Category: ठाणे

Thane news

रिक्षा चालकांचा उपोषणाचा इशारा

रिक्षा चालकांचा उपोषणाचा इशारा विविध मागण्यांसाठी घेतली उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱयांची भेट कल्याण : रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी  पूर्ण महाराष्ट्रातील आरटीओ कार्यालयात  शशांक राव व  विलास भालेकर साहेब यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण यांना टॅक्सी संघर्ष कृती समिती कल्याण वतीने  समितीचे अध्यक्ष महेंद्र मिश्रा, कृती समितीचे कार्याध्यक्ष विल्सन काळपुंड, कृती समितीचे उपाध्यक्ष मोहन पाठारे तसेच प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांना निवेदन देण्यात आले. तसेच लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. ऑटोरिक्षा चालक मालकांवर धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळच्या नोंदणी करण्यास सक्ती करण्यात येऊ नये व जे गैरकायदेशीररित्या सक्ती करत असतील अश्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.  धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळात रिक्षाचालक मालकांच्या नोंदणी करिता प्रवेश शुल्क व वार्षिक शुल्क रद्द करण्यात यावे व सर्व रिक्षाचालक मालकांची निःशुल्क नोंदणी या मंडळात करण्यात यावी. ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र ने कल्याणकारी मंडळासाठी मागणी केलेल्या व सुचवलेल्या कल्याणकारी योजना रिक्षाचालक मालकांकरिता या मंडळामार्फत राबविण्यात याव्यात.  महाराष्ट्र राज्य सरकारने ऑटोरिक्षांच्या परवाना वितरणावर स्थगिती आणली आहे. मात्र, इलेक्ट्रीक ऑटोरिक्षा आणि ई-रिक्षा यांच्यावर स्थगिती आणलेली नाही. या सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा आम्ही निषेध करत आहोत. इलेक्ट्रीक ऑटोरिक्षा आणि ई-रिक्षा यांच्या नोंदणीवर सरकारने तातडीने स्थगिती आणावी. अस्थित्वात असलेल्या इलेक्ट्रीक ऑटोरिक्षा आणि ई-रिक्षा यांच्यावर ऑटोरिक्षा सारखेच नियम लावण्यात यावेत व त्यांना ठरवून दिलेल्या मार्गावरच वाहतूक करण्यासाठी कठोर कारवाही करण्यात यावी. राज्य सरकार ने नुकतीच बाईक टॅक्सी वर बंदी घातली आहे, तरीही शहरात खाजगी कंपन्यांद्वारा अवैधरित्या बाईक टॅक्सी सेवा सर्रासपणे सुरु आहे. या अवैध बाईक टॅक्सी मुळे प्रवाश्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, या अवैध बाईक टॅक्सी व ती सेवा देणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाही करत त्यांच्यावर बंदी आणण्यात यावी. या सर्व मागण्या या अत्यंत रास्त मागण्या आहेत व ऑटोरिक्षा चालकांच्या भविष्यासाठी महत्वाच्या आहेत. तेव्हा यावर गांभीर्याने कारवाही कराल अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे.

तेली समाजाचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात

ठाणे : श्री संताजी सहाय्यक संघ, ठाणे यांच्या वतीने तेली समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन न्यू इंग्लिश स्कूल येथील भोळे सभागृहात उत्साही वातावरणात पार पडले. यावेळी विद्यार्थी गुणगौरव, ज्येष्ठ नागरिक सत्कार, हळदी-कुंकू…

कळसुबाई शिखरावर शालेय विद्यार्थ्यांचा झेंडा

कल्याण : शालांत परीक्षा संपल्यानंतर मुलांना सुट्ट्यांचे वेध लागतात. दहावीची परीक्षा संपल्यानंतर पिकनिक, वॉटर रिसॉर्ट, मोबाईल, कम्प्युटर गेम यापासून दूर जात  काही मुलांनी एकत्र येत महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर पार करण्याची मोहीम आखली. यासाठी गिर्यारोहक आणि प्रशिक्षक प्रदीप नायक यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत लोक कल्याण पब्लिक स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच ही मोहीम फत्ते केली. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्या मध्ये असणारे सर्वोच्च शिखर (१६४६ मी/५४०० फूट उंच ) ज्याला महाराष्ट्र चा एव्हरेस्ट मानले जाते. मुलांनी सायंकाळी शिखराकडे कूच केल्यानंतर मध्ये अनेक अडचणी आल्या. विद्यार्थ्यांचा हा पहिलाच प्रयत्न होता. या सर्वांवर मात करत सकाळी ६ वाजता शालेय विद्यार्थ्यांनी कळसुबाई शिखर सर केले. या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि पहिल्यांदाच केलेला कामगिरीचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता.  या टीम मध्ये स्केटिंगची राष्ट्रीय खेळाडू आस्था नाइकर, तीर्था पणिकेर, दिशिता खाचणे, हर्षिल सोळंकी, धनराज सावंत, सार्थक घोडेस्वार, श्रेया प्रसाद, श्लोक बोंबाटकर, शोभित लोखंडे, सई देशमुख, अमेय सोरकाडे, यश भोर, रणबीर प्रसाद, श्रावणी बांदेकर, कृष्णा पाणीग्रही, तृषा खराडे, पार्थ दाभाडे, मनस्वी ढेंगरे, विरेन वानखेडे, अथर्व कदम, वेदिका देवळेकर, मनस्वी फुटाणे, आर्या गुरव आणि प्रशिक्षक प्रदीप नायक यांचा समावेश होता.

टँकरच्या नावाने करोडो रुपयांची झाली सरकारी उधळपट्टी तरीही पाणी टंचाई कायम !

टँकरच्या नावाने करोडो रुपयांची झाली सरकारी उधळपट्टी तरीही पाणी टंचाई कायम ! धरणांच्या तालुक्याची भयानक कैफियत अविनाश उबाळे ठाणे : शहापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी गाव पाड्यांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या काळात उन्हाळ्यात दरवर्षी टंचाईग्रस्त गाव पाड्यांना टँकरने पाणी पुरविले जाते.यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून सरकारी टँकर सुरु केले जातात केवळ आदिवासी गाव पाड्यांवर पाणी पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आजमितीस सरकारी तिजोरीतून करोडो रुपयांची टँकरच्या नावाने उधळपट्टी केलेली आहे.उन्हाळा सुरु झाला की टंचाई गाव पाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा पाणी पुरवठा विभागाकडून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला जातो त्यास शासनाची मंजूर मिळाली की टँकर सुरु करण्यासाठी निविदा मागविल्या जातात आपल्या मर्जीतल्याच टँकर लॉबीला पाणी पुरविण्याची दरवर्षी कंत्राट दिली जातात जिथे टँकर पोहचू शकत नाहीत अशा डोंगरदऱ्या खोऱ्यात पठारावर असलेल्या वाड्या वस्त्यांवर बैलगाडीतून पाणी पुरवठा केला जातो गेल्या १० वर्षांत तब्बल ६ कोटींहून अधिक खर्च हा राज्य सरकारला केवळ टंचाई गाव पााड्यांना पाणी पुरविण्यासाठी करावा लागला आहे बरेच वर्ष टँकरवर अवलंबून असणारा शहापूर तालुका दुर्दैवाने आजही टँकरमुुक्त होऊ शकलेला नाही . आजही आदिवासी महिलांची पाण्यासाठी सुरु असलेली वणवण व त्यांच्या डोक्यावर हंडा हे चित्र नजरेस पडते.टँकर उन्हाळ्यात सुरु होऊनही हे टँकर कधीच सुरळीतपणे व वेळेवर टंचाई ग्रस्त गाव पाड्यांवर पोहचले नाहीत अशी ओरड आदिवासी महिलांची असते आणि प्रत्यक्षात वस्तुस्थिती देखील तशीच बघायला मिळते आहे.अनियमित टँकर येत असल्याने टँकरची वाट पाहत बसण्यापेक्षा आदिवासी पाण्यासाठी इतरत्र भटकंती करतात प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका आदिवासींना बसत असल्याने  टँकर नंतरही पाण्यासाठी त्यांचे भयानक हाल सुरुच असल्याचे चित्र तालुक्यातील टंचाई ग्रस्त गाव पाड्यांवर दिसत आहे .टंचाई ग्रस्त भागात टँकरने पाणी पुरवठा करण्याबरोबरच टंचाई आराखड्यात नवीन पाणी योजना प्रस्तावित करणे,नव्या विहीरी बांधणे,विहिरींमधील गाळ काढणे,व विहिरींचे खोलीकरण करणे ,नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती करणे, नवीन विंधन विहीरी,जुन्या विंधन विहीरींची दुरुस्ती करणे,हात पंप बसवणे टंचाईग्रस्त भागातील गावासाठी बोअरवेल मंजूर करणे यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होतो पण गेल्या कित्येक वर्षापासून हा निधी खर्च होऊनही अनेक योजनांत गैरव्यवहार झाल्याने बहुतांश योजनांचा खर्च हा अक्षरशः पाण्यात गेलेला दिसतो आहे .या गैरव्यवहार प्रकरणी स्थानिक ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनांवर यापूर्वी गुन्हे देखील दाखल झालेले आहेत या सर्व पाणी योजनांची शासनस्थरावर चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे .या सर्व पाणी योजना या कुचकामी ठरल्याने टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येथे आली आहे.जवळपास तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या गाव पाड्यावरील अनेक पाणी योजना बोगस ठरलेल्या आहेत.शहापूर तालुक्यात एकूण २०३ पाणी योजना असल्याची माहिती मिळते आहे यातील १३७ पाणी योजना या कशातरी रडतखडत सुरु आहेत तर जवळपास १७ पाणी योजना अपूर्ण अवस्थेत बंद पडून आहेत.बऱ्याच आदिवासी वस्त्यांमध्ये पाणी योजनाच नाहीत ठाणे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कित्येक वर्ष टँकरने पाणी पुरविण्याचे नियोजन करते परंतु शहापूरची ही पाणी टंचाईची अवस्था पाहता व त्यासाठीचा होणारा अवास्तव खर्च पाहता टंचाईग्रस्तांसाठी पाणी पुरवठा करण्यासाठीच्या ठोस अशा कोणत्याच उपाययोजना पाणी पुरवठा खात्याला एवढया वर्षांत करता आलेल्या नाहीत हे टंचाईग्रस्तांना टँकरने पाणी पुरवठयासाठी झालेल्या सरकारी खर्चावरुन स्पष्ट होत आहे.या कामी ग्रामीण पाणी पुरवठा योजना सपशेल अपयशी ठरल्याने उन्हाळ्यात फक्त पाण्यासाठी टँकरवरच गाव पाड्यांवरील लोकांना अवलंबून राहावे लागत आहे.हे येथील जळजळीत वास्तव आहे.शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई सोडवण्यासाठी सरकारचे कुठलेच योग्य नियोजन दिसून येत नसून केवळ नेहमीची येतो पावसाळा, या युक्ती प्रमाणे दरवर्षी फक्त टँकरने पाणी पुरवठा या गोंडस नावाखाली टँकर लॉबीला पोसण्याचे काम येथे कित्येक वर्ष प्रशासनाकडून सुरु असून ही टँकरच्या नावाने सरकारी उधळपट्टी येथे सुरु असल्याचे दिसत आहे .करोडो रुपये टँकरच्या नावाखाली खर्च होऊनही हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांची उन्हातान्हात वणवण कायम असल्याचे विदारक असे चित्र धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूर तालुक्यात दिसत आहे.

निसर्गातील पंचतत्त्वांचे जतन करून घरोघरी नर्सरी ही संकल्पना राबवावी – महापौर डिंपल मेहता

निसर्गातील पंचतत्त्वांचे जतन करून घरोघरी नर्सरी ही संकल्पना राबवावी – महापौर डिंपल मेहता मिरा – भाईंदर : पर्यावरण संवर्धन ही केवळ शासन किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. निसर्गातील पंचतत्त्वांचे जतन करून घरोघरी नर्सरी ही संकल्पना राबवावी, असे आवाहन मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांनी केले. महापालिका आयोजित वसुंधरा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या. माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित या तीन दिवसीय महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी महापौरांच्या हस्ते आणि आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. माझी वसुंधरा महोत्सवाच्या निमित्ताने पद्मभूषण मेजर ध्यानचंद मैदानात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांनी प्रदर्शनातील पर्यावरणपूरक स्टॉल्स आणि शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रकल्पांची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. या प्रदर्शनात औषधी वनस्पती, बी-बियाणे आणि विविध नर्सरी, आयुर्वेदिक उत्पादने, हस्तकला आणि हँडलूम वस्त्रे, सोलर सेल्स, सोलर बॅटरी आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसारखी आधुनिक तंत्रज्ञानाची सादरीकरणे करण्यात आली. या सोहळ्याला उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, स्थायी समिती सभापती हसमुख गहलोत, महिला व बालकल्याण समिती सभापती अनिता पाटील, उपसभापती हेमा बेलानी, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे व प्रियंका राजपूत, डॉ. सचिन बांगर, कविता बोरकर, प्रणाली घोंगे, स्वप्नील सावंत, नागेश विरकर हेही उपस्थित होते.

४० वर्षावरील क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

नवी मुंबई महानगरपालिका चषक ४० वर्षावरील क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ नवी मुंबई : ४० वर्षावरील क्रिकेट खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध व्हावे व शारीरिक तंदुरुस्तीबाबत त्यांच्या मनात असलेली आरोग्य जागरुकता वाढविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर चषकांतर्गत मागील १० वर्षापासून ४० वर्षावरील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धा जाहीर होऊन अलपकालावधी उपलब्ध होऊनही या स्पर्धेला मिळलेला भरघोस प्रतिसाद उत्साह वाढविणारा असल्याचे मत महानगरपालिकेच्या क्रीडा, सांस्कृतिक कार्य व युवक कल्याण समितीचे सभापती  गिरीष म्हात्रे यांनी व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयाजवळील क्रीडांगणात २३, २४ व २५ मार्च २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महापौर चषक ४०वर्षावरील क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. या प्रसंगी क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, ४० वर्षावरील क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मास्टर प्रदिप पाटील, उपाध्यक्ष  नरेश गौरी, सचिव  एल डी पाटील व विकास मोकल, मनोज म्हात्रे, बळीराम पाटील, भालचंद्र दळवी, बाळकृष्ण बंदरे व इतर मान्यवर उपस्थित होते. स्पर्धमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ग्रामीण भागातील ३३ क्रिकेट संघ तसेच शहरी भागातील २५ क्रिकेट संघ असे एकूण ५८ क्रिकेट संघ सहभागी झाले आहेत. यावेळी पावणेगाव व ऐरोलीगाव या संघांमध्ये झालेल्या शुभारंभाच्या सामन्यात पावणेगाव संघाने विजय संपादन केला. या स्पर्धतील ग्रामीण क्रिकेट संघांसाठी स्वतंत्र विजेता व उपविजेता चषक तसेच शहरी भागातील क्रिकेट संघांसाठी स्वतंत्र विजेता व उपविजेता चषक असणार आहे.  वैयक्तिक कामगिरी करणा-या सर्वोतम खेळाडूंना सन्मानित केले जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील दोन स्वतंत्र स्पर्धांच्या अंतिम फेरीचे सामने सेक्टर ३ सीबीडी बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकूलात संपन्न होणार आहेत. विशेष म्हणजे हे सामने क्रीडा संकुलात नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रखर विद्युत व्यवस्थेत प्रकाशझोतात संपन्न होणार आहेत. तरी क्रिकेटप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी क्रिकेट सारख्या लोकप्रिय खेळाच्या माध्यमातून चाळीशीनंतर आपले आरोग्य जपणा-या ४० प्लस खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

‘बिट्टू बॉस’ बिबट्याच्या आठवणींना सरनाईक कुटुंबियांचा भावनिक उजाळा

‘बिट्टू बॉस’ बिबट्याच्या आठवणींना सरनाईक कुटुंबियांचा भावनिक उजाळा अनिल ठाणेकर ठाणे, सहा वर्षांपूर्वी पूर्वेशच्या वाढदिवसानिमित्त संजय गांधी नॅशनल पार्क येथून दत्तक घेतलेला बिबट्याचा बछडा ‘बिट्टू बॉस’ आता कायमचा निरोप देऊन गेला. या छोट्या जीवाच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. अशी भावना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. प्रताप सरनाईक म्हणाले ‘बिट्टू बॉस’ हा केवळ एक प्राणी नव्हता, तर कुटुंबाचा जिव्हाळ्याचा सदस्य बनला होता. त्याच्या निरागस हालचाली, लाघवी स्वभाव आणि प्रेमळ वागणुकीने सर्वांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते. गेल्या सहा वर्षांत त्याने कुटुंबीयांशी एक अतूट नातं जोडले होते. आता त्याच्या जाण्याने घरातील प्रत्येक कोपऱ्यात त्याच्या आठवणी दाटून आल्या आहेत. त्याच्यासोबत घालवलेले क्षण, त्याचा निरागसपणा आणि जिव्हाळा हे सर्व आता स्मरणरूपानेच उरले आहेत. आमच्या साठी ही अपूरणीय हानी असून, ‘बिट्टू बॉस’ची जागा कोणीच घेऊ शकणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ‘बिट्टू बॉस, तुझ्या आठवणी आमच्या हृदयात सदैव जिवंत राहतील. तुझ्या आत्म्यास शांती लाभो,’ अशा भावनिक शब्दांत सरनाईक कुटुंबीयांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

जिल्हा परिषदेत शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना अभिवादन

जिल्हा परिषदेत शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना अभिवादन अनिल ठाणेकर ठाणे, स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणारे महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी देशासाठी दिलेल्या त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवत त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प व्यक्त केला.या कार्यक्रमास पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. वल्लभ जोशी, सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय) डॉ. किर्ती डोईजोडे, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे या अमर क्रांतिकारकांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

मुंब्रा पोलीस स्टेशनकडून रमजाननिमित्त गरजूंना राशन किट वाटप

मुंब्रा पोलीस स्टेशनकडून रमजाननिमित्त गरजूंना राशन किट वाटप दिवा: पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत गरीब व गरजवंत नागरिकांसह शासकीय कामात सहकार्य करणाऱ्या पोलीस…

वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण

वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण शहापूरात वन्यप्राण्यांसाठी आणलेले कृत्रिम पाणवठे काष्ट विक्री आगारात पडून अविनाश उबाळे ठाणे : शहापूर तालुक्यातील प्रादेशिक वनविभागाच्या जंगलातील वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी कृत्रिम पाणवठ्यांचा पुरवठा करण्यात आला होता.परंतु धक्कादायक वास्तव म्हणजे हे बशीच्या आकाराचे सरकारी पाणवठे मार्च महिना संपत आला तरीही वनविभागाकडून जंगलात अद्यापही बसविण्यात आले नाहीत हे पाणवठे चक्क आसनगाव काष्ट विक्री आगारात भंगारात पडून असल्याचे संतापजनक चित्र येथे दिसत आहे.जंगलात पाणवठे न ठेवता अगदी निष्काळजीपणे हे कृत्रिम पानवठे येथे टाकून देण्यात आले आहेत.या प्रकारामुळे वनविभागाचा भोंगळ कारभार समोर येत आहे. उपवनसंरक्षक,कार्यालयाच्या प्रादेशिक वनविभागाच्या,शहापूर,धसई,डोळखांब,वाशाळा,विहीगाव,खर्डी या सहा वनपरिक्षेत्रीतील जंगलात हे कृत्रिम बशीच्या आकाराचे पाणवठे दाट जंगलात बसविण्यात येणार होते.येथील विस्तीर्ण व घनदाट अशा जंगलात बिबटे,तरस,कोल्हे,भेकर,नीलगाय चौशिंग,ससे,रानडुक्कर,वानर,रानमांजर यांसह अन्य लहान वन्यप्राणी व दुर्मिळ अशा पक्ष्यांचा अधिवास आढळतो.या प्राण्यांना उन्हाळ्यात जंगलातच त्यांच्या अधिवासात पिण्यासाठी पाणी मिळावे तसेच पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांनी जंगल सोडून गाव वस्त्यांवर व इतरत्र स्थलांतर करू नयेत यासाठी सरकारने बशीच्या आकाराचे  कृत्रिम असे पाणवठे म्हणजेच वॉटर होल जंगलात ठेवण्यासाठी वनविभागाला पुरवठा केले होते या कृत्रिम पाणवठ्यात वनविभागाकडून टँकर अथवा बैलगाडीने पाणी आणून ओतले जाणार असे प्रयोजन होते हे पाणवठे खरेदीसाठी वनविभागाकडून लाखो रुपयांचा निधीही खर्च करण्यात आला. परंतु हे कृत्रिम पाणवठे उन्हाळ्यातील मार्च महिना संपत आला तरीही जंगलात अद्यापही बसविण्यात आलेच नाहीत हे पाणवठे येथील काष्ट विक्री आगारात पडून असल्याचे संतापजनक असे चित्र पाहावयास मिळत आहे.जंगलात वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आलेली दिसत नाही.परिणामी पाण्याच्या शोधात पाणवठ्याकडे येणाऱ्या वन्यप्राण्यांना पाण्याअभावी येथून माघारी फिरावे लागते आहे.उन्हाच्या काहीलीनं पाण्यसाठी तहानेने व्याकूळ झालेल्या असंख्य वन्यप्राण्यांची व पक्ष्यांची पाण्याअभावी जंगलात घुसमट होत आहे.वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या अक्षरशः बेफिकिर व निष्काळजीपणामुळे हे पाणवठे जंगलात उन्हाळ्यात वेळेवर बसविण्यात आले नसल्याने परिणामी वन्य प्राण्यांना पाण्याच्या शोधात जंगलात वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. याकडे प्रादेशिक वनविभागाने गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे.