Category: ठाणे

Thane news

मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही

प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा कल्याण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी गद्दारी करून ज्यांनी पक्षातून बाहेर पडणे पसंत केले. अशा गद्दारांना मनसे म्हणून आम्ही अजिबात सहकार्य करणार नाही. आमच्या सर्व निष्ठा पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आहेत, असे सांगत कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी कल्याण लोकसभा निवडणुकीच्यावेळी पूर्वाश्रमीच्या मनसेच्या पदाधिकारी आता महाविकास आघाडीतून कल्याण लोकसभेत निवडणूक लढविणाऱ्या वैशाली दरेकर यांना मनसे कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही, असे माध्यमांना स्पष्ट केले. शिवसेनेतून फुटून बाहेर पडल्यानंंतर राज ठाकरे यांंनी मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हापासून मनसेसोबत असलेल्या वैशाली दरेकर यांनी मनसेमध्ये नगरसेविका, सभापती, प्रदेश महिला नेत्या अशी अनेक पदे सांभाळली. मनसेबरोबर त्यांचे न पटल्याने २०१६ मध्ये त्या मनसेतून बाहेर पडल्या. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटल्यानंतर दरेकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राहणे पसंत केले. मागील तीन वर्षांपासून शिवसेनेचे खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर विकास कामे, निधी अशा अनेक विषयांवरुन शीत युद्ध सुरू असलेले आमदार पाटील गेल्या सहा महिन्यांपासून थंंड आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पिता-पुत्रा विरुद्धची आपली भूमिका अचानक मवाळ केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मागील तीन वर्षे खासदार शिंदे यांनी आमदार पाटील यांना विकास प्रकल्प, कामे, निधीमध्ये ताणून धरले होते. यामुळे आमदार पाटील सतत त्रस्त होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आमदार पाटील त्याचा वचपा काढतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. परंतु, पाटील यांच्या मवाळ धोरणामुळे आणि मनसेने महायुतीबरोबर जुळते घेतल्याने आमदार पाटील कल्याण लोकसभेसाठी खासदार शिंदे यांना साथ देण्याची चर्चा आहे. फक्त त्यांचे कार्यकर्ते आमदार पाटील यांचे आदेश किती पाळतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते खासदार शिंदे यांच्यावरील जुना राग काढण्यासाठी मनसेच्या माजी पदाधिकारी दरेकर यांना कल्याण लोकसभा निवडणुकीत सहकार्य करतील अशी चर्चा होती. परंतु, आमदार पाटील यांनी मनसेतून फुटून बाहेर पडलेल्या गद्दारांना मनसे कोणत्याही प्रकारची साथ देणार नाही असे सांंगून दरेकर यांच्या विरोधात मनसे काम करणार असल्याचे स्पष्ट संंकेत दिले. मनसेत असताना २००९ मध्ये दरेकर यांनी एक लाखाहून अधिक मते कल्याण लोकसभेत मनसेच्या बळावर मिळवली होती. ही साथ आता मिळणार नसल्याने आणि राष्ट्रवादी, काँग्रेस दरेकर यांना किती साथ देते यावर दरेकर यांचे भवितव्य अवलंंबून आहे. महायुतीेचे, मनसेचे स्थानिक नेते कल्याण लोकसभेत खासदार शिंदे यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना आदेश देत असले तरी त्याचे पालन महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते किती करतात यावर खासदार शिंदे यांचे भवितव्य अवलंंबून आहे.

‘ब्रँड ठाकरे, एकटा लढतो विचारे… उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली… ‘

राजन विचारे यांनी आणलं रॅप गाणं ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून ठाकरे गटाचे उमदेवार राजन विचारे यांनी निष्ठावान विरुद्ध गद्दार असा प्रचार सुरू केला आहे. त्यापाठोपाठ आता ‘ब्रँड ठाकरे, एकटा लढतो विचारे….उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली…’ असे रॅप गाणे तयार केले असून त्यामाध्यमातून ठाकरे गटाने शिंदे गटावर एकप्रकारे अप्रत्यक्षपणे निशाणा साधत ब्रँड ठाकरे असल्याचा उल्लेख केला आहे. देशभरासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडी विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना सर्वत्र रंगला आहे. परंतु शिवसेनेच्या उठावाचे केंद्रबिंदू असलेल्या ठाणे जिल्ह्यात मात्र ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना रंगणार आहे. ठाकरे गटाने खासदार राजन विचारे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देऊ केली आहे. तर, शिंदेच्या सेनेकडून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. महायुतीत ही जागा शिवसेनेला मिळणार की भाजपला याविषयी संभ्रम आहे. असे असले तरी या मतदारसंघाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नसला तरी त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनीही प्रचाराला सुरुवात केली असून त्यात ते निष्ठावान विरुद्ध गद्दार असा प्रचार करीत आहेत. त्यापाठोपाठ आता ‘ ब्रँड ठाकरे, एकटा लढतो विचारे….उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली…’ असे रॅप गाणे तयार केले असून त्यामाध्यमातून ठाकरे गटाने शिंदे गटावर एकप्रकारे अप्रत्यक्षपणे निशाणा साधत ब्रँड ठाकरे असल्याचा उल्लेख केला आहे. काय म्हटले आहे रॅप गाण्यात क्रांतीची ही मशाल धगधगते या उरी, देश माझा महाराष्ट्र, धर्म माझा मातोश्री. ही भगवी माझी निष्ठा, हा भगवा माझा प्राण रे… भगवे माझे रक्त, भगवा माझा श्वास रे… मेलो या जगात तरी भगवी माझी राख रे…आसमंतात साहेबांची गर्जना झाली, निष्ठेच्या लढाईची वेळ आता आली, असे रॅप गाण्यात म्हटले आहे. बोलतो विचारे रोखठोक बात रे… सांगून गेला बाप माझा सोडू नका साथ रे… गद्दार सारे पळवा पण माफ नका करू रे… मशीनमध्ये ईडीच्या घाण झाली साफ रे…कॉलर आपली टाइट कारण ब्रँड आपला ठाकरे. एकनिष्ठ, पक्षनिष्ठा आम्ही सैनिक. ठाण्याचा वाघ दिघेंचा मी सैनिक. सामान्य जनतेपासून सत्य तुम्ही लपवले, शाखेत तुम्ही षंढ गुंड घुसवले, वाटेत माझ्या ते लाल निखारे वाघाचा बछडा एकटा लढतो विचारे, असे गाण्यात म्हटले आहे.

ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त,

आय प्रभागाची कारवाई कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या शाळेच्या आरक्षित भूखंडावर कल्याण पूर्वेत आडिवली ढोकळी गावात स्थानिकांनी चार माळ्याची तीस सदनिका असलेली बेकायदा इमारत उभारली होती. याप्रकरणी तक्रारी प्राप्त होताच, आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने मागील पाच दिवसांच्या काळात आरक्षित भूखंडावरील बेकायदा इमारत शुक्रवारी भुईसपाट केली. कल्याण पूर्वेतील आय प्रभागात भुईसपाट करण्यात आलेली ही सातवी टोलेजंग बेकायदा इमारत आहे. या प्रभागात गेल्या वर्षभराच्या कालावधीत शंभरहून अधिक चाळी, व्यापारी गाळे साहाय्यक आयुक्त मुंंबरकर यांनी राजकीय दबाव झुगारून, भूमाफियांच्या विरोधाला न जुमानता तोडून टाकले आहेत. कल्याण पूर्वेतील आय प्रभागात आडिवली ढोकळी गावात पालिकेचे शाळेचे आरक्षण असलेल्या भूखंडावर भूमाफियांनी चार माळ्याची बेकायदा इमारत बांधून पूर्ण केली होती. आयक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी पालिकेच्या आरक्षित भूखंडावरील रहिवास नसलेल्या बेकायदा इमारती तोडून टाकण्याच्या सूचना साहाय्यक आयुक्तांना केल्या आहेत. आडिवली ढोकळीत शाळेच्या आरक्षित भूखंडावर बेकायदा इमारत उभारल्याच्या तक्रारी आय प्रभागात दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी नगररचना विभागाकडून या भूखंंडासंदर्भात माहिती मागवली. त्यावेळी संबंधित भूखंड पालिकेच्या ताब्यातील आणि त्याच्यावर शाळेचे आरक्षण असल्याचे स्पष्ट झाले. पालिकेचा आरक्षित भूखंड हडप केल्याने मुंबरकर यांनी इमारत तोडण्याची विहित प्रक्रिया पार पाडून आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, अतिक्रमणचे नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठवड्यापासून ही बेकायदा इमारत तोडकाम पथक, जेसीबाच्या साह्याने पोलीस बंदोबस्तात तोडण्यास सुरूवात केली होती. मागील चार दिवसाच्या कालावधीत इमारतीचे सज्जे, गच्ची तोडून झाल्यानंंतर या इमारतीच्या चारही बाजुला जेसीबीच्या साहाय्याने छिद्र पाडून ही इमारत शुक्रवारी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे भुईसपाट करण्यात आली. आय प्रभागात बेकायदा बांंधकामांच्या विरुद्ध साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आक्रमक कारवाई सुरू केल्याने भूमाफियांची दाणादाण उडाली आहे. आडिवलीतील शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्यात आल्याने परिसरातील सोसायट्यांमधील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. कल्याण पूर्वेत आय प्रभागात आडिवली-ढोकळी येथे शाळेच्या आरक्षित भूखंडावरील बेकायदा इमारत आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार आचारसंहितेचा भंग होणार नाही अशा पद्धतीने जमीनदोस्त करण्यात आली. आय प्रभागात बेकायदा बांधकामांवर सतत करावाई सुरू असल्याने या भागातील बेकायदा बांधकामे उभारणीची कामे बंद आहेत. – हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग, कल्याण पूर्व.

डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील एका बस थांब्याजवळील सोनमोहोर झाडावर एक कावळा पतंगीच्या मांजाच्या जाळ्यात सोमवारी सकाळी अडकला होता. मांजाचा फास कावळ्याच्या पाय, पंखाला लागल्याने कावळ्याला उडणे शक्य होत नव्हते. झाडाच्या टोकाला कावळा असल्याने स्थानिकांनी पालिका अग्निशमन जवानांना घटनास्थळी बोलविले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून कावळ्याची मांजाच्या फासातून सुखरूप सुटका केली. मांजाच्या फासामुळे कावळ्याच्या पंख, पाय आणि मानेला दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी प्राणी मित्रांनी दवाखान्यात नेले. डोंबिवली एमआयडीसीतील शेवटच्या निवासी बस थांंब्याजवळील एका सोनमोहोर झाडावर एक कावळा पतंगीच्या अडकेलेल्या मांज्याला फास लागून लटकत असल्याची माहिती या भागातील एक पानटपरी चालक शत्रुघ्न सोनोने यांनी स्थानिकांना दिली. इतर कावळ्यांंनी अडकलेल्या कावळ्याच्या सुटकेसाठी काव काव गलका सुरू केला होता. झाडाच्या टोकाला एका बाजूला कावळा अडकल्याने त्याला काठीने सुखरूप बाहेर काढणे शक्य नव्हते. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी पालिक अग्निशमन विभागाला दिली. जवानांनी बांंबूच्या काठीने आणि त्याला लावलेल्या विळ्याने कावळा अडकलेल्या भागापर्यंत काठी नेली. पीडित कावळ्याला कोणत्याही प्रकारची जखम होणार नाही अशा पद्धतीने जवानांनी कावळ्याला मांजाचा दोरा तोडून खाली ओढले. काही अंतरावर कावळा मांजा तुटल्याने जमिनीवर पडला. त्याला तत्काळ प्राणी मित्र अभिजीत पाटील, हर्षदीप जाधव यांनी प्राथमिक उपचार करून अधिकच्या उपचारासाठी पशुवैद्यक डाॅक्टरांकडे नेले. अग्निशमन दलाचे पाचशे सेवा शुल्क सोनोने, नलावडे यांंनी बचाव पथकाकडे दिले. सार्वजनिक ठिकाणी झाडावर, मांजात अडकलेल्या प्राण्यांची सुटका करताना अग्निशमन दलाकडून संपर्क करणाऱ्या नागरिकाला पहिलेच संबंधित प्राण्याच्या बचावासाठी ५०० रुपये शुल्क भरणा करावे लागेल, असे सांंगितले जाते. अशाप्रकारचे शुल्क प्राण्यांचे जीव वाचविण्यासाठी आकारू नये, अशी मागणी पक्षी, प्राणी, सामाजिक कार्यकर्त्यांची आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हिदू मुस्लिम एकता इफ्तारी-२०२४ चे आयोजन

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रमजान सणानिमित्त रविवारी, ‘हिदू मुस्लिम एकता इफ्तारी-२०२४’ चे आयोजन करण्यात आले. सामाजिक सलोखा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हिंदू मुस्लीम सर्व समाज एकत्र येऊन सण साजरे करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपेसाहेब व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्लासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मी व  माझे सहकारी उमेर फारुकी यांच्यातर्फे इफ्तारी पार्टीचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने एकच संदेश आहे, या देशात, या राज्यात सर्व हिंदू मुस्लीम एकत्र आहेत, अशी प्रतिक्रिया ठाणे परिवहन समिती सदस्य मोहसीन शेख यांनी व्यक्त केली. अजितदादा यांनी जपलेल्या शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा कायम ठेवून दिवाळी सण साजरा करताना जसे नजीबभाई, मोहसीनभाई व पक्षाचे मुस्लीम सहकारी सहभागी होतात तसेच रमजान सणानिमित्त आयोजित इफ्तारी पार्टीतही आम्ही हिंदू-मुस्लीम सर्व  सहकारी एकत्र सहभागी झालो आहोत. प्रदेश प्रवक्ते, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपेसाहेब व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्लासाहेब यांची एकी लोकांना दिसून येते. त्याचप्रमाणे आम्ही सर्व हिदू मुस्लिम सहकारी एकत्रपणे सण साजरे करतो आणि पक्षाचे कामही एकत्र करत आहोत, असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदेश पाटील यांनी व्यक्त केले. ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने,  मध्यवर्ती कार्यालयासमोर रविवारी, परिवहन समिती सदस्य मोहसीन शेख आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर (जिल्हा) सेक्रेटरी उमेर फारुकी यांच्या आयोजनाखाली, रमजान सणानिमित्त ‘हिंदू मुस्लीम एकता नजीब मुल्ला इफ्तारी २०२४’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा सरचिटणीस रविंद्र पालव, ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. वनिताताई गोतपागर, डाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदेश पाटील, ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष प्रा. हुसैन मणियार, ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा सरचिटणीस रविंद्र पालव, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, अजित सावंत, महिला विधानसभा अध्यक्षा सौ. वंदना खानोलकर, सौ. अरुणा पेंढारे, सौ. सुवर्णा खिल्लारी तसेच मोठ्यासंख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मुस्लीम व हिंदू बांधव तसेच महिला भगिनी उपस्थित होत्या.

ठाण्याच्या डॉ. अनुप देवांना  ‘आभामंडळा’चे पेटंट

ठाणे : ठाण्याचे दंतवैद्य डॉ. अनुप देव यांना ‘आभामंडळा’चे पेटंट मिळाले आहे. भारत सरकारच्या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ॲक्ट अंतर्गत नुकतेच मंजूर झाले आहे. अशा प्रकारचे जागतिक स्तरावरील हे एकमात्र पेटंट आहे. गेली…

भारताच्या युवकाने  केला पुश-अप्सचा नवा विश्वविक्रम

ठाणे : सांगोला तालुक्यातील खिलारवाडी गावचे सुपुत्र संजय देवकाते यांनी एका मिनिटात मोस्ट नकल पुश अप्सचा नवा जागतिक विक्रम नोंदवला आहे. त्यांनी एका मिनिटात १२१ नकल – पुश अप्स मारून…

बुधवारपासून खारलँड मैदानात एमसीएतर्फे मुलींची निवडचाचणी

ठाणे : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरातील १७ वर्षाखालील मुलींसाठी बुधवारपासून दरवर्षी प्रमाणे कळव्यातील खारलँड मैदानात निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.  मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी…

४८ वी ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धा

डीटीडीसीने विजेतेपद राखले ठाणे : एकतर्फी लढतीत डीटीडीसी संघाने रूट मोबाईलचा आठ गडी राखून दणदणीत पराभव करत ४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेतील या गटाचे विजेतेपद आपल्याकडे कायम राखले…

१३ एप्रिलपासून ठाण्यात समता संस्कार शिबिर

ठाणे : दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा १३ एप्रिल पासून १६ एप्रिल पर्यंत समता विचार प्रसारक संस्थेतर्फे येऊर येथे समता संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १० वी च्या परीक्षेला बसलेल्या आणि कॉलेज मध्ये जाणाऱ्या १८ ते २५ वयाच्या युवक युवतींसाठी असलेल्या या निवासी शिबिरात शरीर विज्ञान, माध्यमांचा प्रभाव, मोबाईल चा विवेकी वापर, आकाश दर्शन, अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक विषयांवर रंजकपणे, खेळांच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे. डॉ. संजय मंगला गोपाळ, वंदना शिंदे, प्रशांत केळकर, राजू बहाळकर, हर्षदा बोरकर या सारखे मान्यवर मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याच बरोबर शॉर्ट फिल्म दाखवून त्यावर चर्चा करण्यास सुप्रसिद्ध माहितीपट दिग्दर्शक संतोष पाठारे येणार आहेत. मुलांना शिस्तीचे धडे देत व्यक्तिमत्व विकास होण्याबरोबर त्यांच्या सामाजिक जाणिवा जागृत व्हाव्या हा मुख्य उद्देश हे शिबिर भरवण्यामागे आहे. येऊर येथील निसर्गरम्य वातावरणात संपन्न होणार्‍या या शिबिरात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येंने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी सचिव अजय भोसले (८१०८९४९१०२) यांना संपर्क करावा. जागा मर्यादित आहेत.