पाये गावातील जलवाहिनी उखडली
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील पाये, पायगाव परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात पुरेसे पाणी मिळत नसल्याने तीव्रपाणी टंचाई जाणवत असल्याने नुकतीच जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपयांची पाणी योजना मंजूर झाली आहे; मात्र ठेकेदाराने मनमानीपणे व नियमानुसार काम न केल्याने या योजनेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे श्रमजीवी संघटनेच्या चैतीताई चिपाट, भारती धापशी, सुमन टोपले, मुक्ता जाधव, कमला दांडेकर, आंनदीताई आणि महिलांनी नुकतेच आंदोलन केले. या वेळी संतप्त महिलांनी सदर योजनेचा पाईप उखडून फेकून दिला.
भिवंडी तालुक्यातील महिलांना एप्रिल, मे महिन्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यंदादेखील आलखिवली, चिबिपाडा, पाये, मैदे, चाणे, चावे, डिघाशी, मोहंडूळ, राहूर, मालबिडी आदी दुर्गम भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भूजल पातळी कमालीची खाली गेल्याने विहिरीचे तळ दिसू लागले आहेत; तर विंधणविहिरीतही खडखडाट झाला आहे.
सरकारने ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत; मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे या योजनाचा बोजवारा उडाला आहे. ठेकेदाराने पाये गावात केवळ अर्धा फूट टाकलेली जलवाहिनी नुकतीच श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्त्यांनी उखडून फेकून दिली आहे. पायेप्रमाणेच संपूर्ण तालुक्यातील या योजनेचे पितळ उघडे पडले आहे.
पाणीटंचाईमुळे त्रस्त महिलांनी भिवंडी तालुक्यातील अपूर्ण पाणी योजनांची शोध मोहीम श्रमजीवीचा नेतृत्वाखाली सुरू केली आहे. अशी माहिती श्रमजीवी संघटनेचे सागर देसक आणि सुनील लोणे यांनी दिली आहे.