अनिल ठाणेकर
ठाणे : ईदचा आनंद साजरा करण्यात कोणत्याही प्रकारची कुसूर राहू नये; तसेच, मेहंदी कलावंतांना एक मंच उपलब्ध व्हावा, या उद्देशाने गेली ३ वर्षे आम्ही हा ‘मेहंदी फेस्टीव्हल’ आयोजित करीत आहोत. या फेस्टीव्हलच्या माध्यमातून मेहंदी कलावंतांना रोजगाराची संधी निर्माण करुन देण्याचा आमचा प्रयत्न असून महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर फुलवण्यासाठीच हा फेस्टीव्हल साजरा करण्यात आला आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया शानू पठाण यांनी सांगितले.
ईद हा सण मुस्लीम धर्मियांचा सर्वात मोठा सण. हर्षोल्हास घेऊन येणाऱ्या या सणाच्या अनुषंगाने घर सांभाळणाऱ्या मायभगिनींच्या जीवनात आनंदाचे क्षण यावेत, या उद्देशाने सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया शानू पठाण यांनी सुलताना वेल्फेअर ट्रस्ट आणि एमएसपी फाऊंडेशनच्या वतीने ‘मेहंदी फेस्टीव्हल’ आयोजित केला होता. या फेस्टीव्हलमध्ये सुमारे ११०० महिलांच्या, लहान मुलींच्या हातावर १२० मेहंदी आर्टीस्टने मेहंदी काढली. येत्या गुरुवारी ईद साजरी करण्यात येणार आहे. ही ईद आनंदाचे क्षण घेऊन येणार असली तरी घरकामात अडकलेल्या महिलांना स्वत:ला शृंगार करण्यास वेळच मिळत नसतो. ही बाब ध्यानात घेऊन मर्जिया शानू पठाण यांनी सोमवारी सुलताना वेल्फेअर ट्रस्ट आणि एमएसपी फाऊंडेशनच्या वतीने मेहंदी फेस्टीव्हल आयोजित केला होता. मुंब्रा येथील डायमंड हॉलमध्ये आयोजित केलेला हा उपक्रम गेले ३ वर्षे मर्जिया पठाण या राबवित आहेत.
