माटुंग्याच्या देवीचा ३५० वर्षांचा पुरातन इतिहास; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
मुंबादेवी : माटुंग्याच्या पंचक्रोशीत आपल्या चैतन्यमय आशीर्वादाची पखरण करणाऱ्या ३५० वर्षांचा पुरातन इतिहास असणाऱ्या मरुबाई मातेच्या चैत्री नवरात्री उत्सवाला मंगळवारी (ता. ९) गुढीपाडव्याच्या दिवशी आनंदाची गुढी उभारून सुरुवात झाली. माटुंगा परिसरातील भाविक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत.
माटुंगा पंचक्रोशीतील सायन कोळीवाडा, अँटॉप हिल, वडाळा, दादर, माहीम, वांद्रे परिसरातील भाविकांची या देवीवर विशेष श्रद्धा आहे. देवीला हळद, कुंकू, अक्षता, पुष्पहार, प्रसाद अर्पण करून तिची स्वानंदे साडी, चोळी खणा-नारळाने ओटी भरून भाविक आशीर्वाद घेतात. दैनंदिन देवीचे पूजन, अर्चन, महाभिषेक, नैवेद्य, तांबूल अर्पण करीत महाआरती करण्यात येते.
मरुबाई मंदिर ट्रस्टतर्फे टाटा रुग्णालयाजवळ रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत रोटी, वरण, भात, भाजी आणि गोड लाडू असे अन्नसेवा पुरविण्याचे कार्य सुरू असल्याने भाविकांनी या सेवेसाठी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन विश्वस्त अनिल गावंड यांनी केले आहे.
विशेष दीपपूजनाला वडाळा येथील ललिता सहस्रनाम मंडळींनी ललिता देवीचे सहस्त्रनाम स्तोत्र पठण करीत उपस्थितांना एक वेगळाच अवर्णनीय आनंदी सेवेचा लाभ प्राप्त करून दिला. आशीर्वाद भजन मंडळ, दादर आणि स्वर सखी भजन मंडळाने सुश्राव्य भजने गात उत्सवात रंगत वाढविली. हळदी-कुंकू पूजेला महिला भाविक मोठ्या संख्येने आल्या होत्या. रविवारी सायंकाळी विशेष पूजन पार पडले. बुधवारी श्री राम नवमी उत्सवानिमित्त सायंकाळी मरुबाई गावदेवी भजनी मंडळ आपली भजने सादर करणार आहेत. रविवारी श्रीसूक्त महाअभिषेक आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी मातेला पूर्णाहुती होऊन महाआरती आणि विशेष देवी प्रार्थना करण्यात येणार आहे. मंगळवारी चित्रा नक्षत्रावर संध्याकाळी ६ ते रात्री १० दरम्यान मरुबाई मातेच्या मुखवट्याची पालखी मिरवणूक निघणार आहे. रात्री महाप्रसादाचे आयोजन होऊन चैत्र नवरात्री उत्सव सोहळ्याची सांगता होणार आहे.
मी दरवर्षी या सोहळ्यामध्ये सहभागी होते, असे के. जे. सोमय्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी दिशा राजीव शर्मा हिने सांगितले. देवीच्या दर्शनाने जीवनाचे सार्थक होते, असे स्नेहल कांबळे या गृहिणीने सांगितले.
देवीच्या चैत्री नवरात्री उत्सवामध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात, असे मंदिर विश्वस्त अनिल गावंड यांनी सांगितले.
आज नवचंडी हवन
चैत्र नवरात्री उत्सवानिमित्त विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. मंगळवारी पुष्प नक्षत्रावर दुर्गाष्टमी असून सकाळी ११ वाजता कुमारी पूजनाने नवचंडी हवनाचा प्रारंभ होणार आहे.