हनुमान चाळीसा फळली
शैलेश तिवटे
अमरावती : अमरावतीतील स्वकीयांचा विरोध डावलून भाजपा श्रेष्टींनी विद्यमान अखेर खासदार नवनीत राणांना तिकीट दिले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात हनुमान चाळीसा पठण करण्यासाठी मातोश्रीवर धडक देण्याच्या प्रयत्नात जेलवारी केलेल्या नवनीत राणांना भाजपाने अमरावतीची उमेदवारी घोषित केली आणि भाजपासहीत त्यांच्याय मित्रपक्षातही संतापाची लाट उसळली आहे. नवनितजींना हनुमान चाळीसा फळली अशी प्रतिक्रीया राजकीय वर्तुळात उमटलीय.
त्यातच खासदार नवनीत राणा या बनावट जातप्रमाणपत्र सादर करून अमरावतीची लोकसभा निवडणूक लढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राणा यांचं जातप्रमाणपत्र रद्द करावं असा निर्णय दिला आहे. परंतु, या निर्णयाला राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिलं. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या राणा यांच्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. येत्या आठवड्यात हा निकाल लागण्याची शक्यता आहे. इतकी अनिश्चितता असतानाही नवनीत राणांना तिकीट जाहिर झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार होत्या. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे तेव्हाचे खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. यावेळी त्यांना शिवसेनेच्या अडसुळांकडून, तसेच स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांकडून आणि प्रहार संघटनेच्या बच्चू कडूंकडूनही विरोध होत आहे. असे असले तरी स्वपक्षीय आणि एनडीएतील मित्रपक्षांचा विरोध जुगारून भाजपाने नवनीत राणा यांना अमरावतीतून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. भाजपाने लोकसभा उमेदवारांची सातवी जादी जाहीर केली असून यामध्ये नवनीत राणा यांचं नाव आहे. राणा यांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, अशी ठाम भूमिका अडसूळ यांनी घेतली होती.
अभिनेत्री ते खासदार
नवनीत कौर-राणा या दाक्षिणात्य चित्रपटा अभिनेत्री होत्या. यांनी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याशी २०११ मध्ये विवाह केला. २०१४ च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. परंतु, त्यावेळी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांनी राणा यांचा तब्बल १ लाख ३७ हजार मतांनी पराभव केला होता. राणांच्या जात प्रमाणपत्राविरोधात २०१७ मध्ये आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली होती. याच जात प्रमाणपत्राच्या आधारे राणा यांनी २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यांच्या उमेदवारीला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत त्यांनी अडसूळ यांचा ३७ हजार मतांनी पराभव केला होता.
नवनितजींना शंभर टक्के
पाडणार म्हणजेच पाडणारच
नवनित राणा यांच्या अमरावतीतील उमेदवारीला बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने तीव्र विरोध केला होता. आमचा विरोध डावलून नवनित राणांना तिकीट दिले आहे. आता निवडणूकीत त्यांना शंभर टक्के पाडणार म्हणजे पाडणारच असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
ते म्हणाले, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ज्या नवनीत राणाने आम्हाला अपमानित केलं त्यांचा प्रचार आम्ही करणार नाही. कार्यकर्त्यांची मानसिकताच नाही. राजकारणात झीरो झालो तरीही चालेल पण इतकी शरणागती पत्करणार नाही. काहीही झालं तरीही राणांचा प्रचार करायचा नाही ही कार्यकर्त्यांची मानसिकता आहे. त्यामुळे राणांना आम्ही पाडणार म्हणजे पाडणारच असेही बच्चू कडू म्हणाले