Category: ठाणे

Thane news

राम गणेश गडकरी यांचा पुतळा उभारायला लाज वाटते का ?

मुख्यमंत्र्यांना भेटणार-ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ ठाणे: पुण्याच्या संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी  यांचा पुतळा पुन्हा उभारायला लाज वाटते का ? असा सवाल प्रख्यात नाटककार, दिग्दर्शक अशोक समेळ यांनी केला आहे. गडकरी पुतळ्याबाबत आपण त्वरीत मुख्यमंत्र्यांची भेट घेवून पुतळा उभारणीबाबत विनंती करणार आहोत असेही अशोक समेळ यांनी सांगितले. कल्याणच्या भाषाप्रभू राम गणेश गडकरी कट्ट्यातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर व भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्या जयंतीनिमित्त शनिवार व रविवारी व्याख्यानाचे आयोजन केले होते. रविवारी नाटककार अशोक समेळ यांनी गडकरी यांच्या नाटकातील सौदर्यस्थळे या विषयावर सुमारे सव्वा तास अभिनयासह विवेचन केले. गडकरी यांच्या नाटकातील `स्वगत’ त्यांनी साभिनय सादर केले. नाटकात स्वगत हा प्रकार आता संपला आहे असे सांगतांना गडकरी यांचे नाटके कशी अजरामर आहेत याबाबत त्यांनी विविध दाखले देत प्रतिपादन केले. `भावबंधन’ पासून ते `राजसंन्यास’पर्यंत त्यांची नाटके आणि त्यांचे महत्व विशद केले. त्यांच्या नाटकातून नायिका ज्या घराघरात पोहचल्या त्या मालती, सिंधू, सुशिला, वसुंधरा इत्यांदी नायीकांची सोशिकवृत्ती ते कुलवधू मधील बंडखोर लतिकाचे वर्णन केले. शारदा या नाटकाने राम गणेश गडकरी यांना सर्वोच्च पातळीवर नेऊन ठेवले. पैसे असलेल्या म्हातार्‍यांशी लहान मुलींचे लग्न लावून देण्याची त्या काळी प्रथा होती. त्यावर केलेल्या विडंबनाला तोड नाही असे सांगतांनाच त्या नाटकातील अनेक गाणी रसिक गुणगुणत असत. `म्हातारा तितुका’ हे सर्वांत लोकप्रिय गाणे होते. त्या काळातील पौराहित्य संस्कारावर आधारलेले `प्रेमसंन्यास’ आणि `दारुची संगत माणसाला संपवते त्यावरील `एकच प्याला’ नाटकाचे त्यांनी रसभरीत वर्णन केले राम गणेश गडकरी एकदा सहजच बालगंधर्वाना म्हणाले `तुला एक दिवस फाटक्या वस्त्रात आणून उभा करीन हे त्यांनी `एकच प्याला’मध्ये शब्दश: करुन दाखविले. ब्रिटीशांच्या राजवटीत `राकट देशा कणखर देशा, माझा महाराष्ट्र देशा’ हे त्यांचे स्फूर्ती गीत अवघ्या महाराष्ट्रातील घराघरात पोहचले. आयुष्यभर खस्ता खाणारा हा माणूस शारीरिक व्याधींशी लढत होता. परंतु सारखे लिहित होते. त्यांना माहिती होते माझे आयुष्य एवढेच आहे. जेवढे देता येईल तेवढे मी समाजाचे देणे लागतो. या पध्दतीने त्यांनी लिखाण केले. २२ जानेवारी १९१८ रोजी रात्री झोपतांना आपल्या सेवकाला राजसंन्यासचे कागद काढून ठेव मला उद्या नाटक पूर्ण करायचे आहे. असे सांगून झोपी गेलेले राम गणेश गडकरी उठलेच नाही. त्यांचा झोपतच २३ जानेवारी १९१८ रोजी मृत्यू झाला. गडकरी यांना त्यांचा नाटकाचा आनंद कधीच घेता आला नाही. गडकरी जयंती निमित्ताने कल्याणच्या गडकरी कट्ट्यावर त्यांच्यासाठी एवढी माणसे जमतात हे ते स्वर्गातून पाहत असतील. खरं तर गडकरी कट्टा ही संकल्पनाच वेगळी आहे आणि ती राबविली गेली पाहिजे. मराठी भाषेला खर्‍या अर्थाने वैभव प्राप्त करुन देण्याचे काम राम गणेश गडकरी यांनी केले. त्याला साज बालगंधर्व, कुसुमाग्रज, कानिटकर यांनी नंतर चढविला असे सांगून पुन्हा एकदा गडकरी यांच्या पुतळ्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. प्रारंभी गडकरी कट्ट्यांचे तुषार राजे यांनी प्रास्ताविक केले. २ जानेवारी २०१७ रोजी गडकरी यांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि २०१८ साली त्यांच्या शताब्दी महोत्सवाप्रसंगी कल्याणमध्ये राम गणेश गडकरी कट्ट्याची स्थापना करण्यात आली. गडकरी कट्ट्याने राबविलेल्या विविध उपक्रमाची  माहिती देण्यात आली. गडकरी कट्ट्याचे मेघन गुप्ते यांच्या हस्ते अशोक समेळ यांचा सत्कार करण्यात आला. सैनिकी शिक्षण आवश्यक शनिवारी सावरकर जयंती निमित्त `सैन्यांपुढील आव्हाने व `सैन्यातील संधी’ या विषयावर वीरमाता अनुराधा गोरे यांनी आपले विचार प्रगट केले. केवळ बंदूक चालविणाराच सैन्यात काम करु शकतो असे नव्हे तर सर्व कौशल्य असणारे डॉक्टर, इंजिनिअर, विविध विषयातील तज्ञांना सैन्यात काम करता येते. सैनिकाला व त्यांच्या कुटुंबाला शासन कधीच वार्‍यावर सोडत नाही. त्यामुळे आपला पहिला अग्रव्रâम हा सैन्य असायला हवा असे आवाहन केले. शनिवार दि. २५ व रविवार दि. २६ मे रोजी झालेल्या दोन दिवसाच्या जयंती महोत्सवात कल्याणकर रसिकांनी मोठी गर्दी केली होती. सूत्रसंचालन रत्ना हिले व योगेश बुडुक यांनी केले. कार्यव्रâमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री तुषार राजे, पुरुषोत्तम फडणीस, प्रविण देशमुख, मेघन गुप्ते, प्रा. मुकुंद बापट, दिपक देशपांडे, प्रसन्न कापसे, दिपक अग्रवाल, नविन राजे, अनुश्री फडणीस इत्यांदींनी मेहनत घेतली.

कोकण पदवीधर निवडणूक मतदान 26 जूनला

28 मेपर्यंत करता येईल पदवीधर मतदार नोंदणी ठाणे : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे 28 मे 2024 पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची मतदार नोंदणी करावयाची आहे. तरी जिल्ह्यातील अद्यापही नोंदणी न केलेल्या पात्र पदवीधारकांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी, असे  आवाहन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अर्चना कदम यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने 24 मे 2024 रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची मुदत दि.7 जुलै, 2024 रोजी समाप्त होणार आहे. या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे :- निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्दी करण्याचा दिनांक 31 मे, 2024 (शुक्रवार), नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक 7 जून, 2024 (शुक्रवार), नामनिर्देशनपत्रांची छाननी दि.10 जून, 2024 (सोमवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 12 जून 2024 (बुधवार), मतदानाचा दिवस 26 जून 2024 (बुधवार) आणि मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 वाजता, मतमोजणीचा दिनांक 1 जुलै 2024 (सोमवार), निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 5 जुलै 2024 (शुक्रवार). दि. 24 मे 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी संबंधित मतदार यादीत नाव नोंदणीसाठी नमुना नं. 18 भरुन सादर करावयाचा आहे. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे दि. 28 मे, 2024 पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची मतदार नोंदणी करावयाची आहे. कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार यादी प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने करण्याची (de-nova) असल्याने सर्व पात्र उमेदवारांनी नव्याने नमुना क्र. 18 भरणे आवश्यक आहे. ही मतदारयादी नव्याने तयार करावयाची असल्याने जुन्या यादीत जरी आपले नाव असले तरीही नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. नमुना नं. 18 हस्तलिखित / टंकलिखित किंवा खासगीरित्या छापलेले अर्ज देखील स्वीकारले जातील. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदणीसाठी पदवीधर मतदारास नमुना नं.18 पुढील ठिकाणी सादर करता येईल 1) संबंधित तहसिलदार कार्यालय / उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय किंवा 2) मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://gterollregistration.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल.

डोंबिवलीत देवीचापाडा येथे गर्दुल्ल्यांचा रिक्षा चालकावर हल्ला

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील देवीचापाडा, मोठागाव, गणेशनगर उल्हास खाडी किनारा भागात गेल्या काही महिन्यांपासून रात्रीच्या वेळेत गर्दुल्ले, चरस-गांजा सेवन करणारे, मद्यपी यांची वर्दळ वाढली आहे. या भागातील झाडे, झुडपे, मोकळ्या मैदानांचा आधार घेऊन ही मंडळी पोलिसांचा धाक नसल्याने बिनधास्त नागरिकांना उपद्रव देत आहेत. रविवारी रात्री देवीचापाडा गोपीनाथ चौक येथे एका रिक्षा चालकावर एका गर्दुल्ल्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. जगदीश म्हात्रे असे रिक्षा चालकाचे नाव आहे. ते गोपीनाथ चौकातील सद्गुरू दर्शन सोसायटीत राहतात. माजी नगरसेवक दिवंगत वामन म्हात्रे यांचे ते नातेवाईक आहेत. रविवारी रात्री वाढत्या उष्णतेमुळे जगदीश म्हात्रे घराच्या बाहेर बसले होते. त्यावेळी रात्रीच्या वेळेत सद्गुरू दर्शन सोसायटी लगतच्या भरत भोईर नाल्याच्या कट्ट्यावर, काही जण नाल्या जवळील झाडाखाली चरस-गांजा यांचे सेवन करत बसले होते. काही जण मद्यपान करत टोळक्याने बसले होते. ही टोळकी मद्य सेवन करून या भागात ओरडा करत होती. रात्रीची वेळ झाली असल्याने लोकांना सोमवारी कामाला जायचे आहे. ओरडा करू नका असे रिक्षा चालक जगदीश म्हात्रे यांनी घरा जवळून चाललेल्या गर्दुल्ल्यांना सांगितले. त्याचा राग एका गर्दुल्ल्याला आला. त्याने काही क्षणात जगदीश म्हात्रे यांना शिवीगाळ करत त्यांना मारहाण करत हातामधील धारदार स्टीलच्या कड्याचा वार रिक्षा चालक जगदीश यांच्या नाकावर केला. नाकातून रक्त वाहू लागले. त्यानंतर दुसरा वार हल्लेखोराने रिक्षा चालकाच्या डोळ्यावर करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर गर्दुल्ल्याने रिक्षा चालकाला जोराने जमिनीवर ढकलून देऊन हल्लेखोर पळून गेला. विष्णुनगर पोलिसांना ही माहिती म्हात्रे यांनी दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी आले. हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी परिसरात घेतला पण ते या भागातून पळून गेले होते. देवीचापाडा येथील कलावती आई मंदिराजवळील एका मोकळ्या भूखंडावर दररोज रात्री आठ ते रात्री ११ वाजेपर्यंत मद्यपींचे एक टोळके उघड्यावर मद्य सेवन करण्यासाठी बसते. मद्याची गुंगी चढल्यावर ते अश्लिल भाषेत शिवीगाळ करतात. पादचाऱ्यांना टोमणे मारतात. कलावती आई मंदिरात अनेक भाविक उपसना करण्यासाठी आलेले असतात. काही जण प्रार्थना करतात. त्यांनाही या मद्यपींचा उपद्रव वाढला आहे. परिसरातील सोसायटी, चाळींमधील रहिवासी या मद्यपींच्या त्रासाला कंटाळले आहेत. मागील काही महिन्यांपासून उघड्यावर हे मद्यपी मद्य सेवन करत आहेत. विष्णुनगर पोलिसांनी रात्रीच्या वेळेत खाडी किनारची झुडपे, झाडे परिसरात गस्त घातली तर गांजा सेवन करणारे, मद्यपी टोळकी सापडण्याची शक्यता रहिवाशांकडून वर्तवली जात आहे. रिक्षा चालकावर हल्ला झाल्याने रिक्षा चालक संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली आहे.

जितेंद्र आव्हाड महाड येथे बुधवारी करणार मनुस्मृतीचे दहन !

अनिल ठाणेकर ठाणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने  राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड हे या मुद्द्यावरुन कमालीचे आक्रमक झाले आहेत. शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या हालचालींना जितेंद्र आव्हाड यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी जितेंद्र आव्हाड बुधवारी महाड येथे जाऊन मनुस्मृतीची होळी करणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथेच मनुस्मृतीची होळी केली होती. ही बाब लक्षात घेत सरकारचा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड देखील महाड येथेच मनुस्मृतीची होळी करणार आहेत. मनुस्मृतीमधील तीन श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयाविरोधात डॉ. जितेंद्र  आव्हाड यांनी सर्वांना एकत्र येण्याचं आव्हान केले आहे. ज्या मनुस्मृतीने स्त्रियांचे अधिकार नाकारले, ज्या मनुस्मृतीमुळे आपले पूर्वज ५००० वर्ष त्रासात जगले, तीच मनुस्मृती पुन्हा एकदा हे सरकार आणत आहे, याचा तीव्र विरोध व्हायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी या मनुस्मृतीचे दहन केले, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाऊन याचं दहन करणार आहोत आणि सरकारचा निषेध करणार आहोत त्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. सत्ताधारी मागच्या दाराने त्यांच्या मनातील गोष्ट पूर्ण करु पाहत आहेत. आमच संविधान म्हणजेच मनुस्मृती, असं म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय घडतं, त्याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांचा यादीत पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश होत आहे. ज्या मनुस्मृतीने भारताच्या वाटोळं केलं, समाजात दुही माजवली आहे, समाजामध्ये चातुवर्ण्याचा समावेश केला, जातीभेद निर्माण केला, स्त्रियांना तर सर्वात घाणेरडी वागणूक घेण्याची पद्धती या मनुस्मृतीने जन्मला घातली, ती मनुस्मृती परत आणली जात आहे. जे लोक १९५० साली म्हणाले की, आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही, आमचं संविधान म्हणजे मनुस्मृती. तेच लोक आता मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत.  तुम्हाला आणि आम्हाला संविधान वाचवायचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ मध्ये मनुस्मृती दहन केलं आणि १९५० मध्ये संविधान जन्माला घातलं त्यासाठी आपण महाडला जात आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण मनुस्मृतीच दहन करतोय, संविधानासाठी दो बलिदान, असे डॉ.  जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. सुरबानानांचे नातू करणार मनुस्मृतीचे दहन २५ डिसेंबर १९२७ रोजी मंचावर सहस्रबुद्धे, चित्रे, चिटणीस आदी उपस्थित होते. त्यांच्या समोर डॉ.  बाबासाहेब आंबेडकर हे मनुस्मृतीमधील प्रत्येक अध्याय वाचून दाखवत होते. मनुस्मृतीमधील हे अध्याय मंजूर आहेत का, असेही विचारत होते. त्यावेळेस लोकांकडून उत्स्फूर्तपणे नाही असेच उत्तर येत होते. त्यानंतर त्यांनी मनुस्मृती जाळण्याचा निर्णय जाहीर केला अन् मनुस्मृती जाळत असताना त्यांनी सहस्रबुद्धेंना विचारले, तुम्हाला मनुस्मृती जाळणे मान्य आहे का? त्यावर सहस्रबुद्धे म्हणाले, ब्राह्मण म्हणून नाहीच; पण, माणूस म्हणून तर नाहीच नाही! या सर्वांच्या मागे जी शक्ती उभी होती ती म्हणजे तत्कालीन नगराध्यक्ष सुरबानाना उपाख्य  चिटनीस  यांचे नातू मिलींद चिटणीस यांच्या हस्ते एक ऐतिहासिक संदर्भ म्हणून बुधवारी मनुस्मृती जाळण्यात येणार आहे, असेही डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने, माजी पंतप्रधान, भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी.जी. गोदेपुरे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी, महापालिकेचे विधी सल्लागार मकरंद काळे, सहाय्यक आयुक्त (लोकमान्य नगर-सावरकर नगर प्रभाग समिती) भालचंद्र घुगे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर, उथळसर प्रभाग समितीत, आंबे-घोसाळे तलावाशेजारी असलेल्या पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

मैन्युअल स्कैवेंजिंग विरोधी कायद्याचे ठामपाकडून खुलेआम उल्लंघन-जगदीश खैरालिया

कायद्याच्या अंमलबजावणीसाठी  पुणे समाज कल्याण आयुक्तांची नोडल ऑफिसर नेमणुकीची शासनाची न्यायालयात माहिती अनिल ठाणेकर ठाणे महानगरपालिका हद्दीत भूमिगत गटारे सफाई करतांना कंत्राटी कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा सुविधा पुरविल्या जात नाही, याबाबतची तक्रार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. मैन्युअल स्कैवेंजिंग विरोधी कायद्याच्या तरतुदींचे ही खुलेआम उल्लंघन महापालिका प्रशासन आणि ठेकेदार करत असल्याने या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आता महाराष्ट्र शासनाने २ मे २०२४ पासून समाज कल्याण आयुक्त, पुणे यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केली असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाला सुनावणी दरम्यान दिली आहे. यामुळे मृतक सफाई कामगारांच्या कुटुंबातील वारसांना आता नोडल ऑफिसर यांच्याकडेही दाद मागता येईल, अशी माहिती श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत भूमिगत गटारे सफाई करतांना कंत्राटी कामगारांना कोणत्याही सुरक्षा सुविधा पुरविल्या जात नाही. या बाबतीत श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी सफाई कामगार गटारात काम करतांनाचे विडिओ आणि फोटो सहित महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे तक्रारही केली आहे. किमान वेतन अधिनियम १९४८ आणि मैन्युअल स्कैवेंजिंग विरोधी कायद्याच्या तरतुदींचे ही खुलेआम उल्लंघन महापालिका प्रशासन आणि ठेकेदार करत असल्याचे आरोप ही जगदीश खैरालिया यांनी केले आहे. या अगोदर मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेत १६ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना मानवी मैला सफाई प्रतिबंध कायद्याच्या तंतोतंत अंमलबजावणीचे अंतरिम आदेश दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला मॉनिटरिंग कमिटीची किमान सहा महिन्यांत एकदा मीटिंग घेऊन राज्यातील मैन्युअल स्कैवेंजिंग/ सीवर डेथ प्रकरणी पुनर्वसन बाबत आढावा घेण्यासाठी  आदेश श्रमिक जनता संघाने दाखल करण्यात रिट याचिका क्र.१५७०/ २०२३ मध्ये १० मे २०२४ रोजी दिले आहे. तसेच मैन्युअल स्कैवेंजिंग विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केलेले समाज कल्याण आयुक्त, पुणे यांना रिट याचिका क्र.१५७०/ २०२३ मध्ये  प्रतिवादी म्हणून सामिल करण्यासाठी श्रमिक जनता संघ युनियनच्या मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाने २ मे २०२४ पासून समाज कल्याण आयुक्त, पुणे यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केली असल्याची माहिती  मुंबई उच्च न्यायालयाला सुनावणी दरम्यान दिली आहे.

दहावीचा आज निकाल

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आज सोमवार दिनांक २७ मे रोजी दुपारी १ वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे.  ही परीक्षा…

डॉ.भगवान पवारांचे निलंबन नागरी सेवा नियमानुसारच

मुंबई :  पुणे जिल्हा परिषदेचे वादग्रस्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान अंतू पवार यांचे निलंबन हे महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसारच असल्याचे आरोग्य सेवा आयुक्तालयातील सुत्रांनी सांगितले. डॉ. भगवान पवारयांच्याविरुध्दच्या तक्रारी…

कल्याणमध्ये श्रीमंतीचा माज अन् पोलिसांचा इंगा

अल्पवयीन मुलगा चालवित होता बीएमडब्ल्यू आणि बोनेटवर बसून मित्र करत होता स्टंट कल्याण : पुण्यात अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत बाईकवरील दोघांना पोर्शे कारने चिरडून ठार मारल्यानंतरही श्रीमंतीचा माज काही उतरत नाही. आता…

होर्डिंग माफियांवर कारवाई करण्यात मनपाची दिरंगाई ?

सुनिल इंगळे उल्हासनगर : काही दिवसांपूर्वी घाटकोपर येथे बेकायदेशीर होर्डिंग कोसळल्याने 17 जणांना आपला जीव गमवावा लागला. या गंभीर घटनेनंतर महाराष्ट्रातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांनी तेथे असलेले बेकायदा होर्डिंग हटवण्याची…