Category: ठाणे

Thane news

मोदींच्या सभेसाठी रणरणत्या उन्हात कार्यकर्ते हजर

भिवंडी, कल्याण ग्रामीण भागातून सर्वाधिक गर्दी कल्याण : रणरणते ऊन, घामाच्या धारांनी हैराण झालेले असताना भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे कार्यकर्ते कल्याण मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी उपस्थित झाले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये महिला, पुरूषांचा सर्वाधिक सहभाग आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे गर्दी असुनही कोठेही गोंधळ होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. मोदी यांच्या सभेसाठी सुमारे एक लाख खुर्च्या सभा मंडपात लावण्यात आल्या आहेत. या सर्व खुर्च्या केवळ महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे भरणार नसल्याने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण भागातील सामान्य महिला, पुरूष नागरिकांना ‘बांधिव’ कार्यकर्ते म्हणून विशेष बस उपलब्ध करून सभास्थळी आणले आहे. या नागरिकांच्या गळ्यात भाजप, शिवसेनेचे झेंडे, गमछे दिसून येत आहेत. मोदी यांची सभा दुपारी दोन वाजता असल्याचा निरोप असल्याने सकाळी १० वाजल्यापासून शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण, शहरी भागात कार्यकर्त्यांनी गावच्या नाक्यावर जमा होण्यास सांगितले होते. ही सभा संध्याकाळी पाच वाजता असल्याचे समजल्यावर मात्र कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. रणरणत्या उन्हात प्रवास करून आलेल्या कार्यकर्त्यांना आच्छादित सभा मंडपामुळे दिलासा मिळत आहे. मंडपात सर्वत्र पंखे, वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची कमतरता पडणार नाही अशा पध्दतीने पाण्याच्या बाटल्या वाटप केल्या जात आहेत. उत्साही कार्यकर्ते सभा मंडपात मोदी, भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपील पाटील, कल्याणचे लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देत आहेत. काही कार्यकर्ते वाजतगाजत सभास्थळी येत आहेत. भगव्या झेंडे, फलकांमुळे सभा स्थळ परिसर भगवा झाला आहे. सभा मंडपात जाण्यासाठी अतिअति महत्वाच्या व्यक्ति, अति महत्वाच्या व्यक्ति, कार्यकर्ते यांच्यासाठी तीन प्रवेशव्दारे आहेत. कल्याण शहर परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. जागोजागी पोलीस जथ्थ्याने उभे आहेत. संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. सुरक्षेचा त्रास नको म्हणून कल्याणमधील बहुतांशी रिक्षा चालकांनी घरी जाणे पसंत केले आहे. पंतप्रधान मोदी येणाऱ्या मार्गाच्या दुतर्फा रस्तारोधक आणि या भागातील सर्व दुकाने सकाळपासून बंद ठेवण्यात आली आहेत. पक्की दुकाने, बांधकामे यांच्यावर हिरव्या जाळ्या लावून ती बंदिस्त करण्यात आली आहेत. मोदींच्या मार्गाच्या दुतर्फा एकही माणूस फिरकणार नाही असे नियोजन करण्यात आले आहे. विशेष सुरक्षा पथकाचा सभा मंंडपाच्या बाहेर चार ते पाच स्तरीय वेढा आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयेाने वितरित केलेल्या प्रवेश पासाशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तिला अति महत्वाच्या बैठक व्यवस्थेत प्रवेश दिला जात नाही. सभा मंडपाचा परिसराचा ५०० मीटरचा परिसर, रस्ते बांबूचे अडथळे, रस्ता रोधक लावून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सभा स्थळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अर्ध्या वाटेत रिक्षा, वाहन सोडून मग घरी पायी यावे लागत आहे. भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघातील एकूण १२ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी सभास्थळी दाखल झाले आहेत. गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत महायुतीच्या खासदारांनी विकास कामे, नागरिकांच्या मनातील कामे करून दाखवली असती तर अशाप्रकारे मोदींच्या सभेच्या आयोजनासाठी धडपड करावी लागली नसती, असाही सूर सभा ठिकाणी आलेल्या काही कार्यकर्त्यांकडून काढला जात आहे. सेल्फी पॉईंट गर्दी सभा मंडपाच्या बाजूला राम मंदिराची प्रतिकृती, तसेच पंतप्रधान मोदी यांची उभी प्रतिमा लावण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी जाऊन कार्यकर्ते राम मंदिराच्या प्रतिकृती सोबत, आणि मोदी यांच्या प्रतिमेसोबत स्वतःचे मोबाईल मधून छायाचित्र काढून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

गृहमतदानास 85 वर्षावरील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे : ठाणे जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात 20 मे 2024 रोजी  लोकसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी संपूर्ण ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतदानापासून एकही मतदार वंचित राहणार नाही याची खबरदारी देखील प्रशासनाने घेतली आहे. 85 वरील जे नागरिक व दिव्यांग व्यक्ती मतदान केंद्रापर्यत पोहचू शकत नाही अशांसाठी आज 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या गृहमतदानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 105 मतदारांपैकी 96 मतदारांनी मतदानाचा आज गृहमतदान केले. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या  सहाय्यक निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गृहमतदानासाठी विविध भागातील नागरिकांकडे जाण्यासाठी एकूण 11 पथके तयार करण्यात आली होती. एका पथकात मतदान अधिकाऱी, मदतनीस कर्मचारी, पोलीस कर्मचारी व शिपाई  व राजकीय उमेदवारांचे प्रतिनिधीं यांचा समावेश करण्यात आला होता. 11 पथके 148 विधानसभा मतदारसंघातील विविध भागातून गृहमतदानासाठी नोंदणी केलेल्या मतदारांच्या घरी रवाना करण्यात आली असल्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांनी नमूद केले. 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील विविध भागातील 85 वर्षावरील एकूण 103 तर 2 दिव्यांग अशा एकूण 105 मतदारांनी  गृहमतदानासाठी  निवडणूक विभागाकडे अर्ज भरुन दिले होते. या सर्व मतदारांच्या घरी आज प्रशासनाच्या वतीने पथके पाठविण्यात आली होती. नागरिकांनीही गृहमतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी आम्ही मतदान केले, तुम्हीही मतदान करा असा संदेश नागरिकांना दिला. नोंदणी केलेल्या 105  मतदारांपैकी एकूण 96 जणांनी गृहमतदानाचा अधिकार बजावला. तसेच निवडणूक आयोगाने गृहमतदानाची सोय उपलब्ध करुन दिल्याबद्दल सर्व ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

ब्रेल लिपीतील मतदार चिठ्ठीचे अंध मतदारांना घरोघरी वाटप

ठाणे : लोकसभा निवडणुकीत सर्वच घटकातील नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आज 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 148 विधानसभा मतदारसंघातील अंध मतदारांना ब्रेल लिपीतील मतदार माहिती  चिठ्ठीचे वाटप प्रत्यक्ष अंध मतदारांच्या निवासस्थानी जावून करण्यात आले. २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत, १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रेल लिपीमध्ये मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप करण्यात आले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता जास्तीत जास्त मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.या अंतर्गत ठाणे शहरातील जास्तीत जास्त अंध मतदारांना त्यांचा हक्क बजावण्यात सुलभता व्हावी, यासाठी ब्रेल लिपीमध्ये माहिती दस्तऐवज तसेच चिठ्ठी अंध मतदारांना देण्यात आली. अंध मतदारांना मतदान केंद्रावर मतदान करता यावे यासाठी सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. सुलभ मतदानासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती यावेळी मतदारांना देण्यात आली. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन अंध मतदारांना करण्यात आले. अंध मतदारांच्या सोयीसाठी ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी  मतदारांना प्रत्यक्ष घरी उपलब्ध करुन दिल्याबद्दल  सर्व अंध मतदारांनी भारतीय निवडणूक प्रशासनाचे आभार मानले आहेत.

अत्यावश्यक सेवेतील 691 कर्मचाऱ्यांनी ठाण्यात केले टपाली मतदान

ठाणे : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली. 25 ठाणे लोकसभा क्षेत्रातील अत्यावश्यक क्षेत्रात काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना ‍20 मे 2024 या ‍दिवशी मतदानादिवशी कर्तव्यावर असल्याकारणाने मतदान केंद्रावर जाणे शक्य होणार नाही अशा अत्यावश्यक सेवेतील एकूण 691 अधिकारी कर्मचारी यांनी आज (14 मे) टपाली मतदानाद्वारे मतदानाचा अधिकार बजावला असल्याची माहिती  25 – ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक  निर्णय अधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी दिली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील  “प्रशिक्षण केंद्र,जिल्हा विकास उद्योजक केंद्र, कोर्ट नाका, ठाणे प 400601 येथे  सकाळी 9 ते सायं. 5  या वेळेत आज टपाली मतदान पार पडले. नोंदणीकृत मतदार- पोलीस दलातील अधिकारी/कर्मचारी,अग्निशमन दल, वैदयकीय सेवेतील कर्मचारी यांच्यापैकी ज्यांनी विहित मुदतीत टपाली मतपत्रिकेसाठी नमुना 12 ड भरुन दिले होते. अत्यावश्यक सेवेतील जे कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर आहेत, त्यांना त्यांच्या परिक्षेत्रात मतदानासाठी जाणे शक्य नाही अशा अधिकारी कर्मचारी यांनी आज टपाली मतदान केले. टपाली मतदानासाठी एकूण 2949 कर्मचाऱ्यांनी नमुना 12 ड भरुन टपाली मतदानासाठी नोंदणी केली होती. आज सायंकाळी 5.00 वाजेपर्यत एकूण 691  कर्मचाऱ्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. दि.14/05/2024, व दि. 16/05/2024  असे दोन दिवस टपाली मतदान सुरू  राहणार असल्याची माहिती 25 – ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक  निर्णय अधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी दिली.

ठाण्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचारांचा धडाका

ठाणे : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्यात आला असून त्यानुसार पुढील तीन दिवस ठाणेलोकसभा मतदारसंघात विविध नेत्यांच्या प्रचार सभा, रॅली ठाण्यात होणार आहे. त्यातही महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची संयुक्त सभा शुक्रवारी होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ठाण्यात प्रथमच या दोनही नेत्यांच्या सभा होणार आहेत. तर महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शनिवारी रोड शो घेण्यात येणार असून त्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. ठाणे लोकसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे हे मागील काही दिवसापासून ठाण्यात तळ ठोकून आहेत. त्यात आता गुरुवारी ठाण्यात सांयकाळी गडकरी रंगायतन शेजारी असलेल्या रस्त्यावर महाविकास आघाडीची सभा घेण्यात येणार आहे. या सभेला उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय तेजस्वी यादव, सुप्रिया सुळे आदींची देखील हजेरी लागणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे हे प्रथमच ठाण्यात सभा घेणार आहेत. त्यामुळे ते काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे गुरुवारी दुपारी २ वाजता भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक विनोद तावडे घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता भाजप पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी तावडे हे ठाण्यात येत असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. दुसरीकडे शनिवारी सांयकाळी पाच वाजेपर्यंतही ठाण्यात प्रचाराचा धुराळा उडणार असल्याचे चित्र आहे. यादिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो किंवा सभा घेण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील दुपारी ३ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे.

सर्व होर्डिंगचे होणार आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट

अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी घेतला होर्डिंगच्या स्थितीचा आढावा अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा शोध घेण्यासाठी करणार तत्काळ सर्वेक्षण ठाणे : मुंबईत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व होर्डिंगचे आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट (स्थैर्यता प्रमाणपत्र) महापालिकेस सादर करण्याचे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, महापालिका क्षेत्रातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी जाहिरात विभागास तत्काळ सर्वेक्षण करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी बुधवारी सकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपायुक्त (जाहिरात विभाग) दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त रंजू पवार, जाहिरात कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ठाणे महापालिका क्षेत्रात होर्डिंग लावण्यासाठी लहान-मोठे असे २९४ स्ट्रक्चर (सांगाडे) आहेत. या सर्व स्ट्रक्चरचे नियमितपणे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते. मात्र, आता त्यांच्या मालकांनी-कंपन्यांनी पूर्णपणे नव्याने, आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट (स्थैर्यता प्रमाणपत्र) महापालिकेस सादर करायचे आहे. त्यासाठी सर्व कंपन्यांना नोटीसाही देण्यात आल्या आहेत. स्टॅबिलिटी सर्टिफिकेट (स्थैर्यता प्रमाणपत्र) सादर न केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, ज्या होर्डिंगचे आकारमान मंजूर मोजमापापेक्षा जास्त आहे. त्यात आठ दिवसात सुधारणा न झाल्यास वाढीव काम महापालिका काढून टाकणार आहे. त्याबद्दल संबंधित कंपनीकडून दंड आकारला जाणार असल्याचेही या बैठकीत रोडे यांनी सांगितले. तसेच, राज्य शासनाने निर्धारित केलेल्या उंचीपेक्षा जास्त उंचीवर फलक लावण्यात आले असल्यास ती उंचीही कमी करण्यात येणार आहे. उंची वाढवण्यात आलेल्या, धोकादायक होर्डिंगचे सर्वेक्षण जाहिरात विभागातर्फे करण्यात येणार आहे. त्याचवेळी, महापालिका क्षेत्रात अनधिकृत होर्डिंग असल्यास त्याचाही शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रात, मध्य रेल्वेच्या हद्दीत आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारित काही होर्डिंग आहेत. त्यांचेही आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेटची प्रत (स्थैर्यता प्रमाणपत्र) महापालिकेस सादर करण्यासंदर्भात दोन्ही यंत्रणांना कळविण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

सफाई कामगारांना घनकचरा विभागात हजर राहण्याचे आदेश

शिपाई, फेरीवाला हटाव पथकात काम करणाऱ्या कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागातील अनेक सफाई कामगार प्रभागांमध्ये फेरीवाला हटाव पथक, अधिकाऱ्यांचे शिपाई, टपाल वाहक म्हणून काम करतात. रस्त्यावर झाडू मारण्यापेक्षा कार्यालयात ऐषआरामात काम करण्यास मिळत असल्याने हे कामगार वर्षानुवर्ष लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने प्रभाग कार्यालये, पालिका मुख्यालयांमध्ये कार्यरत आहेत. अशा सर्व सफाई कामगारांनी तातडीने आपल्या मूळ नियुक्तीच्या घनकचरा विभागात हजर व्हावे, असे आदेश घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी सोमवारी दिले. कल्याण डोंबिवली शहरे कचरा मुक्त करण्याचे अभियान यशस्वी होत आहे. या कामासाठी घनकचरा विभागाला सफाई कामगारांची नितांत आवश्यकता आहे. आता कार्यरत असलेले बहुतांशी सफाई कामगार हे ५० वयाच्या पुढील आहेत. त्यांची क्रयशक्ती कमी झाली आहे. सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले ३५ ते ५० वयोगटातील अनेक सफाई कामगार वर्षानुवर्ष नगरसेवक, आमदार, राजकीय नेते यांच्या आशीर्वादाने कल्याण डोंबिवली पालिकेच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांचे दालन, यापूर्वी महापौर, सभापती यांच्या दालनात शिपाई, प्रभागात फेरीवाला हटाव पथकात वर्णी लावून घेण्यात यशस्वी झाले आहेत. रस्त्यावर काम करण्यासाठी घनकचरा विभागाला सफाई कामगारांची आवश्यकता असताना, ६० हून अधिक सफाई कामगार प्रभागांमध्ये फेरीवाला हटाव पथक, साहाय्यक आयुक्तांचा शिपाई, टपाली, आवक जावक लिपिक म्हणून काम करत आहेत. सफाईचे मूळ काम सोडून त्यांना प्रशासकीय कामात सहभागी होण्याची मुभा दिली कोणी, असे प्रश्न करत काही माजी नगरसेवक, काही जागृत नागरिकांनी यासंदर्भात पालिका आयुक्त, घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन उपायुक्त अतुल पाटील यांनी पालिकेच्या दहा प्रभागांमध्ये जे सफाई कामगार अन्य कामे करत आहेत. त्यांनी तातडीने आपल्या मूळ नियुक्तीच्या घनकचरा विभागात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. सफाई कामगारांची बदली अन्य कोणत्याही विभागात करू नये, असे आयुक्तांचे स्पष्ट आदेश आहेत. सफाई कामगारांचे नियंत्रक म्हणून उपायुक्त घनकचरा हे नियंत्रक अधिकाऱी आहेत. असे असताना प्रभागातील साहाय्यक आयुक्त घनकचरा विभागाची परवानगी न घेता सफाई कामगारांना आपल्या अधिकारात अन्य विभागात बदली करत आहेत, असे उपायुक्त पाटील यांच्या निदर्शनास आले आहे. अशा नियमबाह्य नियुक्त सफाई कामगारांनी तातडीने सफाई कामगार म्हणून घनकचरा विभागात तातडीने हजर व्हावे, असे आदेश उपायुक्त पाटील यांनी दिले आहेत. काही दिवसापूर्वी ह प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील सफाई कामगार दिलीप उर्फ बुवा भंडारी यांनी ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांच्या बरोबर रेल्वे स्थानक भागात मंडप टाकण्यावरून हुज्जत घातल्याने अंगचोर सफाई कामगारांचे प्रकरण उघडकीला आले आहे. घनकचरा विभागातील सफाई कामगारांनी प्रभागात विनामंजुरी इतर विभागात सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाने पदस्थापना घेतल्या असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित साहाय्यक आयुक्तांवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित केली जाईल. सफाई कामगारांनी आपल्या मूळ घनकचरा आस्थापनेत तातडीने हजर व्हावे. -अतुल पाटील, उपायुक्त, घनकचरा विभाग.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलणे कुणालाही शक्य नाही!

विरोधी पक्षांकडून संविधान बदलले जाणार असल्याचे सांगत समाजाची दिशाभूल! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विरोधी पक्षांवर हल्लाबोल कल्याण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलणे कुणालाही शक्य नसून विरोधकांकडून संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवत समाजाची दिशाभूल केली जात असल्याचे म्हणत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ज्या काँग्रेसने संविधान बदलून देशात आणीबाणी लावली, तीच काँग्रेस आज संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवते, हे दुर्दैवी आणि दुटप्पीपणाचे असल्याची टीकाही खासदार शिंदे यांनी केली. कल्याणमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे बोलत होते. कल्याणमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बुद्धभूमी फाउंडेशनने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना खासदार शिंदे यांनी विरोधकांवर हा हल्ला चढवला. याप्रसंगी बोलताना कल्याण पूर्वेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी गेल्या १२ वर्षांपासून होत होती. पण माझ्याकडे ही मागणी आल्यानंतर त्याचा लगेचच पाठपुरावा सुरू केला आणि जागेचे आरक्षण बदलून तिथे फक्त पुतळाच नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. या स्मारकात ग्रंथालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास, त्यांनी केलेला संघर्ष, डिजिटल पुस्तके, इतकेच नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आवाज देखील ऐकता येणार आहे. त्यामुळे हे फक्त स्मारक नव्हे, तर ज्ञानकेंद्र असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. आज विरोधकांकडे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मुद्देच नसून त्यामुळे देशाचे संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवत समाजाची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. मात्र याच काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांचा निवडणुकीत पराभव केला होता, हे आज विसरून चालणार नाही, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने संविधान दिन साजरा करणे सुरू केले, संविधान यात्रा सुरू केली, इतकेच नव्हे, तर नवीन संसद भवनालाही संविधान भवन असे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले. तर राज्य सरकारकडून इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारले जात असून लंडनमधील बाबासाहेबांच्या राहत्या घरातील स्मारकही आपले सरकार उभारत असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्यांच्या आणि माथी भडकावणाऱ्यांच्या बाजूने नव्हे, तर आपल्या माणसाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी समस्त समाजाला केले. कल्याणमध्ये बुद्धभूमी फाउंडेशनकडून तथागत भगवान गौतम बुद्धांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम सुरू असून भविष्यात त्यांच्या काही प्रलंबित विषयांसाठीही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. २०१४, २०१९ मध्ये आपण मला भरभरून प्रेम दिले. आता २०२४ मध्ये पुन्हा एकदा भन्तेजींनी मला आशीर्वाद दिला असून आपणही पाठीशी उभे राहाल याची खात्री असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी बुद्धभूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौतम रत्न महाथेरो, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष देवचंद अंबादे, रिपाइंचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे, शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण पूर्व विधानसभा निरीक्षक वामन म्हात्रे, कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, माजी नगरसेवक निलेश शिंदे यांच्यासह केतन रोकडे, भारत सोनवणे, सुबोध भारत, शेखर केदारे, मिलिंद सपकाळ, प्रशांत भंडारे, अशोक भोसले, संजय राक्षसकर, प्रशांत बनसोडे, राजेंद्र नितनवरे, भूषण यशवंतराव, नुपूर घाडीगावकर, रोहित डुमणे यांच्यासह आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीकांत शिंदेंच्या प्रचार रॅलीत एकनाथ शिंदे होणार सहभागी!

गुरुवारी डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण भागात निघणार रॅली! डोंबिवली : शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाररॅलीत सहभागी होणार आहेत. गुरुवारी १६ मे रोजी डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण भागात ही रॅली निघणार असून यावेळी राज्यातील मंत्री, आमदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. तर दुसरीकडे त्यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे निवडणूक लढवत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा सोपवली आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीत आले होते. यानंतर आता येत्या गुरुवारी, १६ मेला डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे डोंबिवलीत येत आहेत. डोंबिवलीच्या नांदीवली येथील स्वामी समर्थ चौकातून सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या प्रचार रॅलीला सुरुवात होईल. यानंतर डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण असा ४ किमीचे मार्गक्रमण करून आजदे गावात रॅलीचा समारोप होईल, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे. या रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, आमदार, नेते आणि मान्यवर मंडळी सहभागी होणार आहेत. तर महायुतीचे कार्यकर्तेही हजारोंच्या संख्येने रॅलीत सहभागी होणार असल्याची महिती शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे.

ठाण्यातील होर्डिंग्ची होणार झाडाझडती

ठाणे : घाटकोपर येथे जाहिरात होर्डिग्ज कोसळून १४ जणांचा बळी गेल्यानंतर ठाणे शहरातील मोठमोठ्या होर्डिंग्जमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका सतर्क झाली असून शहरातील सर्वच होर्डिंग्जची झाडाझडती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात सर्व होर्डिंग्जमालकांना बुधवारी (ता. १५) होणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले असून त्यानंतर योग्य ती कार्यवाही होणार आहे. ठाणे शहरात प्रवेश केल्यापासून ते अगदी गायमुखपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत सर्वत्र महाकाय होर्डिंग्ज सर्वांचे लक्ष वेधून घेतात. पालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात सुमारे अशी ५२८ होर्डिंग्जचे मनोरे आहेत; मात्र प्रत्येक पावसाळ्यात या होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर येतो. ठाण्यात यापूर्वीही जाहिरात होर्डिंग स्टँड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. २०२१ च्या सप्टेंबरमध्ये मासुंदा तलावसमोरील शिवाजी मैदानाबाहेरचे होर्डींग केसळले होते. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. गेल्यावर्षी ६ मार्चला झालेल्या अवकाळी पावसात कापूरबावडी परिसरातील होर्डिंग कोसळून सहा वाहनांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शहरातील या होर्डिंगसचे कालबद्ध पद्धतीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना गेल्या वर्षी तत्कालीन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या होत्या. तसेच दुर्घटना घडल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सर्व होर्डिंग मालकांनी हे स्ट्रक्चरल ऑडिट सादर केल्याची माहिती पालिकेने दिली; पण तरीही घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर ‘भय इथले संपत नाही’ अशीच परिस्थिती आहे. वास्तविक पालिकेच्या तिजोरीत भर पडावी, यासाठी होर्डिंगच्या मनोऱ्यांना परवानगी देण्यात आली; पण हे होर्डिंग पावसाळ्यात जीवघेणे ठरण्याची भीती बळावली आहे. घोडबंदर पट्ट्यात सर्वाधिक धोका रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भल्या मोठ्या होर्डिंगची सर्वाधिक संख्या घोडबंदर भागात असल्याचे आढळते. ढोकाळी, मानपाडा, कापूरबावडी, गायमुख येथून जाणाऱ्या महामार्गाला लागून असे शेकडो होर्डिंग आहेत. लवकरच ठोस भूमिका घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पालिकेने सर्व होर्डिंग मालकांची बैठक घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिटच्या रिपोर्टसह सर्वांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. धोका किंवा दुर्घटना टाळण्यासाठी कोणते नवीन उपाययोजना करणे आवश्यक आहेत. यासंदर्भात त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली.