भरत कोळी व नीलांश चिपळूणकर उपांत्य फेरीत
पीएम बाथ कॅरम स्पर्धा मुंबई: जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने पी. एम हिंदू स्विमिंग बाथ अँड बोट क्लब, चर्नी रोड येथे सुरु असलेल्या मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या…
trendlyne-news
पीएम बाथ कॅरम स्पर्धा मुंबई: जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने पी. एम हिंदू स्विमिंग बाथ अँड बोट क्लब, चर्नी रोड येथे सुरु असलेल्या मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या…
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भारतीय इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन कल्याण : कल्याण पश्चिम येथील गौरीपाडा परिसरातील भारतीय इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रयोगांचे आकर्षक प्रदर्शन आयोजित केले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थापक प्रभाकर जाधव आणि मुख्याध्यापिका सोनाली धाकराव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विज्ञान प्रदर्शन यशस्वीरीत्या पार पडले. या प्रदर्शनात एकूण ४८ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित प्रयोग सादर केले. विद्यार्थ्यांनी ऊर्जा संवर्धन, पर्यावरण संरक्षण, अंतराळ विज्ञान, रोबोटिक्स तसेच दैनंदिन जीवनातील विज्ञान या विषयांवर प्रात्यक्षिके सादर करून आपली गुणवत्ता दाखवून दिली. कार्यक्रमास इतर विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रयोग पाहून त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले. शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रसंगी मुख्याध्यापिका सोनाली धाकराव यांच्यासह शिक्षिका वैशाली दळवी, जयंश्री वानी, अर्चना अर्कल, प्रीती गौड, पल्लवी जायसवाल, कविता घेवादे तसेच शिक्षक राजेश परमार, संगीता सिंह आणि प्रणाली काळे उपस्थित होते. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड आणि जिज्ञासा अधिक वाढली आहे. अशा उपक्रमांमुळे त्यांचा आत्मविश्वासही बळकट होतो, असे मत व्यक्त करण्यात आले.
भावी पोलिसांची रस्त्यावरील परवड थांबवा – प्रताप सरनाईक मिरा-भाईंदर- ‘राज्याच्या सुरक्षेची धुरा भविष्यात ज्यांच्या खांद्यावर असणार आहे, त्या तरुण उमेदवारांना आज मिरा-भाईंदरमध्ये उघड्यावर रात्र काढावी लागणे, ही प्रशासनासाठी अत्यंत लज्जास्पद बाब आहे,’ अशा कठोर शब्दांत महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रशासकीय ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी पोलीस भरतीसाठी आलेल्या हजारो युवक-युवतींच्या निवासाची आणि मूलभूत सुविधांची तत्काळ व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांच्यात नियोजनाचा अभाव असल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचा ठपका पत्रात ठेवण्यात आला आहे. सोबतच मिरा-भाईंदर महानगरपालिकेची सभागृहे, एमएमआरडीए (MMRDA) आणि बीएसयूपी (BSUP) अंतर्गत असलेल्या रिक्त सदनिका पोलीस भारती देण्यासाठी आलेल्या उमेदवारांसाठी तात्काळ खुल्या कराव्यात, अशी सूचना देखील आयुक्तांना करण्यात आली आहे. प्रशासकीय दिरंगाई होत असतानाच, उमेदवारांच्या भोजनाची संपूर्ण जबाबदारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्वतः आणि त्यांच्या शिवसेना संघटनेच्या वतीने स्वीकारली असल्याचे हि या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.यासंपूर्ण प्रकरणाबद्दल बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात कि, ‘दोन-दोन दिवस उन्हातानात तग धरून हे तरुण आपल्या भविष्याची परीक्षा देत आहेत. जे उद्या कायदा व सुव्यवस्था राखणार आहेत, त्यांनाच आज सुरक्षित आसरा न मिळणे हे वेदनादायी आहे. प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून यावर ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा ही अनास्था खपवून घेतली जाणार नाही. तसेच भविष्यातील भरती प्रक्रियेसाठी कायमस्वरूपी ‘समन्वय आराखडा’ तयार करावा” प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून सकारात्मक पावले न उचलल्यास, उमेदवारांच्या हक्कासाठी अधिक आक्रमक भूमिका घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
केडीएमसी-धर्माधिकारी प्रतिष्ठानची विशेष स्वच्छता मोहीम यशस्वी कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका व महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन आज करण्यात आले होते. कल्याण पश्चिमेत महापौर हर्षाली चौधरी ,आयुक्त अभिनव गोयल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील इतर पालिका सदस्य यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात स्वच्छता मोहीम राबविली तर डोंबिवली पूर्वेत महापालिका कार्यालयानजीकच्या परिसरात उपमहापौर राहुल दामले व इतर पालिका सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या सह १०० पोलिसांनी देखील या मोहिमेत सहभाग घेतला. महापालिकेच्या प्रभागांतही मनपा स्वच्छता अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य तसेच पालिका सदस्य यांनी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. आमदार राजेश मोरे व सुलभा गायकवाड यांनी देखील इतर पालिका सदस्यांसमवेत स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. या मोहिमेदरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यावरील कचरा, धुळ ,माती साफ सफाई करून घंटागाडी,डंपर मार्फत संकलित करण्यात आली. सुमारे १७५८० किलो ओला कचरा आणि ४६९९६ सुका कचरा यावेळी संकलित करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेकरिता महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे जवळपास ४००० सदस्य व महापालिकेचे जवळपास १००० कर्मचारी तसेच पालिका सदस्य सहभागी झाले होते.
कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन कॅनेडियन शिष्टमंडळासाठी स्वागत कार्यक्रम मुंबई : (अशोक गायकवाड )—जगात पर्यावरणाचे संवर्धन आणि हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगती साधण्याचे आव्हान उभे आहे. महाराष्ट्रही हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगतीचा ठसा उमटवत आहे. कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी आहेत. कॅनडा येथील शैक्षणिक संस्था, उद्योजक यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित कॅनडाचे राष्ट्रीय महसूल मंत्री फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन, कॅनडातील न्यू ब्रन्सविक राज्याच्या प्रीमियर सुसान होल्ट व शिष्टमंडळासाठी आयोजित स्वागत कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, बृहन्मुंबई आयुक्त भूषण गगराणी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, उद्योग विभागाचे सचिव पी अन्बळगण आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. मुंबईला दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागात विकासाच्या मोठ्या संधी आहेत. तसेच नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय ‘एज्युसिटी’ निर्माण करण्यात येत आहे. या ठिकाणी विदेशातील नामांकित विद्यापीठे आपले शैक्षणिक दालने उघडणार आहेत. आतापर्यंत पाच विद्यापीठांना ‘ लेटर ऑफ इन्टेंट’ देखील देण्यात आले आहे. विद्यापीठांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन काम करीत आहे. महाराष्ट्र हे ६० टक्के २७ वर्ष वयापर्यंत लोकसंख्या असलेले राज्य आहे. कॅनडा येथे राज्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात असतात. त्यामुळे कॅनडा येथील विद्यापीठांनी महाराष्ट्रात येत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय ‘एज्युसिटी’ मध्ये आपली शैक्षणिक दालने उघडावी. कॅनडा कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धन यामध्ये मोठे काम करीत आहे. कॅनेडियन शासनाने यासाठी व्यवस्था उभ्या केल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासन भविष्यातील महाराष्ट्र घडवण्यासाठी डाटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, स्टार्टअप आदी क्षेत्रात कार्य करीत आहे. नुकतीच कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरती यशस्वी वैचारिक मंथन करणाऱ्या परिषदेचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात आले. कृषी विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून डिजिटल व्यासपीठावर आणण्यात आले आहे. याकरिता राज्य शासन महाविस्तार उपक्रमही राबवत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत आहे. महाराष्ट्र पण त्याला अपवाद नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. कॅनडा शिष्टमंडळाचा भारत दौरा आणि मुंबईतील हा कार्यक्रम आपल्या द्विपक्षीय संबंधांची खरी सुरुवात आहे. भविष्यातही कॅनडाने अशाच प्रकारे भारत आणि महाराष्ट्राला भेट देण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी कॅनडाचे राष्ट्रीय महसूल मंत्री फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन यांनी भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना मोठा इतिहास असल्याचे सांगत भविष्यातही हे सहकार्य असेच दृढ होत राहील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच कॅनडाच्या न्यू ब्रन्सविकच्या राज्याच्या प्रीमियर सुसान होल्ट यांनी महाराष्ट्र आणि न्यू ब्रन्सवीकमधील सहकार्य आणि संबंधाविषयी भाष्य केले. उद्योग विभागाचे सचिव डॉ पी अनबलगन यांनी राज्य शासनाच्या उद्योग धरण आणि ‘ इज ऑफ डूइंग बिझनेस’ विषयी सादरीकरण केले. तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण चे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार यांनी मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांविषयी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एज्युसिटी, मेडिसिटी एरोसिटी, खारघर येथील आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र याविषयी सादरीकरण केले. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी नवी मुंबई येथे विदेशी विद्यापीठांसाठी उभारण्यात येत असलेल्या पायाभूत सुविधा व राज्यातील उच्च शिक्षणाच्या परिस्थितीविषयी सादरीकरण केले. तसेच मित्रा संस्थेच्या वतीने राज्यातील विकासाच्या परिवर्तनाविषयी चित्रफित दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी केले. कार्यक्रमाला कॅनडियन शिष्टमंडळातील प्रतिनिधी, विद्यापीठांचे प्रतिनिधी, भारतीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उद्योजक, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
विज्ञान, वाणिज्य शाखेसाठीही लवकरच मराठीतून पुस्तके विश्व मराठी संमलेनातील परिसंवादात दावा हरिभाऊ लाखे नाशिक : राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत मातृभाषेतील ज्ञानाने आत्मविश्वास विकसित करणे तसेच मातृभाषेचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे. शिक्षणाचे मूळ संस्कृतीत आहे. लवकरच पदवीसाठी विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पुस्तके मराठीत आणण्यात येणार असल्याची माहिती अभ्यासक्रमातील मराठी भाषा या विषयावरील परिसंवादात देण्यात आली. येथील के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या आवारात आयोजित विश्व मराठी संमेलनात परिसंवाद झाला. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणककर , कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी परिसंवादात सहभाग घेतला. डॉ. देवळाणकर यांनी, शिक्षणाचे महत्व कमी होत असल्याचे सांगितले. शुल्क किंवा अन्य गोष्टींवर चर्चा होत असतांना परदेशात मात्र शिक्षण आणि शिक्षकाला महत्व आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे मातृभाषेला महत्व देण्यावर भर दिला जात असल्याचे नमूद केले. डॉ. सोनवणे यांनी अभ्यासक्रम आणि मराठी या गोष्टींचा विचार करायला हवा. मराठी भाषा आत्मविश्वास निर्माण करते. भाषेमध्ये आपण आशयाचा आधार घेतो. मराठी समृद्धीसाठी भाषा समकेंद्री , शब्द संपदा, व्याकरण यांचा विचार व्हायला हवा. मराठी भाषा तंत्रस्नेही होणे आवश्यक असल्याचे मांडले. डॉ.आवलगावकर यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी शैक्षणिक पातळीवर भाषेचा व्यापार, व्यवहार यामध्ये कितपत उपयोग होतो, हे पाहणे गरजेचे असल्याचे मांडले. शैक्षणिक पातळीवर या अनुषंगाने विविध अभ्यासक्रम मराठीत तयार करण्यात येत आहेत. त्यामध्ये उच्चारण आणि लेखन यावर भर देणे आवश्यक आहे. भाषेशी असणारी आपली नाळ तुटता कामा नये, याची काळजी घ्यायला हवी, असे त्यांनी सांगितले. डॉ. कुलकर्णी यांनी शब्दकोशाच्या बाबतीत आपल्याकडे फारसे काम झाले नसल्याची खंत व्यक्त केली. डॉ. गोसावी यांनी कला, विज्ञान, वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत येत असून पुढील वर्षापासून ती मिळतील. विज्ञान आणि भाषा एकत्र आणण्याचे काम होणे गरजेचे आहे. बोलीभाषाही तितकीच महत्वाची असल्याचे मांडले.
व्ह्यूज पेपर : वर्तमानपत्राच्या ओळींच्या आडून उलगडणारा कलाप्रवास राजेंद्र साळसकर मुंबई : वर्तमानपत्र हे केवळ बातम्यांचे माध्यम नसून ते एक कला कॅनव्हास ठरू शकते, याची प्रचिती व्यंगचित्रकार, लेखक, कवी आणि अमूर्त कलावंत प्रदीप म्हापसेकर यांच्या…
शासनाचे सुरक्षा रक्षक मंडळ हप्तेखोरीच्या विळख्यात मंडळाच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप, रक्षक संतप्त रमेश औताडे मुंबई : नवी मुंबई येथील वाशी परिसरात शासनाच्या सुरक्षा रक्षक मंडळातील पर्यवेक्षकाला लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर शासनाच्या या सुरक्षा रक्षक मंडळाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १९८१ साली स्थापन झालेल्या या मंडळाला ४६ वर्षाहून अधिक काळ लोटला असताना, आजही या मंडळात कामगार मंत्री व अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार, संगनमत आणि हप्तेखोरीच्या आरोपांनी मंडळातील वातावरण गढूळ झाल्याची चर्चा सुरक्षा रक्षक व कामगार विभागात सुरू आहे. काही सुरक्षा रक्षकांचे म्हणणे आहे की, मंडळातील अध्यक्ष, सचिव, निरीक्षक, क्लार्क आणि काही वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमतामुळे खाजगी सुरक्षा ठेकेदारांकडून नियमित आर्थिक व्यवहार (हप्ते) चालतात. ‘पोस्टिंग, ड्युटी वाटप, हजेरी नोंदणी, कंत्राट नूतनीकरण अशा प्रत्येक टप्प्यावर दबाव टाकला जातो. पैसे दिले तरच काम सुरळीत चालते,’ असा गंभीर आरोप काही रक्षकांनी केला आहे. काही कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा दावा आहे की, सुरक्षा रक्षकांकडून दरमहा कपातीच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम वसूल केली जाते. वेतनवाढ, पीएफ, ईएसआय, सुट्ट्या आणि इतर हक्कांबाबत सातत्याने टोलवाटोलवी केली जाते. ‘मंडळ सरकारचे आहे. पण निर्णय मात्र खाजगी ठेकेदारांच्या फायद्याचे घेतले जातात,’ असा आरोपही करण्यात आला आहे. अध्यक्ष व सचिव बघ्याची भूमिका घेत आहेत. कामगार मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय असा कारभार शक्य नाही, असा दावा काही कामगार संघटनांनी केला आहे. ‘तक्रारी दिल्या जातात; पण त्यावर कारवाई होत नाही. उलट तक्रारदारांनाच त्रास दिला जातो,’ असा आरोप एका संघटनेच्या नेत्याने केला. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार युनियनचे नेते लक्ष्मणराव भोसले यांनी निवेदन देत मंडळाच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी, आर्थिक लेखापरीक्षण आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच कायद्याची व शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कामगार मंत्री यांना २० पानाचे सविस्तर एक निवेदन दिले आहे.त्या निवेदनात मी असे म्हटले आहे की, कामगार कायद्याप्रमाणे व शासनाच्या शासन निर्णयात जे म्हटले आहे ते जर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी मनावर घेतले तर व त्याची काटेकोर अंमलबजाणी केली तर सुरक्षा रक्षकांना न्याय मिळेल. मात्र कामगार मंत्री यांचे बगल बच्चे खाजगी ठेकेदार यांना नाराज करू शकत नाहीत. म्हणून कामगार मंत्री पण फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.या पार्श्वभूमीवर आंदोलन उभारले जाईल, असा इशारा कामगार नेते लक्ष्मणराव भोसले यांनी दिला आहे आहे. काही अधिकाऱ्यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. “मंडळाचा कारभार नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने चालतो. काही नाराज घटकांकडून बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. शासन चौकशी करेल, आम्ही सहकार्य करू,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, सुरक्षा रक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. पण आमचेच हक्क असुरक्षित आहेत,” शासनाने तातडीने सर्वंकष चौकशी करून, आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता सुनिश्चित करावी आणि रक्षकांच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी जोर धरत आहे. या सर्व आरोपांमुळे सुरक्षा रक्षक मंडळाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता शासन आणि कामगार मंत्रालयाकडून ठोस पावले उचलली जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बालक मंदिर संस्था आयोजित विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद कल्याण : शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कला ही अत्यंत महत्त्वाची आहे. कला विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासाला चालना देते. त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो आणि सर्जनशीलता वाढते. विद्यार्थ्यांच्या जन्मजात प्रतिभांना वाव मिळावा या उद्देशाने, कल्याणमधील बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेने गेल्या नऊ वर्षांपासून ही जिल्हास्तरीय आंतरशालेय रंगभरण आणि हस्ताक्षर स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली आहे. आणि हे वर्ष स्पर्धेचे दहावे वर्ष आहे. नेहमीप्रमाणे, इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय आंतरशालेय रंगभरण आणि हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बहुतेक शाळांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावर्षी या स्पर्धेला सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सर्व शाळांमधील सुमारे ५००० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी कठोर परिश्रम घेतले. या वर्षीच्या स्पर्धेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या वर्षी या स्पर्धांमध्ये दोन नाविन्यपूर्ण स्पर्धा जोडण्यात आल्या आहेत: एकपात्री अभिनय आणि समूह गायन. या दोन्ही स्पर्धा पहिल्यांदाच होत असल्याने, सहभागींची संख्या तुलनेने कमी होती, परंतु प्रतिसाद आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त होता. सुमारे २०० स्पर्धकांनी या स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतला. तसेच, स्पर्धेसाठी आलेल्या सर्व शाळांनी आयोजक म्हणून काम करणाऱ्या आमच्या बालक मंदिर संस्थेबद्दल स्पर्धकांनी खूप सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार, २८ फेब्रुवारीला कल्याण येथील बालक मंदिर संस्थेच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निखिल राणे (स्मायलिंग व्हिसलर), सुधीर चित्ते (रंगकर्मी) आणि रमेश गोरे, बालक मंदिर संस्था प्राथमिक शाळेचे अध्यक्ष उपस्थित होते.
किडनी पेशंटला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मदत कल्याण: कल्याणमधील किडनी पेशन्टला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रामबाग शाखेतर्फे रूपये ५० हजार रुपयांची मदत करण्यात आली. शिवसेना रामबाग शाखेचे निष्ठावंत शिवसैनिक व ओम कबड्डी संघाचे खेळाडू मंगेश नेटावटे यांना किडनीचा मोठा आजार झाला. त्यांना आता डायलीसच्या मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागणार आहे. त्यांना मीरा हॉस्पिटल मध्ये पंधरा दिवस उपचार घ्यावे लागले, मीरा हॉस्पिटल ने त्यांना बिल कमी करून भरपुर सहकार्य केले. त्यांचा डायलीसीसच्या मोठ्या खर्चाचा विचार करून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी मार्गदर्शनाखाली रामबाग शाखेने तसेच शिवजयंती उत्सवात तर्फे रू.५० हजरांचा धनादेश देऊन सहकार्य केले.