मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व क्षत्रिय युनियन क्लब ( क्षात्रैक्य समाज, दादर, मुंबई ) यांच्या संयुक्त विद्यमाने कॅरमची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनमाळी वातानुकूलित हॉल, छबिलदास मार्ग, दादर-पश्चिम येथे दिनांक ४ ते ६ मे दरम्यान राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कॅरम खेळासाठी क्षात्रैक्य समाज, दादर, मुंबईचे योगदान फार मोठे असून एकेकाळी वनमाळी हॉलच्या स्पर्धेने हंगामाची सुरुवात होत असे. जवळपास महिनाभर चालणारी क्षत्रिय युनियन क्लबची स्पर्धा खेळाडू व क्रीडा रसिकांसाठी पर्वणी असे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यंदा ७० व्या वर्षात पदार्पण करत असल्यामुळे या विशेष स्पर्धेने हंगामाची सुरुवात करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला असून क्षत्रिय युनियन क्लबनेही स्पर्धेसाठी आपला वातानुकूलित हॉल उपलब्ध करून दिला आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून विजेत्या खेळाडूंना तब्बल १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडूंनी आपल्या क्लब मार्फत आपली नावे दिनांक २४ एप्रिल २०२४ पर्यंत जिल्हा संघटनेकडे नोंदवावीत. तर जिल्हा संघटनेने प्राप्त नावे दिनांक २५ एप्रिल २०२४ पर्यंत महाराष्ट्र कॅरम असोसिशनकडे पाठवावीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *