राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर पदाधिकाऱ्यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त तसेच देशाचा निवडणूक आयोग यांच्याकडे नुकतीच एक तक्रार केली आहे. त्यात नागपुरातील जनार्दन मून नामक व्यक्तीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेच्या वतीने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्याची पत्र परिषद घेतल्याचे नमूद केले असून हे बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे, आणि सदर व्यक्तीवर कडक कारवाईची मागणी केली आहे. जनतेनेही अशा प्रचाराला बळी पडू नये असेही आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे.
हे वृत्त वाचल्यावर हे नेमके प्रकरण काय आहे असा प्रश्न वाचकांच्या मनात निश्चित उपस्थित होईल. त्यामुळे त्याचा खुलासा करणेही गरजेचे आहे. जनार्दन मुन नामक नागपुरातील एक माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. या मुन महोदयांनी काही वर्षांपूर्वी एक मुद्दा उपस्थित केला की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना कुठेही नोंदणीकृत संघटना नाही. त्या संदर्भात त्यांनी धर्मादाय आयुक्त तसेच निवडणूक आयुक्त यांच्याकडे रीतसर पत्र व्यवहारही केला होता. ज्यावेळी त्यांना कळले की ही संघटना कुठेही नोंदलेली नाही, त्यावेळी त्या संदर्भात त्यांनी आक्षेप घेतला. नंतर त्यांनी स्वतः धर्मदाय आयुक्तांकडे रीतसर अर्ज केला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाची संघटना आपण स्थापन केली असून या संघटनेची नागपूर धर्मदाय आयुक्त कार्यालयात रीतसर नोंदणी व्हावी अशी त्यांनी आग्रही मागणी केली.
या मागणीवर चर्वितचर्वण होऊन धर्मदाय आयुक्त यांनी जनार्दन मुन यांचा अर्ज फेटाळला. नंतर त्यांनी वरिष्ठ स्तरावरही प्रयत्न केले. मग ते उच्च न्यायालयात गेले आणि शेवटी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही अपील केले. मात्र सर्वच ठिकाणी त्यांना अपयश आले तरीही आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाची संघटना स्थापन केली असून तिची कार्यकारिणीही गठीत केली आहे असा ते दावा करतात. या कार्यकारिणीचे ते स्वयंघोषित अध्यक्षही आहेत.
याच कथित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने या संघटनेचे कथित अध्यक्ष जनार्दन मुन यांनी काही दिवसांपूर्वी नागपुरात एक पत्र परिषद आयोजित केली. या पत्र परिषदेत आपलाच खरा राष्ट्रीय स्वयंसेवक असून देशात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आणि देशाला जुने दिवस दाखवण्यासाठी मतदारांनी काँग्रेसलाच मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे त्यांनी काँग्रेस पक्षाला चक्क पाठिंबाही जाहीर केला. त्यांच्या या पत्रपरिषदेमुळे नागपूर विदर्भात खळबळ माजणे अपेक्षित होते. त्यानुसार थोडीफार खळबळ उडालीही. मात्र जनसामान्यांना पक्की खात्री आहे की खरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कोणत्याच राजकीय पक्षाला कधीच खुला पाठिंबा जाहीर करत नाही. अशा परिस्थितीत ही संघटना काँग्रेसला तर कधीच पाठिंबा जाहीर करणार नाही. त्यामुळे त्यांचे हे उद्योग फारसे गांभीर्याने घेतले गेले नाहीत. तरीही कोणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर संघचालक राजेश लोया आणि नागपूर महानगर कार्यवाह गुंडूजी बोकारे यांनी पोलीस आयुक्त तसेच निवडणूक आयोग यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या प्रति सर्व प्रसिद्धी माध्यमांनाही देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता जनसामान्यांचा गैरसमज होण्याची शक्यता कमी झाली आहे.
आधी नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना कायम राजकारणापासून दूर राहिलेली आहे. भलेही संघ विचाराच्या मंडळींनी समोर येत १९५२ साली भारतीय जनसंघ नावाचा राजकीय पक्ष गठित केला. पुढे हा पक्ष जनता पक्षात विलीन करण्यात आला होता. १९७९ मध्ये जनता पक्षातील काही संघ विरोधकांनी ज्यावेळी दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा पुढे केला. त्यावेळी जनता पक्षातील सर्व जुने जनसंघाचे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी एप्रिल १९८० मध्ये भारतीय जनता पक्ष नावाचा पक्ष स्थापन केला. तेव्हापासून हा पक्ष वाढत वाढत आज देशातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. या पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल त्यांचे असलेले संबंध कधीही लपवले नाहीत. तसेच संघानेही हे संबंध लपवले नाहीत. मात्र भारतीय जनता पक्षाच्या कारभारात संघाने कधीही हस्तक्षेप केलेला नाही. त्यांनी निवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यावी आणि कोणाला पाठिंबा द्यावा, तसेच कोणाशी युती करावी या निर्णयावर संघ कधीही भाष्य करत नाही किंवा सल्लाही देत नाही. हे सर्व जगजाहीर आहे. त्याचप्रमाणे संघाचे देशभर पसरलेले स्वयंसेवक आणि समर्थक यांनाही ही बाब चांगल्या प्रकारे ज्ञात आहे. त्यामुळे जनार्दन मुन यांचे हे उपद्रव कोणी फारसे गांभीर्याने घेतलेले दिसले नाहीत.
काही वर्षांपूर्वी जेव्हा जनार्दन मुन यांनी सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संघटना गठीत करून ती नोंदवून घ्यावी अशी मागणी करणारे निवेदन धर्मदाय आयुक्त यांना दिले होते. तेव्हा त्यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांना एक प्रश्न विचारला गेला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा २९२५ साली स्थापन झाला. त्या दरम्यान या देशात ज्या ज्या राजकीय किंवा गैर राजकीय विचारधारा पुढे आल्या, त्या सर्व काळाच्या ओघात नामशेष झाल्या आहेत समाजवादाचा आज कुठे उल्लेखही दिसत नाही. हिंदू महासभा देखील कागदोपत्रीच राहिली आहे. एका काळी संपूर्ण देशावर राज्य करणारी काँग्रेस देखील आज अस्तित्वासाठी झगडते आहे. कम्युनिस्ट तर औषधालाही दिसत नाहीत.त्याच वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र शून्यातून फार मोठे विश्व उभे करता झाला आहे. या संघटनेवर केंद्र सरकारने तीनदा बंदीही आणली. इतरही विविध प्रकारांनी या संघटनेला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ही संघटना सतत वाढतच राहिली. भारतीय समाज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात या संघटनेने आपले कार्यकर्ते पाठवून तिथे आपल्या विचारांच्या संघटना उभ्या केल्या आहेत. त्यामुळे आज देशात जवळजवळ अर्ध्या लोकसंख्येचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आलेला आहे, आणि या लोकसंख्येवर संघ विचारांचा प्रभावही पडलेला आहे. आज देशात संघ विचाराला मानणारे नागरिक किती आहेत हे गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिसून आले आहे.
संघाचा हा विस्तार का झाला त्यामागे संघाने झोकून देणाऱ्या निःस्वार्थ कार्यकर्त्यांची देशभर फळी उभी केली. कित्येक तरुणांनी आपले घरदार सोडून संघ प्रचारक म्हणून संघासाठी आयुष्य वेचले. त्यामुळेच संघ आज इतका वाढू शकला आहे, आणि आज तो शतकपूर्ती कडे वाटचाल करतो आहे. जर जनार्दन मुन यांना समांतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उभारायचा असेल तर ते अशा निःस्वार्थ कार्यकर्त्यांची नव्हे, स्वयंसेवकांची फळी उभी करू शकणार आहेत का? जर त्यांना ते शक्य असेल तर त्यांनी जरूर समांतर संघ उभा करावा असे त्यांना त्या पत्र परिषदेत काही पत्रकारांनी सुचवले. या प्रश्नाला ते उत्तर देऊ शकले नाहीत अशी माहिती मिळाली. आजही जनार्दन मूल हे या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाहीत. आजही त्यांनी काही वर्षांपूर्वी स्थापन केलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या वीस पंचवीस कार्यकर्त्यांपेक्षा पुढे जाऊ शकलेला नाही, आणि भविष्यात हे कार्यकर्तेही इतरत्र जातील हा सर्वांनाच ठाम विश्वास आहे. अशावेळी त्यांनी सुरू केलेले हे उपद्रव यामागे कोणीतरी बोलविता धनी असणारच. त्यामुळेच जनार्दन मुन हे उद्योग करत आहेत हे स्पष्ट दिसते आहे.या त्यांच्या उपद्रवांमागे बोलविता धनी कोण आहे ते लोकांसमोर यायला हवेच. कधी ना कधी ते समोर येईल हे नक्की. तोपर्यंत त्यांचे हे उद्योग सुरूच राहणार आहेत.. अर्थात त्याचा फायदा काहीही नाही. कोणीतरी विघ्न संतोषी मंडळींनी चावी देऊन समोर उभा केलेला हा खेळण्यातील जोकर म्हणून जनार्दन मुन कार्यरत आहे. त्यांना लवकरात लवकर सद्बुद्धी व्हावी आणि त्यांनी हा अव्यापारेषु व्यापार थांबवावा हीच आमची अपेक्षा आहे. तोवर संघ विचार आणि संघकार्य हे वाढतच राहणार आहे यात कोणाच्याही मनात शंका नसावी.?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *