ठाणे शहरात १० टक्के पाणी कपात लागू
ठाणे : मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने, हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात लागू झाल्याने मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणाऱ्या ठाणे शहरातील काही भागातही, ०५ जूनपासून १० टक्के पाणी कपात लागू झाली होती. ठाणे महापालिका क्षेत्रात मुंबई महापालिकेच्या स्रोतांतून ८५ एमएलडी पाणी मिळते. या पाणी साठ्यातून महानगरपालिका हद्दीतील नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेव वाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर १, किसन नगर नं १, किसन नगर नं २, शिवाजी नगर, पडवळ नगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, करवालो नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजुवाडी, जिजामाता नगर, बाळकुम पाडा नं १, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, मानपाडा (नळपाडा), कोपरी धोबीघाट, गावदेवी (लुईसवाडी) जलकुंभ, टेकडी बंगला जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंद नगर, गांधी नगर, कोपरी कन्हैया नगर या परिसरात पाणी पुरवठा केला जातो. याच भागात आता १० टक्के पाणी कपात लागू झाली आहे. या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि त्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
विकलांगाच्या बचावासाठी गेलेल्या इसमावर प्राणघातक हल्ला
भर रस्त्यात गुंडागर्दी उल्हासनगर : विकलांग व्यक्तीला एक स्थानिक गुंड मारहाण करीत असताना त्याच्या बचावासाठी गेलेल्या इसमाला सदर गुंडाने बेदम मारहाण केली.यावेळी आरोपीने आरडाओरड करून रस्त्यात दहशत माजवली त्यामुळे घाबरून दुकानदारांनी दुकाने बंद केली होती. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या गुंडाच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उल्हासनगर -3 येथील कल्याण – कर्जत महामार्गावर असलेल्या फालवर लाईन परिसरात शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास संजय गजानन जाधव ( 42 ) हा व्यक्ती जेवणाचे पार्सल घेण्यासाठी आलेला होता. यावेळी ताडी माडी केंद्र जवळ यश जजवंशी उर्फ गोल्या हा गुंड प्रवृत्तीचा इसम एका विकलांग व्यक्तीला मारहाण करीत होतो. हा प्रकार बघितल्यानंतर संजय जाधव विकलांगाच्या मदतीसाठी मोटरसायकल वरून खाली उतरला आणि त्याने मध्यस्थी करून विकलांग व्यक्तीला कशाला मारहाण करतोस असे बोलून यश याला बाजूला केले. यानंतर संजय जाधव मोटरसायकलने जात असताना काही अंतरावरच अशोक अनिल थिएटर जवळ यश याने त्याची मोटारसायकल थांबवली आणि शिवीगाळ करून हातातील दगडाने संजयच्या नाकातोंडावर दगडाने प्रहार केला यामुळे संजयच्या नाका तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि त्याचा एक दात पडला. दरम्यान हा प्रकार होत असतांना यश हा भर रस्त्यावर आरडाओरड करून मी इथला भाई आहे कोणी मध्ये येऊ नका असे म्हणून तेथे दहशत माजवली, यामुळे घाबरून आजूबाजूच्या दुकानदारांनी दुकाने बंद केली तर फेरीवाले देखील घाबरून पळून गेले. या प्रकरणी फिर्यादी संजय जाधव यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी आरोपी यश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय आव्हाड हे करीत आहेत.
महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
ठाणे : महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अव्वल कारकून संदीप पवार व इतर कर्मचारी उपस्थित होते.
नितीन कंपनी पूलाखालील उद्यान आता कचराभूमी
चालण्यासाठी उद्यानात येणारे नागरिक हैराण ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी पुलाखाली बेकायदा वाहने उभी राहू नये. तसेच नागरिकांना चालणे, व्यायामासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी सुमारे सात वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेने नितीन कंपनी ते कॅडबरी जंक्शन पर्यंत उद्यान उभारले आहे. या उद्यानामुळे परिसरातील जेष्ठ नागरिक, क्रीडापटू येत असत. परंतु महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आता हे उद्यान ‘डम्पिंग’चा भाग झाल्याचे चित्र आहे. मार्गरोधक, बंद पडलेली सिग्नल यंत्रणा, कारवाई केलेले फलक अशा विविध वस्तू येथे साठविल्या जात आहे. भंगार वाहने, महापालिकेची वाहने देखील येथेच उभी असतात. त्यामुळे एकेकाळी हिरवाईने नटलेला हा परिसर आता कचराभूमी ठरू लागल्याचे चित्र आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी ते कॅडबरी कंपनी उड्डाणपूलाखाली पूर्वी अनधिकृतरित्या शेकडो दुचाकी, कार, अवजड वाहने उभी करण्यात येत होती. तसेच या वाहनांच्या मागे गर्दुल्ले दारू किंवा अमली पदार्थांची नशा करत होते. त्यामुळे परिसराची रया निघून गेली होती. तसेच महिला सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला होता. हा प्रकार रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने २०१७ मध्ये ‘पीपीपी’ तत्त्वावर या भागाचा विकास करण्यास सुरुवात केली होती. महापालिकेने या पूलाखाली सायकल ट्रॅक, चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य, दोन्ही बाजूंनी रोपांची हिरवळ अशा सुविधा निर्माण केल्या होत्या. त्यामुळे या परिसराचा अक्षरश: कायापालट झाला होता. पाचपाखाडी, नितीन कंपनी, कॅडबरी, खोपट भागात वास्तव्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी विरंगुळ्यासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली होती. येथे जवळपास कुठेही उद्यान अथवा मोठी बाग नव्हती. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात होते. उड्डाण पुलाच्या प्रत्येक खांबावर निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाविषयी सुविचार आणि घोषवाक्ये लिहिलेली होती. रात्रीच्या वेळी विविध रंगांची रोषणाई केली जात होती. त्यामुळे या रंगातून हा परिसर उजळून निघत होता. परंतु महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या उद्यानाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. पुलाखाली महापालिकेने बिघाड झालेल्या सिग्नल यंत्रणा ठेवल्या आहेत. उद्यानाखालील सायकल ट्रॅक देखील तोडण्यात आले आहे. उद्यानाखाली काही पत्र्यांचे निवारे बांधण्यात आले आहे. त्यामुळे उद्यानात चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची अडवणूक होत आहे. तसेच महापालिकेने कारवाई केलेल्या जाहिरातींचे फलक, प्लास्टिकचे तुटलेल्या अवस्थेतील मार्गावरोधक, भंगात दुचाकी आणि मोटारी ठेवल्या आहेत. लाकडी बांबूचा खच पडलेला आहे. काही उद्योग देखील या उद्यानात सुरू झाले आहे. जाहिरात फलकांना लावले जाणारे लोखंडी खांब येथे जोडले जात आहेत. त्यामुळे उद्यानाचा वापर खासगी कंपन्यांकडूनही बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे चित्र आहे. या उद्यानाची अवस्था वाईट झाल्याने चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उद्यानाचे बकालीकरण रोखा अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. याबाबत ठाणे महापालिकेचे वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार जाधव यांना संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेच्या छोट्या रोपट्याचा आता वटवृक्ष – श्रीकृष्ण वाडेकर
अनिल ठाणेकर ठाणे : बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेच्या छोट्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे.सहकारी संस्थांमध्ये काम करताना कार्यकर्त्यांनी काळजी घेतली पाहिजे. चुकीचे काम करता कामा नये. आम्ही नेहमी चांगले मार्गदर्शन करतो. त्याचप्रमाणे आर्थिक साक्षरतेचे वर्ग घेतो. काय चुकलं तर आम्हाला सांगत जा, असे हिमतीने सांगणारे संचालक आपल्या संस्थेमध्ये आहेत. याचा अर्थ आपला कारभार चांगला चालला आहे. याचा मला निश्चित अभिमान वाटतो, असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थाचे वरिष्ठ निबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात २० हजार सहकारी पतसंस्था असून ९० हजार कोटीच्या ठेवी आहेत. या संस्थांमधून सभासदांनी २२ हजार कोटी कर्ज घेतले आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी असून त्यापैकी ३ कोटी या संस्थांचे सभासद आहेत. याचाच अर्थ २५ टक्के सभासद सहकार चळवळीशी जोडलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळ फार मोठी आहे. बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेसारख्या अनेक पतसंस्थांचे कार्य खूप चांगले आहे. असे स्पष्ट उद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थाचे वरिष्ठ निबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी काढले. बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई या संस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा ६ जून २०२४ रोजी संस्थेचे अध्यक्ष आनंद गावडे यांच्या अध्यक्षतेखाली वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाप्रसंगी श्रीकृष्ण वाडेकर यांच्या शुभहस्ते रौप्य महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यात स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व कुलस्वामी को ऑप क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष शंकरशेठ पिंगळे, साईप्रेरणा को. ऑप. क्रेडीट सोसायटीचे संस्थापकीय अध्यक्ष देवदास डोंगरे, बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आनंद गावडे, संचालक व स्मरणिकेचे संपादक वसंत गावडे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. याप्रसंगी विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आनंद गावडे, उपाध्यक्ष भगवान शेटे, संचालक सुरेश गावडे, बाबुरावशेठ डोंगरे, वसंत गावडे, मनोहरशेठ डोंगरे, दामाजी डोंगरे, रमेश धुमाळ, शरद डोंगरे, नरेंद्र तांबोळी, जगन्नाथ दाते, उमेश डोंगरे, दैवत डोंगरे, बाळासाहेब डोंगरे, प्रदिप नवले, संचालिका सौ. निता गावडे, सौ. सुनिताताई डोंगरे, संचालक खंडूशेठ आहेर, संचालक हर्षल आहेर व सरव्यवस्थापक संजय घोगरे व संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला मुंबई, नवी मुंबई व ठाणे विभागातील हजारोंच्या संख्येने सभासद उपस्थित होते. संस्थेचे सभासदानी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार रवि आमले, उद्योजक गणपत कोरडे, हनुमंत रांजणे, लावणी सम्राट आशीमिक कामठे अशा भूमिपुत्रांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला. सदर कार्यक्रमानिमित्त “कमलआनंद कलामंच प्रस्तुत वारसा माझ्या महाराष्ट्राचा” “बालगंधर्व पुरस्कार विजेते, नवी मुंबई लावणीसम्राट आशीमिक आनंद कामठे यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा बहुसंख्य सभासदांनी उपस्थित राहून आनंद घेतला. बल्लाळेश्वर पतसंस्थेचे २४ हजार सभासद आहेत. संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात रु. १५१ कोटी खेळत्या भांडवलाचा टप्पा पार केला आहे. तर ३१ मार्च २०२४ अखेर संस्थेने रु. २२१ कोटींचा संमिश्र व्यवसाय पूर्ण केला आहे. बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेच्या आज १४ शाखा असून, संस्था मुंबई, नवी मुंबई व पुणे ग्रामीण या तीन विभागनिहाय कार्यरत आहेत. संस्थेच्या सर्व शाखा कोअर बँकिंग संगणक प्रणालीमुळे एकमेकांशी ऑनलाईन पद्धतीने जोडल्या गेल्या आहेत. बल्लाळेश्वर पतसंस्थेचे सुविद्य संचालक मंडळ, कार्यतत्पर व कुशल कर्मचारी वर्ग व दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांनी एकत्रितपणे केलेल्या कार्यामुळे संस्थेच्या क्वालिटी बैंकिंगला शासकीय लेखापरीक्षकांनी सातत्याने संस्थेस अ वर्ग प्रदान केलेला आहे. बल्लाळेश्वर पतसंस्थेच्या माध्यमातून जवळपास १०० कुटुंबाना रोजगार उपलब्ध झालेला आहे. बल्लाळेश्वर पतसंस्थेने फक्त आर्थीक व्यवहार न पाहता सामाजिक बांधिलकी देखील जोपासली आहे. संस्था सभासद व त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि समाजासाठी वेगवेगळी उपक्रम सदैव राबवीत असते. संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप, वह्या वाटप, शालेय बंग वाटप असे अनेक उपक्रम संस्था सदैव राबवित असते. तसेच वृद्धाश्रमात राहणाऱ्या वयस्कर वृद्धांसाठी कायमस्वरूपी गरम पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सौर पॅनलची व्यवस्था संस्थेने करून दिली आहे तसेच शिक्षण संस्थेस संगणक वाटप देखील केलेले आहे. प्रत्येक वर्षी उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते. बल्लाळेश्वर हि पतसंस्था नाही तर हे एक बल्लाळेश्वर कुटुंब असल्याची जाणीव सभासदांमध्ये निर्माण झाली आहे. संस्थेने वैद्यकीय शिक्षण स्मृती ठेव योजना व सभासद कल्याणनिधी योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत अनेक सभासद यांच्या वैद्यकीय उपचारासाठी लाखो रुपयांची मदत संस्थेने केलेली आहे. महाराष्ट्रातील उत्कृष्ट पतसंस्थांना सहकार क्षेत्रातील मानला जाणारा बैंको पतसंस्था पुरस्कार दरवर्षी जाहीर केला जातो. रौप्य महोत्सवी वर्षात संस्थेच्या चांगल्या कार्यामुळे सन २०२३ चा बँको पुरस्कार बल्लाळेश्वर पतसंस्थेला प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री श्री. दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या शुभहस्ते संस्थेला आदर्श सहकारी पतसंस्था पुरस्कार २०२३ प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. शेवटी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आनंद सबाजी गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुढील काळात जास्तीत जास्त शाखा विस्तार करणार असून उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे व सन्माननीय सभासदांचे आभार व्यक्त केले.
आदिवासी क्रांती सेनेच्या भिवंडी, पालघरमध्ये दहा शाखांचे अनावरण
ठाणे : आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी तरूणांनी संघटनेत प्रवेश केला असून भिवंडी आणि पालघर तालुक्यात सुमारे दहा शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी भिवंडी, वाडा आणि पालघर तालुक्यामध्ये आदिवासी क्रांती सेनेच्या वतीने मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी वाडा येथे आयोजित मेळाव्यात अनिल भांगले यांच्या नेतृत्वाखाली वाडा तालुक्यातील अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी क्रांतीसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळेस दयानंद हरळ यांची आदिवासी क्रांति सेना पालघर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तसेच वैभव सुरेश भोमटे यांची आदिवासी क्रांतिसेना पालघर जिल्हा उपाध्यक्षपदी; संतोष जांजर यांची पालघर जिल्हा आदिवासी क्रांती सेना पालघर जिल्हा सचिव पदी ; प्रकाशजी हरळ यांची आदिवासी क्रांती सेना पालघर जिल्हा संघटक पदी; अनंता सरडे आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी अध्यक्ष पदी; संदीप दळवी आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी उपाध्यक्ष पदी; संजय मोरगा आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी संघटक पदी; जगन मोरे यांची आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी सचिव पदी; संदेश वाघ यांची आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी उपसचिव पदी; सुनील हरल यांची आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी संपर्क प्रमुख पदी; भिवंडी तालुकाध्यक्ष पदी संतोष पाडेकर; भिवंडी सचिवपदी बबलू पाटील, उपसचिव पदी गणेश हडल , दीपक धोदडे तर संघटनेच्या सल्लागार पदी सुनील भांगरे यांची निवड करण्यात आली.
निरंजन डावखरे यांना पाठिंबा
स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघाचा ठाणे : महाराष्ट्र राज्य स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघाने भाजपाचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या २०१८ च्या निवडणुकीप्रमाणेच स्वाभिमान शिक्षक संघाने या निवडणुकीतही निरंजन डावखरे यांना पाठिंबा दिला. भाजपाचे मुरबाड येथील आमदार व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार निरंजन डावखरे यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. तसेच कोकणातील प्रत्येक शिक्षक मतदारापर्यंत पोचून भाजपाला मतदानाचे आवाहन करणार असल्याची ग्वाही दिली. या वेळी संघटनेचे राज्याध्यक्ष यादव पवार, राज्य संपर्क प्रमुख राणू बनसोडे, ठाणे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटोळे, जिल्हा कोषाध्यक्ष विनायक जाधव, तालुका अध्यक्ष नारायण गोल्हे, भरत पांढरे, वसंत घावट, दिपक धूमाळ, रवींद्र घोडविंदे आदी उपस्थित होते. कोकणात डिजिटल शाळा, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, शिक्षकांचे प्रश्न, पेन्शन योजना मंजुरी आदींबाबत आमदार डावखरे यांच्याकडून केला जाणारा पाठपुरावा स्तुत्य आहे, अशा शब्दांत आमदार किसन कथोरे यांनी कौतुक केले. तसेच आमदार डावखरे यांना बहुमताने विजय मिळेल, असा विश्वास श्री. कथोरे यांनी व्यक्त केला.
कोकण पदवीधर मतदार संघातून गोकुळ पाटील रिंगणात
शिक्षकांचा पाठींबा ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघातून गोकुळ रामजी पाटील यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नसलेले सर्वसामान्य कुटुंबातील शिक्षकांच्या समस्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ रामजी पाटील यांना शिक्षकांच्या पाठिंब्यावर कोकण पदवीधर मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.पदवीधर आमदार देखील शिक्षकच असला पाहिजे असे शिक्षकांचे म्हणणे आहे म्हणून त्यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे आपण उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे गोकुळ पाटील म्हणाले. गोकुळ पाटील सर गेल्या 29 वर्षापासून सर्व शिक्षक शिक्षकेतर संस्थापक यांच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी माजी आमदार रामनाथ मोते सरांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर एल आर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. सातत्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी गोकुळ पाटील सर अग्रेसर असतात त्यामुळे शिक्षकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे श्री पाटील यांनी कोकण पदवीधर मतदार उमेदवारी संघातून अर्ज भरला आहे.यामुळे कोकण पदवीधर मतदार संघात गोकुळ पाटील यांची उमेदवारी आव्हान ठरण्याचे चिन्ह आहे.
