शिंदे गटाकडून मुंबईतील उमेदवारांची घोषणा

मुंबई : दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव तर वायव्य मुंबईतून रविंद्र वायकर यांना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. यामिनी जाधव या दक्षिण मुंबईत ठाकरे सेनेच्या अरविंद सावंत यांना टक्कर देणार आहेत. तर रविंद्र वायकर हे ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

यामिनी जाधव या भायखळा येथून शिवसेनेच्या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांना दक्षिण मुंबईत काम करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी नगरसेविका म्हणूनही काम केलं आहे. तसंच त्यांनी विविध पदंही भुषवली आहेत. या जागेसाठी मंगलप्रभात लोढा इच्छुक होते. मात्र एकनाथ शिंदे यांना ही जागा स्वतःकडे ठेवण्यात यश आलं आहे.

“मला उमेदवारी जाहीर झाल्याचा अतिशय आनंद झाला आहे. मला जी संधी दिली आणि जो विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवला त्यानंतर सगळेच जण उत्तम तयारी करतील. महायुतीने जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी आभार मानते. अरविंद सावंत यांचा विचार मी करण्यापेक्षा महायुतीची कामं काय? मोदींची कामं काय ? हे सगळं मी सांगणार आहे. या लढतीकडे मी आव्हानात्मक लढत म्हणून पाहते निवडणुकीतली प्रत्येक लढत आव्हानात्मकच असते.” असं यामिनी जाधव यांनी म्हटलं आहे. या मतदार संघातून गेल्या निवडणूकीत पराभूत झालेले काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनी याआधिच शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडूनही आले आहेत.

दुसरीकडे अमोल किर्तिकर यांच्या विरोधात एकेकाळचे त्यांचेच सहकारी असणारे रविंद्र वायकर उभे राहणार आहेत. अगदी दोन महिन्यापुर्वीपर्यंत उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू म्हणून रविंद्र वायकर ओळखले जायचे. पण ईडीच्या कारवाईच्या भीतीनेत त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला. आणि आज त्यांना लोकसभेचे तिकीट मिळाले. या दोन्ही लढतीत ठाकरे विरुध्द शिंदे असा मुकाबला होणार असल्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे या लढतीकडे लक्ष लागलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *