तलाव परिसर स्वच्छता, खुली पर्यावरण कार्यशाळा, चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन

ठाणे : रायलादेवी तलाव परिसर स्वच्छता, खुली पर्यावरण कार्यशाळा, चित्रकला स्पर्धा आणि प्लास्टिक कचऱ्याचे संकलन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून ठाणे महापालिकेतर्फे सोमवार, २२ एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला.

परिसर भगिनी विकास संघ या स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांनी रायलादेवी तलाव परिसराची स्वच्छता केली. या मोहिमेत भीम नगर येथील अभ्यास वर्गातील विद्यार्थी, कचरा वेचक महिला, महापालिका कर्मचारी यांनी सहभाग घेतला. त्यांनी या अभियानात परिसरातून २५ किलो प्लास्टिक कचरा संकलित केला. याप्रसंगी, विद्यार्थ्यांना वसुंधरा दिनाविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर, या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

ठाणे महापालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांनी नागरिकांना पर्यवरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ऑनलाईन खुल्या पर्यावरण शाळेचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात, २२ एप्रिल रोजी डॉ. संजय जोशी यांचे व्याख्यान झाले. त्यांनी पर्यावरण चळवळ, त्याची सुरूवात, वसुंधरा दिनाचा इतिहास याची माहिती दिली. यंदाच्या वसुंधरा दिनाची संकल्पना ग्रह वि. प्लास्टिक अशी आहे. त्याअनुषंगाने, डॉ. जोशी यांनी प्लास्टिकचा वाढता वापर, त्याच्या विविध प्रकारांमुळे होणारे प्रदूषण आणि त्याचा पर्यावरणावर होत असलेला परिणाम याची माहिती उदाहरणांसह दिली. तसेच, दैनंदिन जीवनशेलीमध्ये प्लास्टिक वापरामुळे होणारा कचरा कमी करण्यासाठी सोप्या उपायांचा अवलंब करण्याची आवश्यकता त्यांनी सांगितली.

आतापर्यंत या कार्यशाळेची १० सत्रे झाली आहेत. ती आपलेपर्यावरण या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत. ही सत्रे दर शुक्रवारी दु. ४ ते. सायं. ६ या वेळात ऑनलाईन होतात. त्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या प्रमुख पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी केले आहे.

जागतिक वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर, वाढत्या उष्णतेचा मुकाबला करण्यासाठी महापालिका सज्ज असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. त्यानुसार, उष्णतेच्या लाटेबाबत जनजागृती, वृक्ष लागवड, संवर्धन, पिण्याच्या पाण्याचा जपून वापर, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुर्नवापर यावरही भर देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले असल्याचेही मनिषा प्रधान यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *