मुरबाड : महाविकास आघाडी घटकपक्ष तर्फे मुरबाड येथे कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दांडी मारल्याने आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाचे मुरबाड तालुका संपर्कप्रमुख संतोष जाधव यांनी वरिष्ठ नेत्यांचे फोटो बॅनरवर टाकले नसल्याने शिवसैनिकही संभ्रमात पडले आहेत.
भिवंडी मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे काँग्रेसने या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पक्षाची जिल्हापातळीवर चर्चा सुरू आहे. भिवंडी लोकसभा निवडणुकीत बाळ्या मामा म्हात्रे यांना पाठिंबा देण्याबाबत अंतिम निर्णय झाल्यावर आम्ही प्रचारात उतरणार असल्याचे मुरबाड तालुका काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष चेतन पवार यांनी सांगितले. दरम्यान, भाजप नेते व मुरबाड नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे हे म्हात्रे यांचे कट्टर समर्थक आहेत. मुरबाड तालुक्यातील प्रचाराची धुरा त्यांच्यावर आहे; पण मेळाव्यात ते शेवटपर्यंत व्यासपीठावर राहिले नाहीत.
