ठाणे : मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, मतदानाचा दिवस हा सुट्टी असल्याने बाहेर जावू नका, नागरिकांनी मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावावा अशी जनजागृती ठाण्यातील भारतीय नववर्ष स्वागत यात्रेत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात आले. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने ठाणे महापालिकेच्या मतदान व पाणीपुरवठा विभागास सरकारी सहभागासाठी विशेष पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास व ठाणे महानगरपालिका यांच्या विद्यमाने काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेत महापालिकेच्यावतीने अतिरिक्त् आयुक्त् 1 संदीप माळवी, अतिरिक्त् आयुक्त् 2 प्रशांत रोडे, उपायुक्त् शंकर पाटोळे तसेच महापालिकेच्या विविध विभागांचे विभागप्रमुख सहभागी झाले होते.
भारतीय नववर्षे स्वागत यात्रेत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून निवडणूकीची जनजागृती करणारा चित्ररथ, पाण्याची बचत करा, पाणी जपून वापरा, रेन वॉटर हार्वेस्टिंगचा अवलंब करा अशी जनजागृती करणारा पाणीपुरवठा विभागाचा चित्ररथ, नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा म्हणजेच परिवहन सेवेचा वापर करा असा संदेश देणारा परिवहनचा चित्ररथ व झाडे लावा, झाडे आणि पर्यावरण वाचवा असा संदेश देणारा पर्यावरण व प्रदुषण विभागाचा संयुक्त चित्ररथ सहभागी करण्यात आले होते.
मतदान हे प्रत्येक नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य असून तो बजावणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी मतदान करावे, ‘लोकशाहीचे एकच अनुष्ठान, करा आपले मतदान’ ‘लोकशाहीचा बाळगू अभिमान, चला करु मतदान’ अशी जनजागृती नववर्ष स्वागतयात्रेत करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनाही मतदानाचे महत्व कळावे यासाठी मतदानाचे संदेश असलेले टी- शर्ट घालून त्यांनी निवडणुकीबाबत जनजागृती केली. आपले मत हे अमूल्य असून ते वाया घालवू नका. मतदानादिवशी असलेल्या सुट्टीचा वापर बाहेर जाण्यासाठी करु नका असा संदेश निवडणुकीच्या चित्ररथातून नागरिकांना देण्यात आला. तसेच मतदान करण्यासाठी जाताना आवश्यक असलेल्या ओळखपत्रांची माहितीही या चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आली.