगदीश खैरालिया

ठाणे : ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कामगार राजबीर सोनपाल चौहान यांना पूर्वलक्षी प्रभावाने कामावर हजर करून घेणे बाबत मा.ठाणे लेबर कोर्टाने आदेश पारित केले आहे, अशी माहिती श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी दिली आहे. कम्प्लेंट (युएलपी) क्र .५५ /२०२१ नुसार ठाणे लेबर कोर्टात राजबीर चौहान यांनी दावा दाखल केला होता. अर्जदार सफाई कर्मचारी राजबीर यांना दि. २९ जानेवारी २०२१ रोजी अचानक ठेकेदार मेसर्स. लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लि. पुणे यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता अचानक कामावरून काढून कमी केले होते. अनेक महिने प्रयत्न करूनही ठेकेदार चे मालक श्री विजय कांबळे आणि रूग्णालय प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने राजबीर चौहान यांनी शेवटी न्याय मिळण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. ठाणे मनोरूग्णालयातील कायम कर्मचाऱ्यांनी संप पुकारले असतांना कंत्राटदारांमार्फत मार्फत कार्यरत सफाई सेवकांनी मनोरूग्णांचे हित लक्षात घेऊन साफसफाईचे काम बंद केले नव्हते. तरी देखील राजबीर चौहान यांना विना कायदेशीर प्रक्रिया कोणतीही बचावाची संधी न देता अचानक कामावरून कमी केल्याने राजबीर चौहान यांनी न्यायालयात दाद मागितली होती. सुमारे साडे तीन वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर शेवटी न्याय मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.  कोर्टात राजबीर चौहान यांची बाजू ज्येष्ठ वकील नितीन शिवकर यांनी बाजू मांडली ठेकेदार तर्फे. वकील सचिन रेगे आणि रूग्णालय प्रशासनातर्फे वकील ए. के. पुराणिक यांनी बाजू मांडली होती.  ठाणे  लेबर कोर्ट येथे श्रीमती धनश्री मोरे (जज) यांनी दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी हा निकाल जाहीर केला आहे. याप्रकरणात वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य केल्याबद्दल श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांचे देखील कामगार राजबीर चौहान यांचे आभार व्यक्त केले आहे. कोर्टाने आदेश दिल्यानंतर देखील रूग्णालय प्रशासन आणि ठेकेदार यांनी हटवादी भूमिका घेऊन राजबीर चौहान यांना कामावर हजर करून घेऊन कोर्टाचे आदेशाची अंमलबजावणी केली नाही तर कोर्टाचे अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल केली जाईल असा इशारा युनियन तर्फे कामगार नेते जगदीश खैरालिया यांनी दिला आहे. 000000

झोपेची गोळी दिली नाही म्हणून खोणी-पलावातील नागरिकाची औषध दुकानातील विक्रेत्याला मारहाण

डोंबिवली : दुकानात झोपेची गोळी नाही, असे कारण औषध खरेदीसाठी आलेल्या खोणी-पलावातील एका रहिवाशाला औषध विक्रेत्याने दिल्याने त्याचा राग येऊन रहिवाशाने आपल्या साथीदार मुलासह औषध विक्रेत्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडला आहे. दीपक अमृतलाल करोडिया (५४, रा. लेकसाईड, पलावा, खोणी), दीपक यांचा मुलगा दर्शन (३२) अशी आरोपींची नावे आहेत. खोणी पलावा येथील लेकशोअर ग्रीनमधील संजीवनी मेडिकल दुकानात हा प्रकार घडला आहे. या दुकानातील अंबरनाथ कोहजगाव भागात राहणारा कामगार अजय रामचंद्र स्वामी (३२) यांनी मारहाणप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी सांगितले, तक्रारदार अजय स्वामी हे संजीवनी मेडिकल दुकानात ग्राहकांना औषध विक्रीची कामे करतात. सोमवारी रात्री दुकान बंंद केले जात असताना दुकानात पलावा भागात राहणारे आरोपी दीपक करोडिया आणि त्यांचा मुलगा दर्शन दुकानात आले. त्यांनी जवळ डाॅक्टरांची औषध चिठ्ठी नसताना औषध विक्रेता अजय यांना झोपेची गोळी मागितली. अजयने झोपेची गोळी नाही असे उत्तर दिले. त्याचा राग दीपक यांना आला. त्यांनी अजय यांना शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. त्यांचा मुलगा दर्शन याने दुकानात शिरून दुकानात असलेला लाकडी दांडका घेऊन त्या दांडक्याने अजयला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अजय यांना दुखापत झाली आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश मुसळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. 00000

अंबरनाथ, बदलापुरकरांनो पाण्याबाबत अतिरिक्त काळजी घ्या!

जीवन प्राधिकरणाचे नागरिकांना आवाहन     अंबरनाथः अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील नागरिकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुरवठा होणारे पिण्यायोग्य पाणी गेल्या दिवसांपासून गढूळ येत असून त्यामुळे नागरिकांनी पाण्याबाबत अतिरिक्त काळजी घेण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. जीवन प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना गढूळ पाण्याबाबत तक्रार करण्याचे आवाहनही प्राधिकरण्याच्या वतीने करण्यात आले आहे. अंबरनाथ शहरातील मोठा भाग आणि संपूर्ण बदलापूर शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आहे. प्राधिकरणाच्या वतीने बदलापूर येथून वाहणाऱ्या उल्हास नदीतून बॅरेज बंधाराय येथे पाणी उचलले जाते. प्राधिकरणाच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रात यावर प्रक्रिया करून ते विविध जलकुंभांच्या माध्यमातून वितरीत केले जाते. पावसाळा सुरू होताच नदीत गढूळ पाण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी प्रक्रिया केल्यानंतरही नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होता. गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन जीवन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे. गळक्या जलवाहिन्या शोधा नागरिकांनी आपल्या पुरवठा होणाऱ्या पाण्याची नळजोडणी गटार भागातून जात नसल्याची खात्री करावी. तसे आढळल्यास ही जलवाहिनी गटारीतून काढून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी. तसेच त्यावर गळती होत नसल्याची खात्री करावी असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. सोबतच बहुमजली इमारतीतील ग्राहकांनी पाण्याच्या साठवण टाक्यांची स्वच्छता करावी, असेही आवाहन प्राधिकरणाने केले आहे. इथे नोंदवा तक्रार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य वाहिनीवर गळती झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यासंबंधी तक्रार करण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. अंबरनाथ (पूर्व / पश्चिम) :- ९२२०६०६८५४, ९८६०३२४२३६. तर बदलापूर पूर्व ९८६९७८६१५१, पश्चिम ८९८३२८०२३२ या क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिक तक्रार नोंदवू शकतात.