Category: ठाणे

Thane news

क्रिकेट खेळताना एकाचा मृत्यू

मिरारोड: येथे क्रिकेट खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  काशिगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खाजगी जागेत कंपनीतर्फे क्रिकेट मॅच आयोजित करण्यात आल्या होत्या. बॉक्स क्रिकेट खेळत असताना कंपनीचे तरुण एकामेकांविरोधात क्रिकेट खेळत होते. त्यावेळी हा तरुण  फलंदाजी करत होता.क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराचा झटका आला व  त्याचा मृत्यू झाला. क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या एका 4२ वर्षीय तरुणाचा खेळताना हृदयविकाराने दुपारी १२ च्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत काशिगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली असून तपास करत आहेत. मयत रामगणेश कृष्णन तेवर (42)हा एका बिल्डर कडे कामाला असून त्या बिल्डर मार्फत कर्मचाऱ्या करता  क्रिकेट स्पर्धा काशिगांव येथील खाजगी जागेत  रविवारी  आयोजित करण्यात आल्या होत्या.

खंडू रांगणेकर स्मृती एकेरी विकेट क्रिकेट स्पर्धा

आकाश सावला अजिंक्य ठाणे : आकाश सावलाने अश्विन माळीचा पराभव करत शतकपूर्ती करणाऱ्या स्पोर्टींग क्लब कमिटी आयोजित खंडू रांगणेकर स्मृती एकेरी विकेट क्रिकेट स्पर्धेचे  विजेतेपद मिळवले. प्रथम फलंदाजी करताना अश्विन माळीने २ षटकात दोन षटकारांच्या सहाय्याने १२ धावा केल्या होत्या. पण या दरम्यान तो तीनवेळा बाद झाल्याने त्याच्या एकूण धावसंख्येतून ९ धावा वजा करण्यात आल्या. विजयावर शिक्कामोर्तब करताना आकाश सावलाने एकदाही बाद न होता २ षटकात १६ धावा केल्या. यादरम्यान त्याने दोन वेळा चेंडू सीमापार पाठवला.  याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत आकाशने आर्यन देशमुखचा पराभव केला होता. या लढतीत ८ चेंडूत आकाशाच्या खात्यात १३ धावा जमा झाल्या तर आर्यनला केवळ ९ धावा करता आल्या. अन्य लढतीत अश्विन माळीने सिद्धेश गावंडेंचा पराभव केला. अश्विनने १९ धावा बनवल्या तर सिद्धेशने १६ धावपर्यंत मजल मारली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत आर्यन देशमुख विजेता ठरला . आर्यनने ३९ धावा जमवल्या. या धावसंख्येला उत्तर देताना सिद्धेशने ३१ धावा केल्या. स्पर्धेत एकूण चार झेल आणि एक धावचीत करणाऱ्या  रोहित राजभरला सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे मोतीराम मोरेकर स्मृती पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांची भाजपमधून हकालपट्टी करा

भाजप नेते जगन्नाथ पाटील यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी कल्याण: मुरबाड विधानसभेतील भाजप आमदार किसन कथोरे यांची भाजपमधून हकालपट्टी करावी. कथोरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप तथा महायुतीचे उमेदवार कपील पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याऐवजी उघडपणे विरोधात काम केले. याची सर्व माहिती आपल्याकडे आहे. पक्षविरोधी काम केल्यामुळे आमदार कथोरे यांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी हे पत्र दिल्याने दोन पाटील विरुध्द कथोरे असा सामना येत्या काळात रंगण्याची चिन्हे आहेत. गेल्या दोन वर्षापासून कपील पाटील आणि किसन कथोरे यांच्यात धुसफूस सुरू आहे. भाजप नेत्यांनी वेळोवेळी या धुसफूशीवर पांघरूण घालून हा वाद वाढणार नाही याची काळजी घेतली. आता माजी मंत्री जगन्नाथ पाटील या ज्येष्ठ नेत्याने कथोरे यांच्या विरुध्द प्रदेश नेत्यांना कथोरे यांच्या हकालपट्टीची मागणी केल्याने भाजपच्या ठाणे जिल्ह्यात मोठी बंडाळी होण्याची चिन्हे आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा विषय उफाळून आल्याने कथोरे समर्थक प्रसंगी मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षीच कथोरे समर्थकांनी कपील पाटील यांच्या त्रासाला कंटाळून स्वतंत्र भूमिका घेण्याची गळ कथोरे यांना घातली होती. त्यावेळी प्रदेश नेत्यांनी कथोरे यांना सबुरीचा सल्ला दिला होता. प्रदेश नेत्यांच्या एकत्रित बैठकीत कपील पाटील यांनी आपले आक्षेप स्पष्ट मांडले होते. कथोरे यांनी यावेळी कोणताही खुलासा केला नव्हता, असे जगन्नाथ पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. कपील पाटील यांच्या विजयासाठी आपल्या सांगण्यावरून मुरबाड मतदारसंघात मेळावे झाले. तेथे कथोरे उपस्थित होते. त्यानंतर कथोरे यांनी पडद्यामागून आपल्या कार्यकर्त्यांना जेथे आगरी समाजाची गावे आहेत तेथे महाविकास आघाडीचे बाळ्या मामा आणि जेथे कुणबी समाजाची गावे आहेत तेथे नीलेश सांबरे यांना मत देण्याचे फर्मान सोडले. अशा १०० कार्यकर्त्यांची यादी आपल्याकडे आहे. भाजपच्या विजयासाठी वरिष्ठांकडून आदेश असताना कथोरे यांनी त्या आदेशाला काडीचीही किमत दिली नाही. प्रदेशाध्यक्षांच्या प्रयत्नांना धुडकावून लावले, असा आक्षेप जगन्नाथ पाटील यांनी पत्रात घेतला आहे. कथोरे यांच्या या कृतीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये खूप असंतोष आहे. पक्षाच्या विरोधात आणि कपील पाटील यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या किसन कथोरे यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी जगन्नाथ पाटील यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रत्यक्ष याविषयी बोलून सविस्तर माहिती दिली आहे. इतर भाजप नेत्यांना याविषयची पत्रे पाठवून किसन कथोरे यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. जगन्नाथ पाटील (भाजप नेते) या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. केवळ गैरसमज आणि आकसापोटी मला लक्ष्य बनवले जात आहे. मी भाजपचा कार्यकर्ता असून पक्षवाढीसाठी सातत्याने काम करीत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर हे स्पष्ट होईलच. आमदार किसन कथोरे (मुरबाड)

डोंबिवलीतील कोपरमध्ये वनराई नष्ट करून बेकायदा इमारतीचे काम सुरू

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागात सर्वाधिक बेकायदा बांधकामे सुरू आहेत. या बेकायदा बांधकामांच्या वारंवार तक्रारी करूनही ह प्रभागाच्या तोडकाम पथकांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने तक्रारदार आणि परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आता कोपरमधील चरू बामा शाळेच्या मागील भागात कॅप्टन तुकाराम हश्या म्हात्रे रस्त्यावर कृष्णा टाॅवरजवळ जुनाट आंबे आणि वनराई तोडून त्या जागेवर भूमाफियांनी सात माळ्याच्या बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू केले आहे. पालिकेच्या उद्यान विभागाच्या परवानग्या न घेता या बेकायदा इमारतीसाठी भूमाफियांनी जुनाट झाडे पालिकेच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन तोडून टाकली आहेत. या इमारतीच्या पायाभरणीचे काम रात्रंदिवसात पूर्ण करून पाऊस सुरू होण्यापूर्वी या इमारतीच्या उभारणीचे काम भूमाफियांनी सुरू केले आहे. पालिकेच्या नगररचना विभागाच्या बांधकाम परवानग्या न घेता स्थानिक भूमाफियांनी या बेकायदा बांधकामाची उभारणी सुरू केली आहे, अशी तक्रार माहिती कार्यकर्ते विनोद गंगाराम जोशी यांनी पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधूत तावडे, ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्याकडे केली आहे. उपायुक्त तावडे यांची तक्रारदार जोशी यांंनी प्रत्यक्ष भेट घेतली आहे. ह प्रभागाचे राजेश सावंत यांंनी आपण निवडणूक कामात खूप व्यस्त आहोत. आता एका बैठकीत आहोत, असे सांगून म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला, असे तक्रारदार विनोद जोशी यांंनी सांंगितले. सर्व प्रभागांमध्ये बेकायदा बांधकामांवर जोरदार कारवाई सुरू असताना मागील दोन महिन्यात ह प्रभागात एकाही बेकायदा बांधकामांवर कारवाई न झाल्याने या प्रभागाचे साहाय्यक आयुक्त बेकायदा बांधकामांवर कारवाई का करत नाहीत, अशा तक्रारदारांच्या तक्रारी आहेत. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन ह प्रभागात बेकायदा बांधकामांवर का कारवाई केली जात नाही, याचा आढावा घेण्याची मागणी तक्रारदारांकडून केली जात आहे. कोपर येथे चरू बामा शाळेच्या मागे सुरू असलेले बेकायदा बांधकामा पायभारणी स्तरावर असताना तोडून टाकण्याची मागणी तक्रारदार जोशी यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. कोपरमध्ये चरू बामा शाळा परिसरात अलीकडे एकही नवीन इमारत बांधकामाला परवानगी दिलेली नाही, असे नगररचना अधिकाऱ्याने सांगितले. ह प्रभागातील बेकायदा बांधकामे कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील शैलेश पाटील यांचा कोंबड्यांचा खुराडा, जुनी डोंंबिवलीतील प्रकाश गोठे, शंकर ठाकूर यांच्या फशी हाईट्स व गटारावर बांधलेली बेकायदा इमारत, ठाकुरवाडीत शाळेच्या आरक्षणावरील शिवलिला इमारत, राहुलनगरमधील रमाकांत आर्केड, सुदाम रेसिडेन्सी बेकायदा इमारती, कुंभारखाणपाडा खंडोबा मंदिरा समोरील बेकायदा इमारत. गणेशनगरमध्ये रेल्वे मैदानाच्या बाजुला सुरू असलेली बेकायदा इमारत.

सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या पाचव्या आरोपीस हरियाणातून अटक

पनवेल-अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी रविवारी पाचव्या आरोपीस हरियाणातील भिवानी येथून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. या प्रकरणात २० हून अधिक आरोपी फरार आहेत. रविवारी अटक केलेल्या आरोपीचे नाव दीपक हवासिंग गोगालिया उर्फ जॉनी वाल्मिकी असे आहे. सलमान याच्या हत्येचा कट रचून सलमानच्या हत्येसाठी पाकिस्तानातून शस्त्र खरेदी करण्याचे नियोजन लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या टोळीतील मारेकऱ्यांनी केले होते. पोलिसांच्या हाती मारेकऱ्यांनी आपसात केलेले फोनवरील व्हिडीओचे संभाषणाचा महत्वाचा पुरावा लागल्याने पोलिसांना या हत्येचा कट उधळता आला. दीपकला शनिवारी हरियाणातील भिवानी येथील तिग्रणा पोलिसांच्या मदतीने पकडण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले. दीपक सलमानच्या हत्येच्या कटातील संशयीत आरोपींची राहण्याची तसेच गुन्हा करताना वापरण्यात येणाऱ्या वाहनांची व्यवस्था करणार होता. दीपक हा सातत्याने व्हिडीओ कॅालद्वारे कटातील संशयीत आरोपितांच्या संपर्कात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दीपकच्या गुन्ह्यातील सहभागाविषयीची माहिती भिवानी (हरियाणा) येथील पोलीस अधीक्षक वरूण सिंघला यांना कळविल्यानंतर भिवानी येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रविंद्र व त्यांच्या पथकाने दीपकला ताब्यात घेतले. भिवानी येथील न्यायालयासमोर दीपकला हजर केल्यावर न्यायालयाने ५ जूनपर्यंत दीपकला ट्रांझीट कोठडी रिमांड दिल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांनी दिली.

श्रमिक जनता संघ युनियनच्या अध्यक्षपदी मेधा पाटकर यांची फेरनिवड !

ठाणे : श्रमिक जनता संघ युनियनची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच रविवारी २ जून २०२४ रोजी ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे पार पडली.  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची युनियनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय महासचिव पदावर सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालीया, उपाध्यक्ष पदी डॉ संजय मंगला गोपाळ, खजिनदार म्हणून अविनाश नाईक, सह खजिनदार पदावर सुदर्शन साहू, सचिव पदावर सुनील कंद आणि संजय चौहान यांची पुढील काळासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. कार्यकारी समिती सदस्य म्हणून अर्चना पवार, अनिता कुमावत, गणेश चव्हाण, संतोष देशमुख, बापू ओव्हाळ, सूरज वाल्मिकी, गौतम सहानी, पुजा पंडित, रोशन गायकर सुखेंदु मडैया, दुर्गेश खवसे राजकुमार दुबे, रामसुशील विश्वकर्मा, संतोष गुप्ता, बैजनाथ यादव, कृपाशंकर मिश्रा , चंद्रकांत चौधरी, विरेंद्र सावंत, नवीन मिश्रा आदी आणि कार्यालयीन सचिव म्हणून अजय भोसले यांची निवड करण्यात आली. कल्याण येथील श्री लक्ष्मीनारायण देवस्थान मंगल कार्यालय येथे १ व २ जून रोजी कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा आणि राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांनी भूषविले. महासचिव जगदीश खैरालिया यांनी प्रास्ताविक केले तर डॉ संजय मंगला गोपाळ यांनी सूत्रसंचालन केले. अधिवेशनात सरकारने चार लेबर कोड रद्द करून सर्व कामगार कायदे पुन्हा अंमलात आणावे, मैला सफाईचे काम यांत्रिक पद्धतीने करावे, मैन्युअल स्कैवेंजिंग प्रतिबंध कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करावी, खाजगीकरण – कंत्राटीकरण पध्दत बंद करून कायम नोकरी द्यावी, समान कामाला समान वेतन अदा करा, कमीत कमी किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळालेच पाहिजे, वर्षानुवर्षे मछली विक्री व्यवसाय करणाऱ्यांचे सर्वेक्षण करून अनुज्ञप्ती पत्र/ लायसन्स द्यावे, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा, गीग कामगारांसाठी कामगार कायदे लागू करा, ग्लोबल वार्मिंग आणि वाढत्या उष्णते पासून कष्टकरी श्रमिकांना सुरक्षा सुविधा पुरविल्या जाव्या,  मध्यप्रदेश येथील सेंच्युरी, मराल आणि पीडीपीएल कारखान्यातील श्रमिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठींबा देत विविध ठराव ही मंजूर करण्यात आले. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या २०१५ पासूनच्या किमान वेतनाचा फरकाची सुमारे सात कोटी रक्कम त्वरित अदा करा, ठाणे महानगरपालिका, प्रादेशिक मनोरूग्णालय, मध्य रेल मधील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर युनियनच्या वतीने आंदोलन छेडण्याचा निर्धार अधिवेशनात समारोप सत्रात करण्यात आला. शनिवारी १ जून रोजी कार्यशाळेत ज्येष्ठ अधिवक्ता रवींद्र नायर, सुधा भारद्वाज आणि एनएपीएमचे कार्यकर्ते श्री भार्गव यांनी युनियनचे प्रमुख कार्यकर्त्यांना विविध श्रमिक अधिनियम आणि श्रमिकांचे अधिकार या बाबतीत मार्गदर्शन केले होते. युनियनचे कार्यकारिणी सदस्य नविन मिश्रा यांनी प्रेरणादायी क्रांतीगीतं सादर करून सर्वांची मने जिंकली. वरीष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा रामटेके, अन्नसुरक्षा अभियानचे कार्यकर्ते विशाल जाधव आणि भारत जोडो अभियानच्या वरिष्ठ कार्यकर्त्या गुड्डी एस. एल., आणि घर बचाओ घरं बनाओ आंदोलनच्या संयोजिका पूनम कनौजिया यांनी समारोप सत्रात श्रमिक जनता संघाच्या मागण्यांना पाठींबा जाहीर केला. कल्याण युनिटचे प्रमुख आणि युनियनचे सचिव सुनील कंद यांच्या नेतृत्वाखाली शिबीर आणि अधिवेशन यशस्वी होण्यासाठी बापू ओव्हाळ, समीर दरेकर, शाम गायकवाड, हरेश ढमाले, सुनील दिवेकर, अजय भोसले, रुपेश जाधव, राधा किसन पांजगे, सुनिल भालेराव, दत्तात्रय जाधव आणि संदिप थूल आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी विशेष श्रम घेतले.

नालेसफाईची बहुतांशी कामे पूर्ण

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी  केली पाहणी आपत्कालीन कक्ष कार्यान्वित, आपत्कालीन हेल्पलाईन क्र. ८६५७८८७१०१ ठाणे (०३) : ठाणे महापालिका क्षेत्रातील बहुतांश मोठे आणि छोटे नाले, गटारे यांची सफाई पूर्ण होत आली…

मोखाडा तालुक्यातील डोल्हारा तलावात बुडून 11 वर्षीय मुलीचा मृत्यू

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील डोल्हारा येथील पाझर तलावात जान्हवी देवीदास कडू, या 11 वर्षीय बालिकेचा बुडून मृत्यू झाला आहे. शनिवार 1 जुन रोजी संध्याकाळी 5 वाजेपासून मोखाडा पोलिसांनी शोधमोहीम राबवली. मात्र रात्री उशीरापर्यंत जान्हवीचा तपास लागला नाही. अखेर, दुसर्या दिवशी तालुक्यातील घोसाळी येथील तरुणांच्या मदतीने जान्हवीचा मृतदेह हाती लागला आहे. या घटनेची मोखाडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. याबाबत मोखाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवी देवीदास कडु  (11), व तिची  मैत्रीण मनु किसन बोढेरे (12)  या दोघी डोल्हारा येथील बंधाऱ्यावर अंघोळीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी जान्हवी हीस पाण्याचा अंदाज आला नाही तसेच जान्हवी हिस पोहता येत नसल्याने ती खोल पाण्यात जावुन बुडुन मृत्यू पावली आहे. या घटनेची खबर जान्हवी चे मामा किशोर खोडे यांनी मोखाडा पोलिसांना दिली आहे‌. जान्हवीच्या मृत्यू बाबत माझा कोणावर संशय नसुन काही एक तक्रार नसल्याची खबर खोडे यांनी दिली आहे‌. मोखाड्यातील साहसी तरुणांची मदत मृत जान्हवीचा तपास उशीरा पर्यंत लागत नसल्याने पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल  (एन्ा.डी.आर.एफ.) यांना पाचारण केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी रविवारी मोखाड्याजवळील घोसाळी येथील वामन जाणू माळी, जगन सक्रू माळी, नाना सक्रू धोंडगा, शिवराम वसंत दिघा, दिनकर झिपर मुरथडे आणि रावजी लक्ष्मण दिघा या सर्वानी धाडसी व अथक प्रयत्न करून जान्हवीचा मृतदेह शोधून काढला. त्यांच्या सत्कार्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप गिते यांनी कौतुक केले असून मोखाडा पोलिसांना तपास कामात सहकार्य केल्याबद्दल आभार मानले आहेत. पालकांनी पाल्यांची काळजी घ्यावी उन्हाळी सुट्टीचे दिवस असल्याने आपली पाल्ये आजोळी जावून सुट्टीचा मनमुराद आनंद उपभोगत असतात. मात्र त्यातून अनेक दुर्घटना घडत असतात आणि त्यायोगे आपल्या जीवलगांची जीवीत हानी आपल्याला पाहवी लागते. ही कधीही भरून न निघणारी हानी असल्याने पालकांनी आप आपल्या पाल्यांची योग्य ती काळजी घ्यावी तसेच खबरदारीच्या दृष्टीने त्यांचे योग्य ते समूपदेशन करण्याचे आवाहन मोखाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदीप गिते यांनी केले आहे.

महिन्यापासून शहापूर परिसरातून जीओचे नेटवर्क गायब

कल्याण: गेल्या महिन्यापासून शहापूर तालुक्यातील अनेक गाव हद्दीतील जीओ मोबाईलचे नेटवर्क गायब असल्याने या भागातील नोकरदार वर्ग सर्वाधिक हैराण झाला आहे. साठगाव, शेणवे, मळेगाव, मुसई, कुल्हे परिसरात हा प्रकार सर्वाधिक असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. जीओ मोबाईलवर काॅल आला तर तो अचानक बोलताना कट होतो. नेटवर्क येण्यासाठी अनेक वेळा ग्रामस्थांना गावाबाहेर उंच टेकडीवर जावे लागते. तेथे चुकून नेटवर्क असेल तर मोबाईल लागतो. अन्यथा नेटवर्क कधी येईल या प्रतिक्षेत ग्रामस्थांना थांबावे लागते. अलीकडे सर्वच व्यवहार मोबाईलच्या माध्यमातून होतात. शेतकऱ्यांना बँँकेचे व्यवहार करताना मोबाईलचा वापर करावा लागतो. आता शेतीविषयक बी-बियाणे, शासन सुविधांचा लाभ ऑनलाईन माध्यमातून घेण्यासाठी मोबाईलचा वापर प्रभावीपणे केला जातो. बँकेतील बहुतांशी व्यवहार, ओटीपी, गॅस अनुदान, दुकानात ऑनलाईन व्यवहार करताना मोबाईल नेटवर्क नसल्याने ग्राहक, दुकानदार त्रस्त आहेत, अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. ग्रामीण भागातील अनेक उच्चशिक्षित नोकरदार घरात बसून कार्यालयीन कामकाज करतात. त्यांची जीओ नेटवर्क नसल्याने सर्वाधिक कोंडी झाली आहे. आता गावागावामध्ये प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. गावांमधील बहुतांशी व्यवहार मोबाईलवर अवलंबून असतात. लहान मोठे व्यवासायिक, त्यांना संपर्क करण्यासाठी मोबाईल महत्वाचा मानला जातो. ग्रामीण भागातील बीएसएनएलचे नेटवर्क मागील सहा वर्षापूर्वी बंद पडत गेल्यानंतर गावांमध्ये जीओचा मोबाईल घेण्याची स्पर्धा लागली. सुरूवातीच्या काळात गावात जीओचे मोबाईल नेटवर्क पूर्ण क्षमतेने होते. पण गेल्या काही दिवसांपासून शहापूर परिसरातील शेणवे भागात जीओचे नेटवर्क नसल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. अनेक ग्रामस्थ, वित्तीय संस्थांनी यासंदर्भात जीओच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला आहे. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.

पर्यावरण दिनी ठामपा लावणार पोखरण रोडवर बकुळाची १ हजार झाडे तर नागला बंदर चौपाटीवर ५०० झाडे !

५ जून रोजी ‘करूनच दाखवू प्रदूषणमुक्त ठाणे’ संकल्प – संदीप माळवी अनिल ठाणेकर ठाणे : महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि श्रीकला संस्कार न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने, पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ५ जून रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ‘करूनच दाखवू प्रदूषणमुक्त ठाणे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे तर ठाणे महापालिका पोखरण रोडवर बकुळाची १ हजार झाडे तर नागला बंदर चौपाटीवर मियावाकी पध्दतीने ५०० झाडे लावण्यात येणार असल्याची  माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली. आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने,  ठाणे महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि श्रीकला संस्कार न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने,५ जून रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सायंकाळी ५.०० वाजता ‘ करूनच दाखवू प्रदूषणमुक्त ठाणे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. नृत्य, नाट्य, स्टॅण्ड अप कॉमेडी, कविता, पर्यावरण नगरी यांच्यासह पर्यावरण मित्र पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पर्यावरणाच्या निमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धाही होणार आहे. हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला असून जास्तीत जास्त नागरिकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे पोखरण रस्ता क्र्.१ आणि नागला बंदर चौपाटी अशा दोन ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. पोखरण रस्ता क्रमांक १ येथे रस्त्याच्या दुर्तफा पारंपरिक पद्धतीने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यात बकुळाची १००० झाडे लावली जाणार आहेत. तर, नागला बंदर चौपाटी येथे मियावाकी पद्धतीने ५०० झाडे लावली जाणार आहेत. त्यात, पळस, बेल, नीम, कांचन, सिताअशोक, जांभूळ आदी देशी वृक्षांचा समावेश आहे.महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे हे या वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.