महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे प्रतिपादन
स्वच्छ सर्वेक्षण २०२४ साठी सर्व विभागांनी एकत्रित समन्वय साधून काम करण्याचे निर्देश
ठाणे : स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत साध्य करायची सगळी उद्दिष्ट ही महापालिका म्हणून आपली प्राथमिक कर्तव्य आहेत. त्यामुळे ती साध्य करण्यासाठी संपूर्ण महापालिकेने एक टीम बनून योग्य रणनीती आखून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले.
स्वच्छ सर्वेक्षण २०२४ ची तयारी सुरू झाली आहे. त्याची माहिती देऊन उद्दिष्ट पूर्तीसाठी अधिकाऱ्यांचे क्षमता वृध्दी सत्र महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे गेल्या आठवड्यात आयोजित करण्यात आले होते. या सत्रामध्ये, ठाणे महापालिकेने २०२३मध्ये केलेली कामगिरी, त्यातील त्रुटी, सुधारणा यांची माहिती देण्यात आली. तसेच, २०२४साठी अपेक्षित असलेली उद्दिष्ट, त्यासाठी तयारी, जनजागृती आणि लोक सहभाग याबद्दल सविस्तर सादरीकरण घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आले. प्रास्ताविक उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार यांनी केले.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला केंद्र सरकारने शास्त्रोक्त स्वरूप दिले आहे. इंदोर, नवी मुंबई, पुणे, पिंपरी- चिंचवड आदी ठिकाणी त्यांचे सकारात्मक परिमाण दिसले आहेत. तेथील चांगल्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्या महापालिका क्षेत्रात त्यातील कोणत्या गोष्टी घेता येतील याचा अभ्यास करण्याच्या सूचना या सत्रात आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.
या अभियानात चांगले गुण मिळवणे हे एक प्रमुख साध्य आहेच, परंतु, या सगळ्या गोष्टी नागरिकांचे जीवनमान उंचावण्याशी निगडित आहे. महापालिकेची जी प्राथमिक जबाबदारी आहे तीच या अभियानाची उद्दिष्ट्ये आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जावे. सहायक आयुक्त यांच्या नेतृत्त्वाखाली सगळ्या टीमने काम करावे. मुख्यालयातून त्यासाठी आवश्यक धोरण ठरवले जाईल. त्याशिवाय, स्थानिक पातळीवर नावीन्यपूर्ण उपक्रम करावेत, अशी सूचना आयुक्तांनी केली. त्यासाठीच, प्रभाग समिती स्तरावर स्वच्छ वॉर्ड ही स्पर्धाही आयोजित केली जात असल्याची घोषणा यावेळी आयुक्त राव यांनी केली.
त्यावेळी, अतिरीक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मनीष जोशी, उमेश बिरारी, दिनेश तायडे, वर्षा दीक्षित, सर्व सहायक आयुक्त, सर्व विभाग प्रमुख आदी अधिकारी उपस्थित होते.
