नवी मुंबई : स्वच्छतेप्रमाणेच एकल वापर प्रतिबंधावरही विशेष लक्ष दिले जात असून नागरिकांच्या प्रबोधनासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवायांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रात एपीएमसी मार्केट येथे जयेश कुमार अँड कंपनी या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसेच नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त कारवाईत 2.5 टन इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला.

या कारवाईप्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम, क्षेत्र अधिकारी अजित देशमुख व शशिकांत पाटील यांच्या समवेत नवी मुंबई महानगरपालिकेचे तुर्भे विभाग सहाय्यक आयुक्त भरत धांडे, स्वच्छता अधिकारी जयेश पाटील, स्वच्छता निरीक्षक जयश्री आढळ, सुषमा देवधर, योगेश पाटील उपस्थित होते.

या कारवाईत जयेश कुमार अँड कंपनी यांचेकडून साधारणत: 2.5 टनाहून अधिक प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले तसेच संबंधितांकडून रू. 5 हजार व सरस फुड्स मार्ट, एपीएमसी मार्केट यांच्याकडून रुपये 5 हजार अशी एकूण रू. 10 हजार दंडात्मक शुल्क वसूली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हा मोठ्या प्रमाणात जप्त केलेला प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी क्रशिंगसाठी पाठवण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *