ठाणे : आतापर्यंत लोकसभेसाठी देशात झालेल्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदान टक्केवरीत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगावर केला आहे.

निवडणूक आयोग मतदानाचे प्रत्यक्ष आकडे देण्याऐवजी केवळ टक्केवारी देत असून त्यातही वाढ कशी झाली, याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले आहे. या दोन्ही टप्प्यात किती मतदान झाले, याची माहिती निवडणुक आयोगाने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. परंतु या आकडेवारीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेत निवडणुक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. पहिल्या टप्यातील मतदानाची आकडेवारी ११ दिवसानंतर तर दुसऱ्या टप्यातील मतदानाची आकडेवारी ४ दिवसानंतर निवडणूक आयोगाने जाहीर केली. उशीराने जाहीर केलेली आकडेवारी आणि आधी जाहीर केलेली आकडेवारी तफावत असून मतदान टक्केवारीत ३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे टक्केवारीत घोटाळा झाला आहे, आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

निवडणूक आयोग मतदानाचे प्रत्यक्ष आकडे देण्याऐवजी केवळ टक्केवारी दिली आहे. मतदान पार पडले, त्याच दिवशी मतदानाची टक्केवारी जाहिर करायला हवी होती. मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यास इतका उशीर का झाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. अशा चुकांमुळेच मतदान यंत्राबाबत संशयाचे वातावरण असून निवडणुक आयोगाने जाहीर केलेली आकडेवारी संशयास्पद आहे. मी पुराव्यानिशी बोलत असून याबाबत निवडणुक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सत्ताधाऱ्यांचा हिंदुत्वाचा अजेंठा फेल गेला आहे. इतर देशात लोकशाहीबद्दल राज्यकर्त्यांना चिंता असते. इथे मात्र काहीच नाही. निवडणूक आयोग कटपूतली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *