नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणूका जाहिर झाल्यात आणि भारतातील सगळ्यात जुन्या आणि सर्वात मोठ्या विरोधी पक्षाकडे आज रेल्वेचे तिकीट काढण्यासाठीही खर्च करण्याची परवानगी नाही. इन्कम टॅक्सने भारतीय जनता पक्षाशी षडयंत्र करून आमची खाती गोठवली आहेत. भाजपाच्या या हुकुमशाहीची न्यायालयानेच दखल घ्यावी अशी आर्त साद आज काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत घातली.

 “जर एखाद्या कुटुंबाचं खातं गोठवलं गेलं तर त्या कुटुंबासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिल, त्यांना उपाशी मरावं लागेल. हेच काँग्रेस पक्षाबरोबर करण्यात आले आहे. एक महिन्यापूर्वी काँग्रेसची खाती गोठवल्यानंतरही या देशातील न्यायालय, निवडणूक आयोग काहीही बोलायला तयार नाही. सर्वजण शांतपणे हा तमाशा पाहत आहेत. आम्ही २० टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करत आहोत. आज आम्ही रेल्वे तिकीट विकत घेऊ शकत नाही, आमच्या नेत्यांना प्रचारासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात पाठवू शकत नाही. आम्ही जाहिरात करू शकत नाही. आज आमच्याकडे दोन रुपयेही नाहीत”, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला.

काय आहे प्रकरण ?

राहुल गांधी पुढे म्हणाले, “सात वर्षांपूर्वी १४ लाखांचा कर भरण्यात काही कसूर झाली, त्याबद्दल २०० कोटी रुपये असलेली आमची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. प्राप्तिकर कायद्याच्या तरतुदीनुसार अशाप्रकारे कर भरण्यात उशीर झाला तर जास्तीत जास्त १०,००० रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. मात्र तरीही बळजबरीने, गुन्हेगारी पद्धतीने आमच्याविरोधात कारवाई केली जात आहे. भारताचे पंतप्रधान आमचे संवैधानिक अधिकार गुन्हेगारी पद्धतीने हिरावून घेत आहेत. माझे भारतीय स्वायत्त संस्थांना आवाहन आहे की, त्यांनी या विषयात काहीतरी करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *