मुंबई : मुंबईला एक्सडीआर टीबीचा वाढता धोका असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. मुंबईतील क्षय रुग्णांच्या नमुन्यांच्या केलेल्या संपूर्ण जीनोम सिक्वेसिंगमधून ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. यात ६०० पैकी ५१ टक्के नमुन्यांमध्ये एक्सडीआर टीबी असल्याचे निदान झाले असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. हॅस्टॅक अॅनॅलिटिक्सने पालिकेच्या सहकार्याने केलेल्या सर्वेक्षणानुसार टीबीसाठी देणाऱ्या चारपेक्षा जास्त औषधांचा टीबी रुग्णांवर परिणाम होत नसून हा एक्सडीआर टीबी तरुणांमध्ये सर्वाधिक पसरत आहे.

कोविड काळात पालिकेने मुंबईसह इतर परिसरातील प्रामुख्याने ६०० एमडीआर टीबी रुग्णांचे नमुने गोळा केले होते. पालिकेने टीबीवरील उपचार देऊनही या रुग्णांवर औषधांचा परिणाम झाला नाही. दोनपेक्षा जास्त औषधे या रुग्णांवर वापरली; पण त्यांना फरक न पडल्याने हे रुग्ण एमडीआर म्हणजेच (मल्टी ड्रग रेसिस्टन्स) असल्याचे समजले. त्यामुळे प्राथमिक स्तरावर या रुग्णांचे नमुने पालिकेने जीनोम सिक्वेसिंगसाठी पाठवले. या जिनोम सिक्वेसिंगच्या अहवालानुसार, ६०० पैकी ५१ टक्के रुग्णांमध्ये प्री-एक्सडीआर (एक्सटेंसिव ड्रग रेजिस्टेंट) संसर्ग झाला होता. ज्या रुग्णांवर चारपेक्षा जास्त औषधांचा फारसा परिणाम होत नाही, असे रुग्ण एक्सडीआर टीबी या श्रेणीत मोडतात.

सामान्यपणे, टीबी रुग्णांवर वेगवेगळ्या १८ औषधांपासून तयार केलेल्या औषधांचा वापर केला जातो. एमडीआर रुग्णांना दोन औषधांपासून तयार केलेले औषध दिले जाते; पण अनेकदा रुग्णांवर टीबीची काही औषधे प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे डॉक्टर वेगवेगळे फॉर्म्युल्यातून रुग्णांच्या आजाराच्या तीव्रतेनुसार औषधे देतात. त्यानुसार ज्या रुग्णांना एमडीआर टीबी होता, त्या रुग्णांच्या नमुन्याचे जीनोम सिक्वेंसिग केले गेले. या जीनोम सिंक्वेसिंगमधून रुग्णावर कोणती औषधे प्रतिसाद देतात आणि कोणती नाही, हेदेखील समजते. सद्यस्थितीत पालिका सी-डीएसटी म्हणजेच कल्चर डीएसटी ही चाचणी टीबी रुग्णांसाठी वापरत आहे. या तपासणीच्या अहवालासाठी किमान नऊ आठवडे लागतात. या चाचणीतून १२ ते १३ औषधांचा प्रतिसाद कळतो.

काय सांगतात तज्ज्ञ?

मुंबईत तरुणांमध्ये प्री- एक्सडीआर टीबीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या रुग्णांवर चारपेक्षा जास्त औषधांपासून तयार केलेले औषधही प्रतिसाद देत नाही. यापेक्षा जास्त तीव्र संसर्ग असणाऱ्या रुग्णांवर आठ औषधांपासून तयार केलेले औषध काम करत नाही. या रुग्णांना बिडाक्युलिन, डेलामाईन ही औषधे द्यावी लागतात.

जीनोम सिक्वेसिंग केलेल्या ६०० एमडीआर नमुन्यांपैकी अर्ध्याहून अधिक ५१ टक्के लोकांमध्ये एक्सडीआर टीबीचा संसर्ग आढळला. विशेष म्हणजे त्यांना आधीपासूनच एक्सडीआरचा संसर्ग असल्याचा निष्कर्ष काढला आहे. अभ्यासात तरुण वयोगटात संसर्ग आढळला आहे.

– अनिर्वन चॅटर्जी, प्रमुख अभ्यासक

एमडीआर आणि जे रुग्ण औषधांना प्रतिसाद करत नव्हते, त्या टीबी रुग्णांचे नमुने दोन वर्षांपूर्वी अभ्यासासाठी पाठवण्यात आले होते. सामान्य लोकांमधून नमुने घेण्यात आले नव्हते. याचा हा अहवाल आता प्रसिद्ध झाला आहे. जीनोम सिक्वेसिंग ही पद्धती पालिकेने आता टीबी रुग्णांच्या तपासणीसाठी पूर्ण क्षमतेने वापरायला हवी. जेणेकरून लवकर योग्य निदान होणे शक्य होईल.

– डॉ. मंगला गोमारे, माजी कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *