विशेष
श्याम ठाणेदार
पुढील महिन्यात २ जून ते २९ जून या कालावधीत अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशात टी २० विश्वचषक स्पर्धा होणार असून या स्पर्धेपसाठी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी नुकताच १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. या संघातील रोहित शर्मा व युवा यशस्वी जयस्वाल हे भारताचे अनुभवी आणि युवा खेळाडू भारताच्या डावाची सुरवात करतील. रोहित शर्मा हा उजव्या हाताने खेळणारा तर यशस्वी जयस्वाल हा डावखुरा असल्याने ही उजवी डावी सलामीची जोडी प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरणार यात शंका नाही. मधल्या फळीची जबाबदारी विराट कोहली, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे तसेच यष्टीरक्षक ऋषभ पंत यांच्यावर टाकण्यात आली असून अनुभवी संजू सॅमसन या आणखी एका अतिरिक्त यष्टीरक्षकाला संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही तडाखेबंद फलंदाज असून फिनिशर म्हणूनही जबाबदारी पार पाडतात. भारताची फलंदाजी अतिशय बलवान असून रोहित, यशस्वी जयस्वाल व विराट हे पहिल्या तीन क्रमांकाचे फलंदाज जगातील सर्वोत्तम फलंदाज मानले जातात. विशेष म्हणजे तिघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आयपीएलमध्ये हे तिघेही चांगली कामगिरी करत आहेत. आयपीएलमध्ये रोहित आणि यशस्वीने अर्धशतकी खेळी केल्या आहेत. विराट तर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गेल्या काही महिन्यांपासून विराट पुन्हा लयीत आला असून त्याने आयपीएलमध्ये काही शतके झळकावून प्रतिस्पर्धी गोलंदाजांना इशारा दिला आहे. तो फॉर्मात आल्याने विश्वचषक जिंकण्याच्या भारताच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर युवा शिवम दुबे येईल. दुखापतीतून तो सावरला असून भारताचा तो भरवशाचा फलंदाज आहे .आयपीएल मध्ये तो तुफान फॉर्मात असून त्याने आपल्या तडाखेबंद फलंदाजीने चेन्नई ला अनेकदा विजय मिळवून दिले आहे. तो षटकार खेचण्यात माहीर आहे. उंचच उंच षटकार खेचून तो प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा पालापाचोळा करत आहे. आयपीएल मध्ये सर्वाधिक षटकार त्यानेच मारले आहेत. त्यानंतर फलंदाजीला येईल तो टी २० स्पेशिलिस्ट मिस्टर ३६० सुर्यकुमार यादव. तो मैदानात सर्वत्र फटकेबाजी करू शकतो. तो भारताचा भरवशाचा फलंदाज मानला जातो. भारताला एकहाती विजय मिळवून देण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्यानंतर ऋषभ पंत किंवा संजू सॅमसन हे यष्टीरक्षक फलंदाज मैदानात येतील दोघेही स्फोटक फलंदाज असून मॅच फिनिशर आहेत. कमी चेंडूत जास्त धावा काढून संघाला विजय मिळवून देण्यात दोघांचाही हातखंडा आहे. त्यानंतर हार्दिक पांड्या हा जगातील सध्याचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू येईल. तो गोलंदाजी, तडाखेबंद फलंदाजी आणि प्रभावी क्षेत्ररक्षण करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावतो. त्याने आपल्या अष्टपैलू खेळीने भारताला अनेक विजय मिळवून दिले आहेत. रवींद्र जडेजा हा आणखी एक अष्टपैलू खेळाडू भारतीय संघात आहे. डावखुरी फिरकी गोलंदाजी आणि तडाखेबंद फलंदाजी हे त्याचे वैशिष्ट्ये आहे. शिवाय तो जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकही आहे. गोलंदाजीमध्ये निवड समितीने दोन फिरकी गोलंदाजांना संधी दिली असून अनुभवी यजुवेंद्र चहल सोबत फॉर्मात असलेला चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याला संधी मिळाली आहे. दोघेही अनुभवी फिरकी गोलंदाज आहेत. फिरकी गोलंदाजीत विविधता आहे. जडेजा, चहल आणि कुलदीप तिघेही फॉर्ममध्ये आहे. जडेजा हा भारताचा सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे शिवाय तो फलंदाजीही करतो आणि चांगला क्षेत्ररक्षक आहे म्हणजे तो एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. कुलदीप यादव जरी डावखुरा असला तरी ती चायनामन गोलंदाज आहे आणि विशेष म्हणजे तो फॉर्ममध्ये आहे. फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूला संधी देणे केंव्हाही चांगले. यजुवेंद्र चहल अनुभवी असून त्याच्या गोलंदाजीत विविधता आहे. फलंदाजांना फसवण्यात त्याचा हातखंडा आहे. जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज या अनुभवी वेगवान गोलंदाजांसोबत अर्षदिप सिंग या डावखुऱ्या युवा गोलंदाजाला देखील निवड समितीने संधी दिली आहे. निवड समितीने अर्षदीप सिंग या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला संधी देऊन वेगवान गोलंदाजीत देखील विविधता आणली आहे. निवड समितीने निवडलेला हा संघ चांगला आहे. जुन्या आणि नव्या खेळाडूंना संधी देत जोश आणि होश यांचे संतुलन साधण्याचा प्रयत्न निवड समितीने केला आहे त्यात ते बऱ्यापैकी यशस्वीही ठरले आहेत. विश्वचषकासाठी निवडण्यात आलेला हा संघ संतुलित आहे हे मान्य करून नीवड समितीचे याबाबत अभिनंदन करावे लागेल. आता जबाबदारी आहे ती निवडण्यात आलेल्या या १५ खेळाडूंची. २००८ नंतर भारताला टी २० विश्वचषकावर नाव कोरण्यात अपयश आले आहे. हे अपयश झटकून नव्याने सुरवात करण्याची संधी या निमित्ताने या संघाला मिळणार आहे. सर्व खेळाडू अनुभवी आहेत. टी २० सामने खेळण्याचा सर्वांना मोठा अनुभव आहे. ही स्पर्धा जरी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार असली तरी आपले सर्व खेळाडू व्यवसायिक आहेत शिवाय यातील बरेच खेळाडू तिथे याआधी खेळले आहेत त्यामुळे तेथील खेळपट्टीचा अंदाज भारतीय खेळाडूंना आहे त्यामुळे अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या मैदानावर देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करून भारताला १६ वर्षांनंतर टी २० विश्वचषक जिंकून देण्याची जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतील अशी आशा करूया. भारतीय संघाला टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी मनापासून शुभेच्छा!