Category: ठाणे

Thane news

कोचिंग क्लासेस संघटनेच्या साडेसात हजार पदवीधर सदस्यांमुळे रंगत

अमोल जगताप यांनी दाखल केला अर्ज अनिल ठाणेकर ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघातील यंदाची निवडणूक कोचिंग क्लासेस संघटनेच्या प्रवेशामुळे रंगतदार झाली आहे. कोचिंग क्लासेस संघटनेचे सुमारे साडेसात हजार पदवीधर सदस्य या निवडणुकीत सक्रीय झाल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनाचा मुहूर्त साधून गुरूवारी कोचिंग क्लासेसचे अमोल जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ठाण्यात कोकण पदवीधर निवडणूकिसाठी कोचिंग क्लास संघटनेच्या वतीने अमोल जगताप  यांना उमेदवारी देण्यात आली असून शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या  आणि रोजगार निर्मिती करणे यांसारखे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अमोल जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आपला अर्ज दाखल करण्याआधी जगताप यांनी कोर्टनाका येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी सतीश देशमुख, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, शैलेश सपकाळ भरत जाधव बबन चव्हाण संचालक शिक्षक उपस्थित होते. सदर प्रसंगी त्यांनी,  शिक्षक, पदवीधरांचे प्रश्न, बेरोजगारी याबाबत विधिमंडळात आवाज उठवण्यासाठी आपण निवडणूक लढवित असल्याचे सांगितले. दरम्यान, गेल्या सहा महिन्यापूर्वी कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने  ९००० तरुण पदवीधर यांचे अर्ज  भरून त्यांचा समावेश मतदार म्हणून करून घेतला आहे. शिवाय,  हजारो माजी विद्यार्थी यांना संपर्क साधण्यात आलेला आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सतिश देशमुख यांनी, महाराष्ट्रातील क्लासेस संचालक म्हणजेच खासगी शिक्षक यांच्या न्याय हक्कासाठी संघटना काम करीत आहे. शालेय शिक्षण व्यवस्था कमकुवत पडत आहे. मात्र, त्यांच्या रोजगार बाबत कोणीही बोलत नाही. पदवीधर याच्या समस्यांबाबतही कोणताही विचार केला जात नाही. पदवीधरांना केवळ गृहीत धरण्यात येते. त्याविरोधात आमचा लढा आहे, असे सांगितले.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन आज रोजी लल्लुभाई कम्पाऊंड,एमएमआरडीए वसाहतीत ज्योती एजुकेशनल अॅड सोशल वेल्फेअर ट्रस्ट मार्फत झाडे लावुन साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाला सह.समाज विकास अधिकारी सुनिल आटपाडकर,सिनियर क्राईम पी आय मानखुर्द जगदिश भामवाळ तसेच संस्थेचे अध्यक्ष राजेंन्द घनगांव,सचिव सचिन सर,पञकार आंनद जाधव ,समाजसेवक लोखंडे,हिराताई काळे तसेच विभागातील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘करूनच दाखवू प्रदूषणमुक्त ठाणे’ या कार्यक्रमात पर्यावरण वीरांना पुरस्कार प्रदान

‘नागरिकांच्या सहकार्याने ठाणे सुंदर, हरित आणि प्लास्टिकमुक्त करणे शक्य’ – आयुक्त सौरभ राव ठाणे : नागरिकांच्या सहकार्याने आपले ठाणे सुंदर, हरित आणि प्लास्टिकमुक्त करणे शक्य आहे. त्यासाठी महापालिकेची यंत्रणा आणि नागरिक यांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिका आणि श्रीकला संस्कार न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ‘करूनच दाखवू प्रदूषणमुक्त ठाणे’ या बहुपेडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या आरंभी आयुक्त राव यांनी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उपस्थितांशी संवाद साधला. तसेच, पर्यावरण रक्षणासाठी निरनिराळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या नागरिक आणि संस्थांचा पारितोषिके प्रदान करून गौरवही केला. या कार्यक्रमास, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपायुक्त (पर्यावरण विभाग) अनघा कदम, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, उपायुक्त दिनेश तायडे (परिमंडळ ३), मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, श्रीकला संस्कार न्यासच्या दिपाली काळे आदी उपस्थित होते. आपण प्रातिनिधिक स्वरुपात एक दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करत असलो तरी प्रत्यक्षात प्रत्येक दिवस हा पर्यावरण दिनच असतो. आपण करत असलेला श्वाच्छोसवास हा या पर्यावरणाची देणगी आहे. त्याचे कायम स्मरण ठेवून या पर्यावरणाच्या रक्षणात आपण आपला वाटा उचलला पाहिजे, असे आयुक्त राव यांनी सांगितले. पंचमहाभुतांच्या पाचही घटकांच्या संवर्धन आणि संतुलनासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असते. त्या प्रयत्नांमध्ये लहान मुले, युवक-युवती, माध्यमे, कंपन्या, गृहसंकुले, शासकीय विभाग  या सगळ्यांनी हातभार लावला तर हे कार्य सोपे होईल. त्यातून वायू, जल, ध्वनी या प्रदूषणांचा आपल्यावरील परिणाम सिमित करणे शक्य होईल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. आपल्या शहराचा विचार करता नाल्यात पडणारा कचरा ही मोठी पर्यावरणीय समस्याच आहे. त्याला आळा घालण्यात महापालिकेच्या प्रयत्नात जशा काही त्रुटी आहेत, तशाच त्या नागरिकांच्या व्यवहारातही आहेत. नाल्यातील हजारो टन कचरा, विशेषत: प्लास्टिकचा कचरा हा पर्यावरणाचे आणि त्यायोगे पुढील पिढीचे नुकसान करत आहे. त्यामुळे नाल्यात कचरा टाकू नका, हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात महापालिकेची यंत्रणा कमी पडते आहे. तसेच, नाल्यात कचरा टाकण्यापेक्षा थोडी कळ सोसून तो कचऱ्याच्या गाडीतच टाकण्याबाबत नागरिकांचा आळसही दिसतो आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही नागरिकांशी त्यांच्या वस्तीत जाऊन संवाद साधत आहोत. प्लास्टिकमुक्तीचे अभियान राबवून नागरिकांच्या सहकार्याने ठाणे सुंदर, हरित आणि प्लास्टिकमुक्त करून दाखवू, अशी ग्वाही याप्रसंगी आयुक्त राव यांनी दिली. या कार्यक्रमात, श्रीकला संस्कार न्यासच्या कलाकारांनी विविध नृत्ये, नाटिका, स्टॅण्डअप कॉमेडी, प्रश्नमंजुषा स्पर्धा आदी सादर केले. त्याबद्दलही आयुक्त राव यांनी संस्थेचे कौतुक केले. पर्यावरणविषयक जागृतीसाठी संस्थेने अभिनव पद्धतीने मांडणी केली, असे आयुक्त म्हणाले. या कार्यक्रमात, पर्यावरणपुरक प्रकल्पांसाठी टीसा, एन्ह्यारोकेअर, मायक्रो मास्टर लॅब, ऑक्सिकेअर इंडस्ट्री, झिरो डी इंडस्ट्री यांना पुरस्कार देण्यात आला. तर, ‘माझी वसुंधरा’ या शासनाच्या अभियानाअंतर्गत ज्या शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी वातावरण बदल या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला व पर्यावरणपूरक कामे केली अशा व्हिपीएम पॉलिटेक्निक, एपी शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय यांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर, रहिवासी संकुलात वृक्षारोपण, सोसायटीच्या आवारात उद्यान, टेरेस गार्डन करणाऱ्या उत्कृष्ट रहिवासी संकुलांना पुरस्कार देण्यात आला. त्यात, कशीश पार्क, स्वस्तिक गार्डन, सिद्धांचल फेज-1, ओझोन व्हॅली, निलकंठ हाईट्स, गार्डन इस्टेट, सनक्रेस सोसायटी, ग्रेस स्क्वेअर, गोदरेज एमराल्ड, कॉसमॉस महुआ, विकास कॉम्पलेक्स, टाटा हाऊसिंग, दोस्ती विहार, सुकुर पार्क यांचा समावेश आहे. समर्थ भारत व्यासपीठ, ॲन्टी प्लास्टिक बिग्रेड, परिसर भगिनी विकास संघ यांनी रहिवासी संकुलांमध्ये केलेल्या जनजागृतीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. तर, त्यास उत्सर्फुतपणे प्रतिसाद देऊन ओला व सुका कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या ऋतुपार्क, ॲक्युरा रूस्तुमजी अरबेनिया, तारंगन, रविउदय, रोझा गार्डनिया, दोस्ती इम्पेरिया, बाल स्नेहालय, नंदनवन होम्स, खारेगाव यांना पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी अलार्क देसाई, उल्हास परांजपे, उत्तरा परांजपे, कौस्तुभ ताम्हणकर, अजित करकरे, गौरी करकरे, रमाकांत बारी यांनाही पुरस्काराने गौरवण्यात आले.

निरंजन डावखरे आज अर्ज भरणार

कोकण पदवीधर निवडणूक कोकण भवनमध्ये भाजपाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाच्या वतीने आमदार निरंजन वसंत डावखरे यांच्याकडून आज सकाळी ११.३० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनमधील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात अर्ज भरण्यावेळी भाजपाच्या प्रमुख लोकप्रतिनिधींबरोबरच कोकणातील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व भाजपाचे निरंजन डावखरे यांच्याकडून केले जात आहे. भाजपाने यंदाही त्यांना उमेदवारी जाहीर केली असून, त्यांची विजयानंतर हॅट्रीक होणार आहे. त्यादृष्टीकोनातून भाजपाकडून कोकण पदवीधर मतदारसंघात मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. आतापर्यंत २ लाख १४ हजार मतदारांची नोंदणी झाली असून, भाजपाकडून शहरांबरोबरच गावा-गावांमध्ये संपर्क साधण्यात येत आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या कोकण भवन (बेलापूर) येथील कार्यालयात निरंजन डावखरे यांच्याकडून शुक्रवारी (ता. ७) सकाळी साडेअकरा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. या वेळी भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कोकणातील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

‘धोकादायक’च्या नावाखाली वृक्षांची कत्तल

भाईंदर  : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मिरा भाईंदर शहरातील धोकादायक वाटणारी सुमारे २०० झाडे महापालिकेकडून तोडण्यात आली आहेत, मात्र त्यात काही चांगल्या झाडांवरदेखील महापालिकेकडून कुऱ्हाड चालविण्यात आल्याने नागरिकांकडून हळहळ…

महायुतीच्या मताधिक्यात मिरा भाईंदरमध्ये घट

भाईंदर : ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के दोन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यात मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून म्हस्के यांना ४० हजारांचे मताधिक्य मिळाले, परंतु २०१९…

मिरा-भाईंदरच्या पाणीपुरवठ्यात १० एमएलडीची वाढ

भाईंदर : मिरा-भाईंदर शहराला भेडसावत असलेली पाणी समस्या लक्षात घेऊन मिरा भाईंदरच्या पाणीपुरवठ्यात १० दशलक्ष लिटरची (एमएलडी) वाढ करण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीला दिले आहेत. हे पाणी उद्या…

‘प्रत्येकाचे प्रगती पुस्तक तपासले जाणार, अन्यथा होणार कारवाई’

उदय सामंत यांचा इशारा ठाणे : इंडिया आघाडीने जातीय ध्रुवीकरण करीत चुकीचा प्रचार केला आणि त्या प्रचाराला जनता बळी पडली. मात्र आता अवघ्या २४ तासाच्या आतच ते त्यांना विसरले. परंतु आमच्या कुठे चुका झाल्या, कोण कुठे कमी पडले, याचे आत्मचिंतन केले जाईल आणि विधानसभेला त्यांना व्याजसकट हिसाब परत केला जाईल असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. दुसरीकडे कोणी चांगले काम केले कोणी केले नाही, याचा अहवाल येत्या आठ दिवसात घेतला जाणार असून प्रत्येकाचा प्रगती पुस्तक तपासले जाईल असा इशारा देत जे यात नापास झालेले असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यात आनंद आश्रम येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. निवडणुकीत इंडिया आघाडीने संविधान बदलणार मुस्लीमांच्या बाबतीत अप्रचार केला, त्याचा त्यांना फायदा झाल्याचेही ते म्हणाले. परंतु आम्ही गाफील राहिलो, त्यामुळेच काही ठिकाणी समीकरणे चुकीली असल्याचेही ते म्हणाले. परंतु निवडून आल्यानंतर त्याचा साधा उल्लेख सुध्दा त्यांनी केलेला नसल्याचे ते म्हणाले. उमेदवार उशीराने घोषीत करणे, प्रचाराला कमी दिवस मिळाल्याने आणि काही ठिकाणी उमेदवार बदलावे लागल्यानेही आम्ही मागे पडलो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना आम्ही व्याजासकट परत करु असा दावा करीत राज्यात विधानसभा निवडणुकीत २०० जागांवर निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी २१ जागांवर निवडणुक लढविली. मात्र त्यांना ९ जागांवर समाधान मानावे लागले. मात्र आम्ही १५ जागा लढून ७ जागा जिंकल्या. त्यामुळे उभाठा पेक्षा आमचा स्ट्राईक रेट अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकीपूर्वी ईव्हीएमवर हल्ला झाला आणि आता निवडणुका झाल्या आणि जागा आपल्या बाजूने आल्या. मात्र आता ईव्हीमीवरील हल्ला थांबला असल्याचेही ते म्हणाले.  त्यातही ज्यांच्या हातून कोकण गेले, संभाजी नगर गेले, अशांनी आपली काय स्थिती आहे, हे समजून जावे असा इशाराही त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला. पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघाच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की, विधान परिषदेच्या जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विजय संपादन करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरेकरांची वाढलेली मते किणीकरांसाठी डोकेदुखी?

अंबरनाथमध्ये ठाकरे गटाला ५८ हजार मते ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांचा एकतर्फी विजय झाला असला तरी याच मतदारसंघातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर राणे यांना मिळालेल्या ५८ हजार मतांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या वेळी प्रमुख विरोधी उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाबाजी पाटील यांना अंबरनाथमधून ३१ हजार मते होती. या मतांमुळे अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त होते आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. किणीकर ६० हजार मते मिळवून विजयी झाले होते. राज्याचे लक्ष लागलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरूद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या खासदारकीच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत अंबरनाथ शहरात सर्वाधिक महत्वाचे प्रकल्प मार्गी लावले. त्यामुळे त्यांच्यासाठी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील लढाई तशी सोपी समजली जात होती. त्यात अंबरनाथ शहरात विरोधी पक्ष नावापुरता राहिला होता. निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला पडलेले खिंडार, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाची निष्प्रभता आणि ठाकरे गटाला नसलेले सक्षम नेतृत्व यामुळे अंबरनाथमधून विजयी आघाडी मिळण्याची आशा शिवसेनेला होता. तशी ती आघाडी मिळालीही. डॉ. श्रीकांत शिंदे यांना अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून ९३ हजार ६७० मते मिळाली. गेल्या निवडणुकीत ८८ हजार ८१० मते डॉ. शिंदे यांना मिळाली होती. त्यामुळे यंदा मतांची संख्या वाढली. मात्र त्याचवेळी प्रमुख विरोधी उमेदवार असलेल्या ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर राणे यांनी तब्बल ५८ हजार २८ इतकी मते मिळवली. त्यामुळे शिवसेना – भाजप महायुतीसह अनेकांच्या भुवया उंचावल्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बाबाजी पाटील यांना ३१ हजार १४३ मते मिळाली होती. त्या तुलनेत यंदा दरेकर यांना २६ हजार अधिक मते मिळाली. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीतील मतांवर विधानसभा मतांचे आकडे अवलंबून असतात. गेल्या लोकसभेत डॉ. शिंदे यांना ८८ हजार मते मिळाली होती. तर शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर यांना विधानसभेत ६० हजार ०८३ मते मिळाली होती. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावरील कॉंग्रेस उमेदवार रोहित साळवे यांना ३० हजार ७८९ मते मिळाली होती. त्यामुळे यंदा दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला मिळालेल्या ५८ हजार मतांमुळे विधानसभेतील विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची लढाई आणखी कठीण होण्याची शक्यता व्यक्त होते आहे. प्रभावी प्रचाराचा अभाव, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कमतरता आणि सहकारी पक्षांची ताकद नसतानाही ठाकरे गटाने मिळवलेल्या या मतांमुळे विद्यमान आमदारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.

कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरूवारी दहा तास बंद

कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांना कल्याण डोंबिवली पालिकेकडून पाणी पुरवठा करणाऱ्या नेतिवली, बारावे येथील जलशुध्दीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीची कामे करायची असल्याने कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद राहणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी दिली आहे. जलशुध्दीकरण केंद्रांच्या या दुरुस्ती, देखभालीच्या कामांमुळे कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम आणि परिसराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी या जलशुध्दीकरण केंद्रांच्या दुरुस्तीची कामे केली जातात. त्याप्रमाणे ही कामे हाती घेतली जाणार आहेत. या जलशुध्दीकरण केंद्रातून होणाऱ्या मुख्य जलवाहिनी, पोहच जलवाहिनींवरील पाणी गळती थांबविण्याची कामे या कालावधीत केली जाणार आहेत, असे कार्यकारी अभियंता घोडे यांनी सांगितले. या कालावधीत यांंत्रिकी आणि तांंत्रिक दुरुस्तीचीही कामे केली जाणार आहेत. गुरुवारी दिवसभर दहा तास कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी या दोन्ही शहरांना कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.