मुंबई : मुंबई बंदरातील अग्निशमन सेवा केंद्रात उभारलेल्या स्मृतीस्तंभासमोर राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवसानिमित्त त्या सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी १४ एप्रिलला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबईतील गोदी मध्ये उभ्या असलेल्या लंडनच्या फोर्ट स्टायकिन या जहाजावर प्रचंड मोठा बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटामुळे संपूर्ण मुंबई हादरली होती. आत्तापर्यंत मुंबईमधील ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. मुंबई गोदीतील विक्टोरिया डॉक्स संपूर्णपणे उध्वस्त झाले होते. ही आग विझवताना मुंबईशमन दलाचे ६६ धैर्यवान जवान शहीद झाले. गोदीमधील नेवी, कस्टम, पोलीस, सिविल डिफेन्स, मुंबई पोर्ट ट्रस्ट इत्यादी व्यवस्थापनात काम करणाऱ्या २३१ जणांचा मृत्यू झाला. १४ जहाजे नष्ट झाली. गोदी बाहेरील ५०० नागरिकांचा मृत्यू झाला. मुंबई अग्निशमन दलाच्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार १९६६ पासून, १४ एप्रिल हा दिवस अग्नी सेवा दिवस किंवा शहीद दिवस म्हणून संबोधला जातो. हा दिवस शिस्त, शौर्य, धैर्य, समर्पण व निष्ठा यांचे प्रतीक आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या विजय सोमा सावंत यांनी आपल्या खास शैलीत, त्यावेळच्या त्या भीषण दुर्घटनेचे अंगावर शहारा आणणारे प्रसंग उपस्थितांच्या नजरेसमोर उभे केले. या कार्यक्रमास महाराष्ट्र फायर सर्व्हिस, नेवल डॉकयार्ड फायर ब्रिगेड, मुंबई अग्निशमन दल, मुंबई बंदर प्राधिकरण पोर्ट सेफ्टी अँड फायर सर्व्हिस, मुंबई पोलीस, सी.आय.एस.एफ., महाराष्ट्र सुरक्षा बल, मुंबई बंदर प्राधिकरण सिव्हिल डिफेन्स इत्यादी तुकड्यां सोबतच, मुंबई बंदराचे डेप्युटी कंजर्वेटर कॅप्टन बाबातोष चांद तसेच, महाराष्ट्र फायर सर्विस चे डायरेक्टर एस. एस. वारीक, मुंबई अग्निशमन दलाचे चीफ फायर ऑफिसर श्री. अंबुलगेकर, राष्ट्रपती पदकाने सन्मानित मुंबई बंदराचे पोर्ट सेफ्टी अँड फायर सर्विस ऑफिसर इंदरजीत चड्डा, मुंबई बंदराचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे, ट्रॅफिक मॅनेजर एस. एस. शिंदे, मुंबई बंदराचे माजी विश्वस्त सुधाकर अपराज, भारत पेट्रोलियम चे चीफ जनरल मॅनेजर ए. के. दास, हिंदुस्थान पेट्रोलियमचे जनरल मॅनेजर नितीन वरखेडकर, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरचे चीफ फायर ऑफिसर टी.व्ही. दिनेश इत्यादी मान्यवर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.