रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार सखी महोत्सव

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या सेनेने महिलांचे एकत्रिकरण करून त्यामाध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ठाण्यात सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा महोत्सव पार पडणार आहे. या मेळाव्याला ठाणे लोकसभा मतदार संघ क्षेत्रातील ५० हजाराहून अधिक महिला उपस्थित राहू शकतील, असे नियोजन शिंदेच्या सेनेकडून आखले जात आहे.

ठाणे लोकसभा मतदार संघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात आहे. यामुळे शिंदेंची सेना या जागेसाठी आग्रही आहे. तर भाजपकडूनही या मतदार संघावर दावा करण्यात येत आहे. यामुळे या जागेचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. उमेदवार जाहीर झाला नसला तरी युतीच्या स्थानिक नेत्यांनी मात्र मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. शिंदेच्या सेनेकडून शहरात ठिकठिकाणी मेळावे घेण्यात येत असून त्याचबरोबर महिला बचत गटांना अनुदानाचे वाटप करून आपलेसे करण्याचा प्रयत्न शिंदेच्या सेनेने केला होता. यावरून विरोधकांनी टीका केली होती.

कोकण पट्ट्यातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपने नारायण राणे यांना उमदेवारी दिली आहे. महायुतीच्या जागा वाटपात रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपकडे गेल्याने ठाण्याच्या जागेचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या वाटाघाटीत आता ठाण्याची जागा शिंदेच्या सेनेला मिळेल, हे जवळपास निश्चित झाले आहे. यामुळे शिंदेंची सेना अधिक जोमाने कामाला लागण्याचे दिसून येत असून त्यासाठी ठाण्यात सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा महोत्सव पार पडणार आहे. निवडणूक काळात महिला मतदारांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. यामुळेच महिला मतदारांवर लक्ष केंद्रित करून शिंदेच्या सेनेने या महोत्सवाचे आयोजन केल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात शिंदेच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात सखी महोत्सव पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले। तर, या महोत्सवाला ठाणे लोकसभा मतदार संघ क्षेत्रातील ५० हजाराहून अधिक महिला उपस्थित राहणार असल्याचे शिंदेच्या शिवसेनेचे महिला ठाणे जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *