माथेरान : माथेरान मधील मुख्य रस्स्यावर लावण्यात आलेले क्ले पेव्हर ब्लॉक निकृष्ट दर्जाचे असल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळे किरकोळ अपघात घडत असतात याकामी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते राकेश कोकळे यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात प्रशासक राहुल इंगळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
एमएमआरडीए च्या माध्यमातून जवळपास चाळीस कोटी रुपये खर्च करून दस्तुरी पासून माथेरान गावांपर्यंत पर्यावरण पूरक क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनविण्यात आले होते परंतु अत्यंत घाईगडबडीत ही कामे उरकण्यात आली होती. आणलेले ब्लॉक हे उत्तम दर्जाचे आहेत किंवा नाही याची शहानिशा न करता कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे बहुतेक ठिकाणी कच्चे ब्लॉक होते ते झिजून गेल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. यातून मार्ग काढताना पादचाऱ्यांना तसेच पर्यटक, हातरीक्षा, घोडेवाल्याना खूपच त्रासदायक ठरत असून या खड्ड्यात पडून अनेकजण जखमी झाले आहेत. पुढील दोन महिने सुट्टयांचा हंगाम येत असून खड्डेमय रस्त्यामुळे पर्यटनावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी लवकरच ही कामे पूर्ण करून घ्यावीत असे राकेश कोकळे यांनी निवेदनात म्हटले आहे. यावर लवकरच ठोस उपाययोजना करण्यात येईल असे उत्तम प्रशासक तथा कार्यक्षम मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सांगितले.