ठाणे : पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेतर्फे सोमवारी (ता. २२) आनंद विश्व गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘माझी वसुंधरा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची ‘प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक’ ही थीम होती. यावेळी विद्यार्थ्यांना मित्तल पार्क आणि प्रकृती सोसायटीच्या आवारात असणाऱ्या हेरिटेज ट्रीबाबत माहिती देण्यात आली.
परिसरात जांभूळ, आंबा, वड, निलगिरी यांसारख्या हेरिटेज वनस्पती आहेत. तसेच आसाणा, आपटा, काटेसावर, पारिजातक, आंबा अशा अनेक वनस्पतीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. आमराईतल्या आंब्याचे महत्त्व सांगण्यात आले. आमराईच्या परिसरातील अनेक झाडांच्या बिया खाली पडल्या होत्या. त्या बिया विद्यार्थ्यांना गोळा करण्यास सांगितले. तसेच या बियांचे रोपण कसे करावे, याबाबत हरियाली संस्थेचे ओम प्रकाश यांनी माहिती दिली.
प्रकृती सोसायटीच्या सभासद वीणा जोशी यांनी सोसायटीच्या आवारात असलेल्या कचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पाला विद्यार्थ्यांसोबत भेट दिली. आपल्या वसुंधरेला हरित ठेवायचे असेल, तर सर्वांना कचरा व्यवस्थापन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. वसुंधरेचे संतुलन राखण्यासाठी नैसर्गिक स्रोतांचा काळजीपूर्वक वापर करणे आवश्यक आहे. तर ‘माझी वसुंधरा माझी जबाबदारी’ हे ब्रीदवाक्य सर्वांनी अंगीकारले पाहिजे. माझी वसुंधरा मी कशी समृद्ध करणार याची प्रत्येकाने जबाबदारी घेणे आवश्यक आहे, असे पौर्णिमा शिरगावकर यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी मित्तल पार्कचे कार्यकारिणी सभासद करमरकर तसेच उल्हास प्रधान, पूनम शाह, स्मिता खराडे, संजय बाबर आदी उपस्थित होते.
