सचिनभाऊ अहिर चषक

मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर चषक १२ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क बुध्दिबळ स्पर्धेमध्ये ११ वर्षीय शुभदा पाताडेने विजेतेपद पटकाविले. उदयोन्मुख शुभदा पाताडेने साखळी पाचही सामन्यात निर्विवाद वर्चस्व राखत सर्वाधिक ५ गुणांसह विजेतेपदाला गवसणी घातली. समान ४ गुण नोंदविणारे पृथ्वीराज देढीया व जीयांश पटेल यांचे आव्हान उत्तम सरासरीच्या बळावर मागे सारत अनन्या चव्हाणने (४ गुण) उपविजेतेपदावर झेप घेतली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, उपाध्यक्ष सुनील बोरकर, प्राचार्य केतन सारंग, बुध्दिबळ मार्गदर्शक विशाल माधव, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, विलास डांगे, शिवाजी काळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला.पाचव्या साखळी सामन्यात पहिल्या पटावर शुभदा पाताडेने आहन चौधरीच्या राजाला २४ व्या मिनिटाला शह दिला आणि सर्व साखळी सामने जिंकून १२ वर्षाखालील गटाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. दुसऱ्या पटावर अनन्या चव्हाणने राणी व हत्तीच्या सहाय्याने काश्वी बन्सलच्या राजाला नमवून महत्वाचा विजय मिळविला आणि अंतिम उपविजेतेपद हासील केले. तिसऱ्या पटावर आक्रमक खेळ करणाऱ्या पृथ्वीराज देढीयाने मृणांक हाथीला १९ मिनिटात शह दिला आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.
१२ वर्षाखालील गटात पृथ्वीराज देढीयाने (४ गुण) तृतीय, जीयांश पटेलने (४ गुण) चतुर्थ, आहन चौधरीने (३ गुण) पाचवा, काश्वी बन्सलने (३ गुण) सहावा, अन्वी अग्रवालने (३ गुण) सातवा तर साईराज बागकरने (३ गुण) आठवा पुरस्कार जिंकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *