स्वाती घोसाळकर
मुंबई: ठाणे आणि नाशिकच्या जागेवरुन महायुतीचे जागावाटप अडले आहे. या दोन्ही जागा शिवसेनेच्या वाटेच्या असून तेथे भाजपा आपल्या जागांसाठी आग्रही आहे. ४८ पैकी उर्वरीत ४६ जागांवर तिन्ही पक्षांत एकमत झाल्याचे सुत्रांनी सांगितले.
ठाण्यातील विद्यामान खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिल्याने भाजपाने या जागेवर दावा सांगितला आहे. येथून विनय सहस्त्रबुध्दे किवा गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांच्या उमेदवारीसाठी भाजपा आग्रही आहे. या लोकसभा मतदारसंघात भाजपचे 4 आणि शिवसेनेचे 2 आमदार आहेत. स्वता मुख्यंत्री शिंदेही येथूनच निवडून येतात म्हणून त्यांनी हा मतदार संघ प्रतिष्ठेचा केला आहे. तर नाशिकमध्ये स्थानिक भाजपा कार्यकर्ते विद्यमान खासदार हेमंत गोडसें यांच्या विरोधात असून भाजपाने तेथून उमेदवार उभे करावे यासाठी जोरदार निर्दशने करीत आहे.
महायुतीचे जागावाटप जाहिर होण्यापुर्वीच शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना नाशिकच्या जागेवर हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहिर केली होती. त्यांनी एकतर्फी ही उमेदवारी घोषित केल्यामुळे स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी जाहिर निदर्शनेही केली होती.
हेमंत गोडसे यांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘मनसे’तर्फे प्रथमच खासदारकीची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करवा लागला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेकडून २०१४ सालची निवडणूक लढवित छगन भुजबळ यांचा पराभव केला. २०१९ साली गोडसे यांनी समीर भुजबळ यांचा पराभव करत दुसऱ्यांदा नाशिकचे खासदार बनले. आता हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभेतून विजयी हॅटट्रिक करण्याच्या तयारीत असतानाच त्यांची उमेदवारीच धोक्यात आली आहे.
भाजपचे नाशिक लोकसभा मतदारसंघात 3 आमदार आहेत. त्यामुळे भाजप पूर्ण ताकद वापरून ही जागा आपल्याकडे घेण्याच्या प्रयत्नात आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे 2 तर काँग्रेसचा 1 आमदार आहे. त्यामुळे संख्याबळ पाहता शिवसेनेची ताकद इथे कमी असल्याने, याच मुद्द्यावरून ही जागा राष्ट्रवादी आणि भाजप स्वतः कडे घेण्याच्या तयारीत आहे.
शिंदे गटाचे संभाव्य जागात कल्याण, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई,
उत्तर पश्चिम मुंबई, पालघर, मावळ, रामटेक, कोल्हापूर, हातकणंगले, बुलडाणा, शिर्डी, हिंगोली, यवतमाळ,वाशिम या १४ जागांवर एकमत झाल्याचे कळते.