जलसाठा २२.६१ टक्क्यांवर, कपातीबाबत पालिकेची चालढकल

मुंबई : वाढणाऱ्या तापमानाबरोबरच मुंबईकरांना पाणी पुरवणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठा झपाटयाने कमी होत आहे. आजघडीला धरणांत केवळ २२.६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धरणांमधील सुमारे तीन लाख २७ हजार २८९ दशलक्ष लिटर आणि राखीव जलसाठा पावसाळयापर्यंत पुरवून वापरावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पाणीकपात लागू करणे आवश्यक असतानाही मुंबई महापालिका चालढकल करीत आहे.

मुंबईकरांना अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे धरणांमध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा होता. मात्र, धरणांतील साठा वेगाने कमी झाल्याने अप्पर वैतरणातील ९१ हजार ३०० दशलक्ष लिटर आणि भातसातील एक लाख ३७ हजार दशलक्ष लिटर अतिरिक्त राखीव पाणी उपलब्ध झाले आहे. पालिकेच्या २० एप्रिलच्या आकडेवारीनुसार सातही धरणांमध्ये तीन लाख २७ हजार २८९ दशलक्ष पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, भविष्यात उन्हाळयामुळे धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन होऊन साठा खालावण्याची शक्यता आहे.

मेमध्ये निर्णय?

पावसाळा सुरू होईपर्यंत धरणांतील उपलब्ध साठा आणि राखीव साठयातील पाण्याचे नियोजन करूनच पाणी पुरवावे लागणार आहे. मात्र मे महिन्यात धरणांतील जलसाठयाचा आढावा घेऊन पुरवठयाचे नियोजन करण्यात येईल. त्यावेळच्या परिस्थितीनुसार पाणीकपात करायची का, किती टक्के करायची? जलतरण तलावांच्या पाणी वापरावर निर्बंध घालायचे का, याबाबत मे मध्ये निर्णय घेण्यात येईल, असे जल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *