अर्ज भरण्यापूर्वी डोंबिवलीतून निघणार भव्य मिरवणूक

डोंबिवलीः कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे २ मे रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार असून त्यांच्यासह शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रासप, पिपल्स रिपब्लिकन पार्टी या महायुतीच्या घटकपक्षांचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन डॉ. श्रीकांत शिंदे अर्ज भरण्यासाठी जातील. श्री गणेश मंदिरापासून संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलापर्यंत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यंदा तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मागील १० वर्षात त्यांनी कल्याण लोकसभेत केलेल्या कामांचा स्मार्ट रूपातील कार्य अहवाल नुकताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी स्वतः खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या १० वर्षातील कामांचे सादरीकरण करत उभारलेल्या प्रकल्पांची माहिती उपस्थितांना दिली. सध्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. तर गुरूवार, २ मे रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी मोठी मिरवणूक काढली जाणार आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया, राष्ट्रीय समाज पक्ष, पिपल्स रिपब्लिकन पार्टी या पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

गेल्या महिन्याभरापासून डॉ. श्रीकांत शिंदे मतदारसंघात निवडणूक प्रचारार्थ विविध मान्यवर मंडळींशी भेटी, पदाधिकाऱ्यांशी संवाद यासह अनेक सार्वजनिक उपक्रमांना उपस्थित राहात आहेत. तसेच विविध समाज संघटनांकडून डॉ. श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठींबा देखील जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर २ मे रोजी निघणाऱ्या मिरवणुकीला लाखोंच्या संख्येने शिवसैनिक तसेच विविध समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

असा असेल मिरवणुकीचा मार्ग –

डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिरात सकाळी ९ वाजता दर्शन घेऊन डॉ. श्रीकांत शिंदे अर्ज दाखल करण्यासाठी निघतील. गणेश मंदिरापासून सुरू होणारी मिरवणूक बाजीप्रभू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चार रस्ता नाका, लोकमान्य टिळक चौकामार्गे जिमखाना रस्त्यावरून संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलापर्यंत जाईल आणि डॉ. श्रीकांत शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *