विशेष

धनंजय कुरणे

दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार अगदी शिगेला पोहोचला होता. भाजपचे नेते श्री नितीन गडकरी एका दौऱ्यादरम्यान काही वेळासाठी कोल्हापूर विमानतळावर थांबणार होते. ‘दिल्लीतलं काँग्रेस सरकार जाऊन भाजपचं सरकार येणार’ अशी सर्वसाधारण हवा त्यावेळेस होती. या बदलत्या हवेचा अंदाज अगदी स्थानिक पातळीवरच्या सर्वपक्षीय नेत्यांनाही आला असावा. कारण, ‘गडकरी साहेब थोडा वेळ एअरपोर्टवर येणार आहेत’ हे कळताच काँग्रेस, राष्ट्रवादी यासारख्या कट्टर भाजपविरोधी पक्षांचे कोल्हापूरातले नेतेही त्यांना भेटण्यासाठी तिथे गेले होते. दिल्लीत सत्तापालट झाल्यास गडकरींचं मंत्रीमंडळातलं स्थान अगदी निश्चित होतं. तेव्हा, ‘भावी केंद्रीय मंत्र्याच्या ‘गुडबुक्स’ मध्ये असलेलं बरं’ असा लांबचा विचार करून ही मंडळी तिथं पोहोचली होती.
एरवी कोल्हापूरातल्या राजकारणात भाजपचं स्थान फारच किरकोळ होतं. कोल्हापूर हा कधी ‘शेकाप’चा, कधी काँग्रेसचा तर कधी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. शिवसेनाही इथं प्रभावी होती. पण भाजप हा तसा लिंबूटिंबूच होता. तरीही, ‘दूरदृष्टी’ असलेल्या या नेत्यांना गडकरींसमोर हात जोडून उभे असलेलं बघून कोल्हापूरमधील प्रसिद्ध पत्रकार सुधाकर काशीद यांनी एक लेख लिहिला होता.. त्याचं शीर्षक होतं.. ‘वांगी बोळ’ हा कोल्हापूरातला अगदी अरुंद, अडचणीचा पण खूप जुना आणि प्रसिद्ध रस्ता आहे. महाद्वार रोडपासून फुटणाऱ्या अनेक छोट्या रस्त्यांपैकी एक ! या वांगी बोळाच्या तोंडाशी असलेल्या वृत्तपत्रांच्या एका स्टॉलवर तेव्हा ‘भाजपचा अड्डा’ जमत असे. ‘अड्डा’ म्हणजे काय तर खच्चून तीन चार कार्यकर्ते! त्यातले मुख्य म्हणजे कै. सुभाष व्होरा आणि दुसरे प्र. द. गणपुले! निवडणुका जाहीर झाल्या की ही मंडळी प्रचाराला बाहेर पडत. यांचा उमेदवार चौथ्या/पाचव्या नंबरवर येणार हे निश्चित असायचं. अनेकदा डिपॉझीटही जप्त व्हायचं. त्यामुळे ही मंडळी म्हणजे सर्वांच्या चेष्टेचा विषय! 1996 साली बाजपेयी सरकार आल्यावर यांचा भाव थोडा वधारला होता. पण 2004 नंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! दररोज सकाळ- संध्याकाळ वांगी बोळापाशी जमायचं, चर्चा करायच्या आणि आपल्या परीनं कार्य करत रहायचं. यशाची कोणतीही शक्यता दृष्टीपथात नसताना हे लोकं आपल्या विचारांशी ठाम होते.
मात्र 2014 च्या सुरुवातीपासून राजकीय परिस्थिती एकदम झपाट्यानं बदलू लागली. या बदलत्या वाऱ्याचं द्योतक म्हणजे वर उल्लेख केलेला, गडकरी यांच्या कोल्हापूर भेटीचा प्रसंग! त्यावेळी, पत्रकार सुधाकर काशीद यांनी असं लिहिलं होतं की, ‘आजपर्यंत सगळे पक्ष, वांगी बोळाला हसत होते पण आज गडकरींसमोर सर्वांना झुकलेलं पाहून वांगी बोळ हसतो आहे!’
अवघ्या दोन दिवसांपूर्वी एका मित्रानं मला या लेखाबद्दल सांगितलं होतं. आणि आज सकाळी मी महाद्वार रोडवर गेलो तेव्हा अचानक प्र. द. गणपुले समोर दिसले. आज ते 86 वर्षांचे आहेत. ते अविवाहित आहेत. गेली सत्तर वर्षं संघाचं आणि 1980 पासून भाजपचं काम करत आहेत. किमान पस्तीस वर्षं मी त्यांना पाहतो आहे. त्यांच्या राहणीत कोणताही बदल झालेला मला आढळला नाही. पांढरी आखूड विजार, कधीही इस्त्रीचा स्पर्श न झालेला पांढरा सदरा, मानेभोवती लपेटलेलं आणि दोन्ही खांद्यावरून रूळणारं ‘जय श्रीराम’चं भगवं उपरणं, काळी टोपी, कपाळावर भस्म आणि पायात जुनीपुराणी चप्पल! काळ बदलला.. भाजप कार्यकर्त्यांच्या राहणीमानात क्रांतिकारी बदल झाला. पण गणपुले मात्र आहेत तिथेच आहेत. आणि समाधानीही आहेत.
गणपुले हे एक प्रतीक आहेत. ते ‘पायाचे दगड’ आहेत. आज भाजपच्या यशाचा कळस दिमाखात उभा आहे तो अशा कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे आणि अविचल निष्ठेमुळे! असे शेकडो गणपुले देशभर पसरले आहेत आणि लाखो काळाच्या पडद्याआड गेले आहेत. देशात असे अनेक ‘वांगी बोळ’ आहेत आणि आज ते सारे समाधानाने हसत आहेत.
आज, भाजपच्या 45 व्या स्थापनादिवशी, अशा कर्मनिष्ठ कार्यकर्त्यांच्या कार्याला व समर्पणाला आमचा प्रणाम आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *