Category: ठाणे

Thane news

बदलापुरात नालेसफाईला सुरुवात

बदलापूर : मागील काही वर्षांपासून अतिवृष्टी झाल्यास बदलापूर शहराला पुराचा तडाखा बसतो. त्यामुळे बदलापूर शहरात पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या नाल्यांच्या सफाईचे काम कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने हाती घेतले आहे. शहरातील १३ मोठ्या नाल्यांसहित इतर गटारे व नाल्यांच्या सफाईचे काम सुरू केल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकारी श्रेया शिरवटकर यांनी दिली आहे. पावसाळा आणि बदलापूर शहराचे जणू जुने समीकरण आहे. २००५ मध्ये आलेल्या महापुरानंतर, २०१८, २०१९ मध्येही पूरपरिस्थिती निर्माण झाली होती; मात्र प्रत्येक वर्षीच बदलापूर शहरातील पश्चिमेकडील अनेक सखल भागांत जास्त पाऊस पडल्यास पाणी साचते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पालिकेने नालेसफाईचे काम पूर्ण करणे अपेक्षित असते. यंदा लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात पालिकेचा सगळा कर्मचारी वर्ग व्यस्त असल्याने नालेसफाईच्या कामाला उशिरा सुरुवात झाली आहे. मात्र तरीही निवडणुकीची कामे पूर्ण करत शहरातील नालेसफाईला आठवडाभरापूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. बदलापूर पूर्व येथील शिरगाव गावातून पुढे आपटेवाडी, कात्रप, स्टेशन परिसर व पुढे पश्चिमेला शनिनगर, हेंद्रेपाडा इथून निघणारा हा नाला उल्हास नदीला जाऊन मिळतो. या नाल्याची सफाई करण्यात येत आहे. तसेच शहरात एकूण १३ मोठ्या नाल्यांच्या सफाईला सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडे असणाऱ्या जेसीबी व पोकलेनच्या साह्याने नालेसफाईला सुरुवात केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. साधारण शहरातील संपूर्ण नालेसफाई ३१ मे पूर्वी पूर्ण होईल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकारी श्रेया शिरवटकर यांनी दिली आहे.

एसटीच्या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

अवघ्या ५ महिन्यात १२ लाख ९२ हजार इतक्या ऑनलाईन तिकीटाची विक्री – अभिजीत भोसले अनिल ठाणेकर ठाणे : एसटीच्या  नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. १ जानेवारी २०२४ ते २० मे २०२४ पर्यंत म्हणजे अवघ्या पाच महिन्यात १२ लाख ९२ हजार इतक्या तिकीटाची विक्री या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनो दिली आहे. १ जानेवारी २०२४ पासून ऑनलाईन आरक्षण प्रणाली अदयावत  करुन नव्याने सुरु करण्यात आलेल्या तिकीट आरक्षण प्रणालीला उदंड प्रतिसाद मिळाला असून १ जानेवारी २०२४ ते २० मे २०२४ पर्यंत १२ लाख ९२ हजार इतक्या तिकीटाची विक्री या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून झाली आहे. याच काळात मागील वर्षी ९ लाख ७५ हजार तिकीटांची विक्री झाली होती म्हणजेच  मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे३ लाखाने जास्त आहे. सध्या या ऑनलाईन आरक्षण प्रणालीव्दारे दररोज १० हजार तिकीटे काढली जात आहेत. प्रवाशांना  घरबसल्या एसटीचे तिकीट उपलब्ध करुन देण्याच्या उददेशाने एसटीने आपल्या npublic.msrtcors.com अधिक़ृत संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे. तसेच मोबाईलवर MSRTC Bus Reservation ॲपच्या माध्यमातून देखिल प्रवाशांना तिकीट काढता येते. या दोन्ही पध्दतीव्दारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये १ जानेवारी, २०२४ पासून अमुलाग्र बदल करुन त्या अदयावत करण्यात आल्या. परिणामी त्यातील अनेक दोषांचे निर्मुलन झाल्याने सदर ऑनलाईन आरक्षण प्रणाली प्रवाशांना वापरण्यास अत्यंत  सोपी व सुलभ झाली आहे. तसेच या दोन्ही प्रणालीव्दारे  प्रवाशांना अमृत जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतीचे ‍ देखिल आगाऊ आरक्षण मिळु शकते. त्यासाठी महामंडळाने npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच MSRTC Bus Reservation ॲपच्या वापर प्रवाशांनी करावा असे आवाहन केले आहे. तथापी, ऑनलाईन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास ७७३८०८७१०३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. सदर नंबर प्रवाशांना तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी २४ तास सुरु असणार आहे. तसेच ऑनलाईन आरक्षण करताना पैसे भरुन देखिल तिकीटे न येणे (पेमेंट गेट वे संदर्भात) या तक्रारींसाठी ०१२०-४४५६४५६ या दुरध्वनी क्रमांकावर  संपर्क करावा, असे आवाहन अभिजीत भोसले यांनी केले आहे.

उल्हासनगर महानगरपालिका अधिकाऱ्याच्या कन्येची 95 टक्क्यांना गवसणी

उल्हासनगर : मनिष हिवरे हे उल्हासनगर महानगरपालिकेत तीन महत्वाच्या पदावर अधिकारी असून त्यांची एकुलती एक कन्या सौम्या हिवरे हिने 12 वीच्या परीक्षेत 95 टक्के गुणांना गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे 10 वीच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळवणाऱ्या सौम्याने 12 वितही 95 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. सहायक आयुक्त प्रभाग समिती 2,सहायक आयुक्त सामान्य प्रशासन आणि सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी या तीन पदाचा पदभार मनिष हिवरे हाताळत आहेत.त्यांची कन्या सौम्या हिने 10 वि मध्ये 97 टक्के गुण मिळवून माटुंग्यातील पोद्दार महाविद्यालयात कॉमर्स शाखेत प्रवेश घेतला आहे मनिष हिवरे यांची पत्नी व सौम्याची आई प्रज्ञा हिवरे ह्या डबल ग्रॅज्युएट असून सौम्याच्या अभ्यासाची जबाबदारी त्या लिलया पार पाडतात.कॉलेज,क्लास आणि आई कडून घेण्यात येणाऱ्या सरावाचे चीज सौम्याने 95 टक्के गुण मिळवून करून दाखवले आहे. सौम्या ही सी.ए करणार असून पुढे ती एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहे.आयुक्त अजीज शेख,अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर,उपआयुक्त किशोर गवस,डॉ.सुभाष जाधव,नोडल अधिकारी गणेश शिंपी,सर्व विभाग प्रमुखांनी सौम्या हिवरे हिचे अभिनंदन केले आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनी अरुणाताई गडकरी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून अरुणाताईंची तब्येत बरी नसल्याचे समजल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजय ओक यांच्याकडून त्यांनी त्यांच्या तब्येत आणि सुरू असलेले औषधोपचार यांच्याबाबत माहिती घेतली. तसेच अरुणाताईंवर शक्य ते सारे उपचार करावेत आणि त्या लवकरात लवकर पूर्ण बऱ्या होतील यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती डॉक्टराना केली.

बाष्पीभवनामुळे ठाणे जिल्ह्यातील धरणांच्या पातळीत घट

पाऊस उंबरठ्यावर असल्याने पाणी कपातीची शक्यता नाही कल्याण : मागील काही दिवसांपासून उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. मुंबई, ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचे अधिक प्रमाणात बाष्पीभवन होऊन, धरणाच्या पातळींमध्ये घट होत आहे. ठाणे, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्यात आता कपात केली जाते की काय या विचाराने नागरिक चिंतातूर असताना जलसंपदा विभागाने अशाप्रकारची कोणतीही कपात करण्याचा निर्णय नाही, असे स्पष्ट केले आहे. एप्रिल ते मे महिन्यात उष्णता वाढली की त्याचा परिणाम धरणांतील पाणी साठ्यावर सर्वाधिक होतो. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन धरणातील पाण्याच्या पातळीत घट होत जात होते. त्याचा परिणाम मुंबई, ठाणे शहर परिसराला करण्यात येणाऱ्या दैनंदिन पाणी पुरवठ्यावर होतो. मागील पाच ते सहा वर्षापूर्वी जून, जुलै सरला तरी पावसाने ओढ दिल्याने धरण साठा तळाला गेला होता. नागरिकांना दैनंदिन पाणी पुरवठा कसा करायचा असा प्रश्न शासनासमोर निर्माण झाला होता. त्यानंतर शासनाने दरवर्षी दिवाळीनंतर पाऊस पडेपर्यंत आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. यामुळे जून अखेरपर्यंत पुरेसा पाणी साठा पिण्यासाठी उपलब्ध होत होता. गेल्या दोन ते तीन वर्षापासून ठाणे जिल्ह्यातील भातसा, वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, बारवी या धरणांमध्ये ऑगस्ट, सप्टेंंबरमध्ये १४ लाख ५० हजार दशलक्ष लिटर पाणी साठा पावसाच्या माध्यमातून जमा होतो. गेल्या दोन महिन्यापासून तापमान ४० अंशाच्या पुढे जात आहे. उष्णतामानामुळे धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन अधिक प्रमाणात होते. मुंबई, ठाणे शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्यात कपात केली जाते की काय अशी चिंता नागरिकांमध्ये आहे. जलसंपदा विभागाने अशाप्रकारची कपात होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाणी साठा ४० टक्क्यांवर मुंबईला दैनंदिन सुमारे साडेतीन हजार तर बारवी धरणातून दैनंदिन सुमारे अकराशेहून अधिक दशलक्ष लिटर पाणी पुरवठा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर निवासी क्षेत्र, औद्योगिक विभागाला केला जातो. आता हा धरणांचा पाणी साठा सुमारे ३५ ते ४० टक्क्यांवर आला आहे. मागील दोन ते तीन वर्ष समाधानकारक पाऊस पडून ठाणे जिल्ह्यातील धरणे ऑगस्ट, सप्टेंंबरपर्यंत शहरांना आठ महिने दैनंदिन पुरेसा पाणी पुरवठा करतील अशा प्रमाणात भरतात. यापूर्वीसारखी पाणी कपातीची वेळ शासनावर येत नाही. भातसा धरणाची पाणी साठवण क्षमंता ३२४ दशलक्ष घनमीटर, तानसा ४८ दशलक्ष घनमीटर, मोडकसागर २६ दशलक्ष घनमीटर, बारवी १२१ दशलक्ष घनमीटर, मध्य वैतरणा २२ दशलक्ष घनमीटर आहे. या धरणांमध्ये सद्य परिस्थितीत सुमारे ३५ ते ४० टक्के पाणी साठा आहे. हा साठा पाऊस पडेपर्यंत पुरेसा असल्याचा दावा जलसंपदा, लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांंकडून करण्यात आला आहे.

दिवा येथील ठाणे पालिकेच्या कचराभूमीवर बेकायदा चाळी

डोंबिवली –दिवा शहराजवळील ठाणे महानगरपालिकेच्या कचराभूमीवर कचऱ्याचे सपाटीकरण करून भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारण्याचा जोरदार धंदा उघडला आहे. या कचराभूमीवर जागा हडप करण्यासाठी भूमाफिया हिरव्या जाळ्या लावून, पत्रे लावून कचराभूमीवरील भौगोलिक…

ठाण्यात प्रथमच गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन,

ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने १० हजार प्रतिनिधी येणार, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती अनिल ठाणेकर ठाणे : गृहनिर्माण संस्थांच्या पुर्नविकासात विविध समस्या व अडचणीबाबत चर्चा तसेच, मार्गदर्शन करण्यासाठी ७ जून ते ९ जुन या कालावधीत ठाण्यातील कोकणी पाडा, उपवन तलाव येथील मैदानात भव्य वातानुकुलीत मंडपात “गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन” व प्रदर्शन आयोजित करण्यात रोजी आले आहे.सुमारे आठ ते १० हजार सहकारी गृहनिर्माण संस्थाचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत तसेच अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित राहतील, अशी माहिती ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे हे ठाणे जिल्हयातील पहिलेच महाअधिवेशन असुन सुमारे आठ ते १० हजार सहकारी गृहनिर्माण संस्थाचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी ७ जून रोजी उदघाटन सोहळा, शनिवारी ८ जून रोजी महाअधिवेशन आणि ९ जून रोजी प्रदर्शन व सायंकाळी समारोप होईल..कार्यक्रमासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध असुन उपस्थितांच्या अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली असुन यावेळी गृहनिर्माण सोसायट्यांकरीता लागणारे किट दिले जाणार आहे. ठाण्यातील उपवन येथे प्रथमच होत असलेल्या या भव्य अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, गटनेते प्रविण दरेकर, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, सहकार आयुक्त आदीसह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. या अधिवेशनात गृहनिर्माण संस्थांचा पुर्नविकास, त्याचबरोबर त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणांनी रखडलेले पुर्नविकास प्रकल्प, स्वयंपुर्ण विकासाच्या समस्या व स्वयंपूर्ण विकासासाठी अर्थसाह्य, वारंवार खोट्या तक्रारी करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी, गृहनिर्माण संस्थांच्या सहकार कायद्याबाबत सुधारणा तसेच, आवश्यक ते बदल या बरोबरच गृहनिर्माण संस्थांच्या वेगवेगळ्या समस्या तसेच अडचणी आदी विषयांवर मार्गदर्शन करून त्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा देखील केला जाणार आहे.तसेच,या अधिवेशनात यासंदर्भातील वेगवेगळे ठराव देखील पारित केले जाणार आहेत. दरम्यान, महाअधिवेशनात आयोजित प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण संस्थासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स, विकासक,अर्थसाह्य करणाऱ्या संस्था त्याचबरोबर रेन हॉर्वेस्टींग व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचे स्टॉल्स असणार आहेत. तेव्हा, ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शविण्यासाठी नोंदणी करावी,अथवा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन सीताराम राणे यांनी केले आहे. चौकट सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पहिल्याच महाअधिवेशनात गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार कायदा, पुनर्विकासबद्दल व स्वयंपुनर्विकास संबंधित समस्या या विषयावर ठराव मांडण्यात येणार आहेत. त्यासाठी https://bit.ly/thanehousingmaha adhiveshan2024 या लिंकवर ३० मे, २०२४ पूर्वी आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. असे आवाहन सीताराम राणे यांनी केले आहे.

मंगळवारी महाराष्ट्र बोर्डाचा १२ वी चा निकाल जाहीर झाला या निकालांमध्ये मुलींनी पुन्हा बाजी मारली आहे. ठाणे येथे विद्यार्थी निकालानंतर एकमेकांना पेढे भरवताना दिसत आहे. (फोटो प्रफुल गांगुर्डे)

मतदार नोंदणीसाठी विशेष मतदार नोंदणी मोहीम – संजय केळकर

अनिल ठाणेकर ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे मतदाना दिवशी उघड झाल्यानंतर प्रशासना विरोधात सर्वच स्तरातुन टिकेची झोड उठत आहे.या पार्श्वभूमीवर ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ‘नवमतदार नोंदणी’ तसेच मतदार ओळखपत्र दुरुस्ती मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी 022 – 25333850 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आ. संजय केळकर यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पार पडलेल्या मतदानात निवडणुक यंत्रणेचा ढिसाळ कारभार समोर आला होता.  मतदार यादीतुन नावे वगळण्यात आल्याने अनेक जुन्या जाणत्या मतदारांना मतदानापासुन वंचित राहावे लागले होते. ही बाब गंभीरतेने घेत आ. संजय केळकर यांच्या पुढाकाराने सचिन शिनगारे यांनी मतदार नोंदणी व दुरुस्ती मोहिम सुरु केली आहे. मतदार यादीमध्ये नाव नोंदणी आणि मतदार ओळखपत्रामध्ये दुरुस्ती करण्याकरिता, तसेच, ज्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असतील अशांसाठी विशेष मोहिम सुरु केली आहे.त्यानुसार, ज्यांना मतदार नोंदणी करावयाची आहे, त्यांनी स्वतःचा फोटो,आधारकार्ड, वास्तव्याचा पुरावा आदी आवश्यक स्वयंसांक्षाकित कागदपत्रांसह जनसेवा कार्यालय, जय भवानी नगर, मराठी शाळे मागे, माजिवडा ठाणे प. 400601.अथवा श्रमसाफल्य, वीर सावरकर मार्ग, तीन पेट्रोल पंप जवळ, आराम बाग समोर, ठाणे प. 400602. या पत्यावर तसेच  022 – 25333850 या व सचिन शिनगारे यांना या  98927 66111 क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन आ. संजय केळकर यांनी केले आहे.

शिवसेना कुणाची ….?

लोकसभा निवडणूकीच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणूकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब वांद्रे येथे मतदान केले. आणि ज्यांच्यामुळे ठाकरे माजी मुख्यमंत्री बनले त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सहकुटुंब…